फिनलंड : (फिनिश सूऑमी). ईशान्य यूरोपातील स्कँडिनेव्हियन देशांपैकी एक स्वतंत्र प्रजासत्ताक देश. फिनलंडचा सु. एक तृतीयांश भाग उत्तर ध्रुववृत्ताच्या उत्तरेस आहे. आकारमानाने यूरोपातील सहाव्या क्रमांकाच्या या राष्ट्राचे क्षेत्रफळ ३,३७,०३२ चौ. किमी. असून त्यापैकी ९ टक्के (३१,५३४ चौ. किमी.) क्षेत्र पाण्याखाली आहे. विस्तार ५८° ३०’ उ. ते ७०° ५’ उ. व १९° ७’ पू. ते ३१° ३५’ पू. लोकसंख्या ४७,५२,००० (१९७८). दुसऱ्या महायुद्धकाळात (१९३९-४४) रशिया व फिनलंड यांमध्ये झालेल्या अतिशय भीषण अशा दोन युद्धांनंतर ४६,०५० चौ. किमी. प्रदेश सोव्हिएट रशियाच्या ताब्यात गेला. फिनलंडला वायव्येस स्वीडनशी ५३९ किमी. उत्तरेस नॉर्वेशी ७३४ किमी. आणि पूर्वेस रशियाशी १,२७६ किमी. भू-सरहद्द लाभली आहे. देशाच्या पश्चिमेस बॉथनियाचे आखात, तर दक्षिणेस फिनलंडचे आखात आहे. देशाची उत्तर-दक्षिण कमाल लांबी १,१६५ किमी. कमाल रुंदी ५४२ किमी. व किनारा १,०७५ किमी. असून सभोवती सु. ८०,००० बेटे आहेत. किनारा उथळ, खडकाळ परंतु दंतुर आहे. हेल्‌सिंकी ही फिनलंडची राजधानी (लोकसंख्या ४,८७,५१९ – १९७७) आहे.

फिनलंडची जंगले ही देशाची प्रमुख साधनसंपत्ती असल्याने त्यांना ‘फिनलंडचे हिरवे सोने’असे म्हटले जाते. वास्तुकला व औद्योगिक अभिकल्प यांमधील नैपुण्याबद्दल फिनिश लोकांची ख्याती आहे. ‘सावना’ म्हणजे ‘फिनिश लोकांचे बाष्पस्नान’ जगप्रसिद्ध आहे.

भूवर्णन : या देशातील प्रदेश सपाट असून पर्वतांची कमाल उंची ३०० मी. पेक्षा अधिक नाही. वायव्येस नॉर्वेच्या सरहद्दीवरील हाल्तीआ नावाचे फिनलंडमधील सर्वोच्च शिखर (१,३२४ मी.) भूविज्ञानदृष्ट्या फेन्नो-स्कँडियन ढालीचा एक भाग होय. हिमयुगामध्ये ही ढाल हिमनद्यांनी झाकली जाऊन या ढालीमधील पर्वतांना गोलाकार प्राप्त झाला, त्यांमधील गर्तिका भरल्या गेल्या व सबंध भूप्रदेश एक मोठी गर्ता बनली. पुढे बर्फ वितळल्यानंतर बाल्टिक समुद्राचा पूर्वरूप असलेल्या योल्डिया समुद्राने या भूमीवर आक्रमण केले. कालांतराने भूप्रदेश पृष्ठभागी आला. तथापि अनेक गार्तिका त्यांत टिकून राहिल्या, त्यांयोगे अनेक सरोवरे व दलदलीचे प्रदेश निर्माण झाले. या दलदलीच्या प्रदेशांवरूनच फिनलंडचे नाव सूऑमी (अर्थ-दलदल) असे पडले. हिमयुगाचा ठळक अवशेष ⇨ एस्करांच्या रूपाने या देशात दिसून येतो. हिमनद्यांमुळे निर्माण झालेल्या निरनिराळ्या निक्षेपांनी अनेक दऱ्यांना बांध घातले गेले, तर अनेक नद्यांचे मार्गही बदलले. यांमुळे फिनलंडमध्ये अनेक प्रपात व धबधबे निर्माण होऊन परिणामी देशजलसंपत्तीच्या दृष्टीने संपन्न झाला.

फिनलंडचा दक्षिण व पश्चिम किनारा उथळ परंतु दंतुर आहे. या किनाऱ्यासभोवती हजारो लहानलहान बेटे पसरलेली असून त्यांतील आव्हेनान्मा (आलांड) हे प्रमुख बेट आहे. मध्य फिनलंड हा जवळ-जवळ सरोवरांचाच प्रदेश असून देशातील सु. ६०,००० सरोवरांपैकी बहुतेक मोठी सरोवरे या भागात आहेत. उदा., केमी, ओलू, साइमा, केटेले, पीएलिनेन, नॅसी इत्यादी. इनारी हे मोठे सरोवर मात्र उत्तरेस आहे. उत्तर फिनलंड हा जंगलमय प्रदेश आहे. विस्तृत व एकमेकांशी जोडलेली सरोवरे आणि नद्या यांमुळे फिनलंडला नैसर्गिक जलमार्ग उपलब्ध झाले आहेत.

फिनलंडचे भौगोलिक दृष्ट्या चार प्रमुख विभाग पडतात : (१) दक्षिण व पश्चिमेकडील किनारी सखल प्रदेश, (२) अनेक सरोवरांनी भरलेला मध्य पठारी प्रदेश किंवा अंतर्गत भागातील सरोवरांचा जिल्हा, (३) उत्तरेकडील व पूर्वेकडील उंचवट्याचा प्रदेश (अपलँड) व (४) बेटांचा-विशेषतः नैर्ऋत्य फिनलंडमधील-द्वीपकल्पीय भाग.

(१) देशातील सर्वात सुपीक प्रदेश आहे. येथील डोंगर आणि सरोवरे अतिशय लहान आहेत. याच भागात तुर्कू हे देशातील सर्वात पहिले गाव वसविले गेले हेल्‌सिंकी ही राजधानी तसेच व्हासा व ओलू ही मोठी शहरे या भागात आहेत.

(२) या भागात सरोवरांचे जाळेच आढळते. हजारो सरोवरे या भागात असून त्यांत हजारोंच्या संख्येत लहानलहान बेटे आहेत. देशाचा ९% प्रदेश सरोवरांनी व्यापलेला असला, तरी या भागात त्यांचे क्षेत्र सु. २० ते ५० टक्के आहे. येथील नद्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर वीज निर्माण केली जाते. टांपेरे, लाती, लाप्पेन्रांता, साव्होन्‌लिन्ना, क्वॉप्यॉ ही शहरे या भागात आहेत.

(३) देशाचे ४०% क्षेत्र या भागात येते परंतु देशाच्या अर्थव्यवस्थेला एवढ्या मोठ्या क्षेत्राचा फारसा उपयोग होत नाही कारण या भागातील हवा रुक्ष, मृदा निःसत्त्व व वनस्पतीही अतिशय तुरळक आहेत. उत्तरेकडील प्रदेशात जंगले व टेकड्या यांच्यामधूनच मोठ्या प्रमाणावर दलदली आहेत. फिनलंडमधील मोठ्या नद्या या प्रदेशाला वळसा घालून पुढे जातात. या नदीखोऱ्यांमधून शेतीला वाव मिळतो. अशा प्रकारच्या कृषिवसाहती नदीखोऱ्यांत उत्तरेकडे झाल्याचे आढळून येते. या भागातील नद्या नौवहनयोग्य नाहीत, तथापि त्यांच्या पाण्याचा उपयोग करून वीजनिर्मिती करणे शक्य झाले आहे. या भागातील खनिजसाठ्यांचे पूर्ण संशोधन अजून झालेले नाही.

(४) फिनलंडच्या किनाऱ्याला लागून असलेल्या बेटांचा हा भाग सापेक्षतः अधिक रुक्ष आहे. उन्हाळ्यातील विश्रांतिस्थाने व कोळ्यांची वसतिस्थाने एवढ्यांपुरताच या बेटांचा उपयोग आहे. नैऋत्येकडील आलांड हो सर्वात मोठे बेट असून तेथे बोटी थांबतात.

नद्या, सरोवरे : नद्या-सरोवरांनीदेशाच्या एकूण क्षेत्रफळाचा एकदशांश भाग व्यापलेला आहे. देशात सु. २,००० हेक्टर क्षेत्रफळ असलेली सु. १५० मोठी व असंख्य लहान सरोवरे आहेत. आग्नेय फिनलंडमधील साइमा सरोवर हे सर्वात मोठे (५,००० चौ. किमी. क्षेत्र) आहे. फिनलंडमधील अनेक नद्या सरोवरानांच मिळतात बहुतेक सरोवरे उथळ आहेत. साइमा सरोवर आपले जलनिस्सारण व्हूऑक्‌सी नदीद्वारे सोव्हिएट रशियाच्या लॅगोडा सरोवरात करते. उत्तरेकडे पासूइक व तिच्या उपनद्या आर्क्टिकला जाऊन मिळतात. पश्चिम फिनलंडमधील टॉर्न, केमी (फिनलंडमधील सर्वात मोठी नदी, ५५३ किमी. लांब), नैर्ऋत्य फिनलंडमधील कोकेमॅकी इ. नद्या बॉथनियाच्या आखातास मिळतात.


हवामान : सर्व फिनलंडच मुळात ६०° अक्षवृत्ताच्याही उत्तरेला असल्याने उन्हाळी दिवस हे मोठे व थंडगार, तर हिवाळी दिवस हे लहान आणि अतिशय गारठ्याचे असतात. उन्हाळ्यामध्ये दक्षिण भागात दिवस जवळजवळ १९ तासांचा असतो. उत्तरेकडील भागात सूर्यप्रकाश वर्षातील ७३ दिवस सतत असतो, यामुळेच फिनलंडला ‘मध्यरात्रीच्या सूर्याचा देश’ असे संबोधिले जाते. एप्रिल ते सप्टेंबर हा येथील उन्हाळा, तर ऑक्टेबर ते मार्च हा हिवाळा असतो. जुलैमधील सरासरी तपमान दक्षिणेकडे १७° से., तर उत्तरेकडे १६° से. असते. सर्वांत कडक थंडीचा महिना फेब्रुवारी हा असून त्यावेळी सरासरी तपमान उत्तरेकडे -१५° से., तर दक्षिणेकडे -११° से ते -४° से. एवढे असते. वर्षातून केव्हाही हिमवृष्टी होते. वार्षिक पर्जन्यप्रमाण उत्तरेकडे ४६ सेंमी., तर दक्षिणेकडे ७१ सेंमी. असते.

वनस्पती व प्राणी : देशात सूचिपर्णी वृक्षांचे आधिक्य असले, तरी दक्षिण फिनलंडच्या अगदी टोकाला पानझडी वृक्षांचा मोठा भाग आढळतो त्यांमध्ये हॅझेल, ॲस्पेन, मॅपल, एल्म व ॲल्डर इ. वृक्षप्रकार येतात. सूचिपर्णी वृक्षांमध्ये पाइन व स्प्रूस हे प्रकार अधिक आढळतात. पाइन वृक्ष अगदी उत्तरेकडील भागातही असून तेथे बर्च व विलो ह्या अतिशय कमी उंचीच्या वृक्षांचे आधिक्य आहे. जसजसे उत्तरेकडे जावे, तसतसे दगडफूल ही वनस्पती मोठ्या प्रमाणात दिसून येते. फुलझाडांचे हजारांवर प्रकार आढळतात.

फिनलंडमधील प्राणिसंपत्ती समृद्ध आहे. बेटांवर आर्क्टिक कूररी, कुरव हे पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. अंतर्गत भागात सरोवरांकाठी बदकांसारखे पक्षी राहतात. इतर पक्ष्यांमध्ये सायबीरियन मैना, रंगीबेरंगी धोबी पक्षी असून उत्तर फिनलंडमध्ये गरुड आढळतात. हिवाळ्यामध्ये अनेक पक्षी दक्षिणेकडे स्थानांतर करतात. अस्वल, लांडगा, रानमांजर, सांबर इ. प्राणी आहेत. जंगली रेनडियर दुर्मिळ झाले असून, उत्तरेकडील भागात आढळणारे बहुतेक सगळे रेनडिअर माणसाळलेले आहेत. उत्तरेकडील नद्यांमधून सामन, ट्राउट, सिका (व्हाइट फिश) या मत्स्यप्रकारांचे वैपुल्य असून बाल्टिक हेरिंग हा नेहमी मिळतो तर क्रे-फिश हा मासा फक्त उन्हाळ्यातच मिळू शकतो. पाइक, कार्र व पर्च हेही माशांचे प्रकार आढळतात.

इतिहास: मध्य व्होल्गा विभाग व उरल पर्वत यांमधील प्रदेश हे फिनी लोकांचे प्रारंभीचे ज्ञात वसतिस्थान मानण्यात येते. फिनींच्या पूर्वजांनी सु. ३,५०० वर्षापूर्वी या प्रदेशामधून वायव्येस स्थलांतर केले व ते बाल्टिक समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचले. कालांतराने त्यांनी नैर्ऋत्य फिनलंडमध्ये वसती केली हळूहळू ती पूर्वेकडे वाढत गेली व इ.स. ८०० च्या सुमारास कारेलियाच्या प्रदेशात त्यांनी शिरकाव केला. याच प्रदेशात आग्‍नेयीकडूनही वसाहतकार आले व त्यांनी या भागात राहणाऱ्या मूळच्या लॅप लोकांना तेथून उत्तरेकडे हुसकावून लावले.

प्रारंभीच्या फिनी लोकांच्या प्रामुख्याने तीन टोळ्या होत्या : नैर्ऋत्य फिनलंडमधील सूओमलाइसेत (यांच्यावरूनच फिनलंडला सूऑमी असे नाव पडले), फिनलंडच्या अंतर्भागातील हामालाइसेत (टॅव्हॅस्टियन) व पूर्वेकडील भागातील कार्जालाइसेत (कारेलियन). शेतीचा प्रसार होण्यापूर्वी शिकार, फासेपारध व मच्छीमारी हीच वसाहतकऱ्यांची उपजीविकेची साधने होती. प्रारंभीच्या काळात फिनी टोळ्यांचे आपापसांत संघर्ष चालू होते. अकराव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यत स्वीडिश आणि रशियन लोकांनी फिनलंडवर ताबा मिळविण्याचे व तो स्थिरपद करण्याचे बरेच प्रयत्‍न केले. फिनी लोकांना रोमन कॅथलिक चर्चच्या छत्राखाली आणण्याचा स्वीडनचा प्रयत्‍न होता, तर रशिया त्यांना ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चच्या अंमलाखाली खेचण्याचा प्रयत्‍न करीत होता. कालांतराने फिनी लोक रोमन कॅथलिक बनले.

अकराव्या शतकारंभापासून रोमन कॅथलिक धर्मप्रचारक फिनलंडमध्ये कार्य करीत होते. या कार्याला बळकटी आणण्याच्या हेतूने स्वीडनच्या एरिक राजाने ११५५ च्या सुमाराला फिनलंडवर पहिली स्वारी (पहिले धर्मयुद्ध) केली. दुसरे धर्मयुद्ध १२३८ किंवा १२४९ च्या सुमारास होऊन हामे प्रांतात रोमन कॅथलिक धर्मपंथाची जोमदार वाढ झाली. तेराव्या शतकाच्या अखेरीश स्वीडिश सत्ता कारेलिया प्रांतात दृढमूल झाली त्याचेच निदर्शक म्हणून १२९३ मध्ये व्हीबॉर्ग येथे एक किल्ला बांधण्यात आला . तथापी कारेलियामध्ये स्वीडिशांना रशियनांशी एकसारखी झुंज द्यावी लागली. १३२३ मध्ये स्वीडन व रशिया या दोन राष्ट्रांमध्ये एक शांतता तह करण्यात येऊन कारेलियाचे विभाजन करण्यात आले.

पुढे पंधराव्या शतकात उत्तरार्धात फिनलंड स्वीडिश साम्राज्याचा एक भाग बनले. यामुळे अनेक स्वीडिश लोकांनी फिनलंडमध्ये दक्षिण व पश्चिम किनाऱ्यांवर वसती केली. कारेलियन लोकांचा अपवाद वगळता फिनलंडमधील विविध जमाती प्रशासकीय अधिकाराच्या उद्देशाने प्रथमच एकत्रित आल्या. १३६२ मध्ये फिनी लोकांना स्वीडिश राज्यांच्या निवडणुकीत मतदार म्हणून भाग घेण्याचा हक्क प्रथमच प्राप्त झाला आणि फिनलंड हा स्वीडनच्या इतर प्रांतांप्रमाणेच एक समान दर्जाचा प्रांत व साम्राज्याचा एक अंगभूत भाग बनला. 

मध्ययुगाच्या अखेरीपर्यंत फिनलंड स्वीडनच्या राजकीय अंमलाखाली होते. धार्मिक बाबतीत तुर्कूचे बिशप यांची सत्ता होती. तुर्कूचे बिशप हे फिनिश चर्चचे अधिपती. मध्ययुगातील बहुतेक सर्व बिशप हे सुसंस्कृत व परदेशी जाऊन (सॉरबॉन विद्यापीठ, पॅरीस) विद्यासंपन्न होऊन आलेले असत. मीकाएल आग्रिकोला (१५१० – ५७) या तुर्कूच्या बिशपने फिनिश भाषेला साहित्यिक भाषेचा दर्जा देऊन मार्टिन ल्यूथरच्या धर्मसुधारणेचा पुरस्कार केला.

स्वीडनचा राजा पहिला गस्टाव्हस व्हासा (कार. १५२३ – ६०) याने स्वीडनवरील तसेच फिनलंडवरील डॅनिश वर्चस्व संपुष्टात आणले. त्याने रोमन कॅथलिक चर्चबरोबरचे संबंधही तोडून टाकले. आपल्या कारकीर्दीत त्याने फिनलंडचा उत्तर व पूर्व भाग वसाहतीस खुला केला.परंतु यामुळेच त्याचे रशियनांशी संघर्ष वाढत गेले प्रदीर्घ युद्धेही उद्‌भवली. सोळाव्या शतकाचा उत्तरार्ध हा स्वीडन व फिनलंड या दोघांनाही फारच जिकिरीचा गेला कारण गस्टाव्हस व्हासाच्या वारसांत गादीसाठी स्पर्धा आणि संघर्ष सुरू झाला. परिणामी १५९६ – ९७ च्या सुमारास ‘द वॉर ऑफ क्लब्ज’ हे बंड फिनलंडमध्ये उद्‌भवले. हे बंड फिनलंडवर राज्य करणाऱ्या क्लाउस फ्लेमिंग या फिनिश सरदाराविरुद्ध करण्यात आले होते. 


सतराव्या शतकामध्ये स्वीडन हे अतिशय सामर्थ्यवान राष्ट्र झाले.त्याचा परिणाम फिनलंडवर होणे अटळ होते. या शतकाच्या आरंभकाळात रशियाशी स्वीडनने पुन्हा युद्ध सुरू केले तथापि ⇨ गस्टाव्हस आडॉल्फस (कार. १६११ – ३२) या स्वीडिश राजाने १६१७ मध्ये रशियाशी स्टॉल्बाव्हा येथे तह करून रशियास बाल्टिक समुद्रापासून दूर ठेवले. पूर्वेकडील यशस्वी मोहिमांनंतर गस्टाव्हस आडॉल्फस ⇨ तीस वर्षाच्या युद्धात (१६१८-४८) व यूरोपीय राजकारणात गुंतला. या युद्धात फिनलंडला वित्त व मानवी शक्ती यांची जबर किंमत मोजावी लागली. वाढते प्रशासकीय केंद्रीकरण, सरदारवर्गांची वाढती राजकीय व आर्थिक सत्ता, तसेच लोकांचे कडवे धर्मवेड यांमुळे परिस्थिती स्फोटक बनली. प्रशासकीय केंद्रीकरणामुळे फिनलंडचे स्वतंत्र अस्तित्वच कमी होऊ लागले. स्वीडिश साम्राज्याची सेवा केल्याने बक्षीस म्हणून मिळालेल्या जमिनी तसेच अनेक सवलती यांमुळे सरदार-दरकदार अधिकाधिक श्रीमंत बनत चालले. याच्याच परिणामी कृषकवर्ग दरिद्री आणि कमजोर होऊ लागला. तथापि सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात सरदार-दरकदारांना दिलेल्या जमिनी त्यांच्या जवळून काढून घेण्यात आल्या व त्यामुळे फिनलंडमध्ये सरंजामशाही आपले डोके वर काढू शकली नाही. कारेलियन लोकांना बळजबरीने धर्मांतर करावयास लावण्याच्या प्रयत्‍नांमुळे त्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर रशियनव्याप्त प्रदेशाकडे स्थलांतर केले. स्वीडनचा राजा अकरावा चार्ल्स याच्या कारकीर्दीत फिनलंडमध्ये भयंकर दुष्काळ पडला होता (१६९५ – ९७). बाराव्या चार्ल्सच्या कारकीर्दीत (१६९७ – १७१८) ग्रेट नॉर्दर्न वॉर (१७०० – २१) हे युद्ध उद्‌भवले. हे युद्ध स्वीडनला फारच हानिकारक ठरले. या युद्धामुळे स्वीडनला आपल्या ताब्यातील पूर्वेकडील प्रदेश (इंग्रीया व आग्‍नेय फिनलंड धरून) तर गमवावे लागलेच, शिवाय सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून असलेले त्याचे महत्त्वही कमी झाले. युद्धकाळातील आठ वर्षे (१७१३ – २१) फिनलंड रशियाच्या ताब्यात गेले होते. याच काळात रशियाने फिनलंड पूर्णतः उद्‌ध्वस्त केले होते. हा आठ वर्षाचा काळ फिनी लोक ‘ग्रेट राथ’ किंवा ‘ईश्वरी कोप’ म्हणूनच ओळखतात. स्वीडन व रशिया यांच्यातील पुढच्या युद्धात (१७४१-४३) रशियाने फिनलंडचा आणखी एक भाग बळकावला.

या दोन युद्धांचा कटू अनुभव आणि रशियाचे वाढते सामर्थ्य यांमुळे फिनलंड स्वीडनच्या संरक्षक सामर्थ्याविषयीच साशंक बनला. रशियाबरोबर झालेल्या पुढील युद्धात (१७८८ – ९०) काही फिनी अधिकाऱ्यांनी रशियांकित पण स्वायत्त असे नवीन फिनीश राज्य निर्माण करण्याचा विचार केला. अर्थात हा बेत फसला तथापि त्यामुळे फिनलंडचे स्वीडनपासून निराळे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले. या कल्पनेचा प्रभावी प्रचार हेन्‍रिक गाब्रिएल पॉर्तान (१७३९ – १८०४) या तुर्कू विद्यापीठातील प्राध्यापकाने केला.

रशिया व स्वीडन यांमध्ये १८०८ साली युद्ध उद्‌भवले. १८०९ मध्ये स्वीडनचा या युद्धात पराभव होऊन त्याने रशियाला फिनलंड देऊ केला त्यावेळी झारने (पहिला अलेक्झांडर-१७७७ ते १८२५) फिनलंडला रशियन साम्राज्यात विलीन करण्याऐवजी फिनलंडचे प्रचलित संविधान, कायदेकानू आणि संस्था यांच्याबाबत मोठ्या प्रमाणावर स्वायत्तता दिली. याशिवाय अठराव्या शतकातील युद्धांत रशियाने बळकाविलेला कारेलियाचा प्रदेश फिनलंडला परत देण्याचे पहिल्या अलेक्झांडरने १८१२ मध्ये मान्य केले. अशा तऱ्हेने फिनलंडवरील अंमल स्वीडिश राजाकडून पहिल्या अलेक्झांडरकडे ‘ग्रँड ड्यूक’ या नात्याने कार्यवाहीत आला. रशियांकित स्वायत्ततेचा हा कालखंड देशाला अतिशय अनुकूल ठरला. याच काळात सबंध यूरोप राष्ट्रवाद व स्वच्छंदतावाद या विचारप्रणालींनी ढवळून निघत होता. त्यास फिनलंड अपवाद नव्हता. फिनिश राष्ट्रवादाची पहिली लक्षणे फिनिश भाषाप्रेमाची निदर्शक होती. १८२० च्या सुमारास तुर्कू विद्यापीठातील आडॉल्फ ईव्हार आर्व्हिट्‌ससॉन या प्राध्यापकाने फिनिश भाषेला अधिक चांगला दर्जा मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन केले. गेली कित्येक शतके फिनलंडचे प्रशासन, कायदे आणि शिक्षण ही स्वीडिश भाषेतून चालत असत. फक्त धार्मिक जीवनातच फिनिश भाषा तगून होती. अर्थातच या स्थितीत तसा काही तातडीने फरक पडला नाही. एल्यास लनरॉटच्या ⇨ कालेवाला या महाकाव्याच्या प्रसिद्धिनंतर फिनिश भाषेविषयीची आवड व अभिरूची वाढू लागली. ⇨ यूहान लड्‌व्हिग रूनेबॅर्य (१८०४ – ७७) या फिनलंडच्या राष्ट्रीय कवीच्या देशभक्तिपर काव्यात फिनी कामगारापासून सैनिकापर्यंतचे आदर्श रूप व्यक्त झाले. या काळातील योहान व्हिल्हेल्म स्‍नेलमन हा प्रसिद्ध फिनिश प्रकाशक, तत्त्वज्ञ व राजकारणधुरंधर होय. शिक्षणातून शिक्षित वर्गाने फिनिश भाषेला आपली मानवे व प्रशासकीय व्यवहारांतून तिचा प्रसार करावा, असे त्याने आग्रहाने प्रतिपादन केले.

जवळजवळ ५० वर्षे नाममात्र स्वरूपात अस्तित्वात असलेली फिनलंडची संसद १८६३ पासून नियमित भरू लागली. त्या वेळेपासून राजकीय पक्षही भाषा हेच कार्याचे केंद्र धरून विकसित होऊ लागले. अखेरीस १९०२ मध्ये फिनिश भाषेला स्वीडिश भाषेप्रमाणेच शाळा, प्रशासन आणि सांस्कृतिक जीवन यांमध्ये समान स्थान व दर्जा प्राप्त झाला. विसाव्या शतकाच्या प्रारंभी, रशियाने आपल्या साम्राज्यात फिनलंडला विलीन करावयाचे ठरविले. त्याची प्रतिक्रिया म्हणून फिनलंडमध्ये तीन गट निर्माण झाले : १ रशियन विलीनीकरणास अनुकूलता दर्शविणारा, २ संविधानवादी (फिनिश संविधानाचा समर्थक) आणि ३ सशस्त्र प्रतिकार करणारा.

तथापि ⇨ रशिया-जपान युद्ध (१९०५) व त्याच वर्षीची अपेशी ठरलेली क्रांती या दोन गोष्टींमुळे विलीनीकरणाची मोहीम तात्पुरती स्थगित झाली. १९०६ मध्ये फिनिश संसद बरखास्त करण्यात आली. १९०७ च्या निवडणुकांत सोशॅलिस्टांनी ४० जागा जिंकून संसदेतील सर्वांत मोठा पक्ष असल्याचा दावा केला. तथापि झारच्या दडपणामुळे नवीन संसद देशातील समस्यांचे निराकरण करू शकली नाही. १९०८ च्या सुमारास फिनलंडच्या विलीनीकरणाच्या मोहिमेने उचल खाल्ली. पहिल्या महायुद्धाच्या प्रारंभकाळात फिनलंडमधील विद्यापीठीय वर्तुळांमधून रशियाविरुद्ध सशस्त्र प्रतिकार करण्याची मोहीम आखण्यात येऊ लागली. १९०१ – ०५ च्या दरम्यान फिनी सेनादलाने रशियाने केलेले विसर्जन आणि सैन्यात भरती होण्यासाठी केलेल्या रशियन आवाहनास फिनी युवकांनी दिलेला नकार, या दोन कारणांमुळे फिनी जनतेला सैनिकी शिक्षण मिळालेले नव्हते. यावर उपाय म्हणून विद्यार्थी व युवक सैनिकी प्रशिक्षणासाठी जर्मनीमध्ये चोरून जाऊ लागले. 


रशियामध्ये मार्च १९१७ रोजी क्रांती घडून आली. परिणामी फिनी-रशियन संबंधांचे नवीन पर्व सुरू झाले. रशियातील तात्पुरत्या सरकारने फिनलंडला स्वायत्तता बहाल केली. जुलै १९१७ मध्ये सोशॅलिस्टांचे आधिक्य असलेल्या फिनी संसदेने आपल्या सार्वभौमत्वाची घोषणा केली व रशियाकडे फक्त परदेशी नीती व सैनिकी व्यवहार सुपूर्द केले. हे रशियन शासनाला न पटल्याने त्याने फिनी संसदच बरखास्त करून टाकली. १९१७ च्या हिवाळ्यात नवीन निवडणुका घेण्यात आल्या, पण सोशॅलिस्ट पक्ष अल्पमतात आला. या राजकीय क्षेत्रामधील नाट्याबरोबर फिनलंडला वाढती बेकारी, अन्नधान्य टंचाई व इतर सामाजिक प्रश्न यांना तोंड देणे भाग पडले. नोव्हेंबर १९१७ मध्ये पेट्रग्राड येथे झालेल्या बोल्शेव्हिक क्रांतीनंतर लगेचच फिनलंडमध्ये सार्वत्रिक संप सुरू झाला फिनिश सोशॅलिस्टांच्या मनातही क्रांतीचे विचार घोळू लागले. फिनलंडमधील अंतर्गत परिस्थिती चिघळू लागली आणी देशातील सोव्हिएट सेनेचे अस्तित्व फिनी लोंकांना खुपू लागले.

फिनिश संसदेने फिनलंड हे रशियापासून स्वतंत्र असल्याचे ६ डिसेंबर १९१७ रोजी घोषित केले, तथापि या घोषणेने ताबडतोब सर्व प्रश्न सुटले नाहीत. बोल्शेव्हिकांनी जरी फिनलंडच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली, तरी रशियन सैन्य फिनलंडमध्येच राहिले. याशिवाय बिगरसोशॅलिस्ट फिनी आणि जहाल फिनी यांच्यामधील मतभेदांची दरी सांधली जाण्याऐवजी अधिकच रुंदावत गेली. या दोन्ही गटांना रशियापासून संपूर्ण स्वातंत्र हवे होते, तथापि हे दोन्ही गट एकमेकांविषयी संशय बाळगून होते. त्यांच्या अनुक्रमे रेड व व्हाइट गार्ड नावांच्या सशस्त्र सेना होत्या. १९१८ च्या आरंभी संविधानवादी गटाचा नेता पेर एव्हिंद स्वीन्हुहुड याने व्हाइट गार्ड सेनेचा कमांडर कार्ल गुस्टाव्ह मानेरहेम याला रशियन सैन्याला देशाबाहेर पिटाळून लावण्याचा, तसेच देशात शांतता व सुव्यवस्था निर्माण करण्याचा आदेश दिला. व्हाइट गार्ड व रशियन सैन्य यांचे पश्चिम फिनलंडमध्ये युद्ध जुंपले तर दक्षिण फिनलंडचा ताबा रेड गार्डच्या सैन्याने घेऊन तेथे यादवी युद्धास प्रारंभ केला.

या यादवी युद्धात व्हाइट गार्ड सेनेला जर्मनांनी व जर्मनीत लष्करी प्रशिक्षण घेण्यासाठी गेलेल्या ‘यागेर्स’ या फिनी युवकांनी साहाय्य केले तर रशियन सैन्याने रेड गार्ड सेनेला मदत केली. अखेरीस मे १९१८ मध्ये हे यादवी युद्ध संपले व व्हाइट गार्ड सेनेचा विजय झाला. १९१९ मध्ये फिनलंड हे प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात येऊन कार्लॉ युहॉ स्टॉल्‌बेर्य या समन्वयवादी नेत्याची फिनलंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.

स्वतंत्र फिनलंडपुढे अंतर्गत व आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या अनेक जटिल समस्या होत्या. स्वीडन व रशिया या दोन्ही राष्ट्रांबरोबरचे फिनलंडचे संबंध अतिशय ताणलेले होते. स्वीडन आलांड बेटांवर आपला हक्क सांगत होता तथापि अनेक वादांनंतर राष्ट्रसंघाने १९२१ मध्ये ही बेटे फिनलंडला परत मिळवून दिली. फिनलंडचा पूर्व कारेलिया हा भाग सोव्हिएट रशियाने बळकावला होता. १९२० मध्ये रशियाबरोबर फिनलंडने शांतता करार केला १९३२ मध्ये अनाक्रमण करार झाला. तरीही दोन्ही महायुद्धकाळात या देशांमधील संबंध तणावपूर्णच राहिले.

कम्युनिस्टविरोधी चळवळीचा उदय त्याचप्रमाणे फिनिश व स्वीडिश भाषिकांमधील कलह, यांमध्ये फिनिश प्रजासत्ताकातील शांतताच धोक्यात आली. १९३०-३५ च्या दरम्यान ‘लपुआ चळवळ’ नावाची एक कम्युनिस्टविरोधी, संसदविरोधी व फॅसिस्टसदृश चळवळ उदयास आली. परंतु ती अल्पायुषीच ठरली. प्रसंगी वादळी राजकारण देशात खेळले जाऊनही, स्वातंत्र्योत्तर दोन दशकांमधील फिनलंडची आर्थिक प्रगती कौतुकास्पद होती. या काळात भूधारण-सुधारणा अंमलात येऊन कुळे जमीनमालक बनली. सोव्हिएट रशियाने १९३९ च्या हिवाळ्यात फिनलंडच्या आखातातील काही बेटे व नाविक तळ त्याचप्रमाणे कारेलियन संयोगभूमीचा काही भाग फिनलंडकडे मागितला तेव्हा त्या मागणीच्या विरोधात सारे राष्ट्र एकवटून उभे ठाकले.

सोव्हिएट रशियाच्या फौजांनी ३० नोव्हेंबर १९३९ रोजी फिनलंडवर आक्रमण केले आणि हिवाळी युद्धास प्रारंभ झाला. रशियाने फिनलंडमध्ये बाहुली शासनाची स्थापना केली. तथापि फिनी लोकांनी – विशेषतः त्यांच्या अतिशय चपळ व वेगवान स्की-दलांनी-रशियन फौजांना निकराचा प्रतिकार केला. हे रशियनांना अगदीच अनपेक्षित होते. अधिक दडपशाही केल्यास या युद्धात ब्रिटन व फ्रान्स फिनलंडला साहाय्य करतील, या भीतीने रशियाने अखेरीस बाहुली शासनाचे उच्‍चाटन करावयाचे व फिनलंडशी समझोत्याची व शांततेची बोलणी करावयाचे ठरविले. १२ मार्च १९४० रोजी झालेल्या शांतता करारानुसार, रशियाने दक्षिण कारेलिया व व्हीबॉर्ग हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर फिनलंडला दिले. मात्र फिनलंडचे हांग्को द्वीपकल्प रशियास नाविक तळ म्हणून द्यावे लागले.

हिवाळी युद्धानंतर, फिनलंडने रशियाला तोंड देण्यासाठी जर्मनीकडे धाव घेतली. २२ जून १९४४ रोजी जर्मनीने जेव्हा रशियावर आक्रमण केले, तेव्हा या संघर्षात फिनलंडने तटस्थ राष्ट्राची भूमिका घेतली. तथापि जर्मन सेना लॅपलँडमध्ये येऊन उतरली आणि रशियाने फिनलंडवर बाँबवर्षाव केला. मानेरहेमच्या नेतृत्वाखाली फिनी सैन्याने रशियन सीमा ओलांडून गेलेला मुलूख परत मिळविला व पूर्व कारेलिया हस्तगत केला.  


रशियाने १९४४ च्या उन्हाळ्यात फिनींचा प्रतिकार मोडण्याचा निकराचा प्रयत्‍न करूनही रशियन फौजांना व्हीबॉर्गपर्यंतच फिनी सैन्याने रोखून धरले व फिनिश सीमाप्रदेशात घनघोर युद्धे झाली. १९ सप्टेंबर १९४४ रोजी फिनलंड व रशिया यांच्यात युद्धविराम झाला. यानंतर फिनी सैन्याला जर्मन फौजांशी निकराने युद्ध करावे लागले, कारण जर्मन फौजा शांततेने उत्तर फिनलंड सोडून जाण्यास तयार नव्हत्या. अखेरीस जर्मन फौजांनी फिनलंडमधून माघार घेतली, पण तीदेखील व्याप्त प्रदेश उद्‌ध्वस्त करूनच.

अशा तऱ्हेने ही युद्धे फिनलंडला अतिशय महाग पडली. या युद्धांत सु. १ लक्ष फिनी मृत्यू पावले, तर ५०,००० कायमचे अपंग वा दुर्बल झाले. याशिवाय फिनलंडला दक्षिण कारेलिया तसेच पूर्वेकडील इतर प्रदेश गमवावे लागले आणि सोव्हिएट रशियाला पोर्क्काला हा लष्करी तळ म्हणून द्यावा लागला. म्हणजेच फिनलंडला आपला सु. १२% प्रदेश रशियाला द्यावा लागला. गमवाव्या लागलेल्या प्रदेशातील सु. ४·२० लक्ष नागरिकांना फिनलंडमध्ये परतण्याची मुभा देण्यात येऊन तेथे त्यांना आपल्या मालमत्तेबद्दल नुकसानभरपाई देण्यात आली व त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. युद्धहानिपूर्तिस्वरूपात फिनलंडला ४,४५० लक्ष डॉलर रशियाला द्यावे लागले.

दुसऱ्या महायुद्धानंतर फिनलंडमध्ये सोशल डेमॉक्रॅटिक, ॲग्रेरियन (१९६५ पासून सेंटर पार्टी ) व कम्युनिस्ट या डाव्या पक्षांनी सरकार बनविले. कम्युनिस्ट पक्षाचे सरकारमधील वाढत्या प्रभावाचे व वर्चस्वाचे प्रयत्‍न निष्फळ ठरले. १९४८ पासून १९६६ पर्यंत कम्युनिस्ट पक्षाला शासनयंत्रणेबाहेर ठेवण्यात इतर पक्षांना यश आले.

मानेरहेम हा १९४४ मध्ये राष्ट्राध्यक्ष झाला व त्यानेच देशाला युद्धातून बाहेर काढले. त्याने १९४६ मध्ये राजीनामा दिला. त्याच्यानंतर युहो कुस्ती पासिकिव्ही हा राष्ट्राध्यक्ष बनला (कार. १९४६ – ५६). पासिकिव्ही हा युद्धोत्तर फिनलंडच्या तटस्थतेच्या विदेशनीतीच्या शिल्पकार समजण्यात येतो. त्याच्या कारकीर्दीत फिनलंडने सोव्हिएट रशिया व स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे (स्कँडिनेव्हियन देश) यांच्याबरोबर संबंध घनिष्ठ केले. १९४८ मध्ये फिनलंडने रशियाबरोबर शांतता करार केला. त्यानुसार फिनलंडवर परक्या देशाने आक्रमण केले किंवा त्या देशाची सुरक्षितता धोक्यात आली, तर रशिया फिनलंडला पूर्ण साहाय्य करेल, असा त्या कराराचा महत्त्वाचा भाग होता. १९५५ मध्ये रशियाने फिनलंडला आपल्या ताब्यातील पोर्क्काला हा लष्करी तळ परत केला आणि १९४८ रोजी केलेल्या मैत्री कराराचे २० वर्षांसाठी नूतनीकरण केले. 

ॲग्रेरियन व सोशल डेमॉक्रॅटिक या पक्षांचा १९५० पासून फिनलंडच्या राजकीय जीवनावर विशेष प्रभाव जाणवतो. १९५६ मध्ये ॲग्रेरियन पार्टीचे नेते ऊर्हा कालेव्हा केकोनेन हे विजयी होऊन पासिकिव्हीनंतर राष्ट्राध्यक्ष बनले. त्याआधी ते पंतप्रधान होते. डॉ. केकोनेन हे १९६२ आणि १९६८ मध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा निवडले गेले. १९७४ मध्ये त्यांना मुदतवाढ देण्यात आली. फेब्रुवारी १९७८ च्या निवडणुकीत ते पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून आले व राष्ट्राध्यक्ष झाले. सोव्हिएट रशियाबरोबरचा मैत्री, सहकार व परस्परसाहाय्याच्या कराराचे १९७० मध्ये आणखी २० वर्षांकरिता नूतनीकरण करण्यात आले. हा करार फिनलंडच्या विदेशनीतीची आधारशिलाच मानण्यात येतो. तथापि फिनलंडने आपल्या मालाला पूर्व व पश्चिम यूरोपीय देशांत बाजारपेठा उपलब्ध होण्यासाठी तटस्थतेचे धोरण अंगिकारल्याचे दिसून येते. ऑक्टोबर १९७३ मध्ये फिनलंडने यूरोपीय आर्थिक समुदाय (यूरोपियन इकॉनॉमिक कम्यूनिटी) आणि यूरोपीय कोळसा व पोलाद समुदाय (यूरोपियन कोल अँड स्टील कम्यूनिटी) यांच्याबरोबर व्यापारी करार केले, तर मे १९७७ मध्ये रशियाशी १५ वर्षांचा व्यापारी करार केला. फिनलंड १९५५ पासून संयुक्त राष्ट्रे आणि नॉर्डिक कौंन्सिल यांचा सदस्य, तर १९६१ पासून ‘एफ्टा’चा सहयोगी सदस्य आहे. १९६९ मध्ये अमेरिकेची संयुक्त संस्थाने व सोव्हिएट रशिया या बड्या राष्ट्रांमधील ‘सॉल्ट’ संबंधीच्या बोलण्याचे त्याचप्रमाणे १९७५ मध्ये भरलेल्या यूरोपमधील सुरक्षा व सहकारविषयक परिषदेचे यजमानपदही फिनलंडने भूषविले होते.


राजकीय स्थिती : स्वातंत्र्यापासून १९७८ पर्यंतच्या ६१ वर्षांत फिनलंडमध्ये ६१ मंत्रिमंडळे होऊन गेली, त्यांपैकी २० अल्पमतांची संमिश्र मंत्रिमंडळे होती. एकामागून एक येणारी काळजीवाहू सरकारे व मुदतपूर्व निवडणुका ही देशातील राजकीय अस्थिरतेची दान ठळक लक्षणे होत. सोशल डेमॉक्रॅटिक पक्षाचा नेता कालेव्ही सोर्सा हा सप्टेंबर १९७२ ते जून १९७५ पर्यंत पंतप्रधान होता. नोव्हेंबर १९७५ मध्ये सेंटर पार्टीच्या मार्ती मिएत्यूनेन याने पाच पक्षांचे संमिश्र मंत्रिमंडळ बनविले. तथापि त्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाचा केलेला समावेश सरकारला फलदायी ठरला नाही. आर्थिक धोरणावरील मतभेदांमुळे या सरकारला सप्टेंबर १९७६ मध्ये राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर मिएत्यूनेनला नाखुषीनेच सोशल डेमॉक्रॅटिक व कम्युनिस्ट हे दोन पक्ष वगळून त्रिपक्षीय अल्पमतातील मंत्रिमंडळ बनवून कारभार चालवावा लागला. मे १९७७ मध्ये राष्ट्राध्यक्षांनी देशातील पक्षांना बहुमत सिद्ध करून मंत्रिमंडळ बनविण्यास सांगितल्यावरून मिएत्यूनेन मत्रिमंडळाने राजीनामा दिला. कालेव्ही सोर्सा या माजी पंतप्रधानाने पुन्हा पाच पक्षांचे नवे मंत्रिमंडळ बनविले. करांमध्ये सूट देऊन खाजगी उद्योगधंद्यांना साहाय्य करण्याचे व त्यायोगे अंतर्गत मागणीला उत्तेजन द्यावयाचे आणि असे केल्याने उत्पादन व उत्पादन-गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन देशाची वाढती बेकारी कमी करावयाची, अशी योजना सोर्साने कार्यवाहीत आणली.

फेब्रुवारी १९७८ मध्ये फिनी मार्कचे एका वर्षातच तिसऱ्यांदा अवमूल्यन करण्यात आले नॉर्वेने केलेल्या आपल्या चलनाच्या अवमूल्यन संकेतानुसारच फिनलंडची ही कृती होती. या अवमूल्यन प्रश्नावर प्रत्यक्ष मंत्रिमंडळातच मतभेद माजले व तट पडले आणि सोर्सा सरकारने राजीनामा दिला. मार्चमध्ये पुन्हा सोर्साच्याच नेतृत्वाखाली नवे सरकार अधिकारावर आले मात्र स्वीडिश पीपल्स पार्टीने या सरकारात भाग घेतला नाही. या नव्या चतुःपक्षीय सरकारला मार्क अवमूल्यनावरून कामगारसंघटनांनी सार्वत्रिक संपाची धमकी दिली. तथापि शासनाने जानेवारी १९७९ पासून कार्यवाहीत येईल, अशी १·५% वेतनवाढ जाहीर करण्याचे व कडक वित्तनीती थोडी सैल करण्याचे मान्य केले.

फिनलंड हे संसदीय व्यवस्था परंतु अध्यक्षाचा मोठा प्रभाव असलेले एक प्रजासत्ताक आहे. येथील एकसदनी संसदेचे २०० सदस्य असून त्यांची चार वर्षांसाठी प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने निवड होते. २१ वर्षे व त्यांवरील वयाच्या सर्व नागरिकांना मताधिकार असून त्यांनी निवडलेले ३०० सदस्यांचे निर्वाचन मंडळ बहुमताने राष्ट्राध्यक्षाची निवड करते. राष्ट्राध्यक्ष सर्वोच्‍च अधिकारी असून त्याची मुदत ६ वर्षे असते. सामान्य प्रशासनासाठी राष्ट्राध्यक्ष हा पंतप्रधान व मंत्रिमंडळाची नियुक्ती करतो. संसदेने मंजूर केलेल्या विधेयकांना संमती देणे, वटहुकूम काढणे, संसद बरखास्त करणे, नव्या निवडणुका घेणे, सेनाप्रमुखत्वाची जबाबदारी संभाळणे, विदेशनीतीची अंमलबजावणी करणे इ. व्यापक अधिकार राष्ट्राध्यक्षाला आहेत. मंत्रिमंडळ संसदेला जबाबदार राहते. फिनलंडचे १२ प्रांत असून त्यांचा कारभार नियुक्त राज्यपालांमार्फत चालतो. १९७५ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर भरलेल्या संसदेमधील प्रमुख पक्षांचे बळ पुढीलप्रमाणे होते : फिनिश सोशल डेमॉक्रॅटिक -५४ फिनिश पीपल्स डेमॉक्रॅटिक लीग (कम्युनिस्ट पार्टी धरून)-४० सेंटर पार्टी (पूर्वीची ॲग्रेरियन) -३९ नॅशनल कोअलिशन पार्टी -३५ स्वीडिश पीपल्स पार्टी-१० लिबरल पीपल्स पार्टी-९ फिनिश ख्रिश्चन लीग -९ अन्य-४.

फिनीश सोशल डेमॉक्रॅटिक पक्षावर मार्क्सवाद्यांचा प्रभाव असून हा पक्ष शासकीय मालकी व उत्पादनावर नियंत्रण या उद्दिष्टांसाठी कार्य करतो. फिनिश पीपल्स डेमॉक्रॅटिक लीग हा पक्ष विचारप्रणालीने मार्क्सवादी असला, तरी राजकीय दृष्ट्या कम्युनिस्टांकडे झुकणारा आहे साहजिकच या पक्षाचे नेते सोव्हिएट-फिनिश मैत्रीवर अधिक भर देतात. त्याचप्रमाणे संसदीय कार्यपद्धतीवर त्यांचा विश्वास आहे. सेटर पार्टी हा पक्ष तर १९४७ पासूनच्या प्रत्येक संमिश्र सरकारामध्ये सहभागी झालेला पक्ष आहे. तो शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करीत असून त्यांचे जीवनमान सुधारण्याकरिता प्रयत्‍नशील आहे. ‘नॅशनल कोअलिशन पार्टी’ आणि ‘लिबरल पीपल्स पार्टी’ हे दोन्ही पक्ष राष्ट्रवादी विचारधारा आणि जुन्या परंपरा व मूल्ये जपणारे आहेत यांशिवाय कमीतकमी शासकीय नियंत्रण व कमी प्रमाणावर सार्वजनिक मालकी यांचा हे पक्ष आग्रह धरतात. स्वीडिश पीपल्स पार्टी हा पक्ष देशातील स्वीडिश लोकांचे प्रतिनिधित्व करतो.

न्याय : न्यायदानाची पद्धत स्वीडिश अंमलापासून अस्तित्वात आहे. १७३४ चा कायदाही काही प्रमाणात कार्यवाहीत आहे. देशात स्थानिक, अपील व सर्वोच्‍च अशी तीन स्तरांवरील न्यायालये आहेत. सर्वांत खालच्या स्तरावरील न्यायालये म्हणजे नगरपालिकीय न्यायालये व जिल्हा न्यायालये. नगरपालिकीय न्यायालयांमध्ये तीन न्यायाधीश असून त्यांपैकी एक प्रमुख (बर्गोमास्टर) असतो. जिल्हा न्यायालयांमध्ये एक न्यायाधीश व पाच ते सात ज्यूरी असतात. अपील न्यायालये तुर्कू, व्हासा, क्कॉप्यॉ, कोव्होला आणि हेल्‌सिंकी या शहरांत आहेत. प्रमुख न्यायाधीश व अन्य २० न्यायाधीश असलेले सर्वोच्‍च न्यायालय हेल्‌सिंकी येथे आहे. देशाची संसद लोकपालाची नियुक्ती करते.

संरक्षण : रशियाबरोबर १९४७ मध्ये झालेल्या शांतता करारानुसार फिनलंडला आपले सेनाबल ४१,९०० सैनिकांपुरतेच सिमित करावे लागले आहे. १९ ते ३० वर्षे वयाच्या सर्व नागरिकांना सक्तीची लष्करी सेवा करावी लागते. लष्करी प्रशिक्षण काळ २४० ते ३३० दिवसांचा, तर उजळणी प्रशिक्षण काळ ४० ते १०० दिवसांचा असतो. १९७८ च्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षणाकरिता १९० कोटी मार्क रकमेची तरतूद करण्यात आली होती. त्याच वर्षी सेनाबलाची एकूण संख्या ३९,९०० असून त्यापैकी भूदल ३४,४०० नौसेना २,५०० व वायुसेना ३,००० होती. यांशिवाय ६·९ लक्ष राखीव सैन्य असून सु. ४,००० सैनिकांचे सीमा सुरक्षा दल आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ईजिप्तमधील शांतता दलामध्ये ६५४ फिनी सैनिकांची एक तुकडी कार्य करीत आहे. 


आर्थिक स्थिती : दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस फिनलंडची अर्थव्यवस्था अतिशय खालावली होती. आपला सु. १२% उत्पादक प्रदेश आणि ४,४५० लक्ष डॉलर युद्धहानिपूर्तीची रक्कम रशियास द्यावी लागून फिनलंडला सु. ४·२० लक्ष निर्वांसितांचे पुनर्वसन करावे लागले. १९४४ ते १९५२ या काळात युद्धहानिपूर्तिची रक्कम, वाढती चलनवाढ आणि लोकसंख्या यांच्या आवर्तात फिनलंड सापडला होता. निकृष्ट मृदा, उत्तरेकडील कडक हवामान, कोळसा व इतर खनिज साधनांचा अभाव ही प्रतिकूल परिस्थिती असूनही फिनी लोकांनी उत्पादक व विविधांगांनी विस्तारित अशा अर्थव्यवस्थेचा आश्चर्यकारक रीतीने विकास केला. याच्या पाठीमागे फिनलंडमधील प्रचंड जंगलांची उपलब्धता आणि जलशक्तिसाधनांचे वैपुल्य त्याचप्रमाणे फिनी लोकांची कष्टाळू वृत्ती, मितव्यय व कल्पकता या गोष्टी आहेत. परंपरेने कृषिव्यवसाय हाच बहुतेक फिनींचा जीवनमार्ग असूनही त्यामध्ये दुग्धव्यवसाय आणि पशूपालन यांच्या विकासामुळे महत्त्वाच्या सुधारणा व बदल घडून येत होते. इमारती लाकूड, इतर लाकूड पदार्थ, कागद व कागदलगदा इ. उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसित झाले. देशाच्या निर्यातीमध्ये त्यांना अग्रक्रम आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर ओतशाळा उद्योग, जहाजनिर्मिती कारखाने व अभियांत्रिकी स्वरूपाचे उद्योग यांचा विकास घडून आला. आयात-निर्यातीच्या बाबतीत परदेशांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून रहावे लागत असल्यामुळे फिनिश अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय आर्थिक बदलांच्या संदर्भात अतिशय संवेदनक्षम असते.

