फ्लोरस : फ्लोरस या नावाच्या एकूण तीन व्यक्ती प्राचीन लॅटिन साहित्यात आढळतात : (१) ल्यूशस ॲनिअस फ्लोरस, (२) ज्यूल्यस फ्लोरस आणि (३)पब्लिअस ॲनिअस फ्लोरस. ही तिन्ही एकाच व्यक्तीची नावे असावीत, अशी शक्यता अभ्यासंकाकडून सूचित केली जाते.
उपर्युक्त तीन नावांपैकी ल्यूशस ॲनिअस फ्लोरस आणि जूल्यस फ्लोरस ही दोन नावे रोमचा संक्षिप्त इतिहास सांगणाऱ्या एका ग्रंथाशी निगडित आहेत. Epitomae de Tito Livio Bellorum Omnium Annorum DCC Libri II हे त्या ग्रंथाचे नाव. विख्यात रोमन इतिहासकार लिव्ही ह्याने लिहिलेल्या रोमच्या इतिहासावर मुख्यतः आधारित असलेल्या हया ग्रंथाचे एकूण दोन खंड आहेत. सदर ग्रंथाच्या एका हस्तलिखितात त्याच्या कर्त्यांचे नाव ल्यूशस ॲनिअस फ्लोरस असे देण्यात आलेले असून दुसऱ्या एका हस्तलिखितात त्याचे नाव ज्यूल्यस फ्लोरस असे देण्यात आलेले आहे. रोम्यूलसपासून रोमन सम्राट ऑगस्टपर्यंतचा इतिहास Epitomae… मध्ये थोडक्यात दिलेला आहे. सम्राट ऑगस्टसचा काळ आणि आपला काळ ह्यांत सु. दोनशे वर्षांचे अतंर असल्याचे Epitomae… चा कर्ता सांगतो. जूल्यस सीझर ऑक्टेव्हिअस हयाला ‘ऑगस्टस’ ही पदवी इ.स.पू. २७ मध्ये प्राप्त झाली. सम्राट ऑगस्टसच्या काळापासूनची दोनशे वर्षे मोजताना इ.स.पू. २७ पासून आंरभ केला, तर फ्लोरसचा हा इतिहासग्रंथ रोमन सम्राट मार्कस ऑरेलिअस (कार. इ.स. १६१ -१८०) ह्याच्या कारकीर्दीत रचिला गेला, असे म्हणता येईल. ह्याउलट ही दोनशे वर्षे ऑगस्टसच्या जन्मापासून (इ.स.पू. ६३) मोजली तर हा ग्रंथ रोमन सम्राट हेड्रिएनस (कार. इ. स. ११७-१३८) हयाच्या कारकीर्दीत लिहिला गेला असा तर्क करता येतो. फ्लोरस नावाचा एक साहित्यिक हेड्रिएनसच्या मित्रवर्तुळात होताही. हा पब्लिअस ॲनिअस फ्लोरस होय. ह्या फ्लोरसने Vergillus orator an poeta ह्या नावाने लिहिलेल्या एका संवादाच्या प्रारंभकाचा काही भाग आज उपलब्ध आहे. ह्या फ्लोरसने कविताही रचिल्या. उमलून कोमेजणाऱ्या गुलाबपुष्पावर लिहिलेल्या त्याच्या पाच सुंदर कविता उल्लेखनीय आहेत. हा फ्लोरस आफ्रिकन होता.
Epitomae….. मध्ये रोमचा अतोनात गौरव केलेला आहे. निःपक्षपाती इतिहासकाराच्या भूमिकेतून हा ग्रंथ लिहिलेला दिसत नाही. त्याची शैलीही फार आलंकारिक आहे. मध्ययुगात हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय ठरला.
कुलकर्णी, अ. र.
“