फुलानी : पश्चिम आफ्रिकेतील एक महत्त्वाची जमात. पिअल, पुल्लो, फुल, फुल्बे, फौलाह, फिलानी, फेलानी, फेलाटे इ. नावांनीही हे लोक ओळखले जातात. लोकसंख्या ७०,००,००० (अंदाज १९७१). त्यांच्या मूलस्थानाविषयी माहिती मिळत नाही. त्यांचे भटके व स्थायिक असे दोन गट आढळतात. फुलानी हे तुकुलूरांपासून आले असून इ. स. सातव्या शतकात ते सेनेगल नदीकाठी राहत होते. ते संमिश्र बर्बर व नेग्रिटो वंशांचे असावेत. विसाव्या शतकात त्यांचा संचार सूदानपासून कॅमेरूनपर्यंत आढळतो. घाना व सेनेगल येथे पूर्वी फुलानी राजे राज्य करीत असत. अकराव्या शतकात फुलानी राजांनी इस्लाम धर्माची दीक्षा घेतली आणि पुढे १७५० ते १९०० दरम्यान त्यांनी इस्लामच्या धर्मयुद्धांत भाग घेतला. एकोणिसाव्या शतकात त्यांनी दोन साम्राज्ये स्थापन केली : तिंबक्तू व सोकोटो. सोकोटो अंमलाखाली अनेक हौसा राज्ये होती शिवाय बॉर्नू व पश्चिम कॅमेरून हे भाग होते. तिंबक्तू राज्य हाजी उमरने १८६१ मध्ये जिंकले परंतु त्यात हाजी उमर मारला गेला. ब्रिटिशांनी १९०३ मध्ये हा प्रदेश जिंकण्यापूर्वी येथे मुहम्मद बेलो व त्याचा भाऊ अब्दुलाई यांची स्वतंत्र राज्ये होती.
भटक्या फुलानींच्या शारीरिक ठेवणीत नेग्रॉइड व कॉकेसाइड वंशांची लक्षणे आढळतात. हे वर्णाने तांबूस असून सरळ नाक, पातळ ओठ, मध्यम उंची, काटक व सडपातळ शरीरयष्टी ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. पशुपालन हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता. दुधदुभत्याचे पदार्थ, मांस, लोकर इ. वस्तूंच्या बदल्यात ते धान्य खरेदी करीत. अनेकजण या पदार्थांचा व्यापार करतात. काही फुलानी शेती करतात. फारच थोडे फुलानी शिकार, मच्छीमारी आणि इतर व्यवसाय करतात. दूध काढणे व त्यापासून दही, लोणी, ताक इ. पदार्थ तयार करणे, ही कामे विशेषतः स्त्रिया करतात.
स्थायिक झालेल्या फुलानींची घरे शंक्वाकृती असून कच्च्या मातीच्या विटांची असतात तर भटकणाऱ्या फुलानींची घरे तंबूवजा व छोटी असून त्यांभोवती काटेरी कुंपण असते. ती अर्धवर्तुळाकृती अथवा अथवा मधमाशांच्या पोळ्यासारखी असतात.
लग्नात वधूमूल्य जनावरांच्या रूपात दिले जाते. बहुपत्नीत्व रूढ आहे. प्रत्येक पत्नीस स्वतंत्र झोपडी असते. स्थायिक फुलानी चुलत बहिणीशी विवाह करणे अधिक पसंत करतात पण इतर फुलानी तो निषिद्ध मानतात. फक्त थोरल्या भावाच्या विधवेस नियोग पद्धतीने संततीचा अधिकार आहे. पितृसत्ताक कुटुंबपद्धतीमुळे कुटुंबाचा वारसा ज्येष्ठ मुलाकडे जातो.
संदर्भ : 1. Johnston, H. A. S. The Fulani Empire of Sokoto,
2. Stenning, D. J. Savannah Nomods, Oxford, 1959.
देशपांडे, सु. र.
“