फॉल रिव्हर : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मॅसॅचूसेट्‌स राज्याच्या ब्रिस्टल प्रांताची राजधानी व बंदर. लोकसंख्या ९६,६९८ महानगरीय लोकसंख्या १,४९,९७६ (१९७०). हे बॉस्टनच्या दक्षिणेस सु. ८० किमी.वर मौंट होप उपसागरावर टाँटन नदीमुखापाशी वसले आहे. वाटुप्पा पाँड नावाचे एक मोठे सरोवर मौंट होप उपसागर किनाऱ्याला समांतर, परंतु ६४ किमी. वरच्या बाजूस असून त्या सरोवरातून पडणाऱ्या प्रचंड जलौघामुळे प्रपात निर्माण झाला आहे. यावरून शहराला ‘फॉल रिव्हर’ असे नाव पडले. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात येथे ब्रिटिश व अमेरिकन सैन्यांची झटापट झाली होती (१७७८). लीझी बॉर्डन ह्या स्त्रीवर आपले वडील व सावत्र आई यांचा खून केल्याच्या आरोपावरून भरविण्यात आलेला खटला याच शहरी चालल्यामुळे (१८९२) व त्यात ती निर्दोष सुटल्यामुळे या शहराला त्यावेळी अतिशय प्रसिद्धी मिळाली होती.

उत्कृष्ट बंदर, दमट हवामान व भरपूर जलविद्युत् यांमुळे १८११ पासून कापड उद्योगाची येथे वाढ होऊन एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ते देशातील उद्योगांचे प्रमुख केंद्रच बनले होते. रेयॉन व रेशीमनिर्मिती, रबर व लेटेक्स वस्तू, प्‍लॅस्टिक उत्पादने, रसायने, कापडछपाई, तयार कपडे, कागदी खोकी इ. अनेकविध उद्योगधंदे शहरात चालतात. मुख्यतः कापड व तयार कपडे यांची येथून निर्यात होते. हे शहर म्हणजे अनेक संपांचे माहेरघर असून येथील कापडगिरणी कामगारांनी संघटना कार्यात महत्त्वाचा वाटा उचलल्याने त्याचेच पर्यवसान १९०१ मध्ये ‘युनायटेड टेक्स्टाइल वर्कर्स ऑफ अमेरिका’ ही संघटना स्थापण्यात झाले.

शहरात अनेकविध शैक्षणिक संस्था असून त्यांपैकी ‘ब्रॅडफर्ड डर्फी तंत्रविद्या महाविद्यालय’ उल्लेखनीय आहे. १९२० पासून येथील सिंफनी वाद्यवृंद प्रसिद्ध असून ‘लिट्‍ल थिएटर ग्रूप’ ही संस्था १९३५ पासून कार्यरत आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या स्मृत्यर्थ ‘मॅसॅचूसेट्‌स’ ही युद्धनौका येथील खाडीत नांगरून ठेवलेली आहे. यांशिवाय शहरात ‘फॉल रिव्हर हिस्टॉरिकल सोसायटी’, ‘मरीन म्यूझीयम’ यांसारखी प्रसिद्ध वस्तुसंग्रहालये आहेत.

लिमये, दि. ह.