प्रोम : प्ये. ब्रह्मदेशाच्या पेगू विभागातील प्रोम जिल्ह्याचे प्रशासकीय आणि व्यापार – दळणवळणाचे केंद्र. लोकसंख्या १,४८,१२३ (१९७३ अंदाज). हे रंगूनच्या वायव्येस सु. २६० किमी. इरावती नदीकाठी वसले आहे. इ. स. तिसऱ्या शतकानंतर येथे आलेल्या प्यू लोकांच्या जुन्या राजधानीवरून ब्रह्मी लोक प्रेमाला ‘प्ये’ असेही संबोधतात. प्यू लोकांनी इरावती नदीच्या खोऱ्यात वस्ती केली. हरिविक्रम नावाच्या त्यांच्या राजाने प्रोमच्या आग्नेयीस ८ किमी. वर श्रीक्षेत्र (वैभव नगरी) ही राजधानी इ. स. सु. ६३८ मध्ये वसविली असे मानतात. आठव्या शतकात श्रीक्षेत्र मॉन टोळ्यांच्या हाती पडल्यावर प्यू लोकांनी उत्तरेस नवीन शहर वसविले ते सध्याचे ‘प्रोम’ असावे. १०५६ मध्ये ब्रह्मी लोकांनी प्रोम हे आपले मुख्य केंद्र बनविले. १८२५ मध्ये ब्रिटिशांनी ते जिंकले.

प्रोम शहरात रेशमी कापड, लाखेच्या वस्तू, नक्षीकामयुक्त पेट्या, कागद इ. बनविण्याचे उद्योग चालतात. अनव्रथ राजाने १०५७ मध्ये बांधलेला येथील श्वेशांडो पॅगोडा प्रसिद्ध आहे. या पॅगोडाच्या तीन दारांवर हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत. श्रीक्षेत्रचे सांप्रतचे स्थान ‘ह्यावझा’ या नावाने ओळखले जाते. विसाव्या शतकात येथे झालेल्या उत्खननांतून प्यू संस्कृतीचे वैशिष्ट्यपूर्ण पुरावे उपलब्ध झाले आहेत.

गाडे, ना. स.