छंद रिकामा किंवा फुरसतीचा वेळ घालविण्यासाठी, मनोरंजनासाठी, त्याचप्रमाणे हौस किंवा विरंगुळा म्हणून माणूस जे जे काही करतो, ते सर्व छंदात मोडते. बहुतेक माणसांना कसला तरी छंद असतो. छायाचित्रे काढणे, पोस्टाची तिकिटे जमविणे, थोरांच्या स्वाक्षऱ्या गोळा करणे, पुरावस्तूंचा संग्रह करणे, शिकार करणे, बागकाम करणे, हलकेफुलके लाकूडकाम करणे यांसारखे छंद सामान्यपणे आढळून येतात.

मोकळा वेळ योग्य रीतीने कारणी लागण्यासाठी एखादा छंद असणे चांगले असते. छंदामुळे मनोरंजन होते, ज्ञानात भर पडते, मित्रही मिळविता येतात व श्रमामुळे आलेला थकवा घालवून मन उल्हसित करता येते. यांत्रिक पद्धतीच्या त्याच त्या कार्यात न लाभलेले मानसिक समाधान किंवा निर्मितीचा आनंद छंदाच्या द्वारे मिळविता येतो. काम आणि खेळ यांच्यात पोषक असा समतोलही छंदामुळे साधता येतो. फार कष्ट केल्यानंतर प्रकृतीच्या स्वास्थ्यासाठी त्याचा उपयोग होतो. शारीरिक आणि मानसिक व्याधींपासून मुक्त होण्यासाठी छंदाचा चांगला उपयोग होतो, असे आधुनिक वैद्यकीय मत आहे.

छंदाच्या बाबतीत पौर्वात्यांपेक्षा पाश्चिमात्य अग्रेसर आहेत. काही छंद खर्चिक असले, तरी गोरगरिबांनाही आपापल्या कुवतीप्रमाणे छंद निवडता येतात. या छंदातून काही माणसांना अमाप पैसा मिळाल्याची, तर काहींना प्राण गमवावा लागल्याची उदाहरणे आहेत.

छंदाचे प्रकार :साधारणतः छंद हे चार प्रकारांत विभागता येतात : (१) वस्तू जमविण्याचा व प्राणी पाळण्याचा छंद, (२) वस्तू स्वतःच तयार करण्याचा छंद, (३) कलाकौशल्याची कामे व (४) खेळ आणि व्यायाम.

(१) वस्तू जमविण्याचा व प्राणी पाळण्याचा छंद : पोस्टाची तिकिटे किंवा स्वाक्षऱ्या जमविणे, ग्रंथसंग्रह करणे, निरनिराळ्या चित्रविचित्र वस्तूंचा संग्रह करणे (उदा., ऐतिहासिक वस्तू, चित्रे, फुलपाखरे, काचा, दिवे, खेळ, खेळणी इ.), कुत्रा, मांजर, कबुतरे, पोपट, ससे, हरिण यांसारखे पशुपक्षी पाळणे याच प्रकारात येतात.

(२) स्वतः वस्तू तयार करणे :आपले हस्तकौशल्य वापरून काही आवडत्या वस्तू स्वतःच तयार करण्याची हौस असली, तर तीमधून करमणूक होते आणि मनाला विरंगुळा मिळतो. आपण तयार केलेली वस्तू स्वतः वापरण्याचे मानसिक समाधान काही वेगळेच असते. वस्तू तयार कशा कराव्यात, त्या तयार करताना बाजारातील नवी साधनसामग्री न आणता घरातील जुनी सामग्री कशी वापरावी, जोड कसे तयार करावेत, तयार वस्तू आकर्षक कशा कराव्यात इत्यादींचे मार्गदर्शन करणारी अनेक पुस्तके बाजारात मिळतात. कपाट, टेबल, खुर्ची असे उपयोगी फर्निचर तयार करणे, विणकाम-शिवणकाम करणे, रंगरंगोटी करणे, चित्रे काढणे, घरातील दिवे बसविणे वा ते दुरुस्त करणे, घरातील किरकोळ दुरुस्त्या करणे, विटकाम करणे इ. अनेक छंद या प्रकारात मोडतात.


(३) कलाकौशल्याचे छंद :नृत्य, संगीत, चित्रकला यांसारख्या कलाप्रकारांची हौसेने साधना करणे या प्रकारात मोडते. नाट्यनिर्मिती किंवा नाटकातून कामे करणे हेदेखील हौसेचे छंद ठरतात. अशा प्रकारचा छंद असल्यामुळे माणसातील सुप्त शक्तींना वाव मिळतो त्याचप्रमाणे तो इतरांची करमणूकही करू शकतो.

 

(४) खेळ आणि व्यायाम :या प्रकारात मोकळ्या वातावरणाचा लाभ होतो, तसेच प्रत्यक्ष कृतीला वाव मिळतो. बॅडमिंटन, टेनिस, क्रिकेट, गोल्फ, मासे पकडणे, शिकार करणे, पोहणे इ. खेळ लोकप्रिय आहेत. काही लोकांना पत्ते, कॅरम यांसारखे बैठे व टेबल टेनिससारखे अंतर्गेही खेळ आवडतात.

