बेल, अँड्रू : (२७ मार्च १७५२-२७ जानेवारी १८३२). स्कॉटिश शिक्षणतज्ञ व मद्रास शिक्षण पद्धती किंवा सहाध्यायी (मॉनिटिरीएल ) शिक्षण पद्धतीचा प्रवर्तक जन्म सेंट अँड्रूज (स्कॉटलंड) येथे. सेंट अँड्रूज विद्यापीठात तयाने शिक्षण घेतले. शिक्षणानंतर अमेरिकेतील व्हर्जिनीया वसाहतीत खासगी शिक्षक म्हणून त्याने काम केले. (१७१४-८१). स्कॉटलंडला परतल्यावर अँग्लीकन चर्चचा धर्मोपदेशक (क्लर्जिमन) म्हणून त्याने दिक्षा घेतली. इ. स. १७८७ मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्कराबरोबर धर्मोपदेशक म्हणून तो भारतात आला. मद्रास येथील यूरोपीय सैनिकांच्या अनाथ मुलांसाठी असलेलया शाळेत अधिक्षक म्हणून त्याची नेमणूक झाली (१७८९). या शाळेत त्याने जो नवा प्रयोग केला, तो `वर्गनायक शिक्षणपद्धती’ किंवा `सहाध्ययायी शिक्षणपद्धती’ या नावाने ओळखला जातो. वर्गातीलच हुशार मुलांना प्राथमिक स्वरूपाचे पाइ शिकवून त्यांच्याकरवी सदर पाइ इतर विद्यार्थ्यांना शिकवण्याची सोय या पद्धतीत होती. प्रशिक्षित शिक्षकांच्या अभावी विद्यार्थ्यांची मोठी संख्या असलेल्या वर्गांना शिकविणे या पद्धतीमुळे शक्य झाले. मद्रासमधील एका स्थानिक शाळेतुन मुले धुळपाठीवरील अक्षरे गिरवीत असलेले पाहून त्याला आपल्या प्रयोगाची कल्पना सुचली.

बेल १७९१ मध्ये लंडनला परतला. मद्रास शिक्षणपद्धतीवर आधार-लेले ऍज एक्सपेरिमेंट इन एज्युकेशन (१७९७) नावाचे पुस्तक त्याने प्रकाशित केले. बेलच्या पद्धतीत काही फेरफार करून क्वेकर पंथीय जोसेफ लॅंकेस्टर याने त्या धर्तीवर इंग्लंडमध्ये बऱ्याच शाळा स्थापन केल्या. त्यामुळे ` बेल-लॅंकेस्टर शिक्षण पद्धत’ या नावानेही ही पद्धत ओळखली जाऊ लागली. पुढे बेलला डॉर्सेट शहराच्या परिसरात तशा पद्धतीच्या शाळा सुरू करण्याचे काम देण्यात आले. विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा देऊ नये या मताचा तो होता. शाळेतील कृतीशील अध्यययाने त्यांचा हसतखेळत विकास साधावा असे त्याचे मत होते. मद्रास शिक्षणपद्धती कमी खर्चाची, गरीबांच्या मुलांना परवडणारी व एकूण तत्कालीन पुरोगामी वातावरणाशी जुळणारी होती. या नवशिक्षण पद्धतीच्या प्रसारार्थ बेलने परदेशीगमन ही केले. (१८१६). इंग्लंडमध्ये बेल पद्धतीचा बराच प्रसार होऊन या पद्धतीचा अवलंब सु. १२ हजार शाळातुन करण्यात आला होता व त्यातुन सु. १० लक्ष मुले शिकत होती. बेलने त्याचे सबंध आयुष्य शिक्षणप्रसारासाठी वेचले. चेल्टनहॅम येथे त्याचे निधन झाले.

मिसार, म. ष्यं.