लेंट्स, हाइन्‍रिखफ्रीड्रिख एमील : (१२ फेब्रुवारी १८०४-१० फेब्रुवारी १८६५). रशियन भौतिकीविज्ञ. विद्युत् प्रवाहासंबंधीच्या कार्याकरिता विशेष प्रसिद्ध.

लेंट्स यांचा जन्म रशियातील डॉर्पाट येथे झाला. त्यांनी डॉर्पाट विद्यापीठात भौतिकीचे व रसायनशास्त्राचे अध्ययन केले. १८२८ मध्ये सेंट पीटर्झबर्ग ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसमध्ये कनिष्ठ वैज्ञानिक साहाय्यक पदावर त्यांची निवड झाली. पुढे¸१८३० मध्ये सहयोगी ॲकॅडेमिशियन आणि १८३४ मध्ये पूर्ण ॲकॅडेमिशियन म्हणून त्यांची निवड झाली. १८३१ मध्ये त्यांनी विद्युत् चुंबकत्वावरील संशोधनास प्रारंभ केला आणि हे त्यांचे संशोधन १८५८ पर्यंत चालू होते. त्याच वेळी नेव्हल मिलिटरी स्कूल (१८३५-४१), आर्टिलरी ॲकॅडेमी (१८४८-६१), सेंट्रल पेडॅगॉजिकल इन्स्टिट्यूट (१८५१-५९) आणि सेंट पीटर्झबर्ग विद्यापीठ येथे त्यांनी भौतिकीचे अध्यापन केले. सेंट पीटर्झबर्ग विद्यापीठात ते भौतिकी व गणित विभागांचे अधिष्ठाते होते.  

लेंट्स यांनी शोधून काढलेले दोन मूलभूत भौतिकीय नियम तसेच त्यांनी प्रतिपादन केलेले विद्युत् चुंबकीय, विद्युत् ऊष्मीय व विद्युत् रासायनिक आविष्कारांतील राशींमधील अनुभवसिद्ध संबंध यांकरिता त्यांच्या नावाचा भौतिकीच्या इतिहासात उल्लेख करण्यात येतो. १८३३ मध्ये त्यांनी त्यांच्या नावाने प्रसिध्द असलेला नियम मांडला. एखाद्या विद्युत् मंडलाला चुंबकीय क्षेत्रात गती दिली असता अथवा त्या मंडलाशी संबंधित असलेल्या चुंबकीय स्त्रोतात बदल केला असता मंडलात प्रवर्तित होणाऱ्या विद्युत् प्रवाहाची दिशा मंडलाच्या गतीला वा स्त्रोताच्या बदलाला विरोध करणारी असते, असे त्यांनी या नियमात प्रतिपादन केले. पुढे हा नियम उर्जा अक्षय्यतेच्या नियमाचे [èद्रव्य आणि उर्जा यांची अक्षय्यता] एक विशेष उदाहरण असून त्या नियमावरुन त्याचे निगमन करता येते, असे दिसून आले. या नियमात विद्युत् चलित्र (मोटर) व जनित्र यांची उलटापालट करण्याच्या तत्त्वाचा समावेश असून लेंट्स यांनी १८३८ मध्ये याचे प्रात्यक्षिकही दाखविले. आर्मेचर [èविद्युत् चलित्र] प्रतिक्रियेच्या आविष्काराचा त्यांनी १८४७ मध्ये शोध लावला व त्याचे स्पष्टीकरणही वरील नियमाच्या आधारे दिले. त्यांनी निरनिराळ्या धातूंच्या तारांच्या विद्युत् रोधकतांची तुलना केली व रोधकतेच्या तापमानावरील अवलंबित्वाचा नियम प्रस्थापित केला.

 

लेंट्स अनेक रशियन विद्यापीठांचे सन्माननीय सदस्य होते, तसेच फ्रॅंकफुर्टच्या फिजिकल सोसायटीचे, बर्लिन जिऑग्राफिकल सोसायटीचे व तूरिन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचेही सदस्य होते. त्यांचे संशोधनात्मक निबंध सेंट पीटर्झबर्ग ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या संस्मरणिकेत व बुलेटिनमध्ये प्रसिध्द झाले. त्याचे काही निबंध इंग्लंड, फ्रान्स व स्वित्झर्लंडमध्येही प्रसिद्ध झाले. ते रोम येथे सुटीवर गेलेले असताना मृत्यू पावले.  

भदे, व. ग.