फेस्कू गवत  :  ( इं .  फेस्कू ग्रास लॅ .  फेस्टूका कुल – ग्रॅमिनी ).  कुरणे व सुका चारा यांकरिता विशेषेकरून लागवडीत असलेल्या वर्षायू  ( एका हंगामात जीवनक्रम पूर्ण करणाऱ्या )  किंवा बहुवर्षायू  ( अनेक वर्षे जगणाऱ्या )  गवतांच्या  [ ⟶ गवते ]  एका वंशाचे नाव .  याचा प्रसार मुख्यतः समशीतोष्ण व आल्प्ससारख्या थंड प्रदेशात झालेला असून भिन्न देशांत याच्या एकूण सु .  ८० जाती लागवडीत किंवा वन्य अवस्थेत आढळतात .  अनेक प्रकारच्या जमिनीत व फार कडक थंडी नसल्या स हिवाळ्यात हे गवत चांगले वाढते व उन्हाळ्यातही त्याची मर्यादित वाढ चालू असते .  हे भरपूर पीक देणारे व लागवडीस सोयीचे आहे .  भारतात याच्या सु .  १५ जाती आढळतात .  बहुतेक जाती हिमालयातील १,५०० – ४,५०० मी .  उंचीवर व काही आसामातील खासी टेकड्यांत १,५०० –१,८०० मी .  उंचीवर आढळतात .  शोभेकरिता व चराऊ रानाकरिता याच्या कित्येक जाती लावतात .  अमेरिकेत फेस्टूका  आरूंडिनॅशिया  या जातीचा लागवडीतील क्रमांक पहिला असून  ‘ आ ल्टा ’  व  ‘ केंटकी –३१ ’  हे त्याचे संकरित वाण उपयोगात आहेत .  त्यांची उंची सु .  १ मी .

मेंढीचे फेस्कू गवत : (१) फुलोऱ्यांसह वनस्पती, (२) पानाचा छेद (मोठा करून दाखविलेला आहे).

 असते .  भारतात  ‘ महाफेस्कू ’ ( फे .  जाय गँ शिया  जायंट फेस्कू )  व  ‘ लाल फेस्कू ’ ( फे. रुब्रा  रेड फेस्कू )  हिमालयात आढळतात .  द .  भारतात मेंढ्यांना खाद्य असे  ‘ मेंढीचे फेस्कू ’ ( फे .  ओव्हिना ,  शीप्स फेस्कू )  आणि  ‘ मेडो फेस्कू ’ ( फे .  इलॅटियर )  लागवडीत आहेत .  मेडो फेस्कू  ( ०·५ –१ ·५ मी .  उंच )  ही जाती सर्वोत्कृष्ट असून यूरोप ,  आशिया ,  अमेरिका व कॅनडा या प्रदेशांत लागवडीत आहे .  महा फेस्कू सर्वांत उंच  ( सु .  १ ·७५ मी .)  असून त्यात १७ ·३७ टक्के प्रथिन, १ ·२८ टक्के स्‍नि ग्ध पदार्थ ,  ३४ ·०९  टक्के तू ली र  ( सेल्युलोज )  आणि १० ·७९ टक्के राख असते .  फे .  ग्लॉका ही निळसर चंदेरी जाती बागेत शो भे करिता विशेष लोकप्रिय आहे ,  तिला  ‘ ब्ल्यू फेस्कू ’  म्हणतात . 

   फे स्टूका या वंशातील वनस्पतींना अरुंद व सपाट किंवा गुंडाळणारी पाने असून त्यांवर ताठर केस असतात .  शुष्क हवेत स्टायपा  [ ⟶ मरु वनस्पति ]  गवताच्या पानांप्रमाणे ती गुंडाळतात .  फुलांची कणिशके परिमंजरीसारख्या  [ ⟶ पुष्पबंध ]  तुऱ्यावर येतात .  कणिशके त्रिशाखी किंवा अनेक शाखी असून प्रत्येकात एक ते अनेक फुले येतात .  सर्वांत वरची फुले अपूर्ण तुसे पाच किंवा अधिक परितुषावर फक्त टोक किंवा प्रशूक लघुतुषे २ केसरदले ३ किंजपुट गुळगुळीत किंजल अग्रस्थ व किंजल्क शिखालू  ( केसाळ )  असते  [ ⟶ फूल ].  फळ खाली खोलगट किंवा त्यावर खोबण असून ते गुळगुळीत किंवा टोकास केसाळ असते .  याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ ग्रॅमिनी  कु लात  ( तृण कुलात )  वर्णिल्याप्रमाणे असतात .

 संदर्भ  : C. S. I. R.  The Wealth of India, Raw Materials, Vol. IV, Newl Delhi, 1956.

 परांडेकर ,  शं .  आ .