फॉकर, आंटोनी हेरमान गेरार्ट : (६ एप्रिल १८९० – २२ डिसेंबर १९३९). डच वैमानिकी अभियंता व लढाऊ विमानांचा शिल्पकार. डच ईस्ट इंडिज (जावा, इंडोनेशिया) मधील काडिरी गावी जन्म. हॉलंडमध्ये हार्लेम येथे शिक्षण. १९१० मध्ये तो जर्मनीला गेला. १९१५ मध्ये पहिल्या महायुद्धात त्याचे इ-१ हे एकताल विमान (मोनोप्लेन) रणांगणावर आले. लढाऊ विमानांची ही सुरूवात होय. पंख्याच्या गरगर फिरणाऱ्या पात्यांमधील मोकळ्या जागेतून विमानाच्या समोर गोळीबार करण्यासाठी आवश्यक अशी यंत्रणा या विमानात होती. त्यामुळे ⇨ वायु युद्धतंत्रात बदल झाला व जर्मन वैमानिकांना त्या क्षेत्रात आपले वर्चस्व टिकविता आले. पुढे त्याने डी-७ ही द्विताल (बायप्लेन) लढाऊ विमाने तयार केली. त्यांस १८५ अश्वशक्तीची एंजिने होती व त्यांचा वेग दरताशी १७५ किमी. होता. त्यांस दोन मशिनगन असत. महायुद्धोत्तर तहाच्या अटीनुसार ही विमाने जर्मनीला दोस्तराष्ट्रांच्या हवाली करावी लागली. युद्धानंतर तो मायदेशी परतला व तेथे त्याने विमाने बांधण्याचा कारखाना काढला. १९२२ साली तो अमेरिकेचा नागरिक झाला. त्याच्या तेथील कारखान्यात तयार झालेली ‘फॉकरफ्रेंडशिप’ ही प्रवासी विमाने आजही भारतात आहेत. १९३१ साली त्याचे फ्‍लाईंग डचमन् हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. न्यूयॉर्क येथे त्याचे निधन झाले.

दीक्षित, हे. वि.