फुलर, रॉय : (११ फेब्रुवारी १९१२- ). इंग्रज कवी आणि कादंबरीकार. जन्म लँकाशर परगण्यातील ओल्डॅम येथे. शिक्षण तेथेच खाजगी पद्धतीने झाले. १९३४ मध्ये तो सॉलिसिटर झाला व नंतर कायद्याच्या व्यवसायाशी निगडित राहिला. १९४१-४६ ह्या काळात ब्रिटनच्या शाही नौसेनेत त्याने काम केले. ‘रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर’चा सभासद. १९६८-७३ ह्या कालखंडात काव्य विषयाचा प्राध्यापक म्हणून ऑक्सफर्ड विद्यापीठात. १९७० साली ‘कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ हा किताब. ह्याच साली कवितेबद्दलचे ‘क्विन्स गोल्ड मेडल’ त्याला देण्यात आले.
फुलरने आपल्या वाङ्मयीन जीवनाचा आरंभ कवी म्हणून केला. पहिला काव्यसंग्रह पोएम्स (१९३९). द मिड्ल ऑफ द वॉर (१९४२) आणि अ लॉस्ट सीझन (१९४४) या संग्रहांतील कवितांमधून सामाजिक व राजकीय परिस्थितीबद्दलची आस्था दिसून येते. एपिटाफ्स अँड ऑकेझन्स (१९४९) या संग्रहात युद्धोत्तर जगाचे उपहासात्मक चित्रण आहे. नंतरच्या कवितांत तो मानसशास्त्रीय व तात्त्विक चिंतनात रमलेला दिसतो. न्यू पोएम्स हा त्याचा संग्रह १९६८ साली प्रसिद्ध झाला. या कवितांच्या आधारे त्याची आजच्या महत्त्वाच्या इंग्रज कवींत गणना होते.
टी. एस्. एलियट, एझरा पाउंड आणि डब्ल्यू. बी. येट्स यांनी १९२० च्या सुमारास इंग्रजी कवितेचे नाते यूरोपच्या वाङ्मयीन परंपरांशी जोडले होते. नंतरच्या पिढीत हे भान कमी झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रजी काव्यातले सांस्कृतिक भान अधिकच संकुचित झाले. तांत्रिक प्रयोगशीलताही क्षीण झाली. अबोध मनातील गूढ, भीतिप्रद स्वप्नप्रतिमांचा प्रवाह डिलन टॉमससारख्या कवीच्या काव्यात अवतरला. १९५० नंतरच्या नवसौंदर्यवादी काव्यात संदिग्ध नैतिक दृष्टिकोण व विस्कळित शैली यांचा प्रत्यय आला. त्यावरची प्रतिक्रिया काही काळाने दिसली. या प्रतिक्रियेच्या लाटेतच रॉय फुलर याची कविता लिहिली गेली.
त्याची कविता विवेचनात्मक, बुद्धिनिष्ठ व स्वतःकडे कोरड्या, मंद उपहासाने पाहणारी आहे. काही कवितांतून निराशेचा सूर उमटल्याचे दिसते. जीवन हा नियतीचा खेळ असून त्यात उत्साह, आनंद ह्यांना स्थान नसल्याचे त्याने अनेकदा सूचित केलेले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जागतिक परिस्थितीवर त्याने आपल्या कवितांतून औपरोधिक भाष्य केले आहे. कवितालेखनाबाबत त्याची दृष्टी प्रयोगशील आहे. ब्रूटसिस ऑर्चर्ड ह्या काव्यसंग्रहात सुनीतरचनेच्या संदर्भात त्याने केलेले काही प्रयोग दिसून येतात.
मुलांच्यासाठी त्याने सुरूवातीस दोन कादंबऱ्या लिहिल्या. नंतरच्या कादंबऱ्यांत द सेकंड कर्ट्न (१९५३), फँटसी अँड फ्यूग (१९५४), इमेज ऑफ द सोसायटी (१९५६), द रुइन्ड बॉइज (१९५९), माय फादर्स कॉमेडी (१९६१) आणि माय चाइल्ड, माय सिस्टर (१९६५) ह्यांचा समावेश होतो. सेकंड कर्ट्न ही ग्रेअम ग्रीनच्या पद्धतीची सुरस आणि रंजक रहस्यकथा आहे. अन्य कादंबऱ्यांतून छोट्या गावात राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांचे मार्मिक चित्रण केले आहे. इमेज ऑफ अ सोसायटी ही कादंबरी अधिक गाजली.
हातकणंगलेकर, म. द.