फ्लेमिंग, सर ॲलेक्झांडर : (६ ऑगस्ट १८८१ – ११ मार्च १९५५). ब्रिटिश सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ. ⇨ पेनिसिलीन या प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधाच्या शोधाबद्दल १९४५ चे शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक ⇨ सर एर्न्स्ट बोरिस चेन आणि ⇨ सर हॉवर्ड वॉल्टर फ्लोरी या दोन शास्त्रज्ञांसमवेत त्यांना विभागून मिळाले.
सर ॲलेक्झांडर फ्लेमिंग यांचा जन्म लॉचफिल्ड (स्कॉटलंड) येथे झाला. स्थानिक शाळांतून सुरुवातीचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी लंडन येथील पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर चार वर्षे त्यांनी लंडनमधील एका जहाज कंपनीत नोकरी केली. याच सुमारास एका चुलत्याच्या मृत्युपत्रान्वये त्यांना काही देणगी मिळाली व त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्याचे ठरविले. या शिक्षणाकरिता लागणारी पात्रता नसल्यामुळे त्यांनी विशेष परीक्षा देऊन लंडन विद्यापीठाच्या सेंट मेरीज मेडिकल स्कूलमध्ये प्रवेश मिळविला. तेथून १९०६ मध्ये त्यांनी विशेष गुणवत्तेसहित वैद्यकीय व्यवसाय पात्रता मिळविली आणि १९०६ पासून लस चिकित्सेचे (निराळ्या लसींचा उपयोग करून रक्ताची सूक्ष्मजंतुनाश करण्याची क्षमता वाढविणाऱ्या चिकित्सेचे) अग्रेसर पुरस्कर्ते सर ॲल्मरोथ राइट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सेंट मेरीजमध्येच संशोधनास प्रारंभ केला. १९०८ मध्ये लंडन विद्यापीठाची एम्. बी. बी. एस्. पदवी सुवर्णपदकासह मिळविल्यानंतर सेंट मेरीजमध्ये त्यांनी १९१४ पर्यंत अध्यापक म्हणून काम केले. पहिल्या जागतिक महायुद्धात (१९१४ – १८) त्यांनी लष्करी नोकरी केली व कॅप्टनचा हुद्दा मिळविला. १९१८ मध्ये सेंट मेरीजमध्ये त्यांनी पुन्हा काम सुरू केले व १९२८ मध्ये तेथेच प्राध्यापक म्हणून त्यांची निवड झाली. १९४८ साली लंडन विद्यापीठात सूक्ष्मजंतुशास्त्राचे गुणश्री प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. एडिंबरो विद्यापीठाचे कुलमंत्री (रेक्टर) म्हणून १९५१ – ५४ मध्ये त्यांनी काम केले.
वैद्यकीय व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच त्यांचे लक्ष रक्ताची सूक्ष्मजंतूंसंबंधीची क्रियाशीलता आणि पूतिरोधके (सूक्ष्मजंतूंची वाढ थोपविणारी औषधे) या विषयाकडे ओढले गेले होते. लष्करी नोकरीत असतानाही त्यांना या विषयाचा अभ्यास चालू ठेवण्याची संधी मिळाली होती. लष्करी सेवेतून मुक्त झाल्यानंतर त्यांनी हे कार्य चालूच ठेवले होते. १९२१ मध्ये ऊतक (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचा – पेशींचा – समूह) आणि लाळ, अश्रू यांसारख्या मानवी स्त्रावांत असलेल्या एका सूक्ष्मजंतुविलयक (सूक्ष्मजंतूंच्या कोशिका विरघळवून टाकणाऱ्या) पदार्थांचा त्यांना शोध लागला. या पदार्थास त्यांनी ‘लायसोझाइम’ हे नाव दिले. पुढे हा पदार्थ तेवढा शक्तिशाली नसल्याचे समजले. याच सुमारास त्यांनी मानवी रक्त व इतर शरीरद्रवांकरिता संवेदनशीलता अनुमापन पद्धती [⟶ अनुमापन] व आमापन पद्धती [⟶ आमापन, जैव] विकसित केल्या आणि पुढे पेनिसिलिनाच्या अनुमापनात त्यांनी याच पद्धतींचा उपयोग केला. ऊतकहानी न करता प्रभावी सूक्ष्मजंतूंचा नाश करू शकेल अशा पदार्थाच्या शोधात