फुगडी : महाराष्ट्रातील मुली व स्त्रिया यांच्यात लोकप्रिय असलेला एक खेळ. महाराष्ट्रीय लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या पारंपरिक लोकनृत्यांमध्येही त्याची गणना होते. या नृत्यात दोन किंवा जास्तीत जास्त आठपर्यंत मुली भाग घेऊ शकतात. मात्र दोन मुलींमध्ये खेळावयाच्या फुगड्यांचे प्रकार जास्त दिसतात. या नृत्यप्रकारात दोन मुली वा स्त्रिया समोरासमोर उभ्या राहून हातांचा तिढा घालून एकमेकींचे तळहात पकडतात. नंतर मागे रेलून व पाय जुळवून गरगर फिरतात. फिरताना एखादे गाणे म्हणतात एकमेकींना उखाणे घालतात, किंवा तोंडाने पिंगा घालतात अथवा ‘पक् पक्’ असा आवाज काढतात, या आवाजाला ‘पक्वा’ म्हणतात. त्या हळूहळू गिरक्यांचा वेग वाढवितात. दोघींपैकी एखादी दमली म्हणजे आपोआप फुगडी थांबते. या खेळात खूप व्यायाम होतो. स्त्रिया मंगळागौर, नवरात्र उत्सव इ. प्रसंगी हा खेळ खूप उत्साहाने खेळतात. या खेळाचे अनेक प्रकार आहेत. ते विशिष्ट प्रकारे फुगडी खेळण्याच्या पद्धतीवरून पडले आहेत. उदा., ‘एक हाती फुगडी’, ‘दंड फुगडी’, ‘बस फुगडी’, ‘लोळण फुगडी’, ‘भुई फुगडी’, ‘कासव फुगडी’, ‘नखुल्या’, ‘जाते’ इत्यादी. ‘पाट फुगडी’ हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार असून त्यात एकच स्त्री भिंतीला पाट टेकवून त्यावर हातांनी चुटक्या वाजवत व नाचत ही फुगडी खेळते. चुटक्यांचा व पायातील जोडव्या-मासोळ्यांचा पाटावर होणारा नाद यांतून एक लय निर्माण होते. फुगड्यांची निरनिराळी गाणी व उखाणे म्हणजे पिढ्यान्पिढ्या चालत आलेली, लोकसंस्कृतीचे यथार्थ दर्शन घडविणारी लोकगीतेचे होत. फुगड्यांच्या काही उखाण्यांतून स्त्रिया कधी परस्परांची गुणवर्णने तर कधी थट्टामस्करी करताना आढळतात. काही उखाण्यांतून गंमतीदार प्रश्नोत्तरेही आढळतात. शब्दांचा सुंदर नाद व एक प्रकारची धावती लयही काही उखाण्यांतून आढळते. उदा., ‘आरंड्यावर करंडा करंड्यावर मोर | माझ्यासंगं फुगडी खेळती चंद्राची कोर |’ सणासमारंभाचे उत्साहपूर्ण व चैतन्यमय वातावरण, फुगड्यांच्या नाचांतील विविध गतिविभ्रम आणि गाणी-उखाणे यांतील गेयता व हास्यविनोद यांच्या संयोगामुळे हा खेळप्रकार मोठा वेधक व वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.
संदर्भ : बाबर, सरोजिनी, संपा. स्त्रियांचे खेळ आणि गाणी, पुणे, १९७७.
शहाणे, शा. वि.
“