फ्लेचर, जॉन : (? डिसेंबर १५७९ – २९ ऑगस्ट १६२५). इंग्रज नाटककार. त्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याचा जन्म ससेक्समधील राय येथे झाला. २० डिसेंबर १५७९ रोजी राय येथेच त्याला बाप्तिस्मा दिला गेल्याचे दिसते. बेने (कॉर्पस क्रिस्ती) कॉलेज, केंब्रिज येथे त्याचे शिक्षण झाले. ⇨ फ्रान्सिस बोमंट, ⇨ फिलिप मॅसिंजर, विल्यम रोली ह्यांसारख्या नाटककारांच्या – मुख्यतः फ्रान्सिस बोमंटच्या – सहकार्याने फ्लेचरने नाट्यलेखन केले. फ्रान्सिस बोमंटच्या साहाय्याने फ्लेचरने नेमकी किती नाटके लिहिली, हे निश्चितपणे सांगता येत नसले, तरी ती जास्तीत जास्त पंधरा असावीत, असा अंदाज व्यक्त केला जातो. फ्लेचर आणि बोमंट ह्यांची गाढ मैत्री होती आणि सहनाटककार ह्या नात्याने त्यांची नावे परस्परांशी कायमची निगडीत झालेली आहेत. फ्लेचरने सर्वस्वी स्वतंत्रपणे लिहिलेल्या नाट्यकृतींची संख्या सोळाच्या आसपास येते.
बोमंट आणि फ्लेचर ह्या दोघांनी जी नाटके परस्परांच्या सहकार्याने लिहिली असावीत, असे सामान्यतः मानले जाते, त्यांतील काही अशी : द नाईट ऑफ द बर्निंग पेसल (१६०९, प्रकाशित १६१३), द स्कॉर्नफुल लेडी (१६१०, प्रकाशित १६१६), फिलॅस्टर (१६११, प्रकाशित १६२०) आणि ए किंग अँड नो किंग (१६११, प्रकाशित १६१९).
फ्लेचरने जी नाटके सर्वस्वी स्वतःच लिहिली असावीत असा अभ्यासकांचा अंदाज आहे, त्यांपैकी काही अशी: द फेथफुल शेफर्डेंस (प्रकाशित १६१०), द मॅड लव्हर (प्रयोग १६१९ आधी), द वाईल्ड गूज चेस (१६१२, प्रकाशित १६५२), द टेमर टेम्ड (प्रकाशित १६४७).
ज्यांना प्रेक्षकांकडून ताबडतोब प्रतिसाद मिळेल, असे परिणामकारक प्रसंग नाटकात गुंफण्याचे कौशल्य फ्लेचरकडे होते. नाटकात विपुल प्रसंग आणि वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा निर्माण करण्याची त्याची प्रवृत्ती होती. तथापि प्रसंगांवर विशेष लक्ष केंद्रित केल्यामुळे परिपूर्ण व्यक्तिरेखनाच्या बाबतीत तो उणा ठरल्याचे दिसून येते. नाट्यकृतींची कथानके त्याने बांदेल्लो, बोकाचीओ (इटालियन), ऑनोरे द्यूर्फे (फ्रेंच) अशा विविध लेखकांच्या साहित्यातून घेतली. विशेषतः स्पॅनिश कथांचा फार मोठा वापर त्याने केल्याचे दिसते. आपल्या नाट्यकृतींतून उत्कट, भावगेय गीतांची रचना त्याने केली. प्लेगच्या विकाराने लंडन येथे तो निधन पावला.
संदर्भ : 1. Appleton, William W. Beaumont and Fletchar, a Critical Study, New York, 1955.
2. Maxwell, Baldwin, Studies in Beaumont, Fletcher and Massinger, Chapel Hill, N. C. 1939.
3. Oliphant, Ernest Henry Clark, Plays of Beaumont and Fletcher, New Haven, 1927.
4. Waith, E. M. Pattern of Tragicomedy in Beaumont and Fletchar, New Haven, 1952.
भागवत, अ. के.
“