दुसऱ्या महायुद्धामुळे फिनिश अर्थव्यवस्थेमध्ये अनेक संरचनात्मक बदल घडून आले. युद्धापूर्वी कृषी व जंगले यांपासून राष्ट्रीय उत्पन्नाचा ३४%, तर औद्योगिक क्षेत्रापासून २५% हिस्सा मिळत असे. नंतरच्या काळात निर्मितीउद्योग आणि बांधकामउद्योग यांचा वेगाने विकास होत गेल्याने त्यांपासूनचा हिस्सा वाढू लागला. धातुउद्योग व जहाजउद्योग हे विकसित होत गेले १९५७ पासून सेवाउद्योगांच्या क्षेत्राचा सर्वाधिक विकास होऊ लागला १९६८ मध्ये कृषी व जंगल क्षेत्रापासून राष्ट्रीय उत्पन्नाला मिळणाऱ्या हिश्श्याचे प्रमाण १५% होते.

फिनिश अर्थव्यवस्था ही मुख्यतः खाजगी उद्योगधंद्यांवर निर्भर आहे. सरकारी उद्योगधंद्यांचे प्रमाण २५% असून ते वाढत आहे. रेल्वे, रेडिओ, टपाल व संदेशवहन सेवा तसेच अल्कोहॉलिक पेये यांवर शासनाची मक्तेदारी आहे. फिनिश शासन खाजगी कारखानदारांना उद्योगधंद्यांची मालकी व व्यवस्थापन यांच्या दृष्टिकोनातून औद्योगिक सहकार्य करीत असते. उदा., विद्युत्‌शक्तिनिर्मिती, संदेशवहन, खाणउद्योग इत्यादी.

कृषी : दुसऱ्या महायुद्धापूर्वी कृषी हा देशातील प्रमुख व्यवसाय होता. त्यानंतर निर्वासितांचे पुनर्वसन करावे लागल्यामुळे अनेक लहानलहान शेते निर्माण करावी लागली. १९७५ साली लागवडीखाली केवळ ९% जमीन असून शेती व जंगले या क्षेत्रांमध्ये केवळ १५% लोक गुंतलेले होते. त्या साली २,४८,७३६ शेते होती. कृषीक्षेत्रातील श्रमबळाची औद्योगिक क्षेत्राकडे जाण्याची प्रवृत्ती वाढली आहे. १९७६ मध्ये देशातील कृषियोग्य जमीन व कायम पिकांखालील जमीन मिळून एकंदर २४·९० लक्ष हे. होती कायम कुरणांखालील जमीन १·५० लक्ष हे. जंगलांखाली १९७·३ लक्ष हे., तर इतर जमीन ८१·७७ लक्ष हे. असे जमीन वापराचे प्रमाण होते. शेतमालावर आयात नियंत्रणे घालून आणि शेतकऱ्यांना शेतमालासाठी आधार किंमती देऊन शासन शेतकऱ्यांच्या मिळकतीचे रक्षण करते. फिनलंडच्या शेतमालाच्या निर्यातीमध्ये मांस, लोणी, चीज, निर्जलीकृत दूध, अंडी यांचा प्रमुख्याने समावेश असतो. रेनडिअरच्या मांसाची निर्यात करण्यात फिनलंडची विशेष प्रसिद्धी आहे. गायी तसेच डुकरे व कोंबड्या यांचे संवर्धन करणे, हे फिनी कृषिउद्योगाचे प्रधान वैशिष्ट्य समजले जाते. फिनलंडच्या अन्नधान्य पिकांवर मशागतीला मिळणारा अल्पकाळ व हानिकारक हिमतुषार यांचा वाईट परिणाम होतो. हा देश उत्तरेकडे असल्याने धान्य पिकांच्या वाढीला पोषक असे हवामानही तेथे नाही. नैर्ऋत्य फिनलंडमध्ये गहू व इतर तृणधान्ये तसेच बीट यांचे चांगले उत्पादन होते. आलांड बेटांवर सफरचंदे, काकड्या व कांदे यांचे पीक घेतले जाते. टोमॅटोचेही चांगले उत्पादन होते. चांगल्या प्रकारे जलसिंचन, खतांचा मोठ्या प्रमाणात वापर आणि उत्कृष्ट प्रतीची बी-बियाने यांच्या योगे शेतमालाचे उत्पादन वाढले आहे. १९७७ मधील कृषिउत्पादन पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्ष मे. टनांत) : गहू २·९४ बार्ली १४·४७ राय (धान्य व गवत) ०·८० ओट १०·२१ मिश्रधान्य ०·५५ बटाटे ७·३६ बीट ५·६०. १९७८ मधील पशुधन पुढीलप्रमाणे (आकडे लक्षांत) : घोडे ०·२४ गाईगुरे १७·७९ डुकरे १२·४४ कोंबड्या ९०·३२ रेनडिअर १·७७ मेंढ्या १·०६. पशुजन्य पदार्थ पुढीलप्रमाणे (आकडे लक्ष मे. टनांत) : गाईचे दूध ३१·३० डुकराचे मांस १·४० अंडी ०·८५ लोणी ०·७३ चीज ०·६०.

फिनलंडमध्ये शेतीव्यवसाय व जंगलव्यवसाय हा दोहोंचा अतूट संबंध आहे. लागवडीखालील जमीनीला जोडूनच जंगलाचा मोठा भाग असतो. ६० ते ६५ टक्के शेतकऱ्यांच्या मालकीचा जंगलप्रदेश असतो. शेतकऱ्याच्या एकूण मिळकतीच्या तिसरा हिस्सा त्याला लाकूडतोडीपासून प्राप्त होतो. दक्षिणेकडील सुपीक प्रदेशात हे प्रमाण कमी, तर मध्य व उत्तर फिनलंडमध्ये हे प्रमाण जास्त आहे.

मासेमारी : महत्त्वाचा अन्नपदार्थ या दृष्टीने अंतर्गत मागणीचा विचार करता मच्छीमारी उद्योगाला महत्त्व आले. १९७६ चे एकूण उत्पादन १,१७,२०० मे. टन (गोड्या पाण्यातील २३,५०० मे. टन व समुद्रातील ९३,७०० मे. टन) झाले. त्यात सामन, रेनबो, ट्राउट, व्हाइट फिश, पाइक व कार्र इ. माशांचा अंतर्भाव होतो. देशात मत्स्योत्पादनाची २०० वर केंद्रे उघडण्यात आली आहेत. 


जंगलसंपत्ती : देशाचा सु. ६५% भूभाग जंगलांनी व्याप्त आहे. स्कॉच पाइन, नॉर्वे स्प्रूस व बर्च हे वृक्ष अधिक आढळतात. १९७० – ७५ च्या दरम्यान प्रतिवर्षी ४४० लक्ष घ. मी. लाकूडतोड होत असे. १९७७ मधील लाकूडतोड २७९·७१ लक्ष घ. मी. झाली. निर्वनीकरणाच्या समस्येमुळे लाकूड उत्पादनात निश्चितपणे घट होत आहे. त्यासाठी वनरोपणाचा कार्यक्रम वेगाने हाती घेण्यात येत आहे. प्लायवुड व व्हीनिअर, रांधा, कागद, वृत्तपत्री कागद, कार्डबोर्ड इत्यादींच्या निर्मितीसाठी लाकडाचा उपयोग करण्यात येतो.

शक्तिसाधने : फिनलंडची जलविद्युत् निर्मितिक्षमता प्रचंड असली, तरी ती संपूर्णतया उपयोजिली जाणे अवघड आहे. १९७७ मध्ये ३,१५५·६ कोटी किवॉ. ता. वीजउत्पादन झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर कारेलियाचा संमृद्ध भाग रशियाला द्यावा लागल्याने, वीजउत्पादनासाठी फिनलंडला उत्तरेकडील नद्यांकडे वळावे लागले. १९७५ पर्यंत ओलू नदीवर सात विद्युत्‌निर्मिती केंद्रे उभारण्यात यावयाची होती. केमी नदीवर अशाच प्रकारची नऊ केंद्रे उभारण्याचे काम चालू होते. प्रत्येकी ४४० मेवॉ. क्षमतेची दोन अणुशक्तिकेंद्रे हेल्‌सिंकीच्या पूर्वेकडील लूव्हीला येथे उभारण्यात येणार आहेत. यासाठी सोव्हिएट रशिया सर्व आवश्यक ती सामग्री देणार असून अणुइंधनाचा २० वर्षांसाठी पुरवठाही करणार आहे.

खनिजसंपत्ती : या बाबतीत हा देश समृद्ध आहे. परंतु पूर्व फिनलंडमधील ओटोकुम्पू येथे देशातील सर्वांत मोठी तांब्याची खाण असून तेथून तांबे, जस्त व आयर्न सल्फाइडे यांचे उत्पादन होते. थोड्याफार प्रमाणात सिमेंटचे उत्पादन नैर्ऋत्य फिनलंडमध्ये, तर लोह खनिजांचे उत्पादन वायव्य फिनलंडमध्ये होते.

उद्योग : दुसऱ्या महायुद्धोत्तर काळातील फिनलंडची औद्योगिक प्रगती लक्षणीय आहे. देशातील औद्योगिक क्षेत्रात अनेकविध लहानलहान उद्योगांचे जाळे पसरलेले आढळते. मोठ्या निर्मितिउद्योगांमध्ये वनउद्योंगाना अग्रक्रम आहे. १९६० व १९७० च्या दरम्यान वनउद्योगांचा एकूण औद्योगिक उत्पादनात २०% वाटा होता. मऊ लाकडावर प्रक्रिया करणारे उद्योग बॉथनियाच्या आखाताच्या वरच्या टोकाजवळ व फिनलंडच्या आखाताच्या परिसरात एकवटलेले आढळतात. या क्षेत्रातील चौदा कंपन्यांची ( पैकी चार शासकीय ) वनउद्योगावर मक्तेदारी आहे. या कंपन्या ५०% कापीव लाकूड आणि ८०% कागद व लगदा यांचे उत्पादन करतात. एकूण कागदउत्पादनापैकी निम्मे उत्पादन वृत्तपत्री कागदाचे होत असून उर्वरित उत्पादनामध्ये कार्डबोर्ड, आवेष्टन कागद, उच्‍च दर्जाचे कागद (बँक नोटा, दस्तऐवज तसेच हवाई टपालवाहतूक कागद) यांचा अतर्भाव होतो. प्रतिवर्षी सु. ७५ लक्ष घ. मी. कापीव लाकडाची निर्मिती होते. बॉथनियाच्या आखातावरील केमी हे कापीव लाकूड निर्यातीचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. १९६५ नंतर प्‍लायवुडची निर्मिती करणारे विसांहून जास्त कारखाने पूर्व फिनलंडमधील सरोवरी विभागात सुरू झाले. कारण याच भागात बर्च वृक्षांची मोठी अरण्ये आहेत. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात धातुकाम व अभियांत्रिकी उद्योगांची झालेली वाढ, हा फिनलंडच्या औद्योगिकीकरणातील महत्त्वाचा टप्पा होय. सोव्हिएट रशियाला युद्धहानिपूर्तीची रक्कम, जहाजे, अवजड यंत्रे, यांत्रिक हत्यारे, केबली व तदानुषंगिक वस्तूंच्या स्वरूपात द्यावी लागल्याने साहजिकच या उद्योगांची वाढ झाली. १९६५ ते १९७५ या काळात धातू, धातुकाम व अभियांत्रिकी उद्योगांमध्ये एकूण औद्योगिक श्रमबळापैकी तिसरा हिस्सा श्रमबळ आणि एकूण उत्पादनापैकी चौथा हिस्सा उत्पादन झाले. राहे येथे लोखंड-पोलादनिर्मितीचा कारखाना उभारण्यात आला असून नैर्ऋत्य फिनलंडमध्ये कागद व लगदा यांच्या उत्पादनाला लागणारी यंत्रे, कृषिअवजारे व यंत्रे, तेलवाहू व बर्फफोडी जहाजे, केबली, रोहित्रे, जनित्रे व विद्युत् चलित्रे यांचे उत्पादन करणारे कारखाने उभारण्यात आले आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासून रसायनोद्योगांचीही वेगाने वाढ झाली आहे. यांमध्ये संश्लिष्ट धागे, प्‍लॅस्टिके, औषधे, रासायनिक खते व सौंदर्यप्रसाधने यांचा समावेश होतो. वस्त्रोद्योग, फर्निचर, काचेची उपकरणे यांच्या उत्पादनकौशल्याबाबतही फिनलंड प्रसिद्ध आहे. देशात दोन महत्त्वाचे कामगार महासंघ आहेत. त्यांपैकी एक ‘सेंट्रल ऑर्गनायझेशन ऑफ फिनिश ट्रेड युनियन्स’ (साक) हा महासंघ १९०७ मध्ये स्थापन झाला असून त्याच्याशी २८ कामगार संघटना संबद्ध आहेत व त्याची सदस्यसंख्या ९,५१,१९० आहे (१९७६). ‘कॉन्फेडरेशन ऑफ सॅलरीड एम्प्‍लॉईज’ (टीव्हीके) हा दुसरा महासंघ आहे. त्याची १९२२ मध्ये स्थापना झाली असून २० कामगारसंघटना त्याच्या सदस्य आहेत.त्याची सदस्यसंख्या ३,००,००० आहे.

