फायलो जूडीअस : (इ. स. पू. सु. २० – इ. स. सु. ४०). ॲलेक्झांड्रियामधील एका संपन्न आणि प्रतिष्ठित ज्यू कुटुंबात जन्मलेला श्रेष्ठ तत्त्ववेत्ता. ह्याला ज्यू आणि ग्रीक ह्या दोन्ही परंपरांतील तत्त्वज्ञानाचे उत्तम शिक्षण मिळाले होते. ॲलेक्झांड्रिया येथील ज्यू रहिवाशांनी आपल्यावर होणाऱ्या जुलूमाचे निराकरण करून घेण्यासाठी इ. स. सु. ४० मध्ये रोमन सम्राट कालिगुला याच्याकडे रदबदली करण्यासाठी ज्या पाच जणांचे प्रतिनिधीमंडळ रोमला पाठविले होते, त्याचे नेतृत्व फायलोने केले होते व तो त्या पाच जणांत वयाने जेष्ठ होता. ह्या प्रतिनिधीमंडळाच्या रोम-भेटीचे वर्णन फायलोने आपल्या De Legatione ad Gaium ह्या ग्रंथात केले आहे. तो जेरूसलेमलाही गेला होता. त्याच्या जीवनाविषयी अधिक माहिती मिळत नाही. त्याची तत्त्वज्ञानातील प्रमुख कामगिरी म्हणजे ज्यू धर्मग्रंथांतील सिद्धांतांचे ग्रीक तत्त्वज्ञानातील संकल्पनांचा उपयोग करून निरूपण करण्याचा त्याने केलेला प्रयत्न. त्याचप्रमाणे ह्या आध्यात्मिक सिद्धांतांच्या आधारे ग्रीक तत्त्वज्ञानाला वेगळे देण्याचाही प्रयत्न त्याने केला आहे. ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लामी धर्मग्रंथांत आणि धार्मिक परंपरांत काही समान सिद्धांत आहेत. ज्यू धर्मसिद्धांत आणि ग्रीक तात्विक संकल्पना यांचा जो सर्जनशील समन्वय त्याने आपल्या तत्त्वज्ञानात साधला त्याच्यापासून प्रेरणा घेऊन ह्या तीन समान धर्मानी आपले आध्यात्मिक तत्त्वज्ञान मध्ययुगाच्या अंतापर्यंत विकसित केले. ख्रिस्ती धर्मशास्त्रावर त्याच्या धार्मिक तत्त्वज्ञानाचा खूपच प्रभाव पडला. ह्या दृष्टीने त्याच्या कामगिरीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
फायलोचे सर्व मूळ लेखन इंग्रजीत भाषांतरित झाले असून ते ‘लोएब क्लासिकल लायब्ररी’ने Philo ह्या शीर्षकाने १२ खंडांत प्रकाशित केले आहे (१९२९-६२).
संदर्भ : 1. Beentwich, N. Philo-Judaeus of Alexandria, Philadelphia, 1990.
2. Wolfson, H. A. Philo : Foundations of Religious Philosophy in Judaism, Christianlty and Islam, Cambridge, Mass., 1962.
रेगे, मे. पुं.
“