फुटबॉल : फुटबॉल म्हणजे पायचेंडू. पायाने खेळविला जाणारा, हवा भरलेला मोठा कातडी चेंडू. या सांघिक व मैदानी खेळाचे अनेक प्रकार आहे. त्यांपैकी दोन प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे : (१) असोसिएशन फुटबॉल अथवा सॉकर आणि (२) रग्बी.  

सॉकर हा प्रत्येकी अकरा खेळाडू असलेल्या दोन संघांमध्ये खेळला जातो. त्यात चेंडू हाताळणे वा तो हातात घेऊन पळत सुटणे नियमबाह्य मानले जाते. रग्बी वा रग्बी युनियन ह्या प्रकारात मात्र चेडू हाताळणे वा तो हातात घेऊन धावणे ग्राह्य मानतात. त्यातूनच रग्बी लीग हा वेगळा प्रकार १८९५ साली निर्माण झाला. रग्बी युनियन या प्रकारातून निर्माण झालेल्या अमेरिकन फुटबॉलमध्ये खूपच वेगळेपणा दिसून येतो. रग्बीमध्ये चेंडू पुढे पळवता येत नाही या खेळात तो पुढेही नेता येतो. तसेच हा खेळ अधिक उग्र व आक्रमक असल्याने त्यात आडदांडपणा व धसमुसळेपणा जास्त आढळतो. कॅनडियन फुटबॉल हा अमेरिकन फुटबॉलशी साधर्म्य असलेला पण काही महत्त्वाचे फेरफार असलेला प्रकार आहे. आयर्लंडमध्ये खेळला जाणारा गेलिक फुटबॉल हाही एक आडदांड प्रकार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणारा ऑस्ट्रेलियन फुटबॉल हा जुन्या गेलिक फुटबॉलचे काही नियम आत्मसात केलेला तथापि वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे. या सर्व प्रकारांची माहिती नोंदीत पुढे दिली आहे. यांपैकी सॉकर हा खेळ जास्त लोकप्रिय असून तो जगातील बहुतेक देशांतून खेळला जातो. भारतात ब्रिटिशांच्या बरोबर आलेला फुटबॉल म्हणजे सॉकरच होय. 

आधुनिक फुटबॉलशी कमीअधिक साधर्म्य असलेले काही खेळ प्राचीन काळापासून अस्तित्वात होते. चीनमध्ये इ.स.पू. चौथ्या व तिसऱ्या शतकांत ‘त्सू-चू’ नामक असाच एक खेळ रूढ होता. प्राचीन ग्रीसमध्ये ‘हरपास्टॉन’ हा फुटबॉलसदृश खेळ होता तोच पुढे रोमन काळात विशेषतः रोममध्ये ‘हरपास्टम’ या नावाने लोकप्रिय झाला (इ.स.पू. दुसरे शतक). रोमनांकडूनच हा खेळ ब्रिटिश बेटांवर प्रसृत झाला असावा, असे एक मत आहे. याबाबत एकवाक्यता नसली, तरी प्राचीन व मध्ययुगीन ब्रिटनमध्ये फुटबॉल मोठ्या प्रमाणावर खेळला जात होता, हे निर्विवाद खरे. अगदी प्रारंभीच्या काळात चेंडूऐवजी तशाच अन्य गोलाकार वस्तूंचा -उदा., मानवी कवट्या, जनावरांचे फुगीर मूत्राशय, शेवाळाने वा वाळूने भरलेल्या पिशव्या इ.- वापर होत असल्याचे उल्लेख सापडातत. सर्वात आद्य चेंडू म्हणजे एका डेन राजाची कवटी असावी, अशीही माहिती आढळते. त्यावरून या खेळाला प्रारंभीच्या काळात ‘किकिंग द डेन्स हेड ’ किंवा ‘किकिंग द ब्‍लॅडर’ असेही संबोधले जात असे. साधारणपणे बाराव्या शतकापासून सध्याचा फुटबॉल प्रचलित झाला. विल्यम फिट्‌झस्टिव्हनच्या हिस्टरी ऑफ लंडन (सु. ११७५) ह्या पुस्तकात ‘श्रोव्ह ट्यूझ्‌डे’ या धार्मिक सणाच्या दिवशी खेळल्या गेलेल्या फुटबॉल सामन्याचे वर्णन आढळते. पुढे पुढे तर इंग्‍लंडमध्ये श्रोव्ह ट्यूझ्‌डे हा फुटबॉल-दिन म्हणून ओळखला जाऊ लागला. या खेळाचे स्वरूप त्या काळी अतिशय आडदांड, अनियमित व धोकादायक बनले होते. हे सामने कित्येकदा दोन गावांमध्ये चालत त्यांत शेकडो माणसे झुंडींनी भाग घेत ते तासन्‌तास खेळले जात व अखेरीस चेंडू प्रतिस्पर्धी गावाच्या हद्दीत गेल्यावरच ते संपत. अन्य उत्सवांच्या दिवशीही – उदा., ‘कँडलमन्स डे’- असेच फुटबॉलचे सामने होत. या खेळाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे धनुर्विद्येसारखे लष्करी कौशल्याचे खेळ मागे पडू लागल्याने त्यावर दुसऱ्या हेन्‍रीने (११५४ – ११८९) आणि उत्तरकालीन राज्यकर्त्यांनी अनेकदा बंदी घातली, तथापि त्यातूनही त्याची लोकप्रियता टिकून राहिली व उत्तरोत्तर ती वाढतही गेली. इंग्‍लिश खेळांचा इतिहासकार जोसेफ स्ट्रट याने अशा एका सामान्याचे वर्णनही केले आहे (१८०१). या नियमविरहित, आडदांड व झुंडीच्या खेळाला एकोणिसाव्या शतकात काहीसे नियमबद्ध व क्रिडाप्रवण स्वरूप लाभले. शेफील्ड, नॉटिंगॅम, ऑक्सफर्ड, केंब्रिज व लँकाशर परगण्यांतील काही नगरी केंद्रांतून एक वेगळाच फुटबॉल हळूहळू उदयास आला त्यात सॉकर व रगर (रग्‍बीचे प्राथमिक रूप) या दोहोंचेही मिश्रण होते, तथापि चेंडू हाताळण्यास परवानगी नव्हती. या फुटबॉल सामन्यांतून खेळाडूंची संख्या निश्चित होत गेली. प्रत्येक संघात अकरा खेळाडू व त्यात एक गोलरक्षक, एक पूर्ण-पिछाडी, एक निम्‍न-पिछाडी, एक निम्‍न-पिछाडी व आठ आघाडी खेळाडू अशी संघरचना अस्तित्वात आली त्यातूनच सध्याच्या सॉकरचा हळूहळू उगम झाला.

