फिशर, एमील हेरमान : (९ ऑक्टोबर १८५२ – १५ जुलै १९१९). जर्मन रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी विविध शर्करा व प्यूरिने यांच्या संश्लेषणाविषयी (कृत्रिम रीतीने तयार करण्याविषयी ) महत्त्वाचे प्रायोगिक कार्य केले असून या कार्याबद्दल त्यांना १९०२ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांचा जन्म जर्मनीतील आइस्किर्खन येथे झाला. त्यांचे शिक्षण प्रथम खाजगी रीतीने आणि नंतर व्हेट्‌सलार व बॉन येथे झाले. १८७१ मध्ये त्यांनी बॉन विद्यापीठात प्रवेश केला. तेथे त्यांना आउगुस्ट फोन केकूले यांच्या अध्यापनाचा लाभ मिळाला. १८७२ मध्ये ते स्ट्रॅस्‌बर्गला गेले व आडोल्फ फोन बेयर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून १८७४ मध्ये त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळविली. त्यानंतर बेयर यांच्याबरोबर तेही म्यूनिकला गेले व तेथे १८७८ मध्ये व्याख्याते व १८७९ मध्ये साहाय्यक प्राध्यापक झाले. नंतर १८८२ साली ते एर्लांगेन येथे, १८८५ मध्ये वुर्ट्‌सबर्ग येथे व १८९२ मध्ये बर्लिनला रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून गेले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीतील रासायनिक द्रव्यांच्या उत्पादनाचे व्यवस्थापन त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते.

कीटोने व ⇨ आल्डिहाइडे या वर्गांचे लाक्षणिक विक्रियाकारक (विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारे) म्हणून प्रसिद्ध असलेले फिनिल हायड्रॅझीन हे संयुग त्यांनी प्रथम बनविले व त्याचा उपयोग करून अनेक कार्बोहायड्रेटांच्या संरचना निश्चित केल्या. त्यांनी ग्‍लुकोज, फ्रुक्टोज, मॅनोज व सॉर्बोज या शर्करांचे संश्लेषण केले. आणि त्यांच्या संरचना व विन्यास (रेणूतील अणूंची त्रिमितीय मांडणी) ठरविले. निसर्गात नसलेल्या कित्येक शर्कराही त्यांनी संश्लेषणाने बनविल्या व त्यांच्या संरचना व विन्यास निश्चित केले. ग्‍लुकोसाइडांच्या संरचना वलयी असतात, हे एकाच शर्करेपासून दोन ग्‍लुकोसाइडे मिळण्याचे कारण असल्याचे त्यांनी सुचविले.

प्राण्याच्या शरीरात असणाऱ्या यूरिक अम्‍ल, झँथीन, हायपोझँथीन, ॲडेनीन, ग्‍वानीन आणि वनस्पतिसृष्टीतील कॅफीन, थिओब्रोमीन व थिओफायलीन या संयुगांच्या विक्रियांचा अभ्यास आणि संश्लेषण करून त्यांनी त्यांचे परस्परसंबंध सिद्ध केले व त्यांच्या संरचना ज्या मूलभूत सांगाड्यावर आधारलेल्या आहेत, त्या प्यूरीन या संयुगाचेही संश्लेषण केले [→ प्यूरिने]. त्यांनी शोधून काढलेल्या कित्येक संश्लेषण प्रक्रियांचा उपयोग औषधनिर्मितीच्या व्यवसायास झाला आहे.

त्यांनी एंझाइमांच्या (जीवरासायनिक विक्रियांना मदत करणाऱ्या प्रथिनांच्या) विक्रियांचाही अभ्यास केला. विशिष्ट एंझाइम विशिष्ट तऱ्हेचा विन्यास असलेल्या शर्करेवरच विक्रिया घडविते यावरून त्यांच्या विक्रिया विवेचक असतात, हे त्यांनी दाखवून दिले.

प्रथिनांच्या जलीय विच्छेदनाने (पाण्याच्या साहाय्याने रेणूचे तुकडे करून) मिळणाऱ्या, त्या वेळी माहीत असलेल्या ॲमिनो अम्‍लांसारखी कित्येक ॲमिनो अम्‍ले त्यांनी संश्लेषणाने बनविली व त्यांच्या संरचना व विन्यास निश्चित केले. ॲमिनो अम्‍लांच्या एस्टरांच्या दोन रेणूंपासून डायपेप्टाइडे आणि अनेक रेणूंपासून पॉलिपेप्टाइडे त्यांनी बनविली. या रेणूंमध्ये असणाऱ्या -CONH- या दुव्याची पुनरावृत्ती प्रथिनांच्या दीर्घ शृंखलाकृती रेणूंमध्ये अनेकदा झालेली असते, असे त्यांनी प्रतिपादन केले व उच्च रेणुभाराची अनेक पॉलिपेप्टिइडे बनविली. चिनी टॅनिनाचे संघटन त्यांनी ठरविले आणि या वर्गाच्या संयुगांच्या संरचनांचे स्वरूप विशद केले.

त्यांना रॉयल सोसायटीचे डेव्ही पदक मिळाले होते (१८९०) व त्यांची या सोसायटीचे विदेशी सदस्य म्हणून निवड झाली होती (१८९९). त्यांनी संशोधनात्मक लेखांच्या रूपात विपुल लेखन केले असून या लेखांचे आठ मोठे खंड प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे. ते बर्लिन येथे मरण पावले.

जमदाडे, ज. वि.