प्रेषित : साक्षात परमेश्वराने मनुष्यजातीच्या उद्धाराकरिता ज्या निवडक श्रेष्ठ भक्तांना पहिल्यांदा उपदेश दिला त्यांना प्रेषित म्हणतात. ज्याने धर्म प्रवृत्त करावा अशी ईश्वराची इच्छा असते व तशी धर्मप्रवर्तनाची प्रेरणा ज्याला ईश्वराकडून मिळते, तो प्रेषित होय. ही प्रेषिताची संकल्पना जगातील चार ऐतिहासिक धर्मांना लागू पडते. पारशी, ज्यू (यहुदी), ख्रिस्ती आणि इस्लाम हे ते चार धर्म होत. ⇨जरथुश्त्र हा पारशी धर्माचा प्रेषित होय. याला अहुर मज्दाने म्हणजे परमेश्वराने स्वर्गामध्ये दर्शन देऊन दिव्यज्ञान दिले. यहुदी धर्माचा मुख्य प्रेषित ⇨मोझेस होय. सिनाईच्या वाळवंटी प्रदेशात परमेश्वराने त्याला उपदेश केला व विशेषतः दहा आज्ञा सांगितल्या. या दहा आज्ञा म्हणजे यहुदी धर्माचा गाभा होय. ⇨येशू ख्रिस्त हा ख्रिस्ती धर्माचा प्रेषित होय. हा परमेश्वराचा पुत्र असून मानवजातीला पापातून तारण्याकरिता आणि मानवजातीने केलेल्या पापाचे प्रायश्चित घेण्याकरिता त्याला परमेश्वराने पृथ्वीवर पाठविले. स्वतः येशू ख्रिस्त हाच परमेश्वराच्या धर्मोपदेशरूप शब्दाचे मूर्तिमंत स्वरूप होय. ईश्वराचा उपदेशच जिवंत रूपाने पृथ्वीवर अवतरला, असा याचा अर्थ आहे. इस्लाम धर्माचा संस्थापक ⇨मुहंमद पैगंबर हा होय. पैगंबराला जो उपदेश मिळाला किंवा स्फुरला तो उपदेश ⇨ कुराण या धर्मग्रंथाच्या रूपाने मानवजातीस मिळाला.

हिंदू धर्म हा सनातन धर्म आहे, म्हणजे तो शाश्वत धर्म आहे. तो श्रुतींच्या म्हणजेच वेदांच्या रूपाने सृष्टीच्या प्रारंभीच ब्रह्मादी प्रजापती किंवा विवस्वान, मनू इ. प्रजापतींना आणि सनक, सनंदन इ. सिद्ध पुरुषांना जगताच्या धारणेकरिता परमेश्वराने उपदेशिला. सृष्टिचक्र अनादिकालापासून चालत आहे. म्हणून हा परमेश्वराचा उपदेशही अनादिकालापासून मनुष्यजातीस पुनःपुन्हा प्राप्त होत असतो. म्हणून वरील प्रेषितांचे धर्म हे ऐतिहासिक ठरतात. या प्रेषितांच्या पूर्वीच्या मानवजातीला श्रेष्ठ धर्माचा उपदेश मिळाला नव्हता. तो या प्रेषितांपासूनच मिळू लागला, असे वरील ऐतिहासिक धर्मांमध्ये दिसते. तसे हिंदू धर्माचे नाही. मानवजात उच्च धर्माच्या उपदेशापासून कधीच वंचित नव्हती, असे हिंदू मानतात.

संदर्भ : 1. Scott, R. B. The Relevance of the Prophets, New York, 1944.

२. शंकराचार्य, श्रीमद्‌भगवद्‌गीताभाष्यम्, अष्टेकर प्रत, पुणे, १९१६.

जोशी, लक्ष्मणशास्त्री