फेर्मियम : एक मानवनिर्मित म्हणजे कृत्रिम रीतीने तयार केलेले , किरणोत्सर्गी ( भेदक कण वा किरण बाहेर टाकणारे ) धातुरूप मूलद्रव्य , रासायनिक चिन्ह Fm अणुक्रमांक ( अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या ) १०० अणुभार २५७ ⇨ आवर्त सारणी तील ( इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टकरूप मांडणीतील ) ३ ब गटातील ॲक्टिनियम मालेमधील ११ वे व युरेनियमानंतरचे ८ वे मूलद्रव्य . यांचे २४४ ते २५९ या द्रव्यमानांकांचे ( द्रव्यमानांक म्हणजे अणुकेंद्रातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकूण संख्या ) समस्थानिक ( अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार ) मिळाले असून ते सर्व किरणोत्सर्गी आहेत आणि त्यांचे अर्धायुकाल ( किरणोत्सर्गाची मूळची क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काळ ) काही मिलिसेकंदांपासून सु . १०० दिवसांपर्यंत आहेत . विद्युत् विन्यास ( अणुकेंद्राभोवतील विविध कक्षांमधील इलेक्ट्रॉनांची संख्या ) २, ८, १८, ३२, ३०, ८, २ . संयुजा ( इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक ) ३ .
इतिहास : १ नोव्हेंबर १९५२ रोजी दक्षिण पॅसिफिक महासागरात हायड्रोजन बाँ बचा स्फोट करण्यात आला . त्या वेळी किरणोत्सर्गी धूलिकण वातावरणात उसळून त्यांचा प्रचंड ढग तयार झाला . गालनपत्र चिकटविलेली विमाने या ढगातून पाठविण्यात आली व त्यांवर हे धूलिकण जमा करण्यात आले , शिवाय जवळपास असलेल्या प्रवाळ खडकांवर जमा झालेले किरणोत्सर्गी द्रव्य निरनिराळ्या प्रयोगशाळांत नेऊन त्याचे संशोधन सुरू झाले . १९५३ साली ए . घिओर्सो , ए स् . जी . टॉम्पसन , जी . ए च् . हिगिन्स आणि जी . टी . सीबॉर्ग या शास्त्रज्ञांच्या पथकाने कॅलिफोर्निया विद्यापीठातील रेडिएशन लॅबोरेटरीमध्ये १०० अणुक्रमांक व २५५ अणुभार असलेल्या या नवीन किरणोत्सर्गी मूलद्रव्याचा शोध लावला . त्यांनीच एन्रीको फेर्मी या भौतिकीविदांच्या सन्मानार्थ या मूलद्रव्याला फेर्मियम हे नाव द्यावे असे सुचविले . हे संशोधन होतानाच आइन्स्टाइनियम ( ९९ ) व मेंडेलेव्हियम ( १०१ ) या मूलद्रव्यांचाही शोध लागला . त्याच सुमारास स्वीडनमध्ये फॉरस्लिंग , श्मे लँ डर व इतरांनी प्लु टोनियमावर न्यूट्रॉनांचा मारा करून आइन्स्टाइ नियम व फेर्मियम ही मूलद्रव्ये स्वतंत्रपणे शोधून काढली .
आढळ व निर्मिती : हे निसर्गात आढळत नाही . वरील स्फोटात युरेनियम ( २३८ ) वर न्यूट्रॉनांचा भडिमार झाल्यामुळे न्यूट्रॉन आत घुसून युरेनियम ( २५५ ) तयार झाले व त्यातून बीटा किरण बाहेर पडून खालील प्रमाणे फेर्मियम ( २५५ ) तयार झाले .
जड मूलद्रव्यांच्या ( उदा ., प्लुटोनियम , युरेनियम ) समस्थानिकांवर सायक्लोट्रॉनामध्ये अथवा विशिष्ट कणवेगवर्धकाद्वारे [ ⟶ कणवेगवर्धक ] प्रवेगित केलेल्या हीलियम , बे रिलियम , कार्बन , ऑक्सिजन व इतर जड आयनांचा ( विद्युत् भारित अणूंचा वा रेणूंचा ) भडिमार करून , तसेच कॅलिफोर्नियमाच्या समस्थानिकावर आल्फा कणांचा मारा करून फेर्मियमाचे इतर समस्थानिक मिळविण्यात येतात .
गुणधर्म : मिळविण्यात आलेले फेर्मियम एक दशलक्षांश ग्रॅमपेक्षाही कमी आहे . त्यामुळे त्याचे फारसे अध्ययन झालेले नाही . मात्र त्याचे अस्तित्व निश्चित झाले असून त्याचे रासायनिक गुणधर्म ॲक्टिनियम मालेतील मूलद्रव्यांच्या गुणधर्मा सारखे असल्याचे दिसून आले आहे .
पहा : युरेनियमोत्तर मूलद्रव्ये संक्रमणी मूलद्रव्ये .
संदर्भ : 1. Partington, J. R. General and Inorganic Chemistry, London, 1966.
2. Seaborg, G. T. Man-Made Transuranium Elements, Englewood Cliffs, N. J., 1963.
कारेकर , न . वि .
“