प्रोलीन : एक ⇨ ॲमिनो अम्ल. रेणवीय सूत्र (रेणूतील अणूंचे प्रकार व त्यांच्या संख्या दर्शविणारे सूत्र) C5H9NO2. संरचना सूत्र (रेणूतील अणूंची मांडणी दर्शविणारे सूत्र) खालीलप्रमाणे आहे.

प्रोलिनाची

२- पायरोलिडीन कार्‌बॉक्सिलिक अम्ल या नावानेही ते ओळखले जाते. रिखार्ट व्हिल्श्टेटर यांनी १९०० साली ते कृत्रिम रीत्या तयार केले. १९०१ मध्ये एमील फिशर यांनी केसिनाचे जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रियेने संयुगाच्या रेणूचे तुकडे करण्याची क्रिया) करून प्रोलीन मिळविले. इतर अमिने अम्लांप्रमाणे प्रोलिनात अँमिनो गट (-NH2) नसतो, तर त्यामध्ये इमिनो गट (=NH) असतो.

बहुतेक सर्व प्रथिनांत प्रोलीन आढळते. गव्हाच्या कोंड्यातील ग्लायडीन, बार्लीमधील होर्डेन व मक्यातील झाईन या प्रथिनांमध्ये नैसर्गिक स्वरूपात प्रोलीन आढळते. कोलॅजेनामध्ये प्रोलिनाचे प्रमाण १० ते १५% असते. कोलॅजेनाला प्रोलीन, हायड्रॉक्सिप्रोलीन आणि ग्लायसिन ह्या ॲमिनो अम्लांमुळे विशिष्ट गुणधर्म प्राप्त होतात.

प्रकाशीय दृष्ट्या प्रोलिनाची तीन रूपे आढळतात : L प्रकार, D प्रकार व रॅसेमिक. जैव दृष्ट्या यांतील L प्रकार महत्त्वाचा आहे. त्याचेच येथे वर्णन केले आहे. L प्रोलिनाच्या भौतिक स्थिरांकाची २५° से. ला असणारी मूल्ये पुढीलप्रमाणे आहेत.

pK1 (COOH): १·९९ p K2 (NH3+):१०·९६.

समविद्युत् भार बिंदू : ६·३०.

प्रकाशीय वलन

: [α] D

(पाण्यात) –८६·२

: [α] D

(५ सममूल्यी हायड्रोक्लोरिक अम्लात)

–६०·४.

विद्राव्यता : ग्रॅम/१०० मिलि. पाण्यात) अती विद्राव्य.

प्रोलिनाच्या प्रकारांच्या व वरील भौतिक स्थिरांकाच्या स्पष्टीकरणाकरिता ‘ॲमिनो अम्ले ’ या नोंदीतील ‘भौतिक गुणधर्म’ हा परिच्छेद पहावा.

पोषणाच्या दृष्टीने प्रोलीन मानव व इतर सस्तन प्राण्यांच्या आहारात नसले तरी चालते कारण कार्बोहायड्रेट चयापचयापासून (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडींपासून) ग्लुटामिक अम्ल व त्यापासून पुढे प्रोलीन तयार होते. मानवी रक्त व कोशिका (पेशी) यांत ते मुक्त स्वरूपात बऱ्याच प्रमाणात व काही कीटकांच्या शरीरातील परिवहन द्रवात ते ६०० मिग्रॅ. प्रतिशत आढळते. ग्लुटामिक अम्लापासून प्रोलीन एंझाइमांच्या (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिन पदार्थाच्या) साहाय्याने तयार होते. अशा एंझाइमांच्या अभावामुळे ‘प्रोलिनिमिया’ ही क्वचित आढळणारी आनुवांशिक विकृती निर्माण होते. या विकृतीत रक्तातील आणि मूत्रातील प्रोलिनाचा प्रमाण बरेच उच्च असते व ते वाढतच राहते. त्यामुळे रोग्याला मानसिक प्रगतीत अडथळा येणे व वृक्कविकार (मूत्रपिंड विकार) यांचा त्रास होण्याची शक्यता असते.

निनहायड्रिनाबरोबर प्रोलिनाची विक्रिया होऊन पिवळा रंग येतो, तर ॲसिटोनाबरोबर विक्रिया होऊन निळा रंग येतो. या गुणधर्माचा उपयोग ⇨ वर्णलेखनाने प्रोलीन अलग करण्यासाठी करण्यात येतो. प्रोलिनाचे हायड्रॉक्सिलीकरण (हायड्रॉक्सिल गट OH संयुगात समाविष्ट होण्याची क्रिया) होऊन हायड्रॉक्सिप्रोलीन तयार होते. प्रोलीन पोटात गेल्यावर त्याचे ग्लुटामिक अम्लात रूपांतर होते.

३, ४-डीहायड्रोप्रोलीन, ॲझेटिडीन-२ कार्‌बॉक्सिलिक अम्ल इ. संयुगे प्रोलिनाच्या कार्याला प्रतिरोध करणारी आहेत.

रानडे, अ. चिं.