फान्सी : (फांसा, सोंदारा, हिं. पासी धोबे, क. पाचरी, लॅ. डाल्बर्जिया पॅनिक्युलाटा कुल-लेग्युमिनोजी). ⇨ शिसू, कौरची, शिसवी इत्यादींच्या वंशातील हा सु. ९-१८ मी. उंच व २-२·५ मी. घेर असलेला पानझडी वृक्ष तुरळकपणे भारतात सर्वत्र, ब्रह्मदेशात व पाकिस्तानात आढळतो. याची साल करडी असून तीवर आडव्या भेगा असतात. कोवळ्या भागांवर रेशमी करडी लव असते. पाने एकाआड एक, संयुक्त, विषमदली, पिछाकृती (पिसासारखी ), १३-१५ सेंमी. लांब दले ९-१५ (२·५-५ +२·५ सेंमी.), लंबगोलाकार-आयताकार, अखंड, काहीशी चिवट व सुकल्यावर काळी पडतात. फुले पांढरी, त्यांवर निळसर छटा असतात. ती असंख्य व लहान असून कक्षास्थ (बगलेत) व अग्रस्थ (शेंड्यावर ) परिमंजऱ्यावर [शाखायुक्त फुलोऱ्यावर → पुष्पबंध] मार्च ते मे या काळात येतात. केसरदले दहा, द्विसंध [ दोन जुडगे असलेली → फूल]. शिंबा (शेंग) ४-१० x १·३-२ सेंमी., तपकिरी, दोन्ही टोकास निमुळती, १-२ बीजी असून त्या मे ते जुलै या काळात येतात. याची इतर सामान्य लक्षणे शिंबावंत कुलात [→ लेग्युमिनोजी] वर्णिल्याप्रमाणे असतात. याचे लाकूड पिवळट पांढरे, दिखाऊ, मध्यम कठीण असून ते वाद्ये, घरबांधणी व किरकोळ कामांकरिता उपयुक्त असते.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India. Raw Materlais, Vol. III. New Delhi, 1952.

परांडेकर, शं. आ.