फिरोझाबाद : उत्तर प्रदेश राज्याच्या आग्रा जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या १, ३३,८६३ (१९७१). आग्र्याच्या पूर्वेस सु. ४५ किमी. आग्रा-मैनपुरी रस्त्यावर हे दिल्ली-मुगलसराई या उत्तर रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. आग्र्याशी तसेच अलीगढ, दिल्ली, इटावा, कानपूर, अलाहाबाद, इ. प्रमुख शहरांशी लोहमार्ग व सडका यांनी ते जोडलेले आहे.
युद्धामध्ये उद्ध्वस्त झालेले हे शहर सोळाव्या शतकात अकबराच्या आज्ञेवरून मलिक फिरोझ याने पुन्हा वसविले. आग्रा मार्गावरील त्याची कबर, लाल दगडांनी बांधलेला ‘राजा का ताल’ हा तलाव, जामी मशीद, सूफी साहेब दर्गा, दिगंबर जैन मंदिर ही येथील प्रेक्षणीय स्थळे आहेत. येथे नगरपालिका (स्था. १८६९) असून महाविद्यालये, माध्यमिक शाळा, रूग्णालये इ. अनेक सोयी आहेत. सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक बनारसीदास चतुर्वेदी यांचे निवासस्थान येथे आहे.
काचेच्या विविधरंगी आणि नावीन्यपूर्ण बांगड्यांसाठी फिरोझाबाद प्रसिद्ध असून येथील बांगड्या परदेशीही पाठविल्या जातात. कापूस व अन्नधान्ये यांची ही प्रमुख बाजारपेठ असून वीज-उपकरणे, कातडी वस्तू, कापड व तयार कपडे, कापूस पिंजणे व सरकी काढणे इ. उद्योगधंदे येथे चालतात.
याच नावाचे एक शहर फिरोझशाह तुघलक याने दिल्लीनजीक यमुना नदीकाठी वसविले होते.
सावंत, प्र. रा.
“