फेलीनी ,  फेदेरीको  :  ( २० जानेवारी १९२१ –  ).  जागतिक कीर्तीचा इटालियन चित्रपटदिग्दर्शक . जन्म इटलीतील रिमिनी या गावी .  त्याचे वडील अर्बानो फेरीवाला म्हणून काम करीत .  फेदेरीकोने वयाच्या दहाव्या वर्षीच घरातून पलायन करून एका सर्कसमध्ये शिरकाव केला .  दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभकाळात तो एका फिरत्या नाट्यसंच्याबरोबर देशभर फिरला .  १९४० च्या सुमारास तो रोममध्ये स्थायिक झाला व मार्क अरेलीओ या विनोदी साप्ताहिकासाठी गीतलेखन आणि व्यंगचित्रे काढून उपजीविका करू लागला .  इ . स .  १९४३ साली जिलिटा मसिना या युवतीशी त्याने रोम येथे विवाह केला .  चित्रकलेची देणगी त्याला उपजतच लाभली होती .  त्यामुळे त्याने १९४५ च्या सुमारास रोममध्ये अमेरिकन फौजा आल्यावर  ‘ फनिफेस शॉप ’  नामक दुकान टाकले व सैनिकांची व्यक्तिचित्रे तो रेखाटू लागला .  येथेच त्याची प्रख्यात दिग्दर्शक रोसेलीनीशी गाठ पडली व फेलीनीच्या आयुष्याला क्रांतिकारक वळण लागले .  १९४५ साली रोसेलीनीने आपल्या रोम ओपन सिटी  ( इं .  शी .)  या चित्रपटासाठी फेलीनीला आपला सहायक म्हणून घेतले .  तेव्हापासून पटकथालेखक ,  साहाय्यक दिग्दर्शक इ .  नात्यांनी त्याने रोसेलीनी ,  लाटुडा ,  जर्मी ,  फिलीप्पो वगैरे तत्कालीन नामवंत दिग्दर्शकांबरोबर काम केले .  १९५२ मध्ये द व्हाइट शेख  ( इं .  शी .)  हा चित्रपट त्याने स्वतंत्रपणे दिग्दर्शित केला .  कथा ,  पटकथा व संवाद या तीनही गोष्टी फेलीनी सहजतेने हाताळू लागला .  उपजत कलात्मक दृष्टी आणि चित्रपटमाध्यमावरील प्रभुत्व यांमुळे कथाविषयाचा आविष्कार तो विलक्षण प्रभावीपणे करी .  फेलीनीचा अत्यंत महत्त्वाचा चित्रपट म्हणजे द रोड  ( १९५४ ,  इं .  शी .)  हा होय .  तत्कालीन वास्तववादी चित्रपटांच्या लाटेतील ही एक महत्त्वपूर्ण कलाकृती मानली जाते .  त्‍यानंतरचा स्वीट लाइफ १९५९ ,  इं .  शी .)  हा चित्रपट उल्लेखनीय असून त्यात आधुनिक युगातील यांत्रिकीकरणाचे शैलीदार विडंबन आढळते .  फेलीनीचा स र्वां त वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट म्हणजे एट अँड हाफ ( इं .  शी .)  हा होय .  जगातील सर्व नामवंत टीकाकारांनी ती एक महान कलाकृती म्हणून गौरवलेली असून एका चित्रपटदिग्दर्शकाच्या वास्तववादी व अतिवास्तववादी विचारसरणीचे विलक्षण कलात्मक दर्शन त्यात घडते .  फेलीनी सटायरिस्ट  ( १९६९ ,  इं .  शी .),  द क्‍ला ऊन्स  ( १९७० ,  इं .  शी .),  रोमा  ( १९७१ ),  आय रिमे म्‍ब र  ( १९७३ ,  इं .  शी .)  हे फेलीनीचे आणखी काही नावाजलेले चित्रपट होत .

 फेलीनीची चित्रणशैली कथेच्या आशयानुरूप गतिमान होते किंवा संयमाने पुढे सरकते .  तो स्वतः चित्रकार व लेखक असल्यामुळे त्याच्या चित्रपटात पडद्यावरील चित्रप्रतिमेचे रेखीव सौंदर्य ,  जडणघडण व रचना कलात्मक असते .  फेलीनीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या सर्व चित्रपटांचे कथाविषय त्याच्या गतजीवनातील घडलेले प्रसंग किंवा घटना असतात . ‘ माझ्या कलाकृतीत सर्व काही आत्मचरित्रात्मक असते ’,  असे तो म्हणतो .  प्रभावी आशय तितक्याच प्रभावी माध्यम – प्रभुत्वाने पडद्यावर उभा करणे ,  हे फेलीनीचे कौशल्य होय .  म्हणूनच त्याची गणना जगातील महान चित्रपटदिग्दर्शकांमध्ये केली जाते . 

 दीक्षित विजय