सॉकर (असोसिएशन फुटबॉल) सामन्याचे दृश्य : प. जर्मनी वि. इंग्लंड यांच्यातील अंतिम विश्वकरंडक सामना, वेम्बली मैदान, लंडन, १९६६.सॉकर (असोसिएशन फुटबॉल) : फुटबॉलच्या नियमांना व कायदेकानूंना अधिकृत रूप देण्यासाठी २६ जुलै १८६३ मध्ये लंडन येथे ‘फुटबॉल असोसिएशन’ या संघटनेची स्थापना झाली, त्याच वर्षी ‘असोसिएशन फुटबॉल’ ही संज्ञा व तिचे बोलीभाषेतील रूप सॉकरहेही रूढ झाले. पुढील वीस वर्षांत आधुनिक फुटबॉल चांगलाच स्थिरावला. १८८३ च्या सुमारास चेंडू सरकवण्याचे (पासिंग) तंत्र विकसित झाल्याने संघरचनेतही काही फेरफार झाले : एक गोलरक्षक, दोन पूर्ण-पिछाडी, तीन निम्‍न-पिछाडी व पाच आघाडी खेळाडू अशी आधुनिक रचना अस्तित्वात आली. जगातला सर्वात जुना क्लब इंग्‍लंडचा ‘शेफील्ड फुटबॉल क्लब’ (१८५७) होय. इंग्‍लंडमध्ये सॉकरचा पहिला अधिकृत सामना १८६६ मध्ये लंडन विरूद्ध शेफील्ड या दोन क्लबांमध्ये झाला. १८७१ साली ‘फुटबॉल चॅलेंज कप’ सामने सुरू झाले. याच सुमारास इंग्‍लंडमधील निरनिराळ्या फुटबॉल क्लबांतून धंदेवाईक खेळाडू खेळू लागल्यामुळे हौशी खेळाडूंची कुचंबणा होऊ लागली, म्हणून १८९३ साली हौशी खेळाडूंसाठी ‘फुटबॉल असोसिएशन अमॅच्युअर कप’ सामने सुरू झाले. अल्पावधीतच हा खेळ जगभर लोकप्रिय झाला व त्याचे नियमन करण्यासाठी ‘फेडरेशन इंटरनॅशनेल दी फुटबॉल असोसिएशन’ (एफ्‌. आय्. एफ्‌. ए.) ही जागतिक संघटना १९०४ साली पॅरिसमध्ये स्थापना झाली. या संघटनेमार्फत १९३० पासून विश्वकरंडक (वर्ल्ड कप) स्पर्धा भरवण्यात येऊ लागल्या. दर चार वर्षांनी भरणाऱ्या या स्पर्धांमध्ये प्रमुख देशांचे राष्ट्रीय संघ भाग घेत असतात. सॉकरचा ऑलिंपिक सामन्यांमध्ये १९०८ पासून व आशियाई सामन्यांमध्ये १९५२ पासून समावेश करण्यात आला. १९५५ साली फक्त यूरोपीय देशांपुरत्या ‘यूरोपियन करंडका’ च्या सामन्यांना प्रारंभ झाला.


सॉकर चेंडू हा रबरी पिशवीत हवा भरलेला आणि वरच्या बाजूस कातडी आच्छादन असलेला असतो. त्याचे वजन ३९७ ग्रॅ. ते ४५४ ग्रॅ. (१४ ते १६ औंस) व परिघ ६८·५० सेंमी. ते ७१ सेंमी. (२७ ते २८ इंच) असा गोलाकार असतो. मैदान ९० मी. ते १२० मी. (१०० ते १३० यार्ड) लांबीचे व ४५ मी. ते ९० मी. (५० ते १०० यार्ड) रुंदीचे आयताकार असते. गोल-खांब एकमेंकापासून ७·३२ मी. (२४ फुट) अंतरावर असून ते २·४३ मी. (८ फुट) उंच असतात. त्यांवर आडवी दांडी बसविलेली असते. गोल-क्षेत्र १८·३२ मी. X ५·५० मी. (२० X ६ यार्ड) असते व दंड-क्षेत्र (पेनल्टी एरिया) ४०·३२ मी. X १६·४७ मी. (४४ X १८ यार्ड) असते. मैदानांची मापे सोयीप्रमाणे लहानमोठी असली, तरी गोल-खांब, गोल-क्षेत्र व दंड-क्षेत्र यांची मोजमापे नियमित असतात. आंतरराष्ट्रीय सामन्यात मैदान हे कमीत कमी १००·५८ मी. (११० यार्ड) किंवा जास्तीत जास्त १०९·७२ मी. (१२० यार्ड) लांबीचे असते आणि त्याची रूंदी कमीत कमी ६४ मी. (७० यार्ड) व जास्तीत जास्त ७३·१५ मी. (८० यार्ड) असते.

डब्ल्यू - एस्. क्षेत्ररचना

सॉकरचा सामना प्रत्येकी अकरा खेळाडू असलेल्या दोन संघांमध्ये प्रत्येकी पंचेचाळीस मिनिटांचे दोन डाव व मध्यंतरी पाच मिनिटांची विश्रांती याप्रमाणे खेळला जातो. सुरूवातीच्या काळात संघातील अकरा खेळाडूंची पाच आघाडी (फॉर्‌वर्ड), तीन निम्‍न-पिछाडी (हाफ-बॅक), दोन पूर्ण-पिछाडी (फुल- बॅक) व गोलरक्षक हा अकरावा खेळाडू अशी रचना असे. तीत कालांतराने बदल होत गेले. 

