प्लॅटिनम:एक धातुरूप व मौल्यवान मूलाद्रव्य रासायनिक चिन्ह Pt अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ७८ अणुभार १९५·०९⇨ आवर्त सारणीतील (इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टकरूप मांडणीतील) आठव्या गटातील मूलद्रव्य वितळबिंदू १,७७२° से. उकळबिंदू ३,७२५° से. ते ३,९२५° से. नैसर्गिक व अशुद्ध प्लॅटिनमाचे वि.गु. १४-१९ शुद्ध प्लॅटिनमाचे वि.गु. २१·४८-२१·५० १९२, १९४, १९५, १९६ व १९८ हे द्रव्यमानांक (अणुकेंद्रातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकूण संख्या) असलेले पाच स्थिर समस्थानिक (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्याचे प्रकार) आणि १८८, १८९, १९०, १९१, १९३, १९७ व १९९ हे द्रव्यमानांक असलेले सात अस्थिर समस्थानिक आढळतात. कठिनता ४·३ मोस [→ कठिनता] विद्युत् विन्यास (अणुकेंद्राभोवतील विविध कक्षांमधील इलेक्ट्रॉनांची संख्या) २, ८, १८, ३२, १७, १ संयुजा (इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक) २, ४ स्फटिक षट्कोणी फलककेंद्रित असतात [→ स्फटिकविज्ञान].
ऑस्मियम, इरिडियम, पॅलॅडियम, प्लॅटिनम, रुथेनियम व ऱ्होडियम या सहा धातुरूप मूलद्रव्यांना प्लॅटिनम गटातील धातू असे संबोधण्यात येते (काही वेळा त्यांना अभिजात-नोबेल-धातू असेही म्हणतात आणि मग त्यांत सोने व चांदी यांचाही समावेश करण्यात येतो). निसर्गात सामान्यतः या धातू निरनिराळ्या प्रमाणांत एकत्रित स्वरूपात सापडतात. या धातू आणि लोह, कोबाल्ट व निकेल यांचा आवर्त सारणीतील आठव्या गटात समावेश होतो. प्लॅटिनम गटातील मूलद्रव्ये हलक्या व भारी अशा प्रत्येकी तीन मूलद्रव्ये असलेल्या दोन उपगटांत विभागली जातात. प्रत्येक हलक्या मूलद्रव्याला संगत असे भारी मूलद्रव्य असून त्याचा अणुक्रमांक ३२ ने जास्त आहे. अशा प्रत्येक जोडीतील दोनही मूलद्रव्ये आवर्त सारणीतील एकाच वर्गात मोडतात आणि यामुळे प्लॅटिनम गटात तीन वर्ग प्रातिनिधिक स्वरूपात दिसून येतात. एकाच वर्गातील मूलद्रव्यांत रासायनिक व भौतिक गुणधर्मांच्या (उदा., संयुजा, लवणांची विरघळण्याची क्षमता इ.) बाबतीत नेहमीप्रमाणे स्पष्टपणे साम्य आढळून येते. सबंध गटातील मूलद्रव्यांच्या गुणधर्मात काही साम्ये दिसून येत असली, तरी निरनिराळ्या वर्गाच्या रासायनिक वर्तनात पुष्कळच फरक आहेत. प्लॅटिनम गटातील सर्व मूलद्रव्यांवर विश्वकोशात स्वतंत्र दिलेल्या आहेत.
इतिहास : प्लॅटिनम धातू निसर्गात शुद्ध स्वरूपात आढळत असल्याने जगाच्या काही भागांतील लोकांना तिची माहिती होती. अमेरिकेचा शोध लागण्यापूर्वी द. अमेरिकेतील विशेषतः एक्वादोरमधील इंडियन लोकांनी सोन्याने जोडलेल्या प्लॅटिनमाचे किरकोळ दागिने तयार केले होते. द. अमेरिकेतील कोलंबियामधील चोको नदीच्या गाळाच्या निक्षेपांत (साठ्यांत) सोन्याबरोबर शुद्ध प्लॅटिनम सापडत असे. तथापि ही वेगळी धातू असल्याचे पुढे बऱ्याच काळाने ओळखण्यात आले. १५५७ मध्ये जे.सी. स्कॅलिजर या इटालियन शास्त्रज्ञांनी धातू म्हणून प्रथम ती ओळखली असावी. डॉन अंतोन्यो द ऊल्योआ (१७१६-९५) यांनी आपल्या द. अमेरिकेतील प्रवासाच्या वर्णनात कोलंबियातील चोको निक्षेपांत सापडणाऱ्या या धातूचे वर्णन केलेले आहे. तसेच तेथील निक्षेपांतून सोने काढताना या धातूमुळे अडथळा येतो, असेही वर्णन त्यांनी केलेले आहे. ही धातू चांदीसारखी दिसते व रीओ पींतो या नदीच्या पाण्यात सापडत असे म्हणून स्पॅनिश लोकांनी तिला Platina del Pinto हे नाव दिले. याचाच अपभ्रंश होऊन पुढे प्लॅटिनम हे नाव आले. कोलंबियातील प्लॅटिनमाचा प्रथमतः चार्ल्स वुड व विल्यम ब्राऊनरिग ह्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. ब्राउनरिग व विल्यम वॉटसन यांनी या धातूचे तपशीलवार वर्णन १७५० मध्ये रॉयल सोसायटीला सादर केले. त्याच वेळी टी. शेफर यांनी स्टॉकहोमच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसला या धातूची माहिती सादर केली. प्लॅटिनम हे अम्लराजात (एक भाग नायट्रिक अम्ल व तीन भाग हायड्रोक्लोरिक अम्ल यांच्या मिश्रणात) विरघळते, असे त्यांनी सिद्ध केले. अमोनियम क्लोराइडामुळे ते विद्रावातून अवक्षेपित (न विरघळणाऱ्या साक्याच्या रूपात तयार होणे) होते, हे ए. एस्. मार्ख्ग्राफ यांनी सिद्ध केले. यो दोन्ही विक्रिया अद्यापिही प्लॅटिनमनिर्मितीत प्रमाणभूत म्हणून मानल्या जातात. १७८४ मध्ये एफ्. के. आशार यांनी प्लॅटिनम तयार करण्याची एक पद्धत शोधून काढली होती. त्यांनी प्लॅटिनमाची आर्सेनिकाबरोबर मिश्रधातू बनवून त्यापासून प्लॅटिनमाची मूस तयार केली व नंतर ती उच्च तापमानाला बराच वेळ तापवून आर्सेनिकाचे ऑक्सिडीकरण [→ ऑक्सिडीभवन] व बाप्पीभवन (बाष्परूपाने उडून जाण्याची क्रिया) करून प्लॅटिनम धातू मिळविली. तथापि ही पद्धत वापरात आली नाही. प्लॅटिनमातील इतर धातूंच्या अस्तित्वामुळे व तिच्या उच्च वितळबिंदूमुळे तिचा वापर करणे त्या काळी अवघड जात होते. १८०० च्या सुमारास डब्ल्यू. एच्. वुलस्टन यांनी केलेल्या प्रयोगांमुळे प्लॅटिनमाचे शुद्ध चूर्ण तयार करणे आणि त्याचे दाबाने व न वितळविता उच्च तापमानाला तापवून सलग द्रव्यात रूपांतर करणे शक्य झाले आणि यामुळेच प्लॅटिनमावर यांत्रिक संस्कार करणे सोपे झाले. या पद्धतीत शुद्ध प्लॅटिनमाचे चूर्ण मिळविण्यासाठी अमोनियम क्लोरोप्लॅटिनेटाचे उष्णतेने अपघटन (घटक द्रव्ये अलग करणे) करण्यात येई. वुलस्टन यांची ही पद्धत प्लॅटिनमनिर्मितीसाठी बराच काळ वापरात होती. १८०२ मध्ये रॉबर्ट हेअर यांनी ऑक्सि-हायड्रोजनाची झोतरूपी ज्योत (टॉर्च) शोधून काढली. तिच्यामुळे निर्माण होणाऱ्या उच्च तापमानाला प्लॅटिनम वितळू शकते, असे आढळून आले. तथापि भट्टी तयार करण्यास आवश्यक असे उच्चतापसह (उच्च तापमानाला न वितळता कार्य करू शकणारे) पदार्थ त्या वेळी उपलब्ध नसल्याने ही पद्धत वापरात येऊ शकली नाही. याकरिता १८५६ मध्ये डेव्हिल एच्. ई. सिल्केअर व एच्.जे. देब्रे या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञांनी चुन्याचा उपयोग उच्चतापसह पदार्थ म्हणून करून व त्याचबरोबर हेअर यांच्या ऑक्सि-हायड्रोजन ज्योतीचा वापर करून उत्तम भट्ट्या तयार केल्या. ही पद्धती प्लॅटिनमनिर्मितीत लवकरच प्रमाणभूत मानण्यात येऊ लागली आणि तिचा उपयोग बराच काळ होत होता. विसाव्या शतकाच्या मध्यापासून या पद्धतीऐवजी उच्च कंप्रता विद्युत् भट्टीचा [→विद्युत् भट्टी] उपयोग प्लॅटिनमनिर्मितीत करण्यात येऊ लागला आहे.
आढळ:कॅनडा, द. आफ्रिका व कोलंबिया येथे जगातील सु. ७५% प्लॅटिनमाचे उत्पादन होते. अल्प प्रमाणात ते अमेरिकेची संयुक्त संस्थाने, मेक्सिको, हाँडुरस, ब्राझील, एक्वादोर, फ्रेंच गियाना, बोर्निओ, ब्रह्मदेश, भारत, नॉर्वे, जर्मनी, स्पेन, आयर्लंड, अल्जीरिया, काँगो, ऑस्ट्रेलिया इ. देशांत आढळते. तसेच ते रशियातही सापडते.
प्लॅटिनम गटातील धातूंचे पृथ्वीवरील विस्तीर्ण भागात वितरण झालेले आढळते, तथापि त्यांचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे काही विशिष्ट परिस्थितीतच त्या खनिजांतून मिळविणे आर्थिक दृष्ट्या शक्य असते. नैसर्गिक रीत्या प्लॅटिनम प्लेसर निक्षेपांत [→ धातुक निक्षेप] आढळते व त्यात प्लॅटिनम गटातील सहा धातूंचे मिश्रण असते. असे प्लॅसर निक्षेप अलास्का, कोलंबिया व रशिया येथे आढळतात. ऐतिहासिक दृष्ट्या कोलंबियात व नंतर रशियातील उरल भागात आढळलेले प्लेसर निक्षेप प्लॅटिनमाचे प्रथम उदगम होते. या उद्गमांपासून अद्यापही प्लॅटिनम मिळविले जात असले, तरी आता कॅनडा, द. आफ्रिका व रशिया येथील प्लॅटिनमाचे पुष्कळच कमी प्रमाण असलेले इतर प्रकारचे (उदा., शिरांच्या स्वरूपाचे) निक्षेपच प्लॅटिनमाचे प्रमुख उद्गम आहेत. या निक्षेपांत इतर धातूंबरोबर प्लॅटिनम अल्प प्रमाणात असते. कॅनडात निकेल-तांबे असल्फाइड धातुकांत प्लॅटिनम अल्प प्रमाणात आढळते व तेथील उत्पादन बाजारातील निकेलाच्या मागणीवर पूर्णपणे अवलंबून आहे. रशियातील मध्य सायबीरियन पठारात आणि द. आफ्रिकेत आढळणाऱ्या प्लॅटिनमाच्या धातुकांत तांबे व निकेल अल्प प्रमाणात असते. प्लॅटिनमाची प्रमुख खनिजे स्पेरिलाइट (प्लॅटिनम आर्सेनाइड), कूपराइट (प्लॅटिनम सल्फाइड), ब्रॅगाइट (निकेल सल्फाइड), ऑस्मिरिडियम, इरिडॉस्मीन व नैसर्गिक प्लॅटिन मही होत. जगातील प्लॅटिनम गटातील धातूंच्या उत्पादनापैकी निम्म्याहून अधिक उत्पादन रशियात होते.
भारतात प्लॅटिनम छोटा नागपूर व सिंगभूम येथील सोनेयुक्त गाळात व महाराष्ट्रात बॉक्साइटात अंशरूपाने आढळते पण धातू म्हणून वेगळे करण्याइतकी आढळत नाही. तसेच ते कर्नाटक, आसाम व प. बंगाल येथेही अल्प प्रमाणात आढळते.
प्राप्ती: प्लॅटिनम उत्पादनासाठी जो कच्चा माल (खनिज, खरवड,उच्चतापसह पदार्थ म्हणून वापरलेले ऑस्मिरिडियम वा इरिडॉस्मीन इ.) वापरतात, त्यावर त्यांच्या उत्पादन पद्धती आधारित असतात. सर्वसामान्यतः या पद्धतीत पुढील टप्पे असतात. प्रथम प्लॅटिनमयुक्त खनिजे अम्लराजात विरघळवितात. मात्र ऑस्मिरिडियम हे खनिज असल्यास ते अम्लराजात विरघळत नाही. त्यासाठी हे खनिज जस्ताबरोबर तापवून अम्लराजात विरघळणारी मिश्रधातू तयार करतात. अम्लराजातील खनिजाचा विद्रास उकळल्यास ऑस्मियम टेट्रॉऑक्साइड (Os O4) तयार होऊन ऑस्मियम वेगळे होते. उरलेल्या साक्याच्या हायड्रोक्लोरिक अम्ल विद्रावात अमोनियम क्लोराइड मिसळल्यास (NH4)2 PtCl6 व (NH4)2 IrCl6 साका मिळतो. परत परत भागशः स्फटिकीकरण करून ही दोन्ही संयुगे वेगळी करतात. अमोनियम हेक्झॅक्लोरोप्लॅटिनेटाचा साका धुतात, वाळवितात व भाजतात. यामुळे ९८% शुद्ध असे स्पंजरूप प्लॅटिनम तयार होते. हे स्पंजरूप प्लॅटिनम परत अम्लराजात विरघळवून त्याचे शुद्धीकरण करतात. अम्लराजातील विद्रावाचे सोडियम क्लोराइडाबराबर बाष्पीभवन करतात व शुष्करूपात आणतात. या वेळी सोडियम हेक्झॅक्लोरोप्लॅटिनेट तयार होते. ते पाण्यात विरघळवितात व सोडियम ब्रोमेटाबरोबर तापवून त्यातून इरिडियम, ऱ्होडियम, पॅलॅडियम व क्षार धातू (लिथियम, सोडियम, पोटॅशियम इ. अल्कली धातू) हायड्रॉक्साइड रूपात साका करून वेगळ्या करतात. उरलेल्या विद्रावाची अमोनियम क्लोराइडाबरोबर विक्रिया करून शुद्ध अमोनियम हेक्झॅक्लोरोप्लॅटिनेट तयार होते. ते सु. १,०००° से. तापमानास भाजून शुद्ध स्पंजरूप प्लॅटिनम तयार करतात.
तसेच प्लॅटिनमाच्या संयुगांच्या सजल विद्रावाचे जस्त, मॅग्नेशियम, लोह वा ॲल्युमिनियम यांच्या साहाय्याने ⇨ क्षपण करून प्लॅटिनम धातू मिळवितात.
गुणधर्म: प्लॅटिनम गटातील धातूंपैकी ही सर्वांत जास्त वापरात असलेली व जड धातू असून तिला धातवीय चमक आहे. ही धातू कथिलासारखी वा चांदीसारखी पांढरी असून चांदीपेक्षा मऊ असते पण इतर धातू तिच्यात मिसळल्यास ती कठीण बनते. तिच्या उच्च वितळबिंदूमुळे तिचे ओतकाम व वितळ जोडकाम (वेल्डिंग) सहज करता येत नाही. सर्व ज्ञात धातूंमध्ये ही धातू जास्त तन्य (ओढून तार काढता येणारी) आहे. ती इतकी तन्य आहे की, तिच्यापासून जास्तीत जास्त कमी व्यासाची तार प्रथम काढून तिच्यावर चांदीचा मुलामा देतात आणि परत आणखी अतिसूक्ष्म व्यासाची तार काढून तिच्यावरील चांदीचा मुलामा वेगळा करतात. या पद्धतीने एक ग्रॅम प्लॅटिनमापासून सु. ६४ किमी. लांबीची तार काढता येते. प्लॅटिनमाचे पातळ पत्रेही काढता येतात. शुभ्र तापमानास (तापविल्यास पांढरी दिसणाऱ्या तापमानास) हवेत तापविल्यास ती पांढरा प्रकाश देऊन चकाकते. सर्वसाधारण तापमानाला हवेचा (गंधकयुक्त औद्योगिक वातावरणाचाही) वा पाण्याचा तिच्यावर परिणाम होत नाही. विद्युत् प्रज्योतीने व ऑक्सि-हायड्रोजन ज्योतीने ती सहज वितळते. ती तापविली असतानाही चकचकीत राहते व तिच्यावर ऑक्साइडाचा दृश्य थर आढळत नाही. तथापि ४५०° से. तापमानाखाली तिच्यावर ऑक्साइडाचा (PtO2) पातळ थर चिकटलेला आढळतो. ४५०° से.ला या ऑक्साइडाचे वियोजन (तात्पुरते घटक अलग होणे) होते आणि या तापमानाच्या वर बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) ऑक्साइड (PtO2) तयार होत असल्याने प्लॅटिनमाचे वजन हळूहळू कमी होत जाते. प्लॅटिनम ऑक्साइड रासायनिक वा विद्युत् रासायनिक विक्रियांनीही तयार करता येते. हायड्रोजन वा इतर क्षपणक वातावरणाचा उच्च तापमानाला प्लॅटिनमावर प्रत्यक्ष दुष्परिणाम होत नाही. तथापि हे वातावरण आसपासच्या पदार्थातील फॉस्फरस, सिलिकॉन, आर्सेनिक, कथिल इ. मूलद्रव्यांच्या संयुगाचे क्षपण घडवून आणते व ही मूलद्रव्ये प्लॅटिनमाबरोबर मिश्रधातू बनवितात आणि त्यामुळे प्लॅटिनमावर हानिकारक परिणाम होतो. गंधक व सिलिकॉन यांची क्षपणक वातावरणातील उपस्थिती विशेष हानिकारक असते. सर्वसाधारण तापमानाला एखाद्याच अम्लाचा आणि क्षाराचा (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणाऱ्या पदार्थाचा अल्कलीचा) अथवा साध्या लवणांच्या पाण्यातील विद्रावांचा आणि कार्बनी पदार्थाचा प्लॅटिनमावर परिणाम होत नाही. मात्र गरम अम्लराजात ती ताबडतोब विरघळते आणि क्लोरोप्लॅटिनिक अम्ल (किंवा प्लॅटिनिक क्लोराइड, H2PtCl6) तयार होते. उच्च तापमानाला तिच्यावर हायड्रोजन क्लोराइडाचा परिणाम होत नसला, तरी ५००° से. तापमानाला तिची क्लोरिनाशी विक्रिया होते. सर्वसाधारण तापमानाला क्लोरीन, ब्रोमीन व आयोडीन यांचा तिच्यावर परिणाम होत नाही, पण हायड्रोक्लोरिक अम्ल आणि ब्रोमीन यांच्या मिश्रणाचा तिच्यावर अम्लराजाप्रमाणे परिणाम होतो. वितळलेल्या क्षारांचाही तिच्यावर परिणाम होतो. गंधकयुक्त वायू, पारा, वितळलेली सल्फेटे, क्लोराइडे व कार्बोनेटे आणि वितळलेली काच यांचा तिच्यावर परिणाम होत नाही. उच्च तापमानास गंधक, फॉस्फरस व आर्सेनिक यांच्याबरोबर तिची सहज विक्रिया होते. काजळीयुक्त ज्योतीचा प्लॅटिनमाशी संबंध आल्यास कार्बनाची तिच्यावर सहज विक्रिया होते. प्लॅटिनमाची बारीक तार काचेत सहज सीलबंद बसविता येते.
अमोनियम प्लॅटिनम क्लोराइड लाल होईपर्यत तापविल्यास प्लॅटिनमाचे अतिसूक्ष्म चूर्ण मिळते. त्याला ’प्लॅटिनम ब्लॅक’ असे म्हणतात. हे चूर्ण प्रथम युस्टुस फोन लीबिक यांनी तयार केले. चूर्णाच्या व्यापाच्या अनेक पट त्यात ऑक्सिजन व हायड्रोजन यांचे शोषण होते आणि त्यात ते साठविले जातात.
अमोनियम क्लोरोप्लॅटिनेट तापवून वा जलीय विद्रावातून त्याचे क्षपण करून करडे स्पंजरूप प्लॅटिनम तयार करतात. स्पंजरूप प्लॅटिनमात वायू (विशेषतः ऑक्सिजन, हायड्रोजन व कार्बन मोनॉक्साइड) शोषण करून घेण्याची उच्च क्षमता आहे. वायूंचे शोषण करण्याच्या या क्षमतेमुळेच ब्लॅक व स्पंजरूप प्लॅटिनम हे दोन्ही प्रकार उत्प्रेरक (रासायनिक विक्रियेत स्वतः भाग व घेता तिचा वेग बदलणारा पदार्थ) म्हणून अत्यंत क्रियाशील आहेत. प्लॅटिनिक क्लोराइड विद्रावात ॲस्बेस्टस तंतू भिजवून, वाळवून व मुशीत अल्प अमोनियम क्लोराइडाबरोबर तापवून वा सोडियम फॉर्मेट विद्रावाने क्षपण करून प्लॅटिनमयुक्त ॲस्बेस्टस तयार करतात. पाण्यातील प्लॅटिनम तारेमधून वारंवार लहान लहान विद्युत् प्रज्योती पाठवून करडा कलील (अतिसूक्ष्म कण लोंबकळत असलेला) प्लॅटिनम विद्राव तयार करता येतो. प्लॅटिनमाची (ज्यात एक मध्यवर्ती अणू वा आयन-विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट आणि त्याच्या भोवती आयनांचे अथवा रेणूंचे गट असलेली) संयुगे तयार होतात. ही संयुगे धनायनाचे (विद्युत् प्रवाहाने घटक अलग करताना धन अग्राकडे जाणाऱ्या व ऋण विद्युत् भारित असलेल्या आयनाचे) व ऋणायनाचे (ऋण अग्राकडे जाणाऱ्या धन विद्युत् भारित आयनाचे) कार्य करतात. ह्या संयुगांत प्लॅटिनम आयन मध्यवर्ती असून इतर आयन त्याला जोडलेले असतात [उदा., क्लोरोप्लॅटिनिक अम्ल, H2PtCl6 बेरियम टेट्रासायानोप्लॅटिनेट, BaPt(CN)4]. धनायनी जटिल संयुगे महत्त्वाची आहेत.
संयुगे: सर्वसामान्यतः प्लॅटिनम संयुगे ही २ आणि ४ संयुजेची असतात. तथापि १,३,५ आणि ६ संयुजांची संयुगेही आढळतात. प्लॅटिनम सायनाइड [Pt(CN)2] हे स्थिर, पिवळे आणि पाण्यात अविद्राव्य (न विरघळणारे) असलेले चूर्ण आहे. पोटॅशियम टेट्रासायानोप्लॅटिनेट [K2Pt(CN)4·3H2O] हे पिवळे स्फटिकरूप असून ते गरम पाण्यात सहज विद्राव्य आहे. बेरियम टेट्रोसायानोप्लॅटिनेट [BaPt(CN)4·4H2O] याचे जांभळट निळे-निळसर हिरवे एकनताक्ष स्फटिक असून अनुस्फुरक (ज्यावर प्रारण-तरंगरूपी ऊर्जा-पडल्यावर प्रकाश उत्सर्जित होतो अशा) क्ष-किरण पडद्यासाठी वापरतात.
प्लॅटिनस क्लोराइड (डायक्लोराइड, PtCl3) हे हिरवट करडे घनरूप असून पाण्यात अविद्राव्य आहे. याच्यापासून टेट्राक्लोरोप्लॅटिनेट लवणे तयार करतात. ट्रायक्लोराइड (PtCl3) हे अती गडद हिरवे घनरूप असून पाण्यात विद्राव्य आहे. टेट्राक्लोराइड (PtCl4) हे करडे घनरूप व जलाकर्षी असून पाण्यात विद्राव्य आहे. हे क्लोरीन वायूत ३६०° से.ला तापवून व हायड्रोक्लोरिक अम्ल घालून बऱ्याच वेळ बाष्पीभवन करून हेक्झॅक्लोरोटिप्लॅनिक अम्ल (क्लोरोप्लॅटिनिक अम्ल, H2PtCl6·6H2O) तयार करतात. यापासूनच बहुतेक सर्व प्लॅटिनम संयुगे तयार करतात. यांशिवाय टेट्राफ्ल्युओराइड (PtF4), हेक्झॅफ्ल्युओराइड (PtF6), डाय, ट्राय व टेट्रो-ब्रोमाइड व आयोडाइडे आणि ब्रोमोप्लॅटिनस व ब्रोमोप्लॅटिनिक अम्ले तयार करतात.
टेट्रोनायट्रोप्लॅटिनिक अम्ल [H2Pt(NO2)4] व टेट्रोनायट्रोप्लॅटिनेट, डायनायट्रोडाय-अमाइन प्लॅटिनम [Pt(NO2)2·(NH3)2], सल्फाइडे (PtSPtS2) व थायोसायानो संयुगेही तयार करतात.
पोटॅशियम क्लोरोप्लॅटिनेट व क्षारीय (अल्कलाइन) हायड्रॉक्साइड यांची विक्रिया केल्यास प्लॅटिनस हायड्रॉक्साइडाचे [Pt(OH)2] काळे चूर्ण मिळते. हे ऑक्सि-अम्लांत अविद्राव्य आहे पण सल्फ्यूरिक व हायड्रोक्लोरिक अम्लांत विरघळते. याच्यापासून प्लॅटिनस लवणे मिळतात. क्षारीय हायड्रॉक्साइड व प्लॅटिनस हायड्रॉक्साइड तापविल्यास प्लॅटिनम धातू व प्लॅटिनम ऑक्साइड (PtO2) तयार होतो आणि प्लॅटिनस हायड्रॉक्साइड हळूहळू तापविले, तर प्लॅटिनस ऑक्साइड (PtO) तयार होतो.
प्लॅटिनम टेट्राक्लोरोइड विद्रावात पोटॅशियम हायड्रॉक्साइडाचा उकळता विद्राव मिसळल्यास प्लॅटिनिक हायड्रॉक्साइडाचा [Pt(OH)4] साका मिळतो. यापासून प्लॅटिनिक लवणे मिळतात.
मिश्रधातू : प्लॅटिनम ही मऊ व तन्य धातू असल्याचे तीत प्लॅटिनम गटातील इतर धातू वा क्षार धातू मिसळून जास्त बलाची मिश्रधातू मिळवितात. प्लॅटिनम गटातील धातूंपैकी ऱ्होडियम, इरिडियम व रूथेनियम या अल्प प्रमाणात मिसळल्यास प्लॅटिनम कठीण होते. ऱ्होडियम मिसळल्यास मिळणारी मिश्रधातू कमी महत्त्वाची असली, तरी या मिश्रधातूचे इतर मिश्रधातूंपेक्षा उच्च तापमानाला ऑक्सिडीभवन होत नाही. ४०% पर्यंत ऱ्होडियम असणाऱ्या मिश्रधातू उपलब्ध आहेत. १०-२०% ऱ्होडियमयुक्त मिश्रधातू काचनिर्मितीत व काचतंतुनिर्मितीत आणि १०-४०% ऱ्होडियमयुक्त मिश्रधातू उच्च तापमान मोजणाऱ्या तपयुग्मांच्या [→ तापमापन] निर्मितीत, अमोनियाचे ऑक्सिडीकरण करणाऱ्या उत्प्रेरकात व कृत्रिम तंतू तयार करण्याच्या तनित्रात [→ तंतु, कृत्रिम] वापरतात. ३०% पर्यंत इरिडियम असलेल्या मिश्रधातूंचा उपयोग कठीणपणा व गंजप्रतिरोध आवश्यक आहे त्याच ठिकाणी वापरतात. या मिश्रधातू विद्युत् रासायनिक धनाग्रे, विद्युत् संपर्क (एका विद्युत् संवाहकातून दुसऱ्या संवाहकात विद्युत् प्रवाह जाण्यासाठी त्याच्या ज्या भागांचा स्पर्श साधण्यात येतो ते भाग), दागिने, शस्त्रक्रिया उपकरणे, रोगनिवारणासाठी शरीरात बसविण्याच्या साधनांत, लांबी व वजन यांची मानके इत्यादींसाठी वापरतात. प्लॅटिनमाचा कठीणपणा वाढविण्यात रूथेनियम धातू फार प्रभावशाली आहे. ही मिश्रधातू विद्युत् संपर्कासाठी वापरतात. क्षार धातुयुक्त मिश्रधातू काही खास उपयोगांसाठी वापरतात. ४% टंगस्टनयुक्त मिश्रधातू अवजड विमानांच्या ठिणगी गुडदीसाठी (स्पार्क प्लगसाठी) वापरतात व २३% कोबाल्टयुक्त मिश्रधातू चिरचुंबकासाठी वापरतात. यांशिवाय सोने, चांदी, तांबे, पोटॅशियम, सोडियम, शिसे इ. धातूंबरोबर प्लॅटिनमाच्या मिश्रधातू होतात. प्लॅटिनम-शिसे मिश्रधातू नायट्रिक अम्लात विरघळतात. सोडियम व पोटॅशियम यांबरोबरच्या तिच्या मिश्रधातू सहज वितळतात.
उपयोग : प्लॅटिनमाचा महत्त्वाचा उपयोग उत्प्रेरक म्हणून होतो. प्लॅटिनम उत्प्रेरक म्हणून ⇨ हायड्रोजनीकरण, हायड्रोजननिरास (हायड्रोजन काढून टाकण्याची विक्रिया), ⇨समघटकीकरण, वलयीकरण (खुल्या शृंखलेच्या रूपातील हायड्रोकार्बनाचे बंद वलयाच्या रूपातील संयुगात रूपांतर करणे), ऑक्सिडीकरण इ. विविध रासायनिक विक्रियांमध्ये वापरतात. विशेषतः ऑक्सिजन वा हायड्रोजन वायूचा समावेश असलेल्या विक्रियांमध्ये तिचा चांगला उपयोग होतो. ॲल्युमिनियम ऑक्साइडावरील प्लॅटिनमाच्या सूक्ष्म कणांचा गॅसोलिनाचा ऑक्टेन अंक [→ अंतर्ज्वलन-एंजिन] वाढविण्यासाठी, तसेच खनिज तेलापासून बेंझीन व टोल्यूइन तयार करण्यासाठी उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात. प्लॅटिनम-ऱ्होडियम मिश्रधातूच्या जाळ्या अमोनियाचे उत्प्रेरकी ऑक्सिडीकरण करून नायट्रिक अम्ल तयार करण्यासाठी वा नायट्रोजनाची ऑक्साइडे मिळविण्यासाठी, तसेच मिथेनाच्या उपस्थितीत हायड्रोसायानिक अम्ल तयार करण्यासाठी वापरतात. सल्फर डाय-ऑक्साइडाचे ऑक्सिडीकरण करून सल्फ्यूरिक अम्ल मिळविण्याच्या जुन्या पद्धतीत प्लॅटिनमाचा उत्प्ररक म्हणून मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येत होता. पण आता त्याऐवजी व्हॅनेडियम ऑक्साइड व अन्य पदार्थ वापरण्यात येतात. प्रयोगशाळेत कार्बनी संयुगांचे हायड्रोजनीकरण वा क्षपण करण्यासाठी प्लॅटिनम उत्प्रेरक वापरतात. कार्बन मोनॉक्साइडाचा ऑक्सिजनाशी संयोग घडवून आणून त्याचे कार्बन डाय-ऑक्साइडात रूपांतर करण्यासाठी, नायट्रो गटांचे (NH2–) क्षपण करण्यासाठी, वायुप्रवाहातून नायट्रोजन ऑक्साइड काढून टाकण्याकरिता त्याची हायड्रोजनाशी विक्रिया घडवून आणण्यासाठी इ. विक्रियांसाठीही प्लॅटिनमाच्या उत्प्रेरकी गुणधर्माचा उपयोग करण्यात येतो. रासायनिक विक्रियांपासून सरळ विद्युत् निर्मिती करणाऱ्या ⇨इंधन-विद्युत् घटात उत्प्रेरक म्हणून प्लॅटिनमाचा उपयोग करतात. प्लॅटिनमाच्या रासायनिक अक्रियतेचा उपयोग प्रयोगशाळेतील व रासायनिक उद्योगातील अनेक उपकरणांमध्ये करण्यात येतो. उदा., ⇨उत्ताप विच्छेदनात (केवळ उष्णतेचा उपयोग करून जटिल रेणूचे साध्या घटकांत तुकडे पाडण्याच्या प्रक्रियेत) वापरण्यात येणारी सामग्री, विक्रियापात्रांचे अस्तर.
काच उद्योगात प्लॅटिनम (शुद्ध रूपात किंवा मिश्रधातू रूपात) उच्च तापमानाला वितळलेली काच ठेवण्यासाठी, ती ढवळण्यासाठी व वाहून नेण्यासाठी वापरतात. उच्च तापमानाला स्फटिक (उदा., माणिक) तयार करण्यासाठी प्लॅटिनम पात्रे वापरतात. यांशिवाय तापमानासाठी वापरण्यात येणारी तपयुग्मे व रोध तापमापके, तसेच विद्युत् भट्ट्यांतील रोध गुंडाळ्या यांसाठी प्लॅटिनमाचा उपयोग करतात. प्लॅटिनमाचा विद्युत् रोध व त्याचा तापमान गुणांक (तापमानानुसार विद्युत् रोध बदलण्याची त्वरा) इतर धातूंच्या मानाने उच्च असल्यामुळे अतिशय शुद्ध प्लॅटिनमाच्या तारेच्या विद्युत् रोधावरून अचूक तापमापन करता येते. यामुळे आंतरराष्ट्रीय तापक्रमातील –१८२·९७° से. ते ६३०·५° से. या दरम्यानची तापमाने प्लॅटिनम रोध तापमापकाने आणि ६५०·५° से. ते १,०६३° से. या दरम्यानची तापमाने प्लॅटिनम व प्लॅटिनम (९०%) – ऱ्होडियम (१०%) मिश्रधातू यांच्या तारांनी बनविलेल्या तपयुग्माने मोजावीत, अशी शिफारस करण्यात आलेली आहे.
प्लॅटिनम व तिच्या मिश्रधातूंच्या मुशी व अशा उच्च तापमानाला पदार्थ तापविण्यासाठी प्रयोगसाळेत वापरतात. तथापि याबाबत कार्बन, फॉस्फरस, सिलिकॉन, शिसे, आर्सेनिक व अँटिमनी यांच्या प्लॅटिनमावर होणार्या दुष्परिणामांसंबंधी काळजी घेणे इष्ट ठरते.
विद्युत् उद्योगात प्लॅटिनमाचा विद्युत् संपर्कासाठी, ज्या ठिकाणी विद्युत् ठिणगी पडते अशा बिंदूसाठी, तसेच विद्युत् रोधक तारांसाठी उपयोग करतात. याची कारणे प्लॅटिनमाचा कमी संपर्क रोध, उच्च तापमानाला विद्युत् प्रज्योतीमुळे होणाऱ्या रासायनिक परिणामाला टिकून राहण्याची क्षमता ही आहेत. विद्युत् दिव्यांत पूर्वी प्लॅटिनमाची तार वापरीत असत.
प्लॅटिनम इतर द्रव्यांबरोबर त्यांचे संरक्षण करण्यासाठी वा त्यांचा आधार द्रव्य म्हणून उपयोग करण्यासाठी वापरतात. आर्थिक कारणासाठी वा प्लॅटिनम व आधार द्रव्य या दोहोंच्या गुणधर्माचा उपयोग करण्यासाठी अशा संयोगांचा वापर करतात. उदा., इलेक्ट्रॉन नलिकेतील जालकाग्र तारांसाठी प्लॅटिनम टंगस्टनावर आच्छादित केलेले असते. येथे प्लॅटिनम ही तिच्या उच्च तापायनिक कार्यफलनाकरिता व तिच्यामुळे तारेमधून होणारे द्वितीयक उत्सर्जन कमी होते म्हणून आणि टंगस्टन ही तिच्या उच्च तापमानाला टिकण्याच्या क्षमतेकरिता वापरतात.[ → इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति].
हायड्रोजन पेरॉक्साइड, तसेच इतर धातूंच्या विद्युत् अग्रांचे क्षरण (झीज) करणारी तीव्र ऑक्सिडीकारक लवणे व अम्ले विद्युत् विच्छेदनाने (विद्युत् प्रवाहाच्या साहाय्याने विद्रावातील पदार्थाचे घटक अलग करण्याच्या क्रियेने) तयार करण्यासाठी प्लॅटिनम विद्युत् अग्रे वापरतात. रासायनिक विश्लेषणातील परिमाणात्मक विद्युत् विलेपन प्रक्रियांमध्ये प्लॅटिनमाची विद्युत् अग्रे वापरतात.
दागिने व दात भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिश्रधातू तयार करण्यासाठी प्लॅटिनमाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. लांबीचा आंतरराष्ट्रीय मानक मीटर व वस्तुमानाचा मानक किलोग्रॅम, तसेच अनेक देशांतील या मानकांच्या प्रती प्लॅटिनम (९०%) व हरिडियम (१०%) यांच्या मिश्रधातूच्या बनविलेल्या आहेत. प्रयोगशाळेतील उत्तम दर्जाची वजने प्लॅटिनमाने विद्युत् विलेपित केलेली असतात.
अभिज्ञान: (अस्तित्व ओळखणे). रासायनिक दृष्ट्या प्लॅटिनम गटातील धातू सारख्याच असल्याने त्यांचे अभिज्ञान गुंतागुंतीचे असते. खनिज निक्षेपातील प्लॅटिनमासाठी विशिष्ट आमापन पद्धतीचा [→ धातु आमापन] प्रथम वापर करून नंतर वर्णपटवैज्ञानिक पद्धतीने [→ वर्णपटविज्ञान] प्लॅटिनमाचे अस्तित्व ओळखतात. खनिजात सल्फाइड असल्यास ते प्रथम वेगळे करतात. जेव्हा अल्प प्रमाणतील प्लॅटिनमाचे अस्तित्व ओळखावयाचे असते, तेव्हा वर्णमापन पद्धतीचा [→ वर्ण व वर्णमापन] वापर करतात. या पद्धतीत प्लॅटिनम संयुगे स्टॅनस क्लोराइडाबरोबर लाल रंग दाखवितात. तसेच वर्णपट प्रकाशमापन पद्धतीचाही [→ प्रकाशमापन] वापर करतात [→ वैश्लेषिक रसायनशास्त्र].
संदर्भ : 1. Griffitch, W. P. The Chemistry of the Rarer Platinum metals, New York, 1968.
2. McDonald, D. A History of Platinum, London, 1960.
3. Parks, G. D., Ed,. Mellor’s Modern Inorganic Chemistry, London, 1961.
4. Partington, J. R. General and Inorganic Chemistry, New York, 1966.
5. Wise, E. M. Vines, R. The Platinum Metals and their Alloys, New York, 1941.
मिठारी, भू. चिं.
“