फॉर्स्टर, एडवर्ड मॉर्गन : (१ जानेवारी १८७९-७ जून १९७०). इंग्रज कादंबरीकार आणि निबंधकार. जन्म लंडनमध्ये. केंब्रिजमधील ‘टनब्रिज स्कूल’ आणि ‘किंग्ज कॉलेज’ येथे शिक्षण. ग्रीस, इटली, ईजिप्त आदी विविध देशांत प्रवास. भारताला त्याने दोनदा भेट दिली होती (१९१२, १९२१). तात्त्विक व कलात्मक प्रश्नांची चर्चा करण्याकरिता एकत्र आलेल्या आणि ‘ब्लूम्सबरी ग्रूप’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या साहित्यिक, कलावंत व विचारवंतांच्या एका मंडळाचा फॉर्स्टर हा सदस्य होता. ह्या मंडळाचे जवळजवळ सर्व सदस्य केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी वा किंग्ज कॉलेजचे माजी विद्यार्थी होते. क्लाईव्ह बेल (कला-साहित्यसमीक्षक), व्हर्जिनिया वुल्फ (कादंबरीकर्त्री), लिटन स्ट्रेची (साहित्यिक), जॉन मेनार्ड केन्स (अर्थशास्त्रज्ञ) ह्यांच्यासारख्या नामवंत व्यक्ती ह्या मंडळात होत्या. शिक्षण, प्रवास आणि ब्लूम्सबरी ग्रूप ह्यांचे फॉर्स्टरवर ठळक संस्कार झाले विचारस्वातंत्र आणि उदारमतवाद ह्यांचा तो पुरस्कर्ता बनला समाजाकडे आणि रूढ जीवनमूल्यांकडे पाहण्याची एक व्यापक दृष्टी त्याला प्राप्त झाली. फॉर्स्टरच्या सर्व लेखनातून त्याच्यावर झालेल्या ह्या संस्कारांचा प्रत्यय येतो.
फॉर्स्टरने एकूण सहा कादंबऱ्या लिहिल्या : व्हेअर एंजल्स फिअर टू ट्रेड (१९०५), ए रूम विथ अ व्ह्यू (१९०८), द लाँगेस्ट जर्नी (१९०७), हॉवर्ड्स एंड (१९१०), ए पॅसेज टू इंडिया (१९२४) आणि मॉरिस (१९७१). त्यांपैकी व्हेअर एंजल्स फिअर टू ट्रेड आणि ए रूम विथ अ व्ह्यू ह्या दोन कादंबऱ्यांवर त्याच्या इटलीतील वास्तव्याचा परिणाम दिसून येतो. ब्रिटिशांच्या सनातनी नीतिकल्पना इटालियन समाजात नसल्यामुळे निकोप लैंगिक दृष्टिकोण बाळगून इटालियन लोक आपले जीवन कसे रसरशीत करू शकतात हे ह्या दोन कादंबऱ्यांतून फॉर्स्टरने परिणामकारकपणे दाखवून, ब्रिटिश आणि इटालियन ह्यांच्या जीवनशैलींतील फरक स्पष्ट केलेला हे. संकुचित मध्यवर्गीय जीवनमूल्यांची झांपडे डोळ्यांवर लावलेल्या एका तरुणीशी विवाह करणाऱ्या उदारमतवादी नायकाच्या जीवनाची शोकांतिका द लाँगेस्ट जर्नीमध्ये दाखविलेली आहे. हॉवर्ड्स एंडमध्येही ब्रिटिश जीवनमूल्यांवर प्रखर टीका करून ब्रिटनचा तरणोपाय वर्गविग्रहातच आहे, असा विचार प्रभावीपणे मांडलेला आहे. ए पॅसेज टू इंडिया ही फॉर्स्टरची विशेष लोकप्रिय कादंबरी. ब्रिटिश राज्यकर्ते आणि हिंदी प्रजाजन ह्यांच्यातील संबंधाचे अत्यंत सूक्ष्म आणि प्रत्ययकारी चित्रण ह्या कादंबरीत केलेले आहे. आपल्या साम्राज्याचा एक भाग असलेल्या भारतीयांकडे पाहताना इंग्रजांकडून सामान्यतः दाखविल्या जाणाऱ्या अनुदार आणि गर्वोद्धत वृत्तीचे जिवंत चित्रण ह्या कादंबरीत केलेले आढळते. ही कादंबरी प्रसिद्ध झाली, तेव्हा भारतीयांच्या स्वातंत्र्याकांक्षांबद्दल सहानुभूती बाळगणारा एक वर्ग इंग्लंडातही निर्माण झालेला होता त्यामुळे त्या कादंबरीला इंग्लंडात लोकप्रियता मिळालीच परंतु भारतातील ब्रिटिश सत्ताधाऱ्यांवरील एक परखड भाष्य म्हणून अमेरिकेतही ह्या कादंबरीचे स्वागत झाले. मॉरिस ही त्याची अखेरची कादंबरी त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध करण्यात आली. समलिंगी संभोगप्रवृत्तीचे सहानुभूतिपूर्वक केलेले चित्रण ह्या कादंबरीत आढळते. १९१३-१४ मध्ये लिहिलेली ही कादंबरी फॉर्स्टरने आपल्या हयातीत प्रसिद्ध करण्याचे टाळले होते.