पूर्वी बचाव फळीत (पूर्ण-पिछाडी) दोनच खेळाडू असायचे. १९३० च्या सुमारास लंडन येथील ‘आर्सेनल क्लब ’ ने ‘ W-M ’ पद्धत सुरू केली. या पद्धतीमुळे बचाव फळीत दोन ऐवजी तीन खेळाडू राहू लागले.

W-M या पद्धतीची स्पष्ट कल्पना यावी, म्हणून पुढे आकृती दिलेली आहे.

त्यानंतर १९५३ च्या सुमारास हंगेरीने मध्य-आघाडी (सेंटर-फॉर्‌वर्ड) खेळाडूस नेहमीपेक्षा जरा पिछाडीला खेळवले व अशा तऱ्हेने ‘४-२-४’ ही पद्धती अस्तित्वात आली. या पद्धतीनुसार खेळाडूंची रचना खालीलप्रमाणे :

ब्राझीलने १९५८ साली विश्वकरंडक जिंकला तेव्हापासून ही पद्धत खूपच लोकप्रिय झाली. ब्राझीलने मूळ पद्धतीत सुधारणा करून खेळाडू फिरते ठेवले : पूर्वीच्या पद्धतीनुसार एका संघाच्या विशिष्ट खेळाडूवर प्रतिपक्षाच्या विशिष्ट खेळाडूची नजर किंवा राखण असायची. या पद्धतीमुळे कोणावर  कोणता खेळाडू रोखला गेला आहे, ह्याची त्या संघाला पूर्वकल्पना येत असे. परंतु खेळाडू फिरते ठेवल्याने त्याविषयीचे अंदाज चुकू लागले व चढाई विसकळित होऊ लागली. या तंत्रानुसार प्रतिपक्षाच्या विशिष्ट खेळाडूवर नजर न ठेवता खेळाडू सारखी जागा बदलून खेळतात आणि त्यामुळे प्रतिपक्षाला सतत पेचात पकडतात. 

यानंतर १९७४ च्या म्यूनिक (प.जर्मनी) येथील विश्वकरंडक स्पर्धेत हॉलंडने नवीन पद्धत सुरू केली त्यास ‘टोटल फुटबॉल’ असे म्हणतात. या पद्धतीत गोलरक्षक सोडून उरलेले सर्व खेळाडू गरजेनुसार आक्रमणाचा वा बचावाचा खेळ खेळतात. या तंत्राला इंग्‍लंडमध्ये ‘व्हर्ल’ असे नाव आहे.

उभय संघांतील सर्व खेळाडू मैदानातील आपापल्या अर्ध्या क्षेत्रात विवक्षित ठिकाणी पांगून उभे असतात व पायांनी चेडू टोलवीत प्रतिपक्षाच्या हद्दीत आक्रमण करून त्यांच्या गोलमधून चेंडू पायाने आरपार ढकलण्याचा प्रयत्‍न करतात. खेळताना चेंडू सामान्यतः लाथा मारून (किकिंग), एकमेकांकडे पायांनी सरकवत (पासिंग), किंवा पायांनी टोलवीत (ड्रिब्‍लिंग) आपल्या भिडूकडे देत प्रतिपक्षावर हल्ला करतात. प्रसंगी डोक्यानेही चेंडू मारतात (हेडिंग). परंतु कोणत्याही प्रकारे जाणूनबुजून चेंडूला हस्तस्पर्शही करावयाचा नसतो. फक्त गोलरक्षक त्याच्या स्वतःच्या दंड-क्षेत्रामध्येच हातांनी चेंडू पकडू शकतो. अन्य खेळाडूचा हस्तस्पर्श झाल्यास दंड (पेनल्टी) म्हणून ज्या ठिकाणी तो झाला असेल तेथे  चेंडू ठेवून प्रतिपक्षातील एका खेळाडूस मुक्त -लाथेची (फ्रि किक) संधी मिळते. त्यावेळी लाथ मारणाऱ्यापासून सर्व खेळाडू ९·१४ मी. (१० यार्ड) दूर उभे राहतात. खेळास सुरूवात प्रथम ओली-सुकी होऊन होते. ती जिंकणारा कप्तान मैदानाची बाजू किंवा प्रथम चेडू टोलविणे यांपैकी एकाची निवड करतो. चेंडू टोलविल्यानंतर तो आपल्या परिघाएवढे अंतर पुढे गेल्यानंतरच खेळात धरण्यात येतो. खेळताना चेंडू मैदानाच्या बाजूरेषांच्या बाहेर गेल्यास ज्याच्याकडून तो गेला असेल, त्याच्या विरूद्ध संघातील खेळाडू चेंडू जेथून बाहेर गेला असेल, तेथून तो दोन्ही हातांनी पाय न उचलता डोक्यावरून आत फेकतो. दंड-क्षेत्रात त्याच बाजूच्या खेळाडूकडून नियमभंग (फाउल) झाल्यास – उदा., चेंडू जाणूनबुजून हाताळणे इ.-प्रतिपक्षाला दंड-लाथेची (पेनल्टी किक) संधी मिळते. त्यावेळी चेंडू दंड-क्षेत्रात गोलासमोर ११ मी. (१२ यार्ड) अंतरावर ठेवून एक खेळाडू गोलाच्या दिशेने चेंडू मारतो. त्यावेळी फक्त गोलरक्षकच गोलमध्ये रेषेवर उभा असतो इतर कोणताही प्रतिपक्षाचा खेळाडू मध्ये असत नाही. केव्हाही गोल झाल्यास मैदानाच्या मध्यरेषेवर चेंडू ठेवून मध्य-आघाडी खेळाडू लाथ मारून खेळास पुन्हा सुरवात करतो. पंच (रेफरी) व त्याचे दोन साहाय्यक (लाइन्समेन) खेळावर नियंत्रण ठेवतात व त्यातील नियमांचे पालन काटेकोरपणे व्हावे, म्हणून दक्षता घेतात. गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूस बाहेर काढण्याचा अधिकार पंचास असतो. पंचाचे निर्णय सर्वांना बंधनकारक असतात.


सॉकर या खेळामध्ये अनेक प्रकारचे जागतिक विक्रम आजतागायत प्रस्थापित झाले आहेत. जागतिक अजिंक्यपदासाठी दर चार वर्षानी ज्या विश्वकरंडक स्पर्धा भरवण्यात येतात त्यांत ब्राझीलने एकूण तीन वेळा अजिंक्यपद मिळविले व ‘ज्यूल्‌स रिमेट ट्रॉफी ’ कायमची पटकावली. त्यानंतर १९७४ पासून ‘एफ्‌. आय्‌. एफ्‌. ए. कप’ ठेवण्यात आला.

विश्वकरंडक (वर्ल्ड कप) स्पर्धेत यशस्वी झालेले संघ 

सन 

स्थळ 

विजेता संघ 

१ 

१९३० 

यूरग्वाय 

यूरग्वाय 

२ 

१९३४ 

इटली 

इटली 

३ 

१९३८ 

फ्रान्स 

इटली 

१९४२ व ४६ च्या स्पर्धा दुसऱ्या महायुद्धामुळे झाल्या नाहीत. 

४ 

१९५० 

ब्राझील 

यूरग्वाय 

५ 

१९५४ 

स्वित्झर्लंड 

प. जर्मनी 

६ 

१९५८ 

स्वीडन 

ब्राझील 

७ 

१९६२ 

चिली 

ब्राझील 

८ 

१९६६ 

लंडन 

इंग्‍लंड 

९ 

१९७० 

मेक्सिको 

ब्राझील 

१० 

१९७४

प. जर्मनी

प. जर्मनी

११

१९७८

अर्जेंटिना

अर्जेंटिना

हंगेरीने ऑलिंपिक स्पर्धांमध्ये तीन वेळा अजिंक्यपद पटकावले आहे (१९५२, १९६४ आणि १९६८). सिडनी येथे १९५१ मध्ये इंग्‍लंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात इंग्‍लंडने १७-० गोलांनी विजय संपादन केला. हा एक जागतिक विक्रम मानला जातो. आंतरराष्ट्रीय सामन्यात एका खेळाडूने जास्तीत जास्त गोल करण्याचा विक्रम जर्मनीच्या गोट्‌फ्रिट फुक्स याच्या नावावर मोडतो. त्याने स्वीडन येथील ऑलिंपिक सामन्यात (१९१२) रशियाविरूद्ध १० गोल केले व सामना १६-० असा जिंकून दिला. ब्राझीलच्या ⇨ पेले या जगप्रसिद्ध फुटबॉलपटूने १,३६३ सामन्यांमध्ये एकूण १,२८१ गोल केले. विशिष्ट कावलावधीत जास्तीत जास्त गोल करण्याच्या बहुमानही त्याने मिळविला : ७ सप्टेंबर १९५६ पासून २ ऑक्टोबर १९७४ पर्यंत एकूण १,२५४ सामन्यांमध्ये त्याने १,२१६ गोल केले. १९५८ हे त्याच्या क्रीडा-कारकीर्दीतील सर्वोत्तम वर्ष. त्या वर्षात त्याने १३९ गोल केले. तथापि जास्तीत जास्त वैयक्तिक गोलसंख्या नोंदवण्याचा मान मात्र ब्राझीलच्याच अर्तूर फ्राइडेनराइख या खेळाडूस मिळाला. आपल्या कारकीर्दीत त्याने एकूण १,३२९ गोल केले.

जगद्‌विख्यात फुटबॉलपटू पेलेचा भारतातील खेळ : कॉसमॉस वि. मोहन बगान, कलकत्ता, १९७७.भारतात खेळला जाणारा फुटबॉल हा मुख्यत्वेकरून सॉकर या प्रकारचाच आहे. हा खेळ ब्रिटिशांनी भारतात आणला. प्रथम तो कलकत्त्यात खेळला गेला व तदनंतर इतरत्रही लोकप्रिय झाला. ‘ट्रेडर्स कप’ साठी १८८९ साली पहिल्या स्पर्धा खेळल्या गेल्या. कलकत्ता येथे ‘इंडियन फुटबॉल असोसिएशन’ स्थापना (१८९३ ) होऊन, तिच्या वतीने ‘आय्‌. एफ्‌. ए. शील्ड ’ ची स्पर्धा १८९३ पासून सुरू झाली. १८९१ पासून ‘रोव्हर्स’ करंडक  सामने सुरू झाले. त्यांत हैदराबाद पोलीस संघाने १९५० ते ५४ पर्यंत ओळीने पाच वर्षे अजिंक्यपद मिळविले. त्या स्पर्धेतला हा विक्रम अद्याप अबाधित आहे. कलकत्त्यापाठोपाठ हा खेळ मुंबईमध्ये रूजला. १९११ मध्ये मुंबईला ‘वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन’ ही संघटना स्थापन झाली. ‘फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया’ ही मध्यवर्ती संस्था १९३७ साली स्थापन झाली व त्यामुळे भारतातील फुटबॉल स्पर्धांना सुसंघटित स्वरूप प्राप्त झाले. १९४१ पासून राष्ट्रीय विजेतेपदासाठी ‘संतोष ट्रॉफी’चे सामने खेळले जाऊ लागले. याशिवाय ‘ड्युरंड कप’ व ‘डी. सी. एम्. (दिल्ली क्लॉथ मिल्स) कप’ या फुटबॉल स्पर्धाही महत्त्वपूर्ण आहेत. भारताने ऑलिंपिक सामन्यांत १९४८ मध्ये प्रथमच आपला फुटबॉल संघ उतरवला. १९५६ साली मेलबर्न येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. १९६२ साली जाकार्ता येथील आशियाई फुटबॉल स्पर्धांमध्ये भारताला अजिंक्यपद मिळाले. चुनी गोस्वामी हा त्या संघाचा कप्तान होता. दरवर्षी आशियाई राष्ट्रांसाठी मर्डेका फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्यांत भारतीय संघ भाग घेतो. तसेच शालेय खेळाडूंसाठीही एक वेगळी आशियाई फुटबॉल स्पर्धा भरवली जाते. सध्याच्या उत्कृष्ट फुटबॉलपटूंमध्ये महंमद अकबर व हबीब हे बंधू, श्याम थापा, इंदरसिंग, शबीर अली, बिडेश बोस, झेव्हियर पायस, सुरजीत सेनगुप्ता हे आघाडी खेळाडू प्रसिद्ध आहेत. बचाव फळीत खेळणारा गौतम सरकार आणि गोलरक्षक भास्कर गांगुली व शिवजी बॅनर्जी या खेळाडूंनीही नाव मिळवले आहे. यांखेरीज मानस भट्टाचार्य, फ्रॅन्सीस, नेव्हील परेरा इत्यादींचा उल्लेख करणे आवश्यक आहे.

