फिरखो, रूडोल्फ लूटव्हिख कार्ल : (१३ ऑक्टोबर १८२१-५ सप्टेंबर १९०२). जर्मन विकृतिवैज्ञानिक, मानवशास्त्रज्ञ व राजकीय नेते. ⇨ विकृतिविज्ञान (रोगांचे स्वरूप, त्यांची कारणे व त्यांचे शरीरावर होणारे परिणाम यांचा अभ्यास करणारी वैद्यकाची शाखा) व ऊतकविज्ञान (कोशिका-पेशी-व त्यांच्या समूहांपासून बनलेल्या ऊतकांचा सूक्ष्मदर्शकीय अभ्यास ज्यात केला जातो ते शास्त्र) यांतील कार्याकरिता विशेष प्रसिद्ध. आधुनिक विकृतिविज्ञानात आजही आधारभूत असलेल्या ‘कोशिकीय विकृतिविज्ञान’ (कोशिकांतील बदल हे रोगाच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण असते असे प्रतिपादन करणारे शास्त्र) या सिद्धांताचे जनक.

त्यांचा जन्म श्व्हीडव्हीन, पोलंड (पॉमरेनीयातील पूर्वीचे इव्हेलबीन) येथे झाला. १८३९ मध्ये त्यांनी बर्लिनमधील फ्रीड्रिख व्हिल्हेल्म इन्स्टिट्यूटमध्ये वैद्यकीय शिक्षणास प्रारंभ करून १८४३ मध्ये बर्लिन विद्यापीठाची वैद्यकाची पदवी मिळविली. १८४७ मध्ये त्यांची विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. बेनो राईनहार्ट या सहकाऱ्यांबरोबर Archiv für pathologische Anatomie and Physiologie und für die Klinische Medizin नावाचे नियतकालिक सुरू केले व त्या काळाचे एक श्रेष्ठ वैद्यकीय नियतकालिक म्हणून ते नावारूपास आले. १८५२ नंतर ते त्याचे एकटेच संपादन होते व हे कार्य त्यांनी मृत्यूपावेतो चालूच ठेवले होते.

सायलीशियातील ⇨ प्रलापक सन्निपात ज्वराच्या साथीसंबंधी जर्मन सरकारने १८४८ मध्ये नेमलेल्या चौकशी मंडळावर त्यांची नेमणूक झाली होती. त्यांनी सादर केलेल्या अहवालात सरकारी कृतिशून्यतेवर टीका केली. एवढेच नव्हे, तर साथ पुन्हा  न उद्‌भवण्यावर तोडगा म्हणून प्रजासत्ताक राज्ययंत्रणा असावी असे सुचविले. १८४९ मध्ये त्यांच्या अशा क्रांतिवादी राजकीय विचारसरणीमुळे सरकारी  रोष ओढवून त्यांना निलंबित करण्यात आले. सरकारच्या या कृतीमुळे वैद्यकीय वर्तुळात जोरदार विरोध झाल्यामुळे त्यांची परत नेमणूक करण्यात आली. त्याच वर्षी त्यांची वुर्ट्‌सबर्ग विद्यापीठात विकृतिवैज्ञानिक शारीर (शरीररचनाशास्त्र) या विषयाचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. तेथील सात वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी आपल्या विषयासंबंधी बरेच संशोधन केले. 

या संशोधनातील सर्वश्रेष्ठ संशोधन ‘कोशिकीय विकृतिविज्ञाना’संबंधी होते. ‘विकृतीतील बदल शरीरातील कोशिकांत अभ्यासावयास हवा. कोशिका इतर कोशिकांपासून निर्माण होतात. त्या सेंद्रिय पदार्थापासून नव्याने तयार होत नाहीत’, अशी कल्पना त्यांनी आपल्या ग्रंथातून मांडली. ‘प्रत्येक कोशिका पूर्वी अस्तित्वात असलेल्या कोशिकेपासूनच बनते’, हे त्यांचे सूत्रवाक्य जीवविज्ञानात क्रांती घडविणारे ठरले.

