प्रिम्युलेलीझ : द्विदलिकित फुलझाडांच्या [⟶ वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] वर्गीकरणात हे नाव एका गणाला दिले असून यातील वनस्पतींच्या फुलांतील पाकळ्या अंशतः किंवा पूर्णतः जुळलेल्या असतात. त्या ⇨ओषधी, क्षुपे (झुडपे) व वृक्ष असतात अनेकदा खोडे जमिनीत असतात. फुले कधी एकाकी (एकएकटी) तर कधी अकुंठित फुलोरे [⟶ पुष्पबंध] असतात. फुले नियमित, द्विलिंगी (क्वचित एकलिंगी), पंचभागी व अवकिंज संदले व प्रदले अंशतः किंवा पूर्णत: जुळलेली केसरदले सुटी पण पाकळ्यांसमोर व त्यांना चिकटलेली क्वचित पाकळ्यांशी एकाआड एक केसरदले किंवा त्यांचे अवशेष, म्हणजे तत्त्वतः ५-५ केसरदले किंजदले जुळलेली, कधी पाचापेक्षा कमी किंवा जास्त किंजपुट ऊर्ध्वस्थ किंवा अर्धवट अधःस्थ आणि त्यात एकच कप्पा (पुटक) [⟶ फूल] बीजके अनेक, केंद्रवर्ती अक्षास चिकटलेली मृदुफळ किंवा शुष्कफळ (बोंड) पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) मांसल किंवा शृंगद्रव्यासारखे असते.
ए. एंