फाब्री, (मारी पॉल ऑग्यूस्त) शार्ल : (११ जून १८६७-११ डिसेंबर १९४५). फ्रेंच भौतिकीविज्ञ. त्यांनी प्रकाशकी व खगोल भौतिकी या विषयांत महत्त्वाचे कार्य केले. त्यांचा जन्म मार्से येथे झाला. पॅरिस येथील एकोल पॉलिटेक्‍निकमध्ये (१८८५-८७) शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नेव्हर्स, बॉर्दो, मार्से व पॅरिसमधील सेंट लूइस येथील सरकारी शाळांत अध्यापन केले. १८९२ मध्ये पॅरिस विद्यापीठाची डॉक्टेरेट पदवी त्यांनी संपादन केली. त्यानंतर मार्से विद्यापीठात १८९४ मध्ये भौतिकीचे प्रमुख अध्यापक व १९०४ मध्ये भौतिकीचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९२०-३७ या काळात त्यांनी सॉर्‌बॉन विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक म्हणून काम केले.

प्रकाशकी व प्रकाशमापन या विषयांचा विशेष अभ्यास त्यांनी केला. त्यांनी १८९६ मध्ये आल्फ्रेद पेरॉ या भौतिकीविज्ञांच्या बरोबर संशोधन करून ‘फाब्री-पेरॉ व्यतिकरणमापक’ या नावाने ओळखण्यात येणारे उपकरण [→ व्यतिकरणमापन] तयार केले. प्रकाशाच्या प्रमाणभूत तरंगलांब्या मोजण्यासाठी त्यांनी या उपकरणाचा उपयोग केला. या उपकरणाच्या साहाय्याने सूर्य व इतर ताऱ्यांच्या वर्णपटांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यावरून त्यांनी असे दाखविले की, सूर्यापासून उत्सर्जित होणारे जंबुपार किरण (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य किरण) उच्च वातावरणातील ओझोन वायूच्या थरात शोषले जातात. यामुळेच पृथ्वीवरील जीवसृष्टीचे जंबुपार किरणांमुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण होते. ⇨ अभ्रिकांचा दृष्टिपथ रेषेतील वेग व प्रदीप्त वायूंचे तापमान यांविषयीही त्यांनी अभ्यास केलेला होता.

ले इन्स्तित्यूत द ऑप्तिक या संस्थेचे पहिले संचालक म्हणून १९२० मध्ये त्यांची नेमणूक झाली. सोसायटी मितिओरॉलॉजिक द फ्रान्स या संस्थेचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय ज्योतिषशास्त्रीय संघटनेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. वजने व मापे यांविषयीच्या आंतरराष्ट्रीय समितीचे फाब्री हे सदस्य होते. फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून १९२७ मध्ये आणि इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचे परदेशी सदस्य म्हणून १९३१ मध्ये त्यांची निवड झाली. रॉयल सोसायटीने १९१८ मध्ये त्यांना रम्फर्ड पदकाचा बहुमान दिला. Les applications des interferences Iumineuses (१९२३) Physique et Astrophysique (१९३५) हे त्यांचे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.