फाल्केनहाइन, एरिख फोन : (११ नोव्हेंबर १८६१-८ एप्रिल १९२२). पहिल्या महायुद्धातील [→ महायुद्ध, पहिले] जर्मन सेनापती व जनरल स्टाफप्रमुख. पूर्व प्रशियात टॉर्नजवळील (सध्या पोलंडमध्ये) बुर्ग बेलशाउ येथे जन्म. सैनिकी गुणापेक्षा जमीनदार घराण्यातील म्हणून त्याची झपाट्याने प्रगती झाली. १८८० साली पायदळात अधिकारी. १८९६ साली चीनच्या हकौ सैनिकी अकादमीत शिक्षक असताना त्याच्यावर चिनी सैनिकी सिद्धांतांचा परिणाम झाला. बॉक्सर बंडात (१९००) टि-एनत्सिन सरकारतर्फे बंड चिरडून टाकण्याची त्याने कामगिरी केली. जर्मनीस परत आल्यानंतर पहिल्या महायुद्धात टॅननबर्गच्या लढाईत नामुष्की पावलेल्या प्रिटवित्सचा चीफ ऑफ स्टाफ झाला. या काळात त्याने ⇨ वेढा युद्धतंत्राचा अभ्यास केला. ⇨ अल्सेस लॉरेनमधील एका सैनिकी सरावात त्याने नाव कमावले. १९१३ साली कैसरने त्याची संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती केली. जर्मनीच्या युद्धतयारीचे श्रेय त्यास देणे अनुचित नाही. जर्मन चीफ ऑफ जनरल स्टाफ मोल्टके याच्या धांदरटपणामुळे जर्मनीची युद्ध योजना ढासळली. १४ सप्टेंबर १९१४ रोजी फाल्केनहाइनला संरक्षणमंत्री पदाबरोबर चीफ ऑफ स्टाफ हेही पद मिळाले. बहुतेक सर्व सेनापतींमध्ये तो वयाने व अनुभवाने कनिष्ट होता. फाल्केनहाइननेच विषारी वायूचा वापर ⇨ पाणबुडी युद्धतंत्रबाँबहल्‍ले यांस चालना दिली. इतके करूनही निर्णय घेण्यात ढिलाई व फाजील सावधपणा यांमुळे जर्मनीला विजयाची खात्री नव्हती. व्हर्डन येथील वेढ्यात फ्रेंच व जर्मन या दोघांचीही फार मोठी प्राणहानी झाली. याच वेळी रूमानिया दोस्त राष्ट्रांत सामील झाला. ऑगस्ट १९१६ मध्ये कैसरने फाल्केनहाइनला पदच्युत केले. तदनंतर त्याने रूमानियाची राजधानी बूकारेस्ट काबीज केली. १९१७ साली तुर्कांच्या बाजूने असलेल्या जर्मन सेनेचे त्याने नेतृत्व केले. तेथेही त्यास अपयश आले. पॉट्‌सडॅम येथे तो मृत्यु पावला.

संदर्भ : Liddell Hart, B. H. The Real War 1914-18, Boston, 1930.

दीक्षित, हे. वि.