फिडीयस : (इ. स. पू. सु. ४९०–४३०).अभिजात ग्रीकशिल्पकार. अथेन्स येथे जन्म. त्याचा पिता कार्मिडीझ हा चित्रकार होता. फिडीयसने अथेन्सचा हेगिअस व पॉलिग्नोटस यांच्या हाताखाली चित्रकलेचे व मूर्तिकलेचे धडे घेतले. पोरिक्लीझने इ. स. पू. ४४७ मध्ये पार्थनॉन मंदिराच्या बांधकामावरील देखरेखीचे व शिल्पांकनाचे काम त्यास दिले. त्यांपैकी ‘अथीना पार्थनॉस’ या देवतेची सुवर्ण व हस्तिदंत यांनी घडविलेली मूर्ती ही त्याची प्रमुख निर्मिती होय. ही उभी भव्य मूर्ती सु. ११·६० मी. उंच, वस्त्रालंकारविभूषित असून तिच्या उजव्या हातात नायकीची छोटी मूर्ती व डाव्या हातात भाला होता. तिच्या बाजूस अलंकृत ढाल आणि सर्प दर्शविले होते. यांखेरीज त्याने अथीनाच्या ज्या अन्य मूर्ती घडविल्या, त्यांत ‘अथीना लेम्निया’ ही उल्लेखनीय आहे. पार्थनॉनपूर्वी डेल्फाय येथे त्याने काही ब्राँझ मूर्ती बनविल्या होत्या. ह्याशिवाय ऑलिंपिया मंदिरातील सिंहासनाधिष्ठित झ्यूसची सोने व हस्तिदंत ह्यांनी घडवलेली प्रचंड मूर्ती (१२·२५ मी.) फिडीयसनेच तयार केली होती. ही मूर्ती जगातील सात आश्चर्यात गणली जाते. आज त्याने घडविलेल्या कोणत्याही शिल्पाकृती वा त्यांचे अवशेष अस्तित्वात नाहीत. तसेच उपलब्ध अवशेषांत त्याचेच नेमके कोणते हे सांगणारा पुरावाही उपलब्ध नाही. तथापि पॉसेनिअससारखे प्राचीन ग्रीक लेखक त्याच्या मूर्तीकामासंबंधी विपुल माहिती देतात.
संदर्भ : Richter, G. M. A. The Sculpture and Sculptors of the Greeks, New Haven, 1970.
देशपांडे, सु. र.
“