फुकुजावा, युकिची : (१० जानेवारी १८३५ – ३ फेब्रुवारी १९०१). जपानी शिक्षणतज्ञ, लेखक व जपानमधील पाश्चात्यीकरणाच्या चळवळीचा पुरस्कर्ता. ओसाका येथे एका गरीब सामुराई कुटुंबात जन्म. ओसाका येथील शाळेतच तो डच भाषा व विद्या शिकला. तत्कालीन जपानमध्ये डच विद्या म्हणजेच पश्चिमी विद्या समजले जाई व वस्तुस्थितीही तशीच होती.

फुकुजावाने तीनदा यूरोप-अमेरिकेचा प्रवास केला (१८६०, १८६२, १८६७). १८६० मध्ये प्रथमच संयुक्त संस्थानांत गेलेल्या जपानी शिष्टमंडळाचा तो एक सदस्य होता. यूरोपचा प्रवास करून त्याने शियो जिजो (शक्ति आणि स्वातंत्र्य) नावाचे सुबोध भाषेत व आवेशपूर्ण शैलीत पहिले पुस्तक लिहिले (१८६२). देशाचे राजकारण व समाजकारण यांत नावीन्य आणण्याविषयी जपानी देशबांधवांना त्यात आवाहन केले आहे. शंभरांहून अधिक पुस्तके त्याने लिहिली असून त्यांत संसदीय राज्यकारभार, सार्वत्रिक शिक्षण, भाषासुधारणा, स्त्रियांचे अधिकार, पाश्चात्य चालीरीती व संस्था इ. विषय हाताळलेले आहेत.

फुकुजावाने १८३८ (१८५८ ?) मध्ये एक लहान शाळा (केओगिजुकु) टोकिओमध्ये स्थापन केली व तिचेच पुढे केओ विद्यापीठात रूपांतर झाले (१८७१). फुकुजावाच्याच लेखन-प्रसारणेवरील विचारसरणीचा पुरस्कार या विद्यापीठात केला गेल्याने पुढील पिढी पाश्चिमात्य संस्कृतीच्या अनुकरणाकडे अधिक प्रमाणात वळली.

फुकुजावा हा जपानमधील पाश्वात्यीकरणाच्या चळवळीचा आद्य पुरस्कर्ता होय. जपान सरकारने विदेशी भाषांतील ज्ञानसंशोधन करण्यासाठी फुकुजावाला निमंत्रित केले पण त्याने त्यास नकार दिला. १८८२ मध्ये त्याने जिजी शिंपो नावाचे दैनिक काढले. लोकजागृतीसाठी त्याने या दैनिकात पाश्वात्यांचे आचारविचार व पाश्वात्य संस्थांच्या कार्याचे समालोचन केले. जपानचे एक प्रभावी पत्र म्हणून ते गाजले. १८९९ साली त्याचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. जपानच्या आधुनिकीकरणात त्याचे महत्त्वाचे आहे. टोकिओ येथे तो मरण पावला.

मिसार, म. व्यं.