फेलीनी , फेदेरीको : ( २० जानेवारी १९२१ – ). जागतिक कीर्तीचा इटालियन चित्रपटदिग्दर्शक . जन्म इटलीतील रिमिनी या गावी . त्याचे वडील अर्बानो फेरीवाला म्हणून काम करीत . फेदेरीकोने वयाच्या दहाव्या वर्षीच घरातून पलायन करून एका सर्कसमध्ये शिरकाव केला . दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभकाळात तो एका फिरत्या नाट्यसंच्याबरोबर देशभर फिरला . १९४० च्या सुमारास तो रोममध्ये स्थायिक झाला व मार्क अरेलीओ या विनोदी साप्ताहिकासाठी गीतलेखन आणि व्यंगचित्रे काढून उपजीविका करू लागला . इ . स . १९४३ साली जिलिटा मसिना या युवतीशी त्याने रोम येथे विवाह केला . चित्रकलेची देणगी त्याला उपजतच लाभली होती . त्यामुळे त्याने १९४५ च्या सुमारास रोममध्ये अमेरिकन फौजा आल्यावर ‘ फनिफेस शॉप ’ नामक दुकान टाकले व सैनिकांची व्यक्तिचित्रे तो रेखाटू लागला . येथेच त्याची प्रख्यात दिग्दर्शक रोसेलीनीशी गाठ पडली व फेलीनीच्या आयुष्याला क्रांतिकारक वळण लागले . १९४५ साली रोसेलीनीने आपल्या रोम ओपन सिटी ( इं . शी .) या चित्रपटासाठी फेलीनीला आपला सहायक म्हणून घेतले . तेव्हापासून पटकथालेखक , साहाय्यक दिग्दर्शक इ . नात्यांनी त्याने रोसेलीनी , लाटुडा , जर्मी , फिलीप्पो वगैरे तत्कालीन नामवंत दिग्दर्शकांबरोबर काम केले . १९५२ मध्ये द व्हाइट शेख ( इं . शी .) हा चित्रपट त्याने स्वतंत्रपणे दिग्दर्शित केला . कथा , पटकथा व संवाद या तीनही गोष्टी फेलीनी सहजतेने हाताळू लागला . उपजत कलात्मक दृष्टी आणि चित्रपटमाध्यमावरील प्रभुत्व यांमुळे कथाविषयाचा आविष्कार तो विलक्षण प्रभावीपणे करी . फेलीनीचा अत्यंत महत्त्वाचा चित्रपट म्हणजे द रोड ( १९५४ , इं . शी .) हा होय . तत्कालीन वास्तववादी चित्रपटांच्या लाटेतील ही एक महत्त्वपूर्ण कलाकृती मानली जाते . त्यानंतरचा स्वीट लाइफ १९५९ , इं . शी .) हा चित्रपट उल्लेखनीय असून त्यात आधुनिक युगातील यांत्रिकीकरणाचे शैलीदार विडंबन आढळते . फेलीनीचा स र्वां त वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट म्हणजे एट अँड हाफ ( इं . शी .) हा होय . जगातील सर्व नामवंत टीकाकारांनी ती एक महान कलाकृती म्हणून गौरवलेली असून एका चित्रपटदिग्दर्शकाच्या वास्तववादी व अतिवास्तववादी विचारसरणीचे विलक्षण कलात्मक दर्शन त्यात घडते . फेलीनी सटायरिस्ट ( १९६९ , इं . शी .), द क्ला ऊन्स ( १९७० , इं . शी .), रोमा ( १९७१ ), आय रिमे म्ब र ( १९७३ , इं . शी .) हे फेलीनीचे आणखी काही नावाजलेले चित्रपट होत .
फेलीनीची चित्रणशैली कथेच्या आशयानुरूप गतिमान होते किंवा संयमाने पुढे सरकते . तो स्वतः चित्रकार व लेखक असल्यामुळे त्याच्या चित्रपटात पडद्यावरील चित्रप्रतिमेचे रेखीव सौंदर्य , जडणघडण व रचना कलात्मक असते . फेलीनीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या सर्व चित्रपटांचे कथाविषय त्याच्या गतजीवनातील घडलेले प्रसंग किंवा घटना असतात . ‘ माझ्या कलाकृतीत सर्व काही आत्मचरित्रात्मक असते ’, असे तो म्हणतो . प्रभावी आशय तितक्याच प्रभावी माध्यम – प्रभुत्वाने पडद्यावर उभा करणे , हे फेलीनीचे कौशल्य होय . म्हणूनच त्याची गणना जगातील महान चित्रपटदिग्दर्शकांमध्ये केली जाते .
दीक्षित विजय