हेमाद्री : (इ. स. तेरावे शतक) . यादवकालीन एक व्युत्पन्नसंस्कृत पंडित, मंत्री आणि धर्मशास्त्रकार. हेमाडी पंडित वा हेमाडपंतया नावानेही त्याचा कोरीव लेखांत उल्लेख आढळतो. त्याच्या पूर्व आयुष्याबद्दल फारशी माहिती ज्ञात नाही परंतु तत्कालीन कोरीव लेखांवरून त्याचा काळ स्थूलमानाने १२५०–१३०० वा १३१० असा धरला जातो. त्याच्या ⇨ चतुर्वर्गचिंतामणि या ग्रंथात आणि ठाणे येथे उपलब्ध झालेल्या लेखांतून त्याच्याविषयी तसेच यादव वंशाविषयीमाहिती मिळते. त्यानुसार कामदेव हे त्याच्या पित्याचे नाव व वासुदेवहे आजोबा होत. तो वत्सगोत्री, शुक्लयजुर्वेदी, पंचप्रवरी ब्राह्मणहोता. चतुर्वर्गचिंतामणि या ग्रंथाच्या व्रतखंडात यादव घराण्याची माहिती असून या खंडाच्या राजप्रशस्तीत त्यांची वंशावळ आढळते.
कृष्ण (कार. १२४६ – ६१), महादेव (कार. १२६१–७०) व रामदेवराव (कार. १२७१–१३११) या यादव राजांच्या कारकिर्दीत तो अनुक्रमे मंत्रीन्द्रचूडामणी, सकलकरणाधिप, महाप्रधान या प्रतिष्ठित पदांवर होता आणि शाही दप्तरखान्याचा प्रमुखही होता. शिवाय तो सेनापती म्हणून अनेक युद्धांत सहभागी असल्याचे उल्लेख आढळतात. पूर्वमीमांसा, स्मृती व धर्मसूत्रे यांतील आचारधर्माचा व व्रतादिकांचा तो कट्टर पुरस्कर्ता होता. त्यासाठी त्याने चतुर्वर्गचिंतामणि हा विश्वकोश सदृश बृहद्ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे व्रत, दान, तीर्थ व मोक्ष असे चार खंड असून शिवाय परिशेष नावाचा पाचवा पुरवणी खंड आहे. या ग्रंथातील कर्मकांड, विधिविधाने, देवदेवता, तीर्थक्षेत्रे, प्रतिमाप्रतीके इ. माहिती ऐतिहासिक, सामाजिक व धार्मिक दृष्ट्या विशेष महत्त्वाची ठरते. चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथाची रचना करताना हेमाद्रीने संदर्भासाठी वापरलेले ग्रंथ व ग्रंथकारांची यादी पाहिल्यानंतर त्याच्या प्रकांड पांडित्याची कल्पना येते तथापि राज्यकारभार आणि ग्रंथाची व्याप्ती पाहता त्याने अन्य पंडितांचे सहकार्य घेतले असावे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय त्याने शौनकाच्या प्रणवकल्पा या ग्रंथावर टीकाग्रंथ लिहिला असून बोपदेवाच्या मुक्ताफल या ग्रंथावर कैवल्यदीपिका नावाचा टीकाग्रंथ लिहिला. याशिवाय त्याने रघुवंशांवर दपर्ण नामक टीका लिहिली असावी, असे काही विद्वान म्हणतात. बोपदेव हा त्याचा मित्र व सहाध्यायी होता. त्याच्या अन्य ग्रंथांत कालनिर्णय, कालनिर्णयसंक्षेप, तिथिनिर्णय, आयुर्वेद-रसायन, दानवाक्यावली, पर्जन्यप्रयोग, प्रतिष्ठालक्षण समुच्चय, हेमाद्रिनिबंध, त्रिस्थलविधी, अर्थकांड, हरिलीला इ. लहान-मोठ्या ग्रंथांचा उल्लेख आढळतो. आयुर्वेदरसायन ही वाग्भटांच्या अष्टांगहृदयावरची टीका होय. हिंदू धर्मशास्त्राच्या संदर्भात त्याचा व्रतखंड प्रमाणभूत मानण्यात येतो. यादवांच्या दप्तरखान्यास त्याने एक शिस्त लावली होती. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी हेमाद्रीने देणगी दिल्याचा उल्लेख चौऱ्यांशीच्या लेखात आढळतो. त्याने अनेक मंदिरे बांधल्याची वा बांधण्यास उत्तेजन दिल्याची वदंता आहे. त्यावरूनच हेमाडपंती (हेमाडपंथी) वास्तुशैली ही संकल्पना महाराष्ट्रात रूढ झाली असावी. हेमाद्रीने मोडी लिपीचा शोध लावला. त्यावरून त्यास मराठी भाषा येत असावी, असे काहींचे म्हणणे आहे तथापि याबाबतीत संशोधकांत मतैक्य नाही. मोडीचे वळण हेमाडपंताच्या पूर्वीपासूनचे असावे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे मात्र मोडी लेखनाचा प्रभाव उत्तरकालीन मराठी लेखांतून आढळतो.
पहा : चतुर्वर्गचिंतामणि यादव घराणे हेमाडपंती वास्तुशैली.
संदर्भ : १. पाध्ये, केशवआप्पा, हेमाद्री ऊर्फ हेमाडपंत यांचे चरित्र, पुणे, २००४.
२. पानसे, मु. ग. यादवकालीन महाराष्ट्र, मुंबई, १९६३.
३. भावे, श्री. मा. कुलकर्णी, बी. डी. संपा. त्रैमासिक : भारत इतिहास संशोधक मंडळ, खंड ८९, जुलै २०१२ ते एप्रिल २०१३, पुणे.
देशपांडे, सु. र.
“