फेल्ट : ( नमदा ) लोकर , फर ( मृदू लो म ), इतर केस तंतू किंवा लोकरमिश्रित तंतूंचा उपयोग करून उष्णता , आर्द्रता , पाणी आणि घर्षण यांच्या मदतीने दा बू न व लोकरी तंतू एकमेकांत गुंतवून तयार केलेल्या त्रिमितीय वीणरहित, जाड व भरीव कापडाला फेल्ट असे म्हणतात. फेल्टला नमदा असा मराठी शब्द प्रचलित आहे. काही विशिष्ट प्रकारांत वीण असलेले कापड वापरूनही वरील पद्धतीने नमदा तयार करता येतो.
लोकरी तंतूंच्या पृष्ठभागावर एका विशिष्ट प्रकारचे एकदिशाभिमुख खवले असतात आणि त्यामुळे एकमेकांच्या सान्निध्यात आल्यावर तंतूंचे नमदीकरण ( फेल्टिंग ) होणे म्हणजे तंतू एकमे कां त गुंतणे हा या तंतूंचा मूलभूत गुणधर्म आहे . ह्या नमदीकरणाचे प्रमाण व तीव्रता अनेक गोष्टींवर अवलंबून असते उदा., लोकरी तंतूंची प्रत , दाब देताना किंवा ताडण करताना दिलेली उष्णता , पाण्याचे प्रमाण वगैरे . लोकर व इतर प्राणिजन्य तंतूंमध्ये जसा नमदीकरणाचा गुणधर्म असतो , तसा इतर तंतूंमध्ये त्यांच्या खवलेरहित पृष्ठभागामुळे नसतो आणि म्हणून अशा तंतूंपासून चांगल्या प्रतीचा नमदा सहजासहजी मिळू शकत नाही परंतु अशा प्रकारच्या तंतूंस लोकर मिसळल्यास नमदा तयार करता येतो . अशा प्रकारात लोकरीचे प्रमाण केवळ १० % असले , तरी नमदा बनू शकतो .
फेल्ट ( felt ) या शब्दाची व्युत्पत्ती ‘ falze n’ ह्या जर्मन शब्दापासून झाली आहे व त्याचा अर्थ ‘ आटणे ’ किंवा ‘ आकुंचन पावणे ’ असा आहे . नमदा हे मानवाला माहीत झालेले जगातील पहिले कापड होय . कताई व विणाई ह्या क्रिया ज्ञा त होण्याच्याही खूप पुरातन काळापासून मानवाला फेल्ट निर्मितीची व तिचा उपयोग करण्याची कला माहीत होती . कां ( वायव्य फ्रान्स ) येथील सेंट फ्यु त र हे फेल्टचे जनक समजले जातात . ते लांब पल्ल्याच्या फिरतीवर जात असताना आपल्या पायाच्या वेदना कमी करण्यासाठी पादत्राणांत लोकरीचे तंतू ठेवत असत . बरेचसे अंतर चालून झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की , तळपायाच्या आकाराचे भरीव कापड तयार झाले आहे . लोकरी तंतूंच्या विशिष्ट खवल्यांच्या रचनेमुळे पायाची आणि घर्षणजन्य उष्णता , घामातून मिळणारी आर्द्रता व चालण्यामुळे मिळणारा सततचा दाब यांतून तंतूंचे नमदीकरण होऊन तंतूंचे रूपांतर नमद्यात – कापडात- झाले . अशा त ऱ्हे ने फेल्टचा जन्म झाला . अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले नमदा कापड व फक्त अलीकडचा ( इ . स . १९४२ ) इतिहास असलेले वीणरहित कापड यांतील फरक मात्र लक्षात ठेवायला हवा .
नमद्याचे सर्वसाधारण तीन प्रकार आहेत , ते म्हणजे :
(१) लोकरीचे नमदे : यांत ( अ ) गुंडाळण्याजोगे आणि ( आ ) सपाट आकाराचे असे दोन उपप्रकार आहेत .
(२) टोप्यांसाठी ( हॅटसाठी ) वापरण्याचे नमदे : यांत ( अ ) लोकरीचे व ( आ ) फरचे असे दोन उपप्रकार आहेत .
