फीझो, आरमां ई पॉलीत ल्वी : (२३ सप्टेंबर १८१९ – १८ सप्टेंबर १८९६). फ्रेंच भौतिकीविज्ञ. त्यांनी प्रकाशवेगाच्या मापनासंबंधी महत्त्वाचे कार्य केले. त्यांचा जन्म पॅरिस येथे झाला. त्यांनी सुरूवातीला वैद्यकीय शिक्षण घेतले. तथापि नंतर त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव हे शिक्षण सोडून देऊन कॉलेज द फ्रान्समध्ये प्रकाशकी या विषयाचा अभ्यास केला. त्यांनी पॅरिस वेधशाळेमध्ये प्रसिद्ध ज्योतिर्विदी फ्रांस्वा ॲरागो यांच्या मार्गदर्शनाखाली एक अभ्यासक्रम पूर्ण केला. ॲरागो यांनी फीझो यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे कार्य फ्रान्सच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्या नजरेस आणले.
सुरूवातीला त्यांनी एल्.जे.एम्. दागेअर यांच्या छायाचित्रण प्रक्रियेत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. १८४४-४९ या काळात त्यांनी ⇨ झां बेर्नार लेआँ फूको या शास्त्रज्ञांच्या बरोबर सौर वर्णपटाच्या अवरक्त भागाचा (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य भागाचा) अभ्यास केला तसेच प्रकाशाचे व्यतिकरण व विवर्तन [→ प्रकाशकी] आणि उष्णता यांसंबंधी महत्त्वाचे प्रयोग केले. १८४९ मध्ये फीझो यांनी पृथ्वीवरच प्रयोग करून प्रकाशवेगाचे पहिलेच खात्रीलायक मूल्य मिळविले [→ प्रकाशवेग]. यापूर्वीची प्रकाशवेगाची मूल्ये ज्योतिषशास्त्रीय निरीक्षणांच्या आधारे मिळविण्यात आलेली होती. त्यांनी हवा व पाणी यांतील प्रकाशाचा सापेक्ष वेगही फूको यांच्याप्रमाणेच पण स्वतंत्रपणे मोजला होता. १८४८ मध्ये फीझो यांनी ताऱ्यापासून येणाऱ्या प्रकाशाच्या बाबतीतील ⇨ डॉप्लर परिणामाचे यथार्थ स्पष्टीकरण दिले (त्यामुळे प्रकाशाच्या बाबतीतील या परिणामाला ‘डॉप्लर-फीझो परिणाम’ असेही संबोधण्यात येते). एकाच दृष्टिपथरेषेतील ताऱ्यांचा सापेक्ष वेग मोजण्याकरिता या तत्त्वाचा उपयोग करता येतो, असेही त्यांनी दाखविले. १८५१ मध्ये त्यांनी ईथर (सर्व अवकाश ज्याने व्यापलेले आहे व प्रकाश तरंगांच्या वहनास आवश्यक आहे असा मानलेला एक काल्पनिक पदार्थ) व द्रव्य यांतील सापेक्ष गतीचा शोध घेण्यासाठी गतिमान माध्यमातील प्रकाशवेग मोजण्यासंबंधी प्रयोग केले. या प्रयोगांत त्यांनी वाहत्या पाण्यातून जाणाऱ्या प्रकाशकिरणांच्या व्यतिकरण पट्टांच्या स्थानांतराचे मापन केले. या प्रयोगांचा निष्कर्ष नकरात्मक असल्याचे दिसून आले व ईथराचे अस्तित्व दर्शविण्यास हे प्रयोग असमर्थ ठरले. तथापि त्यांचे कार्य ईथर सिद्धांताचे विसाव्या शतकाच्या सुरूवातीला उच्चाटन होण्यास पायाभूत ठरले [→ ईथर-२]. पृष्ठभागाच्या गुळगुळीतपणाचे परीक्षण करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या एका व्यतिकरणमापकाचे वर्णन फीझो यांनी १८६२ मध्ये केलेले होते. हा व्यतिकरणमापक प्रत्यक्षात १८८३ मध्ये एल्. एल्. लॉरां यांनी तयार केला म्हणून तो ‘फीझो-लॉरां व्यतिकरणमापक ’ या नावाने ओळखण्यात येतो. फीझो यांनी प्रकाशकीखेरीज तारांमधील विद्युत वेगाचे मापन, ⇨ प्रवर्तन वेटोळ्याचा विकास व प्रकाशीय तरंगलांबीचा परिशुद्ध मापनासाठी उपयोग करणे यांसंबंधीही महत्त्वाचे कार्य केले.
फीझो हे १८६० मध्ये ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या भौतिकी विभागाचे सदस्य म्हणून निवडले गेले. ते या विभागाचे १८७७ मध्ये उपाध्यक्ष व १८७८ मध्ये अध्यक्ष होते. १८६३ मध्ये पॅरिस येथील एकोल पॉलिटेक्निकमध्ये भौतिकीचे पर्यवेक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८७८ मध्ये ब्यूरो ऑफ लाँजिट्यूडस या संस्थेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. इन्स्टिट्यूट द फ्रान्स या संस्थेने त्यांना १८५६ मध्ये त्रैवार्षिक पारितोषिक आणि इंग्लंडच्या रॉयल सोसायटीने १८६६ मध्ये रम्फर्ड पदक देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. १८७५ मध्ये रॉयल सोसायटीचे परदेशी सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. ते र्व्हेत्यूल येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.