असताना १९२८ मध्ये इन्फ्ल्यूएंझाच्या व्हायरसावर ते प्रयोग करीत होते. त्या वेळी स्टॅफिलोकोकाय (पुंजगोलाणू) नावाचे शरीरात निरनिराळ्या ठिकाणी संक्रामणजन्य विकृती उत्पन्न करू शकणारे सूक्ष्मजंतू संवर्धनाकरिता ठेवलेल्या एका काचबशीकडे त्यांचे लक्ष गेले. त्या बशीत अकस्मात प्रविष्ट झालेल्या विशिष्ट बुरशीच्या (हरितद्रव्यरहित वनस्पतीच्या) पुंजक्याकडे बघताना त्या बुरशीच्या सभोवतालची जागा सूक्ष्मजंतुविरहित असल्याचे व इतरत्र सूक्ष्मजंतूंची वाढ नेहमीसारखी असल्याचे त्यांना दिसून आले. या निरीक्षणाला अनुलक्षून त्यांनी आणखी प्रयोग केले आणि सवंर्धित बुरशी ८०० पट विरल केल्यानंतरही सूक्ष्मजंतूंची वाढ रोखू शकते, हे सिद्ध केले. या बुरशीच्या पेनिसिलियम नोटॅटम या नावावरून तिच्यातील क्रियाशील घटकाला त्यांनी ‘पेनिसिलीन’ हे नाव दिले.
सेंट मेरीज येथे जीवरसायनशास्त्रज्ञ उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पेनिसिलीन शुद्ध स्वरूपात आणि अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) देण्यायोग्य असे मिळवता आले नाही. हेच कार्य पुढे १९४० मध्ये ऑक्सफर्ड येथील एर्न्स्ट चेन व हॉवर्ड फ्लोरी या शास्त्रज्ञांनी पूर्ण केले. त्यानंतर पेनिसिलिनाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यात येऊ लागले. या शोधामुळे प्रभावित होऊन शास्त्रज्ञांनी अनेक प्रतिजैव औषधांचा शोध लावला [⟶ प्रतिजैव पदार्थ]. पेनिसिलिनाच्या शोधामुळे मानवी आयुर्मर्यादा किती तरी पटींनी वाढली आहे.
फ्लेमिंग १९४३ मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवडले गेले व १९४४ मध्ये त्यांना सर हा किताब मिळाला. त्यांनी सोसायटी फॉर जनरल मायक्रोबायॉलॉजीचे अध्यक्ष म्हणून आणि पॉन्टिफिकल ॲकॅडेमी ऑफ सायन्स या संस्थेचे सभासद म्हणून काम केले. सेंट मेरीजमध्ये राइट-फ्लेमिंग इन्स्टिट्यूट स्थापण्यात आली व तिचे पहिले संचालक म्हणून फ्लेमिंग यांची नेमणूक झाली. जगातील बहुतेक सर्व शास्त्रीय आणि वैद्यकीय संस्थांचे ते सन्माननीय सभासद होते. अमेरिका व यूरोपातील जवळजवळ तीस विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी दिली होती. नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना मिळालेले विशेष उल्लेखनीय मानसन्मान पुढीलप्रमाणे : फेलो ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स (इंग्लंड, १९०९) फेलो ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ फिजिशिअन्स (लंडन, १९४४) हंटेरियन प्राध्यापक (१९१९) सन्माननीय सुवर्णपदक, रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स (१९४६) कॅमरन पारितोषिक, एडिंबरो विद्यापीठ (१९४५) मॉक्सन पदक, रॉयल कॉलेज ऑफ फिजिशिअन्स (१९४५) सुवर्णपदक, रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीन (१९४७). त्यांनी सूक्ष्मजंतुशास्त्र, प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक्षमता) व रासायनी चिकित्सा या विषयांवर वैद्यकीय व वैज्ञानिक नियतकालिकांतून अनेक निबंध लिहिले.
ते लंडन येथे मरण पावले व तेथील सेंट पॉल कॅथीड्रलमध्ये त्यांच्या शवाचे सन्मानपूर्वक दफन करण्यात आले.
संदर्भ : Nobel Foundation, Nobel Lectures : Physiology or Medicine 1942-1962, Amsterdam, 1964.
भालेराव, य. त्र्यं.
“