त्यांनी विकृतीविज्ञान व ऊतकविज्ञान यांसंबंधी काही महत्त्वाचे शोध लावले. त्यांमध्ये ⇨ श्वेतकोशिकार्बुद (रक्तातील श्वेतकोशिकांची अनियंत्रित वाढ होणारी मारक विकृती), तंत्वीजनक (रक्तरसातील एक प्रथिन यापासून तंतुमय प्रथिन बनते व ही क्रिया रक्त साखळण्याशी संबंधित असते), ॲमिलॉइड (ऊतकात रोगांमुळे साठणारे अपसामान्य प्रथिन), वसावरण (काही तंत्रिका तंतूंवरील-मज्‍जातंतूंवरील-वसायुक्त आवरण) इत्यादींबद्दलच्या संशोधनाचा समावेश आहे. वाहिनीक्लथन (रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी बनणे), अंतर्कीलन (क्लथित रक्ताची गुठळी वा इतर बाह्य पदार्थ रक्तप्रवाहात वाहून नेला जाणे व तो इतरत्र अडकून रक्तप्रवाह बंद पडणे), संयोजी ऊतक (विशिष्ट कोशिका समुच्चयांना आधार देणारे ऊतक), शोथ प्रक्रिया (दाहयुक्त सूज येण्याची प्रक्रिया), अर्बुदे (नव्या कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठी) व ⇨ ऊतकक्रामी संसर्ग रोग यांसंबंधी त्यांनी महत्त्वपूर्ण निरीक्षणे केली. वुर्ट्‌सबर्ग येथे असतानाच त्यांनी सार्वजनिक आरोग्य व शारीरिक मानवशास्त्र यांविषयी संशोधन सुरू केले होते. 

फिरखो यांनी १८५६ मध्ये बर्लिन विद्यापीठात  विकृतिविज्ञानाकरिता स्वतंत्र इमारत बांधण्याच्या अटीवर प्राध्यापकपद स्वीकारले व मृत्यूपर्यंत ते या पदावर कायम होते. १८५९ पासून त्यांनी राजकारणात सक्रिय भाग घेण्यास सुरुवात केली व बर्लिन शहराच्या कौन्सिलवर निवडून आले. सभासद असताना त्यांनी आपले लक्ष सार्वजनिक आरोग्याकडेच केंद्रित केले होते. १८६१ मध्ये ते प्रशियाच्या कनिष्ठ सभागृहात निवडून आले. जर्मन प्रोग्रेसिव्ह पार्टी या नव्या राजकीय पक्षाची त्यांनी स्थापना केली व १८६२-६६ या काळातील घटनात्मक झगड्याच्या वेळी ते त्या पक्षाचे नेते होते. विस्मार्क यांच्या जर्मन एकीकरण विचारसरणीचे ते कट्टर विरोधक होते. १८८०-९३ पर्यंत ते जर्मन संसदेचे सभासद होते. बर्लिनमधील स्थानिक व महानगरपालिकेच्या राजकारणातही त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. महानगरपालिकेच्या कार्यकारिणीचे सभासद असताना बर्लिन शहराच्या सांडपाण्याचा निचरा, गटार योजना व पाणी पुरवठा या सार्वजनिक आरोग्याच्या बाबींबद्दल त्यांनी महत्त्वाचे कार्य केले.

 त्यांनी १८६०-७० या काळात आपले लक्ष मानवशास्त्र या विषयावर केंद्रित केले होते. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परस्परसंबंधाविषयी ते जागरूक होते. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संमेलनांतून भाग घेतला होता. १८७३ मध्ये ते प्रशियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसवर निवडून आले व त्याच वर्षी त्यांनी जर्मन मानवशास्त्र संस्थेची स्थापना केली. एका मानवजातिविज्ञानविषयक नियतकालिकाचे ते प्रमुख संपादक होते. त्यांना पुरातत्वविद्येचीही आवड होती. सुप्रसिद्ध पुरातत्त्ववेत्ते ⇨हाइन्‍रिख श्लीमान यांच्याबरोबर ट्रॉयच्या उत्खननात त्यांनी भाग घेतला होता आणि ट्रोजन थडगी व कवट्या यांविषयी एक ग्रंथ प्रसिद्ध केला होता.

स्वहस्ते तयार केलेले २३,०६६ विकृतीविज्ञानविषयक नमुने असलेले संग्रहालय त्यांनी १८९९ मध्ये राष्ट्राला अर्पण केले. वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांना ५०,००० मार्क असलेली थैली अर्पण करण्यात आली व ती त्यांनी त्यांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या विकृतीविज्ञान संस्थेस दिली. या वेळी जर्मनीच्या सम्राटांनी सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव केला. ते बर्लिन येथे मरण पावले. 

संदर्भ : Ackernecht, E.H. Rudolf Virchow, Doctor, Statesman, Anthropologist, Madison, Wis., 1953.

कुलकर्णी, श्यामकांत भालेवार, य. त्र्यं.