फॉस्कोलो, ऊगो : (६ फेब्रुवारी १७७८ – १० सप्टेंबर १८२७). इटालियन कवी आणि कादंबरीकार. त्याची आई ग्रीक होती. फॉस्कोलो कुटुंब व्हेनिसचे. व्हेनिसच्या सत्तेखाली असलेल्या झँटी (झाकिंथॉस) ह्या आयोनियन बेटावर ऊगोचा जन्म झाला. निक्कोलो हे त्याचे खरे नाव ऊगो हे नंतर घेतलेले. त्याचे शिक्षण स्पालातो (आता स्प्लिट ह्या नावाने यूगोस्लाव्हियात), पॅड्युआ आणि व्हेनिस येथे झाले. इटलीबद्दल त्याला अपार प्रेम होते आणि त्याची स्वातंत्र्याकांक्षा उत्कट होती. नेपोलियनच्या व्यक्तिमत्त्वाने भारलेल्या इटालियन तरुणांपैकी फॉस्कोलो हा एक होता. नेपोलियनचे इटलीतील आगमन त्याला मुक्तिदूताच्या आगमनासारखे वाटत होते. ‘बोनापार्ट द लिबरेटर’ (इं. शी.) ही उद्देशिकाही त्याने लिहिली होती (१७९७). तथापि काम्पॉफॉर्म्योचा तह करून नेपोलियनने व्हेनिस जेव्हा ऑस्ट्रियाला देऊन टाकले, तेव्हा त्याचा फार मोठा भ्रमनिरास झाला. ‘द लास्ट लेटर्स ऑफ जाकोपो ओर्तीस’ (१८०२) ह्या इं. शीर्षकार्थाच्या त्याच्या कादंबरीत ह्या भ्रमनिरासाचे प्रभावी प्रतिबिंब पडलेले आहे. जर्मन महाकवी गटे ह्याच्या ‘द सॉरोज ऑफ यंग वेर्थर’ (इं. शी.) ह्या कादंबरीचा प्रभावही ‘द लास्ट लेटर्स …’ वर दिसून येतो. ऑस्ट्रियन व रशियन ह्यांनी इटलीवर हल्ला केला (१७९९) तेव्हा तो फ्रेंच सैन्यात दाखल झाला आणि जेनोआच्या संरक्षणार्थ लढला. त्यानंतर फ्रेंच सैन्यातील इटालियन डिव्हिजनमध्ये त्याची कॅप्टन म्हणून नेमणूक झाली. तथापि नेपेलियनच्या इटलीविषयक धोरणाबाबत त्याला वाटणारी निराशा उत्तरोत्तर तीव्रच होत गेली. दफनभूमी चर्चमध्ये असू नये ती शहराबाहेर असावी सर्व थडगी एकाच आकाराची असावीत आणि त्यांवर समाधिलेख असू नयेत, ह्या आदेशानेही तो व्यथित झाला. तत्संबंधीचा आपला निषेध त्याने ‘ऑफ द सेपल्कर्स’ (इं. भा.) हे आपले सर्वश्रेष्ठ काव्य लिहून व्यक्त केला. सर्व समाध्या सारख्या लेखणे उचित नाही श्रेष्ठांच्या, महात्म्यांच्या समाध्यांपासून मिळणारी स्फूर्ती त्यांच्या रूपाने स्मृतिबद्ध होणारा राष्ट्रीय भूतकाळ ह्यांचे मोल मोठे आहे, असे विचार ह्या काव्यात फॉस्कोलेने मांडले आहेत. अभिजाततावादी आणि स्वच्छंदतावादी अशा दोन्ही प्रवृत्ती ह्या काव्यात सुसंवादित्वाने एकवटल्या आहेत. इंग्रज कवी टॉमस ग्रे ह्याची ‘ॲन एलिजी रिटन इन अ कंट्री चर्चयार्ड’ ह्या कवितेचा काही प्रभाव फॉस्कोलोच्या ह्या काव्यावर दिसतो. १८०८ मध्ये पॅड्युआ विद्यापीठात वक्तृत्वशास्त्र ह्या विषयाच्या अध्यासनी त्याची नेमणूक झाली तथापि ती अल्पकालीनच ठरली. १८१४ मध्ये नेपोलियनचा पराभव झाल्यानंतर व्हिएन्ना काँग्रेसने, इटलीत नेपोलियनचे आगमन होण्यापूर्वी ज्या सत्ता अस्तित्वात होत्या त्यांचे सामान्यतः पुनःस्थापन केले ऑस्ट्रियनांनाही सत्ता मिळाली. फॉस्कोलोला ऑस्ट्रियनांशी निष्ठावंत राहण्याची शपथ घेण्यास सांगण्यात आले. ही शपथ घेण्याचे नाकारून फॉस्कोलो इटलीबाहेर पडला. स्वित्झर्लंडमध्ये काही काळ घालविल्यानंतर १८१६ मध्ये तो इंग्लंडला आला. तेथे लेखनावर त्याने आपला उदारनिर्वाह केला. इंग्लंडमध्येच मिडलसेक्स परगण्यातील टर्नहॅम ग्रीन येथे, विपन्नावस्थेत त्याचे निधन झाले. १८७१ मध्ये त्याच्या पार्थिव देहाचे अवशेष सन्मानाने इटलीत आणले गेले. फ्लॉरेन्सच्या सांता क्रोचे चर्चमध्ये ते पुरण्यात आले.
‘द लास्ट लेटर्स…’ आणि ऑफ द सेपल्कर्स ह्या उपर्युक्त दोन साहित्यकृतींवर फॉस्कोलोची कीर्ती मुख्यतः अधिष्ठित असली, तरी ‘अजॅक्स’ (इं. शी.) आणि रिचिआर्दो ह्यांसारख्या शोकात्मिका, समीक्षात्मक तसेच राजकीय स्वरूपाचे लेख, उत्कट भावकविता असे अन्य लेखन त्याने केलेले आहे. काही ग्रीक-लॅटिन साहित्यकृतींचे इटालियन अनुवादही त्याने केलेले आहेत.
कुलकर्णी, अ. र.