फिनलंडमध्ये सरकारच्या मालकीचेही काही उद्योगधंदे आहेत. अर्थात शासनाचे उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करण्याचे धोरण नाही. मद्ये, लाकूड, कागद, अभियांत्रिकी, रसायने, व्यापारी जहाजे, खाणकाम, विद्युत्‌शक्ती निर्मितीचे शासकीय कारखाने असून बहुतेक कारखान्यांवर सु. ८० ते ९० टक्के शासकीय मालकी आहे.

अर्थकारण : देशाचे ‘ मार्क’ (फिनमार्क) हे नवे अधिकृत चलन १९६३ पासून अंमलात आले असून एक फिनमार्क १०० पेनींमध्ये विभागलेला आहे. १, ५, १०, २० व ५० पेनींची आणि १, ५, व १० मार्क यांची नाणी तर ५, १०, ५०, १०० व ५०० मार्कच्या कागदी नोटा वापरात आहेत. ऑक्टोबर १९७८ मधील विदेश विनिमय दर १ स्टर्लिंग पौंड = ७·९३ मार्क, तसेच १ अमेरिकी डॉ. = ३·७८ मार्क म्हणजेच १०० मार्क = १२·६० स्टर्लिंग पौंड = २६·४६ डॉ. असा होता. १९७७ च्या अर्थसंकल्पात महसूल व खर्च हे अनुक्रमे ३,५१६·८ कोटी मार्क व ३,५०६·४ कोटी मार्क होते. महसुली उत्पन्नापैकी ३१% उत्पन्न प्रत्यक्ष करांपासून ५४% अप्रत्यक्ष करांपासून, ७% कर्जे व ८% संकीर्ण बाबींपासून जमा झाले. एकूण खर्चांच्या रकमेपैकी ९% रक्कम सार्वजनिक प्रशासन, व्यवस्था व सुरक्षितता यांसाठी ५% संरक्षणासाठी १८% शिक्षण व सांस्कृतिक कार्यक्रम १३% सामाजिक सुरक्षा ९% आरोग्य १२% कृषी व वने १३% वाहतूक ७% गृहनिर्माण ६% उद्योगांचे संवर्धन व ९% इतर बाबी यांसाठी खर्चण्यात आली. १९७९ च्या अर्थसंकल्पात महसूल व खर्च अनुक्रमे ४,३५१·५ कोटी व ४,३५१·३ कोटी मार्क होते. १९४५ पासून अनेकदा झालेले मार्कचे अवमूल्यन हे युद्धकालोत्तर फिनी अर्थनीतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. ‘बँक ऑफ फिनलंड’ ही देशातील प्रमुख बँक असून तिलाच नोटा काढण्याचा अधिकार आहे. १९७७ च्या अखेरीस देशात दोन मोठ्या व पाच लहान व्यापारी बँका आपल्या ८६१ शाखांद्वारा कार्य करीत होत्या. यांशिवाय देशात २८० बचत बँका आहेत. सहकारी बँका हे फिनलंडमधील बँकिंग क्षेत्राचे एक वैशिष्ट्य आहे. १९७७ च्या अखेरीस देशात ३७६ सहकारी बँका व सहा गहाण बँका होत्या. डाकघर बँक आपल्या ३,१२४ शाखांद्वारा कार्य करीत असते. हेल्‌सिंकी येथे शेअरबाजार आहे. देशात २३ विमाकंपन्या आहेत. १९७७ मध्ये फिनलंडचा आयात-निर्यात व्यापार अनुक्रमे ३,०७०·८ कोटी व ३,०९३·१ कोटी मार्क होता. पहिल्यापासून फिनलंडचा व्यापारशेष तुटीचाच होता तथापि १९४५ नंतर औद्योगिक विकास होऊ लागल्यावर ही घट कमी होऊ लागली. फिनलंडचा बहुतेक व्यापार स्वीडन, ग्रेट ब्रिटन, प. जर्मनी या पश्चिमी यूरोपीय देशांशी चालत असून १५% व्यापार रशियाशी व पूर्व यूरोपीय राष्ट्रांशी चालतो. फिनलंड वनउद्योगनिर्मित माल पश्चिमी राष्ट्रांना विकतो व त्या मोबदल्यात अनेकविध औद्योगिक माल खरेदी करतो. रशियाला धातू व अभियांत्रिकीय सामग्री विकून त्याबदली खनिज तेल, कच्‍चा माल व काही औद्योगिक सामग्री घेतो. फिनलंड हा ‘एफ्टा’ चा सहसदस्य असून ‘यूरोपीय सामायिक बाजारपेठ’तील राष्ट्रांशी त्याचा व्यापारी करार झालेला आहे. 


वाहतूक व संदेशवहन : फिनलंडचे शासकीय मालकीचे लोहमार्ग मुख्यतः दक्षिण भागात एकवटलेले असून त्यांची लांबी ६,०६३ किमी. आहे (१९७८). ‘फिनिश स्टेट रेल्वे मंडळ’ १८६२ पासून अस्तित्वात आहे. ५१५ किमी. लोहमार्गांचे विद्युतीकरण झाले असून अधिक लोहमार्गांचे विद्युतीकरण करण्याच्या योजना आहेत. देशातील वाहतूक माध्यमांपैकी रस्ते वाहतूक सर्वांत महत्त्वाची आहे. १९७८ मध्ये एकूण ७३,७६३ किमी. सार्वजनिक रस्त्यांपैकी १८६ किमी. मोटाररस्ते १०,६१५ किमी. प्रथम व द्वितीय श्रेणीचे प्रमुख रस्ते २९,४६० किमी. इतर महामार्ग आणि ३३,६८८ किमी. स्थानिक रस्ते होते. यांशिवाय ३१,४०१ किमी. खाजगी रस्ते होते. १९७७ च्या अखेरीस देशात १०,७५,३९९ मोटारी १,३६,२१५ मालमोटारी १,८७७ बसगाड्या आणि ७,२६१ विशेष वाहने होती. फिनलंडचा ९० टक्के विदेशव्यापार व प्रवासी वाहतूक समुद्रमार्गे होते. नैर्ऋत्य किनाऱ्यावरील बंदरमार्ग हिवाळ्यात बर्फफोडी बोटींनी खुले ठेवण्यात येतात. कोट्‍का हे प्रमुख निर्यातबंदर, तर हेल्‌सिंकी हे प्रमुख आयातबंदर आहे. हेल्‌सिंकीची पाच विशेष बंदरे आहेत. फिनलंडची इतर महत्त्वाची बंदरे पोरी, तुर्कू, राउमा व ओलू ही होत. १९७७ साली फिनलंडच्या व्यापारी नौदलात २२.७ लक्ष टनभाराच्या ४४६ जहाजांचा अंतर्भाव होता. फिनलंडमधील सरोवरांनी ३१·५०० चौ. किमी. क्षेत्र व्यापले असून देशांतर्गत जलवाहतूक ६,६०० किमी. आहे. ‘वॉटर बस’ हे सरोवरांतील वाहतुकीचे एक मोठे वैशिष्ट्य आहे. लाकूडवाहतूक ही सर्वांत महत्त्वाची समजली जाते. १९७७ मध्ये जलमार्गांवाटे ५०० कोटी टन-किमी. अंतर्गत मालवाहतूक व १४ लक्ष प्रवासीवाहतूक करण्यात आली. सोव्हिएट रशियाने १९६३ मध्ये फिनलंडला साइमा कालव्याचा दक्षिण भाग वाहतुकीसाठी भाडेकरारावर देऊ केला. १९६८ मध्ये नव्याने दुरुस्त केलेला साइमा कालवा वाहतुकीस खुला करण्यात आला. १९७७ मध्ये या कालव्यातून ७·८८ लक्ष टन मालाची वाहतूक करण्यात आली. ‘फिन्‌एअर’ (स्था. १९२३) ही ७५% शासकीय मालकीची आंतरराष्ट्रीय आणि अंतर्गत हवाई वाहतूक कंपनी आहे. तिने १९७७ मध्ये २८·३ लक्ष किमी., १३,९५०·९२ लक्ष प्रवासी-किमी. आणि ३८६·९० टन-किमी. मालवाहतूक केली. अनेक परदेशी विमान कंपन्या फिनलंडला हवाई वाहतूक सेवा उपलब्ध करतात. देशात १७ विमानतळ असून १९७७ मध्ये ४,०९७ डाककचेऱ्या ९१७ तारघरे आणि २०,३२,२८० दूरध्वनियंत्रे होती. संदेशवहनव्यवस्था शासनाच्या हाती आहे. रेडिओ संच २१,९९,६०० व दूचित्रवाणी संच १४,५४,४८४ होते (१९७७). याच वर्षी ३,६७९ पुस्तके प्रकाशित झाली.

लोक व समाजजीवन : फिनलंडच्या एकूण लोकसंख्येपैकी सु. ९२ टक्के लोक फिनिश भाषा बोलणारे आहेत तर ७ टक्के लोकांची मातृभाषा स्वीडिश आहे. अल्पसंख्यांक स्वीडिश भाषिकांचे एकेकाळी राजकीय व सामाजिक दृष्टींनी असलेले प्रभुत्व घटत चालले आहे. आंतरविवाह, घटते जननप्रमाण आणि वाढते बहिःप्रवासन यांसारख्या कारणांनी तर स्वीडिश भाषिकांचे प्रत्यक्ष संख्याबळच कमी होऊ लागले आहे. फिनिश व स्वीडिश भाषा बोलणाऱ्यांचे गट वा समूहांमध्ये बाह्यस्वरूपाच्या दृष्टीने फारसा फरक आढळला नाही गौरवर्ण, करडे वा निळसर डोळे आणि फिके वा तांबूस रंगाचे केस ही वैशिष्ट्ये दोहोंतही समानच आहेत. सु. १,५०० संख्या असलेले लॅप लोकही देशात असून त्यांच्यापैकी काहीजण रेनडिअर कळप पाळून उदरनिर्वाह करतात. चित्रविचित्र वेषभूषेच्या जिप्सी लोकांचीही फिनलंडमध्ये वस्ती असून त्यांची संख्या सु. ४,००० भरेल यांशिवाय १,५०० ज्यू आणि १,००० तुर्की लोकांचीही वस्ती आहे.

शहरवासी फिनी लोकांत आपल्या मालकीच्या सदनिकेमध्येच (फ्‍लॅट) राहण्याची प्रवृत्ती आढळते. ग्रामीण भागातील लोक, विशेषतः शेतकरी, आपल्या शेतावरच घरे बांधून राहतात. ही निवासाची बाब वगळता, ग्रामीण व नागरी भागांतील राहणीमानात बरेच साम्य आढळते. दळणवळणाच्या साधनांत झालेली सुधारणा, मोटारगाड्या, रेडिओ तसेच दूरचित्रवाणी यांचा प्रसार यांमुळे फिनी समाजात रीतिरीवाज, अभिरूची यांबाबतीत सार्वत्रिक एकसारखेपणा निर्माण झालेला आहे.

फिनलंडमध्ये लोकसंस्कृतीचे जतन करण्यात आले आहे. विशेषत्वाने लोकविद्येसंबंधीच्या प्राचीन साधनांचा व वस्तूंचा जगातील सर्वांत मोठा संग्रह फिनलंडमधील अभिलेखागारात आहे. उत्सवसमारंभप्रसंगी राष्ट्रीय पोशाख परिधान करण्यात येतात. काष्ठतक्षणे व अनेक प्रकारच्या विणलेल्या वस्तू या मुख्यतः फिनी हस्तोद्योगाच्या वस्तू होत. अनेक हिवाळी व उन्हाळी खेळप्रकार येथे रूढ आहेत. हिवाळ्यात आबालवृद्ध स्त्रीपुरुष बर्फावरील घसरखेळ आवडीने खेळतात. बर्फावरील हॉकी व स्की-जंपिंग हे खेळ फिनी युवकांमध्ये फार प्रिय आहेत. उन्हाळ्यात हजारो फिनी शहरी भागांतून ग्रामीण भागाकडे विशेषतः किनारी व सरोवरी भागांकडे-धाव घेतात. फिनींचा सावना हा बाष्पयुक्त स्‍नानप्रकार असून देशात अशा प्रकारची सु. ५ लक्ष सावना केंद्रे कार्यवाहीत आहेत. 


सामाजिक संरचना: महायुद्धोत्तर काळात विशेषतः १९६० नंतर फिनलंडमधील सामाजिक संरचनेत मोठे बदल झाले. कृषिक फिनलंडचे आधुनिक औद्योगिक आणि व्यापारी समाजात रूपांतर झाले. १९४० पूर्वी बहुतेक फिनींचा उदरनिर्वाह शेती व जंगले यांवरच चाले १९६६ च्या सुमारास हे प्रमाण एकतृतीयांशावर घसरले. याच कालखंडात उद्योगधंद्यांत गुंतलेल्या श्रमबलाचे प्रमाण दुप्पट आणि व्यापार व सेवा व्यवसायांतील श्रमबलाचे प्रमाण चौपटीहून अधिक झाले. मध्यम वर्ग वाढत असून त्याचे प्रमाण लोकसंख्येच्या ३०% होते. (१९६०). याच काळात कामगारवर्गाचे व कृषकवर्गाचे प्रमाण अनुक्रमे ५१ टक्के व १६ टक्के होते. देशातील एकूण श्रमबलात स्त्रीकामगारांचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. एकूण औद्योगिक व मुलकी कामगारांचा तिसरा हिस्सा स्त्रिया आहेत. १९०६ मध्ये देशात सार्वत्रिक मताधिकार कायदा संमत करण्यात येऊन स्त्रियांना मतदानाचा हक्क देणारे फिनलंड हे यूरोपातील पहिले राष्ट्र ठरले. फिनी स्त्रिया राजकीय अधिकारपदे मोठ्या प्रमाणावर भूषवितात. अनेक व्यवसायांतही त्या उच्‍च पदांवर काम करतात. १९७० मध्ये २० ते ६४ वर्षे या वयोगटातील ६० टक्के स्त्रियांना रोजगार होता.

जगामधील समृद्ध राष्ट्रांमध्ये फिनलंडची गणना होते तथापि उत्तर आणि पूर्व फिनलंडमध्ये दारिद्र्यक्षेत्रे आहेतच. दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत फिनलंडचा जगात पंधरावा, तर यूरोपमध्ये अकरावा क्रमांक लागतो. यूरोपमध्ये राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर मोठा असणाऱ्या राष्ट्रांत फिनलंडची गणना होते. फिनलंडच्या महत्त्वाच्या सामाजिक समस्या, प्राताप्रांतांमधील संपत्तीच्या वितरणामध्ये असणाऱ्या तफावतीशी निगडित आहेत. देशाचे उत्तर व पूर्व भाग हे आर्थिक दृष्ट्या मागासलेले असून या भागांतील जननमान मात्र मोठे आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर फिनलंडमध्ये जननमानाने उच्‍चांक गाठला परंतु नंतरच्या काळात हे प्रमाण घटत जाऊन १९६७, १९७० आणि १९७७ या वर्षी ते अनुक्रमे दरहजारी १६·५, १४·० व १३·९ असे घटल्याचे दिसते. विसाव्या शतकात मृत्युप्रमाण आश्चर्यकारक रीतीने घटले असून १९७०, १९७२ व १९७७ या वर्षी ते अनुक्रमे दरहजारी ९·६, ९·५ व ९·४ वर आले. बालमृत्युमानही १९७६ मध्ये दरहजारी ९·९ एवढे होते. सरासरी आयुर्मान पुरूषांसाठी ६५·४ वर्षे व स्त्रियांसाठी ७२·६ वर्षे होते.

ग्रामीण भागातून शहरी (नागरी) भागाकडे वाटचाल हे फिनलंडच्या लोकसंख्येचे एक वैशिष्ट्य आहे. नागरीकरण अतिशय वेगाने होत असून सांप्रत सु. ५०% फिनी लोकसंख्या नागरी भागात राहते. हेच प्रमाण १९४० मध्ये २६·८% व १९०० मध्ये १२% होते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे दक्षिण फिनलंडमध्ये होत असलेले लोकसंख्येचे वाढते केंद्रीकरण हे होय. देशाच्या १९७७ मध्ये अर्ध्या लाखावर लोकवस्तीची ८, तर लाखावर लोकवस्तीची ५ शहरे होती.

 देशात १९२३ पासून धर्मस्वातंत्र आहे. सु. ९०·९% लोक इव्हँजेलिकल ल्यूथरन चर्चचे, तर १·२% लोक ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चचे सदस्य आहेत. यांशिवाय रोमन कॅथलिक, मेथडिस्ट, ज्यू व इतर धर्मपंथांचे लोक आहेत.

फिनलंडमध्ये प्रचलित असलेल्या सामाजिक सुरक्षा व्यवस्थेत वृद्धांसाठी निवृत्तिवेतन व त्यांची देखभाल, बेकारी लाभ व कुटुंब कल्याण योजना या गोष्टींचा समावेश होतो. ६५ वर्षे व त्यांवरील वृद्धांना विकलांगता आणि वार्धक्य निवृत्तिवेतन शासनाद्वारा दिली जातात. ‘केंद्रीय निवृत्तिवेतन सुरक्षा संस्था’ ही मिळकतींशी निगडित अशी निवृत्तिवेतन योजना राबवीत असून ती शेतकऱ्यांप्रमाणेच स्वयं-रोजगारी माणसांनाही लागू आहे. शासनाचे आरोग्य कल्याण खाते वृद्धांसाठी शुश्रूषासेवा उपलब्ध करते १९७१ मध्ये त्या खात्याने त्यांच्याकरिता मनोरंजन केंद्रे उभारली. बेकारी लाभ व औद्योगिक अपघात हानिपूर्ती पुरविली जाते. प्रसूतिलाभ १९३७ पासून अंमलात असून १९४८ पासून १६ वर्षे वयाखालील सर्व मुलांना कौटुंबिक भत्ते मिळू लागले. शासन जरी संपूर्ण मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करीत नसेल, तरी रूग्णाच्या वैद्यकीय खर्चाच्या ६०% रक्कम त्याला परत देण्यात येते. १९४६ पासून विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवा विमायोजनेशी जोडून उपलब्ध करून देण्यात आली. ‘राष्ट्रीय गृहनिवसन मंडळ’ घरांची बांधणी, पुरवठा व विकास यांसंबंधी मार्गदर्शन करते. देशात घरांची टंचाई मोठ्या प्रमाणात असून ती शहरांमध्ये प्रकर्षाने जाणवते. घरांमध्ये लाकडाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. ‘अपार्टमेंट’ पद्धतीच्या घरांसाठी काँक्रीटचा उपयोग केला जातो.

आरोग्य : १९७६ मध्ये देशात ७,०६८ वैद्य ३,३६६ दंतवैद्य व ७२,३६६ खाटा उपलब्ध होत्या.


शिक्षण : फिनलंडमध्ये साक्षरतेची परंपरा जुनीच आहे. सतराव्या शतकामध्ये फिनींना साक्षरता सिद्ध केल्याखेरीज विवाहास अनुमती दिली जात नसे. सांप्रतच्या शैक्षणिक पद्धतीची रूपरेखा १८६० च्या सुमारास निर्धारित करण्यात आली १९२१ पासून प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले. १९७७-७८ च्या शैक्षणिक वर्षापासून सबंध देशभर जुन्या शिक्षणपद्धतीचा त्याग करण्यात येऊन नवीन सर्वसमावेशक शैक्षणिक पद्धती स्वीकारण्यात आली. सक्तीचा शिक्षणक्रम ९ वर्षांचा असून यामध्ये सर्वांसाठी एकाच प्रकारचे शिक्षण दिले जाते. प्रत्येकाला शिक्षण मोफत असते. सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीमध्ये सहा वर्षांचे कनिष्ठ, तर तीन वर्षांचे उच्‍च पातळीचे शिक्षण समाविष्ट असते. सक्तीचे शिक्षण पूर्ण केल्यावर विद्यार्थ्याला वरिष्ठ वा उच्‍च माध्यमिक शाळेत अथवा व्यवसाय शाळेत तीन वर्षांकरिता दाखल व्हावे लागते. या मुदतीनंतर विद्यार्थ्याला मॅट्रिक्युलेशन परीक्षेस बसावे लागते. जर तो तीमध्ये उत्तीर्ण झाला, तर त्याला ११ विद्यापीठे आणि विद्यापीठीय पातळीवरील सात महाविद्यालये यांपैकी कोणत्याही संस्थेत पुढील शिक्षणाकरिता प्रवेश मिळू शकतो. १९७६-७७ मधील शैक्षणिक आकडेवारी पुढीलप्रमाणे होती : प्राथमिक शाळा ४,३२४, शिक्षक २७,४१४, विद्यार्थी ४,३८,८०४ माध्यमिक १,०१५, शिक्षक २१,३९९, विद्यार्थी ३,४१,४२१ माध्यमिक व्यावसायिक शाळा ५००, शिक्षक ११,३७०, विद्यार्थी ८९,६६९ उच्‍च शिक्षण (विद्यापीठे व इतर संस्था धरून) एकूण ८०, शिक्षक ५,७८०, विद्यार्थी १,१९,२७४ प्रौढशिक्षण संस्थांत ७,०७,९६५ विद्यार्थी होते. ११ विद्यापीठे, शिक्षक ५,९८६ व विद्यार्थी ७६,३१८. हेल्‌सिंकी विद्यापीठ हे फिनलंडमधील सर्वांत जुने विद्यापीठ (स्था. १६४०) आहे.

फिनलंडमध्ये १९१९ च्या संविधानान्वये वृत्तपत्रस्वातंत्र्य निर्धारित करण्यात आले असून वृत्तपत्रांना अभ्यवेक्षण लागू नाही. येथील वृत्तपत्रांची दोन महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे (काही अत्यावश्यक अपवाद वगळता) शासकीय दस्तऐवजांचे अवलोकन करण्याचा जनतेचा कायदेशीर हक्क आणि १९६६ पासून अंमलात आलेला वार्ताहराचा, माहितीच्या उगमस्थानाबाबत गुप्तता राखण्याचा हक्क, ही होत. येथील बहुतेक सर्व वृत्तपत्रे खाजगी कंपन्यांची असून त्यांची मालकी अनेक भागधारकांकडे असते. येथे साखळी वृत्तपत्रे जवळजवळ नाहीतच. राजकीय पक्षांची एकूण ८८ वृत्तपत्रे असून त्यांपैकी स्वतंत्रवादी ४६ (खप ५८·२%), मध्यम धोरणाची व उजव्या गटाची २४ (खप २९·८%) आणि डाव्या गटाची १८ (खप १२%) आहेत. खाजगी मालकीची वृत्तपत्रे-उदा., Helsingin Sanomat (खप ३,६६,१६८), Turun Sanomat (खप १,२८,७८८) यांसारखी अनुक्रमे हेल्‌सिंकी व तुर्कू येथून प्रसिद्ध होणारी दैनिके-ही बव्हंशी राजकीय पक्षनिष्ठेपासून अलिप्त असतात. हेल्‌सिंकी हे वृत्तपत्रांचे प्रमुख केंद्र असून इतर जिल्ह्यांच्या राजधान्यांमधूनही अनेक मोठी दैनिके प्रसिद्ध होतात. परदेशी बातम्या व त्यांवरील भाष्य यांकरिता दिली जाणारी मोठी जागा हे फिनी दैनिक वृत्तपत्रांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. १९७८ मध्ये देशात ८९ दैनिके (त्यांपैकी १२ स्वीडिश भाषेतील) असून त्यांचा एकूण खप २४ लक्ष प्रती एवढा होतो. याच साली १३६ लहान स्थानिक स्वरूपाची वृत्तपत्रे प्रसिद्ध होत होती. सर्वांत लोकप्रिय व खपाने मोठी अशी दैनिके म्हणजे Helsingin Sanomat, Aamulchti, Turun Sanomat, Ilta Sanomat, Savon Sanonat ही होत. वृत्तसंकलन व भाष्य या दोहोंच्या दर्जाच्या दृष्टीने विचार करता Helsingin SanomatUusi Suomi ह्या दैनिकांनी जनमानसात आदराचे स्थान मिळविले आहे. सुमारे १,०४० नियतकालिकांपैकी २०० नियतकालिके स्वीडिश भाषेतून प्रसिद्ध होतात. या सर्व नियतकालिकांचा एकूण खप सु. २१० लक्ष प्रती असून व्यापार व व्यवसाय यांसाठी वाहिलेल्या नियतकालिकांचा हिस्सा सु. ११५ लक्ष प्रती आहे. आघाडीच्या साप्ताहिकांमध्ये Apu (३,०३,६९४), सचित्र वृत्त मासिक Suomen Kuvalehti (१,००,२५३) यांचा अंतर्भाव होतो. ग्राहक सरकारी संस्थांच्या मासिकांचा खप सर्वाधिक हे. उदा., Pirkka (९,९१,४२७), Anna (१,३७,३१६), Me Naiset (१,३३,९१६), Kotiliesi (१,७८,८८४) या स्त्रियांच्या मासिकांचा खप मोठा आहे. Oy Valitut Palat या फिनिश रीडर्स डायजेस्टचा खप २,८७,२८७ प्रती आहे.

फिनी लोक वाचनप्रिय असल्याने देशातील ग्रंथालयांना या लोकांच्या जीवनात आगळे महत्त्व आहे. देशात ५४० हून अधिक केंद्रीय ग्रंथालये आणि २,६६० हून अधिक शाखा-ग्रंथालये होती (१९७०). यांशिवाय अनेक शास्त्रीय ग्रंथालये आहेत. प्रमुख ग्रंथालयांमध्ये हेल्‌सिंकी, तुर्कू, ओलू या विद्यापीठांची ग्रंथालये, फिनिश लिटररी सोसायटी ग्रंथालय व संसदीय ग्रंथालय यांचा समावेश होतो. दुसऱ्या महायुद्धापासून फिनलंडमध्ये संग्रहालय चळवळ वेगाने वाढीस लागली असून सांप्रत येथे तीनशेंवर विविध विषयांवरील संग्रहालये आहेत. उत्कृष्ट संग्रहालयांमध्ये हेल्‌सिंकी येथील ‘नॅशनल’, ‘मानेरहेम’ व ‘नगरपालिकीय’ तसेच ‘अथीनियम कलावीथी ’ ‘तुर्कू कला संग्रहालय’, बॉर्गो येथील ‘रूनेबॅर्य संग्रहालय’ यांचा अंतर्भाव होतो. फिनलंडमधील विद्यापीठे आणि अकादमीमधून १९४७ पासून विज्ञानकेंद्रे स्थापण्यात आली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे फिनी शास्त्रज्ञ ए. आय्. विर्तानेन (१८९५ –    ) यांना १९४५ चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले रॉल्फ नेव्हान्‌लिन्ना (१८९५ –  ) हे गणिती, तर पेन्ती एस्कोला (१८८३-१९६४) हे भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध पावले आइमो कार्लो काजान्देर (१८७९-१९४३) यांना फिनिश वनस्पतिशास्त्राचे जनक मानतात. जे. ए. वासास्त्येर्ना व जे. एल्. सिम्सन हे दोन प्रख्यात अणुकेंद्रीय भौतिकीविज्ञ मानले जातात. फिनलंडमध्ये भाषाभ्यास व मानवजातिविज्ञान या दोन शास्त्रांमधील मोठे संशोधनकार्य झाले आहे. तुलनात्मक धर्माचा फार मोठा अभ्यास ऊनो हार्व्हा या प्राध्यापकाने केला आहे. गणित, भूगर्भशास्त्र, खनिजविज्ञान व भूमापनशास्त्र यांमध्येही फिनींनी मोठी प्रगती केली आहे.

गद्रे, वि. रा. 

भाषा-साहित्य : फिनिश भाषा ही उरल-अल्ताइक कुटुंबाच्या उरालिक किंवा फिनो-उग्रिक शाखेची महत्त्वाची भाषा आहे. ह्या भाषेतील लोकसाहित्याच्या संचितात कालेवालासारख्या राष्ट्रीय महाकाव्याचा अंतर्भाव होतो. एल्यास लनरॉट ह्याने कालेवालाची पहिली आवृत्ती संपादिली (१८३५-३६). सोळाव्या शतकात फिनिश भाषा लेखनिविष्ट होऊ लागली. चौदाव्या शतकापासून फिनलंड हे स्वीडिश राज्याचा एक भाग झाल्यामुळे त्या सत्तेच्या जोखडाखाली फिनिश साहित्याचा फारसा विकास होऊ शकला नाही. त्यामुळे एकोणिसाव्या शतकापर्यंत फिनिश साहित्यनिर्मिती जवळजवळ नव्हतीच, असे म्हटले तरी चालेल परंतु १८३१ मध्ये ‘फिनिश लिटररी सोसायटी’ची स्थापना झाली. कालेवालाला जागतिक साहित्यात स्थान मिळाल्यामुळे फिनिश साहित्यिकांचे ते एक स्फूर्तिस्थान ठरले. एकोणिसाव्या शतकात अलेक्सिस किव्ही, मिन्ना कांट ह्यांसारखे श्रेष्ठ साहित्यिक उदयास आले. युहानी आहॉ, आयनो लेइनो, ओट्टो माननिनेन. व्हि. ए. कोस्केन्निएमी हे एकोणिसाव्या-विसाव्या शतकांतील काही विशेष उल्लेखनीय साहित्यिक. १९३९ मध्ये फ्रान्स एअमिल सिल्लांपॅ ह्या फिनिश कादंबरीकाराला साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. काही फिनिश साहित्यिकांनी स्वीडिश भाषेतही साहित्यनिर्मिती केलेली आहे. अशा साहित्यिकांत यूहान लड्‍‌व्हिग रूनेबॅर्य ह्याचा समावेश होतो. [⟶ फिनिश भाषा फिनिश साहित्य].

कुलकर्णी, अ. र. 


कला व क्रीडा : नवाश्मयुगापासून ब्राँझयुगापर्यंतचे कलाविशेष – उदा., लाकडी मूर्ती, मातीची भांडी, चमचे, गुहाचित्रे इ.- फिनलंडमध्ये सर्वत्र सापडतात. ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराबरोबर बाराव्या शतकानंतर रोमनेस्क शैलीची लाकडी व दगडी चर्च बांधण्यात आली. चौदाव्या व पंधराव्या शतकांतील चर्चवास्तू दगडविटांच्या, गॉथिक शैलीतील आहेत. सतराव्या शतकात व्हीपुरी (व्हीबॉर्ग) सारखी पंधरा नवीन शहरे वसविण्यात आली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीस कार्ल एंगेल (१७७८-१८४०) या जर्मन वास्तूशिल्पज्ञाने हेल्‌सिंकी शहराची पुनर्रचना केली व गॉर्व्हेलने तुर्कू विद्यापीठ बांधले (१८०२-१६).

आधुनिक फिनी वास्तुकलेत कल्पकता व प्रयोगशिलता आढळते. आल्व्हार आल्तॉ, एल्येल सारिनेन यांसारख्या वास्तुशिल्पज्ञांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळालेली आहे. सारिनेनने बांधलेले हेल्‌सिंकीचे रेल्वे स्थानक (१९०५) व नॅशनल म्यूझीयम (१९०६-११) आल्व्हार आल्तॉने बांधलेले पायमीओ शहरातील रुग्णालय (१९२९-३३) व हेल्‌सिंकी येथील ‘हाउस ऑफ कल्चर’ (१९५६) लार्स साँकने नव्या कलाशैलीचा वापर करून हेल्‌सिंकी येथे बांधलेली चर्च व टांपेरे येथील कॅथीड्रल लिंडेग्रेनने बांधलेले हेल्‌सिंकी येथील ऑलिंपिक स्टेडियम (१९३८) यांसारख्या वास्तू अनन्यसाधारण आहेत.

एल्यास लनरॉटने फिनलंडच्या पूर्वापार चालत आलेल्या लोकगीतांचा संग्रह करून १८३५ मध्ये कालेवाला या नावाने प्रसिद्ध केलेल्या राष्ट्रीय महाकाव्याने अनेक कलावंतांना प्रेरणा दिली. हेल्‌सिंकी, क्वॉप्यॉ, व्हासा, कॉस्टीनेन इ. ठिकाणी भरणारे विविध कलामहोत्सव फिनी लोकांची कलासक्ती दर्शवितात.

आक्‌सेल गाललेन्‌काल्लेला (१८६५-१९३१) या चित्रकारापासून आधुनिक स्वच्छंदतावादी चित्रसंप्रदाय सुरू झाला. गाललेन्‌काल्लेलाने कालेवाला या महाकाव्यातील अनेक विषय हाताळले. येथील आधुनिक मूर्तिकला प्रयोगशील आहे. हिल्टानेन याने तयार केलेले झान सिबेलिउस या संगीतकाराचे हेल्‌सिंकी येथील स्मारक नावीन्यपूर्ण आहे. पाव्हॉ नुर्मी या राष्ट्रीय खेळाडूचा पुतळा तयार करणारा वायनॉ आल्टोनेन हा अग्रगण्य मूर्तीकार आहे. येथील काचकाम, चिनी मातीची भांडी, लाकडी कोरीवकाम, फर्निचर इ. आलंकारिक कलावस्तू साधेपणा व सौंदर्य यांसाठी जगप्रसिद्ध आहेत.

प्रख्यात संगीतकार ⇨ झान सिबेलिउस (१८६५-१९५७) ह्याने फिनी संगीताला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळवून दिली. त्याच्या बहुतेक संगीतरचना कालेवाला या महाकाव्यावर आधारित आहेत. ऊनो कार्लेव्हो क्लामी, रौटाव्हारा हे अन्य उल्लेखनीय संगीतकार आहेत. दर पाच वर्षांनी ‘सिबेलिउस व्हायोलिन संगीत स्पर्धा’ भरविण्यात येतात. हेल्‌सिंकी येथील ‘ सिबेलिउस अकादमी’ ही संस्था संगीताच्या उच्‍च शिक्षणाचे कार्य करते. ‘कान्तेले’ हे एकसंघ लाकडापासून तयार केलेले फिनलंडचे प्राचीन तंतुवाद्य आहे.

फिनलंडमध्ये चाळीसहून अधिक नाट्यसंस्था आहेत. १८७२ मध्ये स्थापन झालेली ‘नॅशनल थिएटर’ ही सर्वांत महत्त्वाची नाट्यसंस्था होय. ‘सेंट्रल फेडरेशन ऑफ फिनिश थिएट्रिकल ऑर्गनायझेशन्स’ ही संस्था नाट्यशिक्षणाचे कार्य करते.

स्कीइंग हा फिनलंडचा राष्ट्रीय खेळ आहे. ओलू येथे सु. १८९० पासून स्किइंगच्या राष्ट्रीय स्पर्धा भरविल्या जातात. बर्फावरील हॉकी व स्केटिंग हे खेळही लोकप्रिय आहेत. १९५२ साली हेल्‌सिंकीमध्ये ऑलिंपिक सामने भरविण्यात आले होते. फुटबॉल (सॉकर), नौकाविहार, पोहणे, नेमबाजी हे खेळही लोकप्रिय आहेत. प्रमुख फिनी-व्यायामपटूंमध्ये हानेस कोलेह्‌माइनेन (१८९०-१९६६) व पाव्हॉ नुर्मी (१८९७-१९७३) यांचा समावेश होतो. १९२१-३१ या काळात पळण्याच्या शर्यतींत भाग घेऊन नुर्मीने एकूण २० जागतिक उच्चांक केले. त्याला ‘उडता फिन’ (फ्‍लाइंग फिन) म्हणूनच ओळखले जाते.

जगताप, नंदा 


पर्यटन : विस्तीर्ण अरण्ये, सरोवरे इत्यादींनी निसर्गरम्य बनलेल्या फिनलंडकडे पर्यटक मोठ्या संख्येने आकृष्ट होतात. स्कँडिनेव्हियन देशांमधून सर्वाधिक पर्यटक फिनलंडला येतात. त्यानंतर जर्मन आणि अमेरिकन पर्यटकांचा क्रम लागतो. १९७७ मध्ये १२५ लक्ष पर्यटकांनी फिनलंडला भेट दिली व त्यामुळे १५० कोटी मार्क उत्पन्न मिळाले. 

प्रेक्षणीय स्थळे : हेल्‌सिंकी (लोक. ४,८७,५१९-१९७७) ही फिनलंडची राजधानी असून औद्योगिक, आर्थिक, सांस्कृतिक, व्यापारी व शैक्षणिक केंद्र आहे. ते फिनलंडचे सर्वांत मोठे शहर व प्रमुख बंदर आहे. तुर्कू (१,६५,२१५) हे देशाचे एक मोठे बंदर व महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे. ‘फिनी संस्कृतीचे उगमस्थान’ म्हणून ओळखले जाणारे तुर्कू हे देशाच्या प्राचीन शहरांपैकी एक आहे. फिनलंडच्या पहिल्या बिशपचे धर्मपीठ येथे होते (१२२०) तसेच ही १८१२ पर्यंत फिनलंडची राजधानी होती. तुर्कू हे कॅथीड्रल, म्यूझीयम, स्वीडिश रंगभूमी इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे. लाती (९५,०६५) हे महत्त्वाचे हिवाळी क्रीडास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. येथे जागतिक स्की-स्पर्धा अनेकदा घेण्यात आल्या. हे औद्योगिक व व्यापारी केंद्रही आहे. फिनलंडमधील चौथ्या क्रमांकाच्या या शहरात फर्निचर उद्योग महत्त्वाचा आहे. एल्येल सारिनेन या वास्तुशास्त्रज्ञाने अभिकल्पिलेला ‘सिटीहॉल’ याच शहरात आहे. फिनलंडचे सर्वांत शक्तिशाली नभोवाणीकेंद्र येथेच आहे. टांपेरे (१,६६,११८) हे देशातील मोठे औद्योगिक व लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. फिनलंडची पहिली कापडगिरणी येथे उभारण्यात आली. कागद उत्पादनाचे हे मोठे केंद्र आहे. सेंट जॉनचे चर्च, त्यामधील मॅग्नस एन्‌केल या चित्रकाराने काढलेली भित्तीचित्रे, म्यूझीयम इत्यादींसाठी हे प्रसिद्ध आहे. क्वॉप्यॉ (७३,३९५) हे औद्योगिक, व्यापारी तसेच सांस्कृतिक केंद्र आहे.

इतर औद्योगिक दृष्ट्या विकसित राष्ट्रांप्रमाणेच फिनलंडलाही चलनवाढ, बेकारी, गुंतवणूक-भांडवलाची चणचण, व्यापारघट यांसारख्या अनेक जटिल आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तथापि फिनी लोकांच्या अंगी असलेली कार्यासक्ती, धाडस त्याचप्रमाणे राष्ट्रीय बाणा या गुणांच्या जोरावर ते निर्भयपणे या सर्व संकटांना सामोरे जातात. कला व वास्तुशिल्प यांच्यायोगे सबंध जगावर फिनलंडचा सांस्कृतिक प्रभाव वाढत असून पर्यटन उद्योगात प्रतिवर्षी दहा टक्क्यांनी वाढ होत आहे. (चित्रपत्रे). 

गद्रे, वि. रा.

संदर्भ : 1. Hall, Wendy, The Finns and their Country, Ontario, 1968.

           2. Jutikkala, E. Pirinen, K. A. History of Finland, New York, 1974.

           3. Varjo, U. Finnish Farming : Typology and Economics, Budapest, 1977.

 


 

फिनलंड

फिनलंडमधील ध्रुवीय प्रकाशफिनी काष्ठकलेचा एक नमुनाओटोकुंपू येथील तांब्याच्या खाणीचे क्षेत्र, फिनलंडराउटारूक्की येथील लोखंड कारखान्याचा अंतर्भाग, फिनलंड