फॉर्स्टरचे निबंध आणि भाषणे अबिंजर हार्वेस्ट (१९३६) आणि टू चिअर्स फॉर डेमॉक्रसी (१९५१) ह्या ग्रंथांत संगृहीत आहेत. वंशवाद आणि सर्वंकष सत्तावाद ह्यांना टू चिअर्स फॉर डेमॉक्रसीमधून फॉर्स्टरने प्रखर विरोध केलेला आहे. त्याचप्रमाणे व्यक्तित्वाच्या जोपासनेचे व व्यक्तिगत जीवनाचे महत्त्वही आवर्जून सांगितले आहे. ह्या संग्रहातील ‘आय बिलीव्ह’ हा निबंध विशेष गाजला.
केंब्रिज येथे त्याने दिलेली कादंबरीच्या विविध पैलूंवरील व्याख्याने ॲस्पेकट्स ऑफ द नॉव्हेल (१९२७) ह्या नावाने प्रसिद्ध झालेली आहेत. ह्या व्याख्यानांची गुणवत्ता सर्वत्र सारखीच नसली, तरी मार्मिक वाङ्मयीन विवेचनाची अनेक उदाहरणे त्यांत आढळतात. विशेषतः कादंबरीतील व्यक्तिरेखांबाबत फॉर्स्टरने मांडलेले विचार महत्त्वाचे आहेत. ‘राउंड’ म्हणजे विकसनक्षम आणि ‘फ्लॅट’ म्हणजे साचेबंद, असे व्यक्तिरेखांचे दोन प्रकार फॉर्स्टरने सांगितले आहेत.
द सिलेश्चल ऑम्निबस अँड अदर स्टोरिज इटर्नल मोमंट अंड अदर स्टोरीज (१९२८) आणि कलेक्टेड
शॉर्ट स्टोरीज (१९४८) असे फॉर्स्टरच्या कथांचे एकूण तीन संग्रह प्रकाशित झालेले आहेत. फॉर्स्टरच्या कादंबऱ्यांतील काही विषय ह्या ना त्या प्रकारे त्याच्या कथांतूनही आलेले आहेत.
फॉर्स्टरने भारताला दुसऱ्यांदा भेट दिली तेव्हा देवास संस्थानच्या महाराजांचा सचिव म्हणून त्याने काही काळ नोकरी केली. ह्या नोकरीतील त्याच्या अनुभवांचे चित्रण त्याने-मुख्यतः पत्ररूपाने-द हिल ऑफ देवी (१९५३) ह्या ग्रंथात केले आहे. काही प्रवासवर्णनेही त्याने लिहिलेली आहेत. वॉरिकशरमधील कॉव्हंट्री येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ : 1. Beer, J. B.The Achievement of E. M. Foster, London, 1962.
2. Bradbury, M. Ed. Forster: A Collection of Critical Essays, Englewood Cliffs, N. J. 1966.
3. Kirk Patrick, B. K. A Bibliography of E. M. Forster, London, 1965.
4. Thomson, George H. The Fiction of E. M. Forster, Delroit, 1967.
5. Trilling, Lionel, E. M. Forster, London, 1951.
6. Wilde, Alan, Art and Order A Study of E. M. Forster, New York, 1964.
नाईक, म. कृ.