फनवीजिन, दिनीस इवानोविच : (१४ एप्रिल १७४५ – १ डिसेंबर १७९२). रशियन नाटककार. मॉस्को येथे एका सरदारघराण्यात जन्मला. मॉस्को विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले. १७६३ ते १७८२ ह्या काळात तो सरकारी नोकरीत, भाषांतरकाराच्या पदावर होता. ब्रिगादीर (१७६९, इं. शी. ब्रिगेडियर) आणि न्येदरस्ल (१७८३, इ. शी इग्नरॅमस) ह्या त्याच्या विशेष उल्लेखनीय सुखात्मिका. आपल्या सुखात्मिकांतून त्याने रशियन सरदारवर्गाच्या काही प्रवृत्तींवर उपरोधप्रचुर टीका केली त्यांच्या जीवनशैलीतील उथळपणा उघड केला. फ्रेंचांच्या चालीरीतींचे ह्या वर्गाकडून केल्या जाणाऱ्या अंधानुकरणावर फनवीजिनचा विशेष रोख होता. फ्रेंच सुखात्मिकाकार मोल्येर आणि डॅनिश सुखात्मिकाकार लूद्व्ही हॉल्बर्ग ह्यांचा–विशेषतः हॉल्बर्गचा–फनवीजिनवर प्रभाव होता. रशियन भाषेतील पहिल्या वास्तववादी नाट्यकृती निर्माण करण्याचे श्रेय त्याला दिले जाते.
फनवीजिन ह्यास आरंभी रशियन सम्राज्ञी कॅथरिन द ग्रेट हिचा अनुग्रह लाभला होता तथापि पुढे तो नाहीसा होऊन त्याच्या साहित्यावर रशियात बंदी घालण्यात आली. त्यानंतर त्याने लेखन केले नाही. मॉस्को येथे तो निधन पावला.
पांडे, म. प. (इं.) कुलकर्णी, अ. र.(म.).