प्रेस्कट, विल्यम हिकलिंग : (४ मे १७९६ – २८ जानेवारी १८५९). अमेरिकन इतिहासकार. त्याचा जन्म सधन व सुसंस्कृत घराण्यात सेलेम (मॅसॅ.) येथे झाला. त्याचे वडील न्यायाधीश असून अमेरिकन संघराज्याच्या जनकांपैकी (फौर्डिंग फादर्स) एक होते. विल्यमने हार्व्हर्ड विद्यापीठातून पदवी घेतली (१८१४). विद्यार्थिदशेत एका अपघातात त्याचा डावा डोळा अधू झाला होता. त्याच्या उपचारार्थ यूरोपातील काही देशांत प्रवास करून (१८१५ – १७) तो बॉस्टन या मूळ गावी परतला. त्याचा वर्गमित्र जॉर्ज टिकनर याने त्यास स्पॅनिश वसाहतीविषयक अभ्यासास उद्युक्त केले. विल्यमने वाङ्मयीन चर्चेसाठी ‘द क्लब रूम’ ही संस्था काढली. तिच्यातर्फे एक प्रकाशनही सुरू झाले. त्यामधून तो लेखन करी. १८२० साली त्याने स्यूझन एमोरी या युवतीशी विवाह केला.
या सुमारास स्पेनच्या इतिहासावर अनेक विद्वान मंडळी संशोधन करीत होती. प्रेस्कटने साधनसामग्री संकलित करून फर्डिनांट अँड इझाबेला (३ खंड – १८३७) हा ग्रंथ प्रसिद्ध केला. या ग्रंथामुळे त्याचा इतिहासकार म्हणून लौकिक झाला. द काँक्वेस्ट ऑफ मेक्सिको (३ खंड – १८४३) हा ग्रंथ म्हणजे एक गद्य महाकाव्य समजण्यात येते. त्यात अनेक रोमांचकारी कथा आहेत. यानंतर त्याने ए हिस्टरी ऑफ द काँक्वेस्ट ऑफ पेरू (३ खंड – १८४७) हा ग्रंथ लिहिला. इंका संस्कृतीवरील हा एक अधिकृत ग्रंथ मानला जातो. यानंतर त्याने ए हिस्टरी ऑफ द रेन ऑफ फिलिप द सेकंड या मोठ्या इतिहासलेखन प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले आणि दुसऱ्या फिलिपच्या नियोजित इतिहासाचे तीन खंड प्रसिद्ध केले (१८५५ -५८). या ग्रंथात त्याची प्रॉटेस्टंटांबद्दलची पक्षपाती दृष्टी प्रकट झाल्याचे दिसून येते. तत्पूर्वी बॉयॉग्रफिकल अँड क्रिटिकल मिसेलेनिज हा त्याचा आणखी एक ग्रंथ प्रसिद्ध झाला होता (१८४५). दरम्यान त्याचे वडील वारले आणि त्याच्या एकूण जीवनावर एक नैराश्याचे सावट पसरले. यानंतर काही दिवसांतच तो बॉस्टन येथे मरण पावला.
सुरुवातीच्या त्याच्या तीन ग्रंथांची शैली काहीशी कथात्मक असून त्यांत ऐतिहासिक तपशिलांबाबत काटेकोरपणा आढळतो. अमेरिकेच्या वाङ्मयीन इतिहासात या ग्रंथांचा विशेष उल्लेख करण्यात येतो पण नंतरचे त्याचे लेखन फारसे दर्जेदार नाही. त्यात अनावश्यक तपशील अधिक आहेत. आधुनिक पुरातत्त्वीय व पुराभिलेखविद्येच्या संदर्भात त्याचे सर्वच लेखन पुन्हा एकदा तपासले पाहिजे, अशी त्याच्यावर टीका होते तथापि प्रेस्कटचे द काँक्वेस्ट ऑफ मेक्सिको व ए हिस्टरी ऑफ द काँक्वेस्ट ऑफ पेरू हे दोन ग्रंथ अभिजात मानले जातात.
संदर्भ : 1. Gardner, C. H. William Hickling Prescott : a Biography, Austin, 1969.
2. Peck, H. T. William Hickling Prescott, London, 1969.
देशपांडे, सु. र.