फूशुन : चीनमधील मँचुरिया विभागातील कोळसा-खाणीचे केंद्र आणि औद्योगिक शहर. लोकसंख्या १७,००,००० (१९७० अंदाज). हे लिऑउनिंग प्रांतात. मूकडेन शहराच्या पूर्वेस ४० किमी.वर हुन नदीकाठी वसले आहे. अनेक स्थित्यंतरे झालेले हे शहर प्राचीन काळी चिनी वसाहतीच्या सरहद्दीवर होते. थांग राजघराणे (इ.स. ६१८-९०७) , मिंग राजघराणे (१३६८-१६४४) यांच्या काळात यास जकातकेंद्र व व्यापारी पेठ म्हणून महत्त्व प्राप्त झाले. बाराव्या-तेराव्या शतकांपासून कोळशाच्या खाणींचा उद्योग येथे सुरू झाला. त्यावेळी मँचुरिया खितान घराण्याच्या अंमलाखाली होता. सतराव्या शतकात मांचू घराणे सत्तेवर येताच खाणींच्या कामाला प्रतिबंध करण्यात आला कारण त्या खाणी राजांच्या थडग्यांजवळ होत्या. १९०१ मध्ये चिनी खाणमालकांना सवलत देण्यात आली. तथापि अपुऱ्या भांडवलामुळे त्यांनी आपले खाणींचे हक्क रशियनांच्या स्वाधीन केले. खाण-उद्योगात रशियनांनी प्रचंड पैसा गुंतविला. १९०४-०५ मधील रशिया-जपान युद्धानंतर ‘जपानी साउथ मँचुरिया रेल्वे कंपनी’ने रशियनांकडून या खाणी घेतल्या आणि त्यांची प्रचंड भरभराट केली. १९३१ ते १९४५ या काळात जपानचा हा एक अमूल्य ठेवा होता.

दुसऱ्या महायुद्धात रशियनांनी या खाणींचा अतोनात विध्वंस केला. फूशुनच्या परिसरात कोळशाचे साठे भरपूर असून ते १६ किमी. लांब, ३.२ किमी. रुंद अशा क्षेत्रात आहेत. त्यांमध्ये ९५ कोटी टन कोळशाचा साठा असावा. जगामध्ये सर्वांत चांगल्या प्रतीचा बिट्युमेन कोळसा या ठिकाणी आहे, असे मानतात. जगातील जास्तीतजास्त उघड्या खाणी येथेच आहेत. कोळशाशिवाय ऑइल शेलचे साठे भरपूर असून त्यांमध्ये तेलाचे प्रमाण ६ ते १० टक्के आढळते. येथे प्रतिवर्षी २,००,००,००० टन कोळशाचे उत्पादन होते.

येथील उद्योगधंदे कोळसा व तेल यांच्याशी संबंधित असून त्यांमध्ये शेल तेल, अमोनिअम सल्फेट (खत), काजळी यांना महत्त्वाचे स्थान आहे. यांशिवाय अवजड यंत्रसामग्री, रबर, सिमेंट, रासायनिक उद्योगधंदे, ॲल्युमिनिअम, लोखंड-पोलाद इ. उद्योगधंदेही विकसित झाले आहेत.

ओक, द. ह.