प्रोकोपिअस : (इ. स. ६ वे शतक). प्राचीन बायझंटिनचा प्रसिद्ध इतिहासकार. त्याचा जन्म सीझारीआ (पॅलेस्टाइन) येथे इ. स. ४९० ते ५०७ च्या दरम्यान केव्हातरी झाला असावा, असे मानले जाते. सीझारीआ येथे पारंपारिक शिक्षण पूर्ण केल्यावर गाझा येथे त्याने अलंकारशास्त्र व कायदा यांचा अभ्यास केला. पुढे तो वकिली करण्यासाठी कॉन्स्टॅंटिनोपल येथे गेला. तिथे त्याचा लौकिक वाढला आणि बेलिसेरिअस या जस्टिनियन राजाच्या तरुण सेनापतीचा कायदेविषयक सल्लागार व सचिव म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली (इ. स. ५२७). त्याने बेलिसेरिअसबरोबर पहिले इराणी युद्ध (इ. स. ५२७-५३१), गॉथविरुद्धची मोहीम (इ. स. ५३६), व्हँडाल्सविरुद्धचे युद्ध (इ. स. ५४१) यांसारख्या अनेक लष्करी मोहिमांत भाग घेतला. यामुळे त्यास आफ्रिका, इटली वगैरे प्रदेश पाहता आले. त्याने अनेक घटनांसंबंधीची प्रत्यक्ष माहिती व साधने जमविली होती. या त्याच्या कामगिरीमुळे त्याच्याकडे नाविक दलाचे नेतृत्वही काही काळ देण्यात आले आणि पुढे त्यास कॉनस्टँटिनोपलचा अंमलदार (प्रीफेक्ट) करण्यात आले (इ. स. ५६२). यांशिवाय अखेरच्या दिवसांत त्याला अनेक मानसन्मान व मानाच्या जागा देण्यात आल्या असाव्यात. तो इ. स. ५६३ नंतर कॉन्स्टॅंटिनोपलमध्ये मरण पावला असावा, असे समजण्यात येते.
प्रोकोपिअसने विविध मोहिमांच्या निमित्ताने जमविलेल्या साधनसामग्रीच्या आधारे तीन महत्त्वाचे ऐतिहासिक ग्रंथ ग्रीक भाषेत लिहिले. पॉलमोन (इं. भा. द. हिस्टरी ऑफ द वॉर्स) अनिकडोट हिस्टोरिया अर्कान (इं. भा. सीक्रेट हिस्टरी) आणि पेरी तिसमातोन (इं. भा. बिल्डिंग). पहिल्या ग्रंथात जस्टिनियन राजाच्या एकूण सर्व लढायांचे उदा., इराणी युद्धे, व्हँडाल्सवरील स्वाऱ्या, गॉथिक युद्धे इ. तपशीलवार वर्णन आठ खंडांत केले आहे. त्यांपैकी पहिले सात खंड इ. स. ५५० मध्ये प्रसिद्ध झाले व उरलेला इ. स. ५५३ मध्ये प्रसिद्ध झाला. तिसऱ्या ग्रंथात जस्टिनियन राजाच्या कारकीर्दीत बांधलेल्या वास्तू व सार्वजनिक कार्य यांचा वृत्तांत आहे. ही सर्व माहिती राजाच्या दफ्तरखान्यातील अधिकृत साधनांवर आधारित असून, भौगोलिक दृष्टीने महत्त्वाची आहे. दुसरा ग्रंथ पहिल्या ग्रंथाचाच पुरवणीवजा भाग असून तो मुळात गुप्त ठेवण्यात आला होता. कारण लेखकाने जस्टिनियन व त्याची राणी थीओडोर तसेच सेनापती बेलिसेरिअस व त्याची बायको अँटन्सीन यांवर टीका केली आहे. राजाच्या भीतिपोटी त्याने ही माहिती प्रसिद्ध केली नसावी. यामुळेच त्या ग्रंथाच्या विश्वसनीयतेबद्दल शंका व्यक्त करण्यात येते. याशिवाय तत्कालीन धार्मिक स्थितीवरही त्याने लेखन केले असावे, असा तंज्ञाचा कयास आहे.
बायझंटिन साम्राज्याचा सविस्तर व विश्वसनीय इतिहास लिहिण्यास वरील तीन ग्रंथांची साधन-सामग्री अत्यंत उपयुक्त मानली जाते. पॉलिबिअसनंतरच्या दर्जेदार व विश्वसनीय इतिहासकारांत प्रोकोपिअसचा क्रमांक लागतो. त्याने बहुधा आपल्यासमोर थ्युसिडिझचा आदर्श ठेवून त्याचे अनेक स्थळी अनुकरणही केले आहे. ग्रीक इतिहासलेखनाची अभिजात परंपरा आणि ख्रिस्ती मठांतील वृत्तांतलेखनाचा वारसा या दोहोंचा ठसा सहाव्या शतकातील बायझंटिन इतिहासवेत्त्यांवर उमटलेला दिसतो. प्रोकोपिअसचे लेखनही यास अपवाद नाही.
संदर्भ : Evans, J. A. S. Procopius,
देशपांडे, सु. र.