छंदाची निवड :आपल्या आवडीनिवडींप्रमाणे आणि मानसिक कलाप्रमाणे छंदांची निवड करावी हे खरे असले, तरी बैठी व एकाच जागेवर कामे करणारांनी जर मैदानी व मोकळ्या हवेतील छंद लावून घेतले, तर ते हितकारक होते. एकलकोंड्या स्थितीत ज्याला बराच काळ घालवावा लागतो, त्याने चारचौघांचा सहवास देणारा छंद लावून घेतला, तर ते त्याला लाभदायक होते. याच्या उलट अनेकांच्या संगतीत आणि संबंधात काम करावे लागणाराने मन शांत होईल व गडबडीपासून दूर जाता येईल, असे वाचनाचे, लेखनाचे, संग्रहाचे छंद लावून घेणे लाभदायक असते.

आपल्या भोवतालच्या परिस्थितीप्रमाणेच छंद निवडण्याकडे माणसाचा कल असतोच असे नाही. समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्याला समुद्र काठी सापडणाऱ्या शंखशिंपल्यांचे महत्त्व वाटत नाही. समुद्र क्वचित पहावयास मिळणाऱ्याला सागरकिनारी मिळणाऱ्या वस्तूंचा संग्रह करण्याची मौज वाटते.

छंदांची हौस पुरविण्यासाठी पुरेशी सवड, जरूर तो पैसा त्याचप्रमाणे जरूर ते श्रम करण्याची तयारी असावी लागते. 

जहांगीर बादशाहाला शिकारीचा आणि मातलेले हत्ती वठणीवर आणण्याचा छंद होता. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी दौलतराव शिंदे यांच्या लष्करी छावणीत पतंगांच्या खेळाची प्रचंड धामधूम चालत असे, असा उल्लेख आढळतो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी पोस्टाची साडेबारा लाख तिकिटे जमविलेली होती. विन्स्टन चर्चिल यांना चित्रे काढण्याचा, लेखनाचा आणि विटकाम करण्याचा छंद होता. जॉल्स्टन नावाच्या धनिकाने हातकाठ्यांचा संग्रह केलेला आढळून येतो. त्यात रासपुटीन आणि अब्राहम लिंकन यांच्या काठ्या आहेत. एका गृहस्थाने आगपेट्यांवरील निरनिराळ्या चित्रांचे २८,००० नमुने जमविलेले आहेत. निरनिराळ्या काचांचा अनेक माणसे संग्रह करतात कारण अमेरिकेत चारपाचशे वर्षापूर्वीच्या काचांना चांगली किंमत येते. एका हौशी गृहस्थाने एक हजार घड्याळांचा संग्रह केलेला आहे. त्यात १५७३ सालचे घडीव लोखंडाचे घड्याळ असून त्याला फक्त तासकाटा आहे आणि ते वजनांवर चालते १७६० सालचे एक जपानी घड्याळही त्यात आहे. स्वाक्षऱ्या जमविण्याचा छंद एक लोकप्रिय छंद आहे. हा छंद पुरविण्यास लोक आवश्यक पडल्यास पैसेही देण्यास मागेपुढे पहात नाहीत. म. गांधी स्वतःच्या एका स्वाक्षरीला पाच रुपये घेत असत. अमेरिकन प्रेसिडेंट विल्सनच्या सहीचे पत्र पाच डॉलरला मिळते. जॉर्ज वॉशिंग्टनच्या सहीला पन्नास डॉलर पडतात. एलिझाबेथ राणीच्या सहीचे पत्र पाचशे डॉलरांना खपते, तर शेक्सपिअरच्या सहीच्या पत्राची किंमत तीस लाख डॉलर आहे. पुण्याच्या राजा केळकर संग्रहालयाचे केळकर यांस ऐतिहासिक वस्तू जमविण्याचा छंद आहे. एकाच माणसाने केलेला विविध वस्तूंचा इतका मोठा संग्रह दुसरीकडे क्वचितच असेल. पूर्वीच्या हैदराबाद संस्थानातील सालारजंग (तिसरा) नावाच्या गृहस्थाने असंख्य वस्तूंचा फार मोठा संग्रह केलेला असून तो सर्वांना पहावयास मोकळा आहे. जुनागढच्या नबाबाला कुत्री पाळण्याचा नाद होता. त्याने चारशेहून अधिक कुत्री बाळगलेली होती. त्यांच्यासाठी नबाबाने संगमरवरी घरे बांधली. नबाबसाहेब कुत्रा-कुत्रींची लग्ने मोठ्या इतमामाने करीत असत. हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यानंतर तो जेव्हा पाकिस्तानात पळाला, तेव्हा त्याने आपल्या बेगमा भारतात ठेवल्या पण निवडक कुत्र्यांचा ताफा मात्र विमानाने आपल्या बरोबर नेला.  

एका रोमन गृहस्थाने अनेक नाविन्यपूर्ण प्याले जमा केलेले होते. त्या संग्रहात एक रत्‍नजडीत प्याला होता. तो त्याने उत्साहाने नीरो राजाला दाखविला. नीरोला त्या प्याल्याचा मोह आवरला नाही. त्याने त्या रोमन गृहस्थाला विष भरलेला प्याला पाठविला. विष तो प्यायला नसता, तर त्या रोमन गृहस्थाचा राजाने छळ करून वध केला असता. तो छळ टाळण्यासाठी या रोमन माणसाने त्याच रत्‍नजडीत प्याल्यात ते विष ओतून घेऊन ते पिऊन टाकले. मरणापूर्वी त्याने तो प्याला आपटून फोडून टाकला. त्याला त्याचा छंदच प्राणघातक ठरला. तथापि असे प्रकार क्वचितच आढळतात. छंद म्हणून जमविलेल्या वस्तूंचा व्यापारी दृष्टीने खरेदीविक्री व्यवहार करणे योग्य नसले, तरी असेही प्रकार आढळून येतात.

गोखले, श्री. पु.