फोलॅस : शिंपाधारी मॉलस्क (मृदुकाय) प्राण्यांच्या एका वंशाचे नाव. या वंशातील प्राण्यांना पिडॉक असे म्हणतात. हे प्राणी चुनखडक, लाकूड, माती, चिखल, इतर मृदुकाय प्राण्यांची कवचे, पीट इत्यादींमध्ये तिरकस बिळे पाडतात. हे प्राणी बीळ पाडताना पादांचा (पायांचा) आधार घेतात. प्रत्येक शिंपेच्या एका टोकाला दातेरी धारदार कडा असते तिचा बीळ करताना कानशीप्रमाणे उपयोग होतो. यांचे पाद स्नायुमय
व वर्तुळाकार असून ते बाहेर येण्याकरिता अग्र भागामध्ये पोकळी असते. बीळ पाडण्याचे काम बंद असते त्या वेळेस अग्र भाग आच्छादित असतो. कवचाला बिजागरी नसते दोन्ही शिंपा सुट्या सलग परिकवचाने (कॅल्शियमी द्रव्याचे अम्लापासून संरक्षण व्हावे म्हणून असलेल्या कवचाबाहेरील पटलाने) आच्छादित असतात व त्यांमध्ये एक किंवा अनेक कवचांच्या साहाय्यक पट्टिका असतात. शिंपांखेरीज असलेल्या इतर साहाय्यक पट्टिकांवरून सर्व जातींची लक्षणे ओळखता येतात. कवच सु. १५ सेंमी. लांब व सु. ५ सेमी. रुंद असते. काही जाती कवचाच्या लांबीपेक्षा किंचित जास्त खोल बीळ पाडतात परंतु ज्यांचे निनाल (पाणी आत घेण्याकरिता व बाहेर टाकण्याकरिता असलेली नळीसारखी इंद्रिये) चांगले वाढलेले असतात अशा काही जाती त्यांच्या कवचाच्या लांबीच्या अनेक पट खोल बीळ पाडतात. फार खोल बीळ पाडणाऱ्या जातींमध्ये निनालांच्या संरक्षणासाठी कायटिनमय चिवट पट्टिका असतात. क्लोम (कल्ले) अंतर्वाही (पाणी आत घेणाऱ्या) निनालामध्ये वाढलेले असतात. हे प्राणी पाण्यामधील लहान लहान जीवांवर आपला उदरनिर्वाह करतात. अंतर्वाही निनालामधून अन्नाचे कण प्रावार गुहेत (शिंपेच्या लगेच खाली असलेली त्वचेची स्नायुमय घडी म्हणजे प्रावार आणि शरीर यांच्यातील पोकळीत) आणले जातात आणि उत्सर्जक पदार्थ बहिर्वाही (बाहेर टाकणाऱ्या) निनालामधून बाहेर टाकले जातात. या प्राण्यांच्या बाह्य पृष्ठभागावर स्थलांतर झालेल्या अभिवर्तनी (एक भाग दुसऱ्या भागाजवळ आणणाऱ्या) स्नायूच्या संरक्षणसाठी वरच्या भागावर साहाय्यक पट्टिका असतात. पुढील व मागील अभिवर्तनी स्नायूंच्या लागोपाठ होणाऱ्या आकुंचनांमुळे शिंपांची मागेपुढे हालचाल होते. या प्राण्यात प्रदीप्ति-कोशिका (चकाकणाऱ्या पेशी) असल्याने प्रस्फुरता (सर्वसाधारण तापमानाला असलेला चकाकण्याचा गुणधर्म) आढळते.
इंग्लंडच्या किनाऱ्यावर फोलॅस डॅक्टिलस या जातीचे प्राणी आढळतात. पूर्वी त्यांचा खाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे. द. अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यालगत आढळणाऱ्या फो. चीलोएन्सिस जातीचे प्राणी चीलोए बेटावरील लोकांचे मिष्टान्न आहे. काही जातींतील प्राण्यांचा आमिष म्हणूनही उपयोग केला जातो.
पहा : बायव्हाल्व्हिया.
सूर्यवंशी, वि. ल.
“