रग्बी युनियन खेळातील एक दृश्यरग्बी : ह्या खेळाला सॉकरपासून वेगळे दर्शविण्यासाठी सुरूवातीला ‘रगर’ असेही संबोधीत असत. या खेळाची बीजे प्राचीन रोमन काळात आढळत असली, तरी त्याचा उगम खऱ्या अर्थाने एकोणिसाव्या शतकातच झाला. १८२३ मध्ये इंग्‍लंडमधील रग्बी येथे एका मैदानावर फुटबॉलचा सामना चालू असता घडलेल्या एका नाट्यपूर्ण प्रसंगातून या खेळास चालना मिळाली. विल्यम वेब एलिस या खेळाडूने चेंडू हातांमध्ये पकडला व तो पायाने खेळण्याऐवजी, हातांमध्येच घेऊन प्रतिस्पर्ध्याच्या गोलरेषेकडे पळत सुटला. ह्या नियमभंगाच्या घटनेतूनच रग्बी या खेळाचे स्वरूप सिद्ध झाले. त्यातील चेंडू हाताळण्याच्या व हातात घेऊन पळवत नेण्याच्या कृतीस पुढे खेळात प्राधान्य मिळाले. १८३९ साली केंब्रिज विद्यापीठात अशा प्रकारे सामना खेळला गेल्याचे उल्लेख आढळतात. या खेळाला अधिकृत रूप देण्यासाठी १८७१ मध्ये ‘रग्बी फुटबॉल युनियन’ची स्थापना लंडन येथे करण्यात आली. त्याच वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवरचा पहिला सामना इंग्‍लंड विरूद्ध स्कॉटलंड या संघांमध्ये एडिंबरो येथे खेळला गेला. १८७५ मध्ये हा खेळ प्रथमच अमेरिकेत गेला. सुरूवातीला प्रत्येक संघात २० खेळाडू असत. १८७७ मध्ये खेळाडूंची १५ ही संख्या निश्चित झाली. या खेळाचे नियम ‘इंटरनॅशनल रग्बी फुटबॉल बोर्ड’ (स्थापना १८९०) या संस्थेमार्फत तयार केले जातात. पहिल्या महायुद्धानंतर रग्बी वा रग्बी युनियन हा खेळ जगभर पसरला. इंटरनॅशनल रग्बी बोर्डाचे सात सदस्य आहेत: इंग्‍लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, वेल्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व द. आफ्रिका. फ्रान्सने १९३४ मध्ये ‘फेडरेशन इंटरनॅशनल दी रग्बी अमॅच्युअर’ (एफ्. आय्. आर्. ए.) ही स्वतंत्र संघटना यूरोपमधील खेळाचे नियंत्रण करण्यासाठी स्थापन केली. त्याचे २० सदस्य आहेत. त्यांत रूमानिया, इटली, स्पेन, नेदर्लंड्‌स, डेन्मार्क, रशिया इत्यादींचा अंतर्भाव होतो. ऑलिंपिक सामन्यांमध्ये रग्बी युनियन खेळाचा समावेश एकूण चार वेळा करण्यात आला (१९००, १९०८, १९२० व १९२४).


 रग्बीचा चेंडू अंडाकृती असून त्याची लांबी २८ ते २९ सेंमी. (११ ते ११ / इंच) व लांबीनुसार परिघ ७६ ते ७९ सेंमी. (३० ते ३१ इंच) असतो. त्याचे वजन ३८० ते ४३० ग्रॅ. (१३/ ते १५/ औंस) असते. रग्बीचे मैदान हे सामान्यपणे १४६ मी. (१६० यार्ड) लांब व ६९ मी. (७५ यार्ड) रुंद असते. दोन गोलरेषांमधील अंतर १०१ मी. (११० यार्ड) असते. गोलरेषांच्या पलीकडे त्यांना समांतर अशा रेषा २३ मी. (२५ यार्ड) अंतरावर काढलेल्या असतात. या क्षेत्रास ‘इन गोल’ असे म्हणतात. मैदानास मध्यभागी विभागणारी रेषा म्हणजे ‘हाफ वे लाइन’. तिच्यापासून दोन्ही बाजूंस १० मी. अंतरावर समांतर रेषा काढलेल्या असतात. गोल-खांबांमधील अंतर ५·६ मी. (१८ फुट ६ इंच) असते. गोल-खांब ३ मी. (१० फुट) उंचीवर आडवा वासा असलेले पण एकूण ३·४ मी. (११ फुट) पेक्षा जास्त उंचीचे असतात. कारण यात चेंडू आडव्या दांडीवरून जावा लागतो.

रग्बी युनियनमध्ये प्रत्येक संघात १५ खेळाडू (आठ आघाडी व सात पिछाडी) असतात. प्रत्येकी ४० मिनिटांचे दोन डाव, मध्यंतरी विश्रांती घेऊन खेळतात. सामन्याचे नियंत्रण पंच व त्याचे दोन साहाय्यक करतात. या खेळात चेंडू लाथाडणे, पायांमध्ये खेळवत पुढे पुढे सरकवत नेणे, चेंडू हातात घेऊन पळत जाणे, चेंडू एका खेळाडूने दुसऱ्याकडे सोपवणे, इ. प्रकार अंतर्भूत होतात. खेळाडू जर ‘ऑफ साइड’ स्थितीत (पोझिशन) असेल, तर त्यास खेळात भाग घेता येत नाही. ‘ऑन साइड’ स्थितीमध्ये खेळाडू हा नेहमी चेंडूमागे वा चेंडू घेऊन धावणाऱ्या त्याच्या संघातील खेळाडूमागे असावाच लागतो. एका खेळाडूने दुसऱ्या खेळाडूकडे चेंडू देताना (पास) तो दोन्ही बाजूंना वा पाठीमागे दिला पाहिजे पुढच्या बाजूस चेंडू हवाली करणे (फॉर्‌वर्ड पास) नियमबाह्य आहे. चेंडू काखेत पकडून धावणाऱ्या खेळाडूला प्रतिपक्षाचा खेळाडू अडवू वा धरू शकतो व त्याला मैदानात बसवू शकतो (टॅक्‌लिंग) पण त्याची नाकेबंदी (ब्‍लॉकिंग) करता येत नाही.

या खेळाचा मुख्य उद्देश म्हणजे ‘ट्राय’ मिळवून वा गोल करून गुण मिळवणे. साहजिकच जास्त गुण मिळवणारा संघ विजयी ठरतो. गुण पुढील पद्धतीने मिळविले जातात : जेव्हा चढाई करणारा खेळाडू प्रतिपक्षाच्या ‘इन गोल’ मध्ये (गोलरेषेच्या पलीकडे) चेंडू पोहोचवतो तेव्हा त्यास ‘ट्राय’ म्हणतात. ट्राय मिळविल्यावर चढाई करणारा संघ त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्‍न करतो. म्हणजे चेंडू विवक्षित ठिकाणी ठेवून त्यास लाथ मारून गोल केला जातो. सध्याच्या गुणपद्धतीनुसार ट्रायसाठी ४ गुण व त्याचे गोलमध्ये रूपांतर केल्यास जादा २ गुण मिळतात. ‘ड्रॉप गोल’ साठी (म्हणजे खेळ चालू असताना एखाद्या खेळाडूने चेंडू हातांतून जमिनीवर आपटला व तो जमिनीवर टप्पा पडून उडाल्यावर त्यास लाथ मारून सरळ गोल केल्यास) ३ गुण असतात. खेळताना एखाद्या खेळाडूकडून नियमभंग घडल्यास त्याच्या प्रतिपक्षास दंड-लाथेचा (पेनल्टी किक) फायदा मिळतो व त्याने गोल केल्यास त्यास ३ गुण मिळतात. अपराध गंभीर स्वरूपाचा असल्यास- म्हणजे ऑफ साइडमध्ये राहिल्यास, खेळाडूची धोकेबाज अडवणूक (डेंजरस टॅक्‌लिंग) केल्यास वगैरे – प्रतिपक्षास मुक्त-लाथेचा फायदा दिला जातो. किरकोळ नियमभंग घडल्यास – उदा., चेंडू पुढील बाजूस खेळाडूच्या हवाली केल्यास – त्यासाठी ‘स्क्रम’ वा ‘स्क्रमेज’ ही शिक्षापद्धती अवलंबली जाते : दोन्ही संघांतील आघाडी खेळाडू गट करून परस्परांना भिडतात. हे गट तीन-दोन-तीन अथवा तीन-चार-एक अशा खेळाडूंच्या तीन रांगांमध्ये उभे केले जातात. उभय पक्षांचे पहिल्या दोन रांगांतील खेळाडू आपापली डोकी व खांदे परस्परांना घट्ट भिडवत ओणवून उभे राहतात व उरलेल्या रांगांतील खेळाडू त्यांचे खांदे पुढच्या खेळाडूंच्या पार्श्वभागी  भिडवून त्यांना घट्ट धरून वाकून उभे राहतात. नंतर चेंडू पहिल्या दोन रांगांच्या मधल्या पोकळीत फेकला जातो. पहिल्या रांगांतले खेळाडू तो चेंडू जोराने आपल्या मागच्या बाजूस भिरकावण्याचा प्रयत्‍न करतात. मागील बाजूस असलेला त्यांचा साथीदार तो चेंडू बळकावून पळत सुटतो, वा आपल्या अन्य साथीदाराच्या हवाली करतो, वा लाथेने उडवतो. स्क्रमेजचा हा प्रकार म्हणजे रग्बी हा खेळाचे एक लक्षणीय वैशिष्ट्य आहे. ‘पंट’ हे या खेळाचे दुसरे वैशिष्ट्य. ‘पंट’ म्हणजे चेंडू हातातून खाली सोडणे व जमिनीवर त्याचा टप्पा पडण्यापूर्वी- अधांतरीच-तो लाथेने उडवणे. लाथेचा हा प्रकार खेळ चालू असताना वारंवार वापरला जातो.

 या खेळात जागतिक दर्जाचे काही महत्त्वपूर्ण विक्रम नोंदले गेले आहेत : आंतरराष्ट्रीय सामन्यांतील सर्वोच्च गुणसंख्या टोकिओ येथे १९७५ साली झालेल्या सामन्यात वेल्सने जपानचा पराभव करताना नोंदवली. वेल्सने ८२ गुण (१० गोल + ४ ट्राय + २ पेनल्टी गुण) तर जपानने ६ गुण (२ पेनल्टी) मिळवले. ‘इंटरनॅशनल चँपियनशिप’ स्पर्धांमधील सर्वोच्च गुणसंख्या ७५ असून ती १९१० साली स्वान्झी येथे वेल्स (५९ गुण) विरुद्ध फ्रान्स (१६ गुण) या सामन्यात नोंदवली गेली. विल्यम फर्गस माकॉर्मिक, ईआन स्कॉट स्मिथ, सॅम्युएल डबल हे रग्बी युनियनमधील काही प्रसिद्ध खेळाडू होत.

भारतातील रग्बी युनियनचा खेळ रूढ आहे. ‘इंडियन रग्बी युनियन ट्रॉफी’साठी दरवर्षी स्पर्धा भरवण्यात येतात त्यांत मुंबई व भारतातही रग्बी युनियनचा खेळ रूढ आहे. ‘इंडियन रग्बी युनियन ट्रॉफी’साठी दरवर्षी स्पर्धा भरवण्यात येतात व त्यांत मुंबई व  कलकत्ता येथील अनेक संघ भाग घेतात. महाराष्ट्रातही या खेळाचे नियंत्रण व जोपासना करणारी ‘महाराष्ट्र रग्बी युनियन’ ही संघटना अस्तित्वात आहे. मुंबईच्या शालेय व महाविद्यालयीन खेळाडूंमध्ये रग्बीची आवड दिवसेंदिवस वाढत आहे. ॲलन सॅम्युअल, श्याम मोहातो, ए. चतर्जी, रणजीत सेन, पीटर हूपर, रॉबीन ब्राउन इ. सध्याचे प्रसिद्ध खेळाडू होत.


रग्बी लीग : रग्बी युनियनमधूनच फुटून वेगळी निघालेली ही शाखा आहे. रग्बी युनियनमध्ये व्यावसायिक वृत्तीस वाव नव्हता त्यातूनच १८९५ साली ‘नॉर्दर्न युनियन’ ही वेगळी संघटना स्थापन झाली व तिचेच रूपांतर पुढे ‘रग्बी फुटबॉल लीग’ (१९२२) या व्यावसायिक संघटनेत झाले. ज्येष्ठ अशा तीस रग्बी लीग मंडळांतील खेळाडू व्यवसायिक असून त्यांना खेळाबद्दल मोबदला दिला जातो. हौशी रग्बी युनियनपेक्षा या व्यावसायिक खेळामध्ये स्पर्धात्मक वृत्तीला जास्त वाव मिळतो. संघटनात्मक तत्त्वे व खेळाचे नियम या दोन्ही दृष्टींनी हा खेळ रग्बी युनियनपेक्षा काहीसा वेगळा आहे. खेळाच्या नियमांत सुधारणा करण्यामागे हा खेळ अधिक गतिमान व प्रेक्षणीय व्हावा, हे उद्दिष्ट होते. त्या दृष्टीने रग्बी युनियनमधली खेळाडूंची १५ ही संख्या कमी करून ती १३ वर आणण्यात आली. यात दोन आघाडी खेळाडू वगळण्यात आले व पिछाडी खेळाडूंना अधिक वाव देण्यात आला. खेळाडूंना अडवण्याच्या (टॅक्‌लिंग) नियमातही फरक आहे. रग्बी लीग हा प्रकार लँकाशर, यॉर्कशर व कम्‍ब्रीअ येथे जास्त लोकप्रिय असून तेथे या खेळाच्या स्पर्धा भरवल्या जातात. याखेरीज लंडन येथील वेम्‍बली क्रीडांगणावर ‘कप फायनल’ स्पर्धा दरवर्षी भरवल्या जातात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व फ्रान्स येथेही या खेळास वाढती लोकप्रियता लाभते आहे. १९५४ नंतर विश्वकरंडक स्पर्धांमध्ये या देशांचे संघ भाग घेऊ लागले तथापि १९७५ मध्ये त्याच्या जागी ‘रग्बी लीग इंटरनॅशनल चँपियनशिप’ स्पर्धा भरवण्यात येऊ लागल्या. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी घेण्यात येते आणि त्यात इंग्‍लंड, वेल्स, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड हे संघ भाग घेतात. विश्वकरंडक स्पर्धा एकूण सात झाल्या. त्यांपैकी ऑस्ट्रेलियाने चार (१९५७, १९६८,१९७० व १९७५) तर ग्रेट ब्रिटनने तीन (१९५४, १९६० व १९७२) जिंकल्या. सी. एच्. टीच, जिमी लोमास, बी. ल्यूइस जोन्झ, नील फॉक्स, डेव्हिड वॉट्‍‌किन्स, मिक सलिव्हन इ. खेळाडू प्रसिद्ध आहेत.

अमेरिकन फुटबॉल : वसाहतकाळापासून १८७१ पर्यंत असोसिएशन फुटबॉलचा एक प्रकार अमेरिकेत कॉलेजांतून खेळला जात होता. पहिला अधिकृत फुटबॉल सामना रट्‍गर्झ व प्रिस्टन या संघांत १८६९ मध्ये खेळला गेला. पण सध्या अमेरिकेत रूढ असलेल्या खेळाची सुरुवात १८७३ मध्ये झाली. त्या वेळी कोलंबिया, प्रिन्स्टन, येल व रट्‍गर्झ या संघांनी एक सामान्य नियमावली स्वीकृत केली. १८८० मध्ये प्रत्येक संघात ११ खेळाडू असावेत, हा नियम सर्वसंमत झाला. मध्यंतरी या खेळाचे स्वरूप फार उग्र  व हिंसक बनले. तथापि ‘द नॅशनल कॉलेजिएट ॲथलेटिक असोसिएशन’ या संघटनेने खेळाची सूत्रे हाती घेतली व त्याचे नियमन केले. त्यामुळे त्यास अधिक सुविहित रूप प्राप्त झाले.

 इंग्‍लिश रग्बी या खेळाशी ह्याचे काहीसे साम्य आढळून येते. चेंडू हा रग्बी चेंडूसारखाच अंडाकृती पण थोडा लहान व दोन्ही चपट्या बाजूंना जास्त टोकदार असतो. खेळाचे मैदान ९१ × ४९ मी. (३०० × १६० फुट) असते. त्याच्या दोन्ही बाजूंना गोलरेषेच्या पलीकडे अंतिम रेषेपर्यंत (एन्ड लाइन) ९ मी. (३० फुट) इतक्या अंतराचे जे क्षेत्र असते, त्यास ‘एन्ड झोन’ म्हणतात. हे गुणमोजणीचे क्षेत्र. दोन गोलरेषांमधील जागा (११० मी.) म्हणजे प्रत्यक्ष क्रीडाक्षेत्रच होय. ते गोलरेषांना समांतर अशा रेषा प्रत्येकी ४·५७ मी. (१५ फुट) अंतरावर काढून विभागलेले असते. दोन गोल-खांब ५·६ मी. (१८ फुट ६ इंच) अंतरावर असतात. त्यांची उंची ६ मी. (२० फुट) पेक्षा जास्त असते व जमिनीपासून ३ मी. (१० मी.) उंचीवर त्यांना आडवे वासे जोडलेले असतात. अकरा खेळाडूंपैकी सात आघाडी व चार पिछाडी असतात. बदली खेळाडूंना परवानगी असते. खेळाडू जाड पॅड्स, शिरस्राण व मुखवटे अशी संरक्षक साधने वापरतात. प्रत्येकी १५ मिनिटाचे एकूण चार डाव व मध्यंतरी १५ मिनिटांची विश्रांती असते. जो संघ जास्त गुण मिळवतो तो विजयी ठरतो. ‘टच्‌डाउन’चे (इंग्‍लिश रग्बीमधील ‘ट्राय’) ६ गुण व त्यानंतर त्याचे गोलमध्ये रूपांतर केल्यास १ जादा गुण मिळतो. मैदानातून चेंडूला लाथ मारून सरळ गोल केल्यास ‘गोल किक’चे ३ गुण मिळतात. अमेरिकन फुटबॉलचे महत्त्वाचे वैशिष्ट्य हे की, त्यात अडथळ्याचा (इंटरफीअरन्स) मोठ्या प्रमाणातील वापर नियमात बसू शकतो. त्यामुळेच या खेळाचे स्वरूप जास्त उग्र व आक्रमक बनते.

कॅनडियन फुटबॉल :  या खेळाचा उगम रग्बी फुटबॉलमध्ये असून तो ब्रिटिश सैनिक व आप्रवासी यांनी १८६० च्या दशकात कॅनडामध्ये प्रसृत केला. कॅनडियन फुटबॉलचे अमेरिकन फुटबॉलशी निकटचे साम्य असून दोहोंतील फरक मुख्यतः खेळाडूंच्या संख्येत व मैदानाच्या आकारात आहे. कॅनडियन खेळात प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात. मैदान मोठे म्हणजे १०० मी. (११० यार्ड) × ६० मी. (६५ यार्ड) असून ‘एन्ड झोन्स’ २३ मी. (२५ यार्ड) अंतराचे असतात. व्यावसायिक खेळाडूंचे संघ ‘कॅनडियन फुटबॉल लीग’ मध्ये भाग घेतात. ‘ग्रे कप’ ही महत्त्वाची स्पर्धा होय.

ऑस्ट्रेलियन फुटबॉल : १८६० च्या दशकात हा खेळ उगम पावला. त्यात गेलिक फुटबॉलची वैशिष्ट्ये सामावलेली आहेत. मैदान लंबगोलाकार असून दोन गोलांमधील लांबी १३५ ते १८५ मी. (१४७ ते २०२ यार्ड) व मध्यापासून आडव्या बाजूचे अंतर ११० ते १५५ मी. (१२० ते १७० यार्ड) असते. चेंडू रग्बी चेंडूप्रमाणेच अंडाकृती असला तरी त्याच्या आकारमानात काहीसा फरक असतो. प्रत्येक संघात १८ खेळाडू व दोन राखीव असतात. त्यांपैकी १५ खेळाडू हे प्रत्येकी तीन-तीन रांगांमध्ये निश्चित स्थानी असतात. (पिछाडी, निम्‍न पिछाडी, मध्य-स्थानी, निम्‍न आघाडी व आघाडी). उर्वरित तीन खेळाडू अनुवर्ती (फॉलोअर्स) असतात. प्रत्येकी २५ मिनिटांचे चार डाव यानुसार खेळ चालतो.

गेलिक फुटबॉल : आयर्लंडमध्ये कोणत्या रूपात फुटबॉल सु.१६०० पासून खेळला जात होता. तो रग्बीप्रमाणेच होता. १८९४ मध्ये ‘गेलिक ॲथलेटिक असोसिएशन’ने या खेळास सध्याचे रूप दिले. या संघटनेमार्फत ‘ऑल-आयर्लंड’ नैपुण्य स्पर्धा दरवर्षी भरविल्या जातात व त्यांमध्ये आयर्लंडच्या ३२ परगण्यांचे संघ भाग घेतात. खेळाचे मैदान १२८ ते १४६·४ मी. (१४० ते १६० यार्ड) लांब व ७६·८ ते ९१·५ मी. (८४ ते १०० यार्ड) रुंद असते. चेंडू गोलाकार असून त्याचा परिघ ६८·५८ ते ७३·६६ सेंमी. (२७ ते २९ इंच) व वजन ३६८·५५ ते ४२५·२५ ग्रॅ. (१३ ते १५ औंस) असते. गुणमोजणी क्षेत्रात गोल-खांब हे ६·४० मी. (२१ फुट) अंतरावर असतात व त्यांची उंची ४·८८ मी. (१६ फुट) असून त्यांमधील आडवी दांडी जमिनीपासून २·४४ मी. (८ फुट) उंच असते. गोलाच्या खालच्या अर्ध्या भागात जाळी असते व त्यात चेंडू गेल्यास ३ गुण मिळतात व वरच्या भागात गेल्यास फक्त १ गुण मिळतो. प्रत्येक संघात १५ खेळाडू असतात आणि प्रत्येक सामन्यात प्रत्येकी ३० मिनिटांचे दोन डाव असतात. चेंडू हवेतल्या हवेत झेलता येतो. तथापि तो ३·६५ मी. (४ यार्ड) अंतरापेक्षा जास्त बरोबर वागवता (कॅरी) येत नाही तो लाथेनेच खेळावा लागतो. जमिनिवरील चेंडूला हस्तस्पर्श करता येत नाही तर तो पायांनीच उचलून हातात घ्यावा लागतो. दोन प्रथम दर्जाच्या तुल्यबळ संघांत हा खेळ अत्यंत गतिमान व आकर्षक होऊ शकतो.

यांखेरीज ईटन, हॅरो, विंचेस्टर असे स्थानपरत्वे फुटबॉलचे काही प्रकार दिसून येतात. त्यांत खेळाच्या पद्धती व नियम यांत काहीशी भिन्नता व वैशिष्ट्ये आढळतात.

संदर्भ : 1. Butter, Frank, Ed. Success at Soccer, London,1956.

   2. Currie, Gordon, 100 Years of Canadian Football, 1968.

   3. Glanville, Brian, The puffin Book of Football, 1973.

   4. Golesworthy, Maurice Macdonald, R. K. The AB-Z of World Football, London, 1966.

   5. Pollard, Jack, Ed. High Mark : The Complete Book on  Australian Football, Sydney, 1964.

   6. Reyburn, Wallace, A History of Rugby, London, 1971.

   7. Treat, Roger, Ed. The Official Encyclopaedia of Football, Cranburry, N. J. 1972. 

   ८. खांडेकर, जयसिंग, फुटबॉल – तंत्र, कौशल्य व नियम, कोल्हापूर, १९८०.

शहाणे, शा.वि. इनामदार, श्री. दे. पंडित, बाळ ज.