(३) विणाई असलेले नमदे .
भारतात काही भागांतील मेंढपाळ जमातीतील ( धनगर ) लोक प्राचीन काळापासून ‘ जान ’ नावाचा नमद्याचा प्रकार तयार करीत आले आहेत व अजूनही काही भागांत त्याचा अंथरण्यासाठी वापर केला जात आहे .
लोकरीचे नमदे गुंडाळण्याजोगे किंवा सपाटच ( त्यांच्या जाडीमुळे ) ठेवण्याजोगे अशा दोन प्रकारांत तयार करतात . पहिल्या प्रकारच्या नमद्याची जाडी सु . ०·८ मिमी . पासून ते सु . ४० मिमी . इतकी असते , तर सपाट नमद्याची जाडी सु . १०० मिमी . एवढी असू शकते . गुंडाळण्यायोग्य नमद्याची लांबी व पन्हा जास्त असू शकतात . उदा ., पन्हा २ मी . व लांबी ५० ते ६० मी . असू शकते . सपाट नमद्याच्या बाबतीत मात्र लांबी व पन्हा एवढी मोठी असू शकत नाहीत . प्रत्येक तुकडा वा नग गरजेनुसार त्या त्या लांबीरुंदीचा तयार करून तसाच्या तसा वापरतात . चौरसाकृती , वर्तुळाकृती अथवा लंबवर्तुळाकृती नमदे तयार करता येतात . उच्च दर्जाच्या नमद्यांत फक्त लोकरी तंतूंचाच वापर करतात . कमी दर्जाच्या मालात मात्र स्वस्त अशा नमदीकरणविरहित गुणधर्म असलेल्या तंतूंची भेसळ करतात .
टोप्यांसाठी वापरावयाचे नमदे अर्थातच पातळसर असावे लागतात . ते लोकर किंवा फर यांचे करतात . प्रामुख्याने बीव्हर व ससे यांच्या फर तंतूंपासून केलेल्या नमद्याचा टोप्यांसाठी वापर करतात . लोकरीच्या टोप्या कमीच प्रमाणात प्रचारात आहेत .
वीणयुक्त नमदा हा काही सर्वसामान्य प्रकार नाही . तरीसुद्धा त्यांचा काही विशिष्ट ठिकाणी ( उदा ., कागद उद्योगात ) उपयोग होतो . बिलियर्ड टेबलावरचे कापड म्हणजे वीणयुक्त नमदा होय .
क च्चा माल : सर्व प्रकारच्या लोकरी व त्यांचे तंतू , तसेच त्यांच्यापासून निघणारे अपशिष्ट ( निरुपयोगी अवशेष ) यांचा नमदा करण्यात उपयोग होतो . उंट , शेळी , बोकड , गाय , ससा इ . प्राण्यांचे केसतंतू , पिंजणयंत्रातून येणारी अपशिष्ट लोकर , आखूड तंतूंची लोकर , लोकर उद्योगातील अनेक विभागांतून निघणारे टाकाऊ लोकर तंतू , प्रक्रिया करताना खराब झालेली लोकर , वापरल्यानंतर टाकाऊ झालेल्या लोकरयुक्त वस्तू इत्यादींचा क च्चा माल म्हणून वापर होतो . अर्थात आखूड लोकरी तंतू हा स र्वां त महत्त्वाचा क च्चा माल गणला जातो .
उत्पादन पद्धती : नैसर्गिक प्राणिजन्य तंतूंमध्ये अनेक अपद्रव्ये वा मलद्रव्ये असता त उदा ., प्राण्यांच्या घामांतून उत्सर्जित होणारी लवणे व इतर पदार्थ , धूळ , खडे , पालापाचोळा , वाळलेल्या शेंगा , वाळलेल्या स्थितीत असलेले मृत किड्यांचे अवशेष इत्यादी . नमदा तयार करण्यापूर्वी कच्च्या मालापासून ही अपद्रव्ये वेगळी करून शुद्ध तंतू मिळविणे आवश्यक असते . पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार लोकरी तंतू मुबलक पाण्याने धुतात . काही वेळा साबणाच्या पाण्यातही लोकर धुवून स्वच्छ करतात . शेवटची धुलाई झाल्यानंतर तंतू पाण्यातून काढून पसरवतात व ओल्या स्थितीतच त्यांच्यावर प्रहार करून दाबण्याची क्रिया बराच वेळ चालू ठेवतात . लोकरी तंतूंचे नमदीकरण होऊन नमदा तयार होईपर्यंत प्रहार करणे व दाबणे या क्रिया चालू ठेवतात . नवीन औद्योगिक पद्धतीतील नमदा तयार करण्याची तत्त्वे जरी तीच असली , तरी त्यात यंत्रे व यांत्रिक क्रियांचा अवलंब मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो . या लोकरीची शास्त्रीय पद्धतीने स्वच्छता करतात . साबण व काही रसायनांचाही उपयोग तीत होतो . लोकरीचे हवे तेवढे थर एकमेकांवर घालून यांत्रिक क्रियांनी उष्णता व दाब यांचा वापर केला जातो . नमदे बनविण्यासाठी घ्यावयाचे लोकरीचे तंतू ३५-४० मिमी . पेक्षा जास्त लांब असतात आणि त्यांची एकमेकांत गुंतण्याची क्षमता व त्याचे बल ही चांगली असावी लागतात . सुरुवातीला लोकर लहान लहान पुं जक्यांच्या रूपात असते . ती स्वच्छ करून तिच्यातील डांबर , रंग , काटेरी शेंगा वगैरे काढून टाकतात . नंतर हे पुंजके मोकळे करून त्यांत इतर पुंजक्यांतील तंतू मिसळतात . अशा मोकळ्या लोकरीचा एक गट तयार करतात . नंतर ही लोकर पिंजण यंत्रांत घालतात . तेथे तंतू मोकळे होऊन त्यांची चांगली मिसळ होते . त्याचप्रमाणे तंतू विंचरले जाऊन कचराही वेगळा होतो . ही लोकरीची मिसळ एकेरी तंतूच्या जाडीच्या पेळूच्या रूपात शेवटी यंत्रांतून बाहेर पडते . यंत्राच्या टोकाला एक निरंत भागावर तिचे थर रचले जातात . गुंडाळी पद्धतीचे नमदे तयार करताना किमान दोन पिंजण यंत्रे एकमेकांशी काटकोनात ठेवतात . त्यामुळे पेळूंच्या चवडीत एक तरी चवड आडवी असते . असे केल्याने तंतूंची गुंतवण चांगली होऊन तयार मालाच्या मापांना स्थैर्य येते .
पेळूच्या ( गादीच्या ) चवडीचे वजन आधीच ठरविलेले असते . नंतर नमद्याला लागणाऱ्या चवडी एक किंवा अधिक कडक करणाऱ्या यंत्रांत ठेवतात आणि त्यांवर पाणी शिंपडतात . या ओलसर झालेल्या चवडी आता यंत्रांतील बंदिस्त जागेत ठेवून तेथे वाफ सोडतात . वाफेमुळे पेळूंतील तंतू उकलून गुंतण्याच्या क्रियेला योग्य अशा स्थितीत येतात . नंतर या चवडी एका तापलेल्या जाडजूड लोखंडाच्या पाटाच्या खाली आणतात व हा जड पाट खाली आणला की , त्याच्या वजनाने चवडी दाबल्या जातात . तंतू गुंतण्याची क्रिया घडून येण्यासाठी पाट पुढे – मागे , डावीकडे – उजवीकडे अशा थोड्या वेगाने फिरवितात . उष्णता , ओलसरपणा आणि पाट फिरविताना होणारे घर्षण यांच्यामुळे सर्व चवडीतील तंतू एकमेकांत गुंतून नमद्यात एकजिनसीपणा येतो . जरूर तितका वेळ थांबून लोखंडी पाट वर घेतात आणि त्या अवधीत वाफ देऊन तयार झालेला पुढील भाग वरील क्रिया करण्यासाठी पाटाच्या खाली ओढतात . या पद्धतीला ‘ पाट कठिनीकरण ’ असे म्हणतात . या खंडित पद्धतीऐवजी रूळ वापरून ‘ रूळ कठिनीकरण ’ ही अखंड चालणारी पद्धतीही नमदे कडक करण्यासाठी वापरता येते . वरीलप्रमाणे कठिनीकरण केलेले नमदे गुंडाळून ते निवण्यासाठी व त्यांतील पाणी निचरून जाण्यासाठी काही काळ बाजूला ठेवून देतात . कठिनीकरणात नमद्याची फक्त जाडीच कमी होते व तंतूंची गुंतवणही थोड्याच प्रमाणात होते . याच्या पुढील क्रिया म्हणजे भरण ही होय . ह्या क्रियेत नमद्याचे क्षेत्रफळ आकुंचन पावते . हे आकुंचन ५० % पर्यंत असू शकते . क्षेत्रफळाचे आकुंचन हेच नमदीकरण होय . कडक केलेली गादी ( गुंडाळी ) एका भरण साहाय्यक द्रव्यातून नेतात . हे साहाय्यक द्रव्य म्हणजे साबणाचा विद्राव किंवा विरल अम्ल अस ते पण काही प्रसंगी साधे जरा गरम केलेले पाणीही पुरेसे होते . नंतर नमदे गुंडाळी करून भरण यंत्रात ( भरण गिरणीत ) घालतात . एका प्रकारच्या भरण यंत्रात टेबलाच्या खणासारखे खण असतात . त्यांच्या बाजू सरळ पण तोंडाचा भाग अंतर्गोल असतो . खणाच्या मागच्या बाजूला एक वा अधिक चल हातोडे असतात . हे हातोडे नमद्याच्या गादीवर फटके मारतात , ती उलटी करतात व वळवतातही . नमदे आक्रसून त्यांची मापे इच्छित मूल्याची होईपर्यंत ही क्रिया चालू ठेवतात .
भरण क्रिया पूर्ण झाल्यावर नमद्यावर धुणे , वाळवणे , रंगवणे वगैरे प्रक्रिया केल्या जातात . या प्रक्रिया नेहमीच्या लोकरी कापडावर करतात तशाच असतात [ ⟶ लोकर ]. सपाट नमद्याच्या बाबतीत पेळूंच्या चवडीचे तुकडे करून ते इष्ट मापाचे व वजनाचे होतील अशा त ऱ्हे ने एकमेकांवर व शेजारी असे रचतात . मग वरीलप्रमाणेच या गादीवर कठिनीकरण , भरण , धुलाई , सुकविणे वगैरे क्रिया करतात . शेवटी हे नमद्याचे तुकडे सपाट अवस्थेतच राहतात . कमाल मापस्थै र्य , घनता आणि बल हे गुण गुंडाळण्याच्या नमद्यापेक्षा सपाट नमद्यातच जास्त असतात .
केसांचे नमदे वर वर्णिलेल्या सपाट नमद्यांच्या पद्धतीनेच करण्यात येतात . लोकरी नमद्याच्या उद्योगात केसांचे नमदे हा एक खास प्रकार असून त्याला महत्त्वाचे स्थान आहे .
टोप्यांचे नमदे लोकर व फर या दोन्हींपासून करतात . लोकरीच्या टोप्या करताना साधारण वरील पद्धतच वापरतात पण जे काही बदल करावे लागतात ते म्हणजे पिंजण यंत्रांतून निघणारा पेळू अरुंद ठेवतात व तो एका अंडाकृती तर्कूवर जमा करतात . यास सुरुवातीच्या आकारातून नमदीकरण करून दोन शंकूच्या आकाराचे तुकडे मिळतात व या दोन तुकड्यांपासूनच टोपी तयार करतात . फरच्या टोप्या करण्यासाठी बी व्हर आणि ससे यांची फर प्रामुख्याने वापरतात . फर वापरण्याआधी त्यांच्यावर तीव्र रासायनिक प्रक्रिया कराव्या लागतात व मगच त्यांत गुंतण्याचा गुणधर्म उत्पन्न होतो . जरूर त्या निरनिराळ्या फरचे प्रथम मिश्रण तयार करतात . छिद्रे असलेला एक शंकू यंत्रावर फिरत ठेवतात व त्यावर एक ओले पातळ कापड गुंडाळतात आणि मग मिश्रणातील फर त्यावर टाकीत राहतात . जरूर त्या जाडीचा थर कापडावर बसला की , हा कापडाचा शंकू काढून घेतात . या वेळी हा फरचा शंकू भंगुर स्थितीत असतो आणि म्हणून त्याला फार जपावे लागते . त्यावर रंगाईसकट बऱ्याच क्रिया ओल्या अवस्थेतच केल्यावर साच्यात घालून त्याला टोपीचा प्राथमिक आकार देतात . यानंतर टोपी वाळू देऊन त्याच सुकलेल्या अवस्थेत तिच्यावर अनेक संस्करण क्रिया केल्यानंतर तिला अंतिम स्वरूप प्राप्त होते .
वरील सर्व प्रकारांत यांत्रिक पद्धतीने ताडण करून तंतूंचे नमदीकरण होत असल्याने गुंतणक्रिया , भरण व आकुंचन आदर्श तऱ्हेने होऊन चांगल्या प्रतीचे व जास्त टिकाऊ नमदे तयार होतात . अनेक तंतू दाटीवाटीने छोट्याशा क्षेत्रफळात दाबले जातात व त्यामुळे कापडाची घनता वाढते . कापडाचे आकुंचन होत असल्यामुळे ते जाड व मजबूत होते . नमद्याचा पोत सुधारतो . भरण , आकुंचन , तंतूंची प्रत , दाबण्यासाठी दिलेला वेळ , तापमान इ . गोष्टींवर तयार होणाऱ्या नमद्याचा पोत अवलंबून असतो .
भारतीय कृती : प्राचीन काळापासून भारतात ‘ जान ’ नावाचा नमदा तयार होतो . हा तयार करण्यासाठी प्रथम एका जुन्या गोणपाटाच्या कापडावर धुवून वाळवलेल्या लोकरी तंतूंचा थर पसरवितात . त्यावर शेंगदाण्याच्या पेंडीचा रात्रभर पाण्यात भिजवून तयार केलेला लगदा पसरवितात . त्यावर डिंकाचा विद्राव पसरवितात आणि हाताच्या कोपरांनी दाबून लोकरी तंतू बसवितात . ही च क्रिया खूप वेळा करतात. तंतू योग्य तऱ्हेने बसल्यावर त्यावर लोकरीचा दुसरा थर पसरवितात आणि पुन्हा पेंड व डिंकाचा विद्राव शिंपडून वरील पद्धतीने दाबतात . अशा तऱ्हेने थरावर थर देऊन योग्य व हव्या असलेल्या जाडीचे जान तयार करतात . हा सपाट नमद्याचाच प्रकार होय . आवश्यकतेप्रमाणे तयार जानावर नक्षी काढून वा रंगीत अक्षरे लिहून ते सुशोभित करण्यात येते . ह्या सर्व क्रिया कुठल्याही प्रकारचे यंत्र वा रसायन न वापरता केवळ हाताने करण्यात येतात . जानाचा उपयोग बसण्यासाठी आसन व बिछान्यावर आंथरण्यासाठी करतात तसेच जेथे पाण्याचा संपर्क येणार नाही किंवा वाकवून दाब पडणार नाही अशा कुठल्याही उपयोगासाठी जान वापरता येते . थंड प्रदेशात आंथरण्यासाठी जान आणि पांघरण्यासाठी घोंगडी वापरीत असल्याने माणसाचे थंडीपासून चांगले रक्षण होते .
विणाईचे नमदे तयार करण्याची कृती : विणाईचे नमदे तयार करण्याची पद्धत बरीचशी नेहमीचे लोकरीचे कापड तयार करण्याच्या पद्धतीसारखीच असते . योग्य ती जाडी , लांबी व गुंतवण्याचा गुण असेल त्या तंतूंची लोकर घेऊन तिच्यावर सफाई , मिश्रण , पिंजणे , विंच रणे इ . क्रिया करून तिचे सूत काढतात . हे सू त अर्थात जाडसरच असते . या सुताचे जाडेभरडे कापड विणून त्यावर साबणाच्या पाण्याने भरण वगैरे क्रिया करतात . भरण्याचे मान आवश्यकतेप्रमाणे अर्थातच नियंत्रित करण्यात येते . ह्या भरण आणि नमदीकरण क्रिया कापडावर पडलेला डाग घर्षणाने काढण्याच्या पद्धतीसारख्याच असतात . कापडावरील डाग काढताना डाग असलेल्या भागावर घर्षण करतात . त्याच घर्षणाने पृष्ठभागावरील तंतू उभे राहतात व पुढे त्यांचे नमदीकरण होते . त्यामुळे विणलेल्या कापडातील ताणा आणि बाणा यांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागा भरल्या जातात व कापड भरीव व खऱ्या नमद्यासारखे दिसते . योग्य प्रकारे उष्णता , साबणाचा विद्राव , पाणी व घर्षण वापरून उत्तम प्रतीचे नमदे तयार करता येतात .
आधुनिक पद्धत : नमद्याचे जनक सेंट फ्युतर यांच्या नावाने ओळखण्यात येणारी आधुनिक नमदा व वीणरहित कापड तयार करण्याची पद्धत १९५५ मध्ये अमेरिकेतील फेल्ट कंपनीने शोधून काढली . ह्या पद्धतीत लोकरीऐवजी मानवनिर्मित कृत्रिम तंतूंचा वापर करतात परंतु नमदा तयार करण्यासाठी रेझिनाचा अथवा ऊष्मादृढ प्लॅस्टिकीकरणाचा ( प्रथम दाबाखाली तापवून आकार देता येणाऱ्या पण पुन्हा तापवून वितळविता वा आकार देता न येणाऱ्या प्रक्रियेचा ) उपयोग मुळीच केला जात नाही . तंतूंची गुंतवण केवळ यांत्रिक पद्धतीने सूची मागावर [ ⟶ विणकाम ] करतात . नमदीकरण करण्यासाठी रसायनांचा वापर करतात . अशा तऱ्हेने तयार झालेल्या नमद्यांचा उपयोग विशिष्ट औद्योगिक क्षेत्रांत करण्यात येतो .
भरण क्रिया पुरी झाल्यावर नमद्यावर धुलाई , वाळविणे , रंगविणे वगैरे क्रिया केल्या जातात . या क्रिया नेहमीच्या लोकरी कापडावर करतात तशाच असतात .
अलीकडेच सिलिकोन संस्कारित नमदे तयार करण्यात आले आहेत . फॅशनचे कापड व कपडे तयार करण्यासाठी ह्या नमद्यांचा उपयोग होतो . हे नवीन प्रकारचे नमदे सर्वसामान्य नमद्यांपेक्षा उच्च प्रतीचे असतात . या नमद्यांचे रेशमी पोत ( मुलायम ), उच्च दर्जाची चूणक्षमता , वजनाने हलके , घडी उलगडण्याची उच्च प्रतीची क्षमता , सुईशी घर्षण कमी होत असल्यामुळे उच्च दर्जाचा शिलाई गुणधर्म , जलनिर्मित डाग व निर्जल धुलाईमध्ये पाण्याच्या थेंबांच्या खुणा उमटू न देण्याची क्षमता इ . विशेष गुणधर्म होत . अ ग्नि रोधक , जलरोधक , कीटकरोधक इ . विशेष गुणधर्मांचे नमदेही तयार करता येतात .
उपयोग : नमदा हे त्रिमितीय कापड असते . त्यात विणलेल्या कापडासारखे ताणे व बाणे नसतात व म्हणून त्यात मोकळी जागा नसून कापड एकसंध असते . सपाट नमद्याच्या कापडाचा काठ किंवा कोपरे वळत नसल्यामुळे त्याची गुंडाळी होत नाही किंवा चुण्या पडून ते खराब होण्याची वा चोळामोळा होण्याची भीतीही नसते . लोकरी तंतू स्वतःच बऱ्याच मोठ्या प्रमाणात हवेतील बाष्प शोषत असतात . ही बाष्पशोषणक्षमता नमद्याच्या कापडाच्या विशिष्ट रचनेमुळे आणखीच वाढते . पाणी शोषण्याविषयीसुद्धा असेच म्हणावे लागेल . नमद्यामध्ये उष्णतारोधकताही बरीच असते . वरील उपयुक्त गुणधर्मांमुळे नमद्याचे अनेकविध उपयोग आहेत .
जुन्या काळी नमद्याचे कापड कपडे करण्यासाठी तसेच इतर घरगुती उपयोगांसाठी वापरण्यात येत असे . त्यांत वातीसारखा उपयोगही समाविष्ट आहे . काही काळानंतर टोप्या करण्यासाठी नमद्याचा उपयोग होऊ लागला आणि आजही तो अत्यंत मोठ्या प्रमाणांत होत आहे . पताका करण्यासाठी , जाहिराती सजविण्यासाठी , अस्तर किंवा अनेक ठिकाणी कडा व काठ लावण्यासाठी नमद्याचा उपयोग होतो . घर्षण कापड किंवा ठराविक वस्तूंसाठी पॉलिशचे कापड म्हणून त्याचा उपयोग करतात . पियानोच्या हातोड्यांवर बसविण्यासाठी व टंकलेखन यंत्राच्या खाली ठेवण्यासाठी किंवा चहाच्या किटलीच्या आवरणासाठी नमद्याचे कापड वापरण्यात येते . वीणयुक्त नमद्याचा उपयोग कागद उद्योगात दाबण्याच्या प्रक्रियेत होतो . याच प्रकारच्या कापडाचा उपयोग कपडे करण्यासाठीही होतो . त्यापासून तयार केलेली अंतर्वस्त्रे थंडीच्या दिवसात वापरतात . ⇨ फ्लॅनेल ( मृदू गरम कापड ), क्रिकेट कापड , मोलेटन किंवा शांत वस्त्र ( कपबशांचा आवाज शोषून घेण्यासाठी आणि टेबलाच्या पृष्ठभागाचे संरक्षण करण्यासाठी टेबलावरील चादरी खाली वापरण्यात येणारे कापड ) इ . प्रकारचे कापड नमदाच होय . अनेक प्रकारच्या बाह्य कोटांसाठी उदा ., मेल्टन , कर्झी , बीव्हर व फ्लीसकोट , रीफर , एल्स्टार व भारी गणवेश इत्यादींसाठी नमद्याचा उपयोग होतो . काही प्रकारचे विशिष्ट सुती कापड , इतर पोषाखाचे कापड व ब्लँ के टे यांत नमद्याचा उपयोग होतो . काही प्रकारचे नमदे वेलवुट्टी वा नक्षी काढून सुशोभित कपड्यांसाठी वापरतात . नमद्याचा उपयोग सैल कपडे , जाकिटे , फुगविलेले परकर ( स्कर्ट ) इत्यादींमध्येही करण्यात येतो . आधुनिक काळात कशिदा काढलेले नमदे परकर , जाकिटे आणि इतर कपड्यांत वापरतात . मूळ कपड्यांना सुशोभित करण्यासाठीही नमद्याचा उपयोग होतो . रंगीत नमद्याची अक्षरे वा नक्षी पांढऱ्या शुभ्र क्रीडा साहित्यात वा क्रीडापटूंच्या अंगरख्यावर अगर इतर कपड्यांवर वापरतात .
औद्योगिक क्षेत्रात नमद्याचा विविध प्रकारे खूप उपयोग होतो . ध्वनिशोषण , कंपनशोषण , उष्णता निरोधन , गाळणे – झिरपणे , चकाकी आणणे इ . प्रक्रियांत नमद्याचा उपयोग होतो .
पहा : लोकर .
संदर्भ : 1. Editors of American Fabrics Magazine, A. F. Encyclopedia of Textiles, Englewood Cliffs, N. J. 1960.
2. Hollen, N. Saddler, J. Textiles, New York, 1958.
ओगले , कृ . ह . लोखंडे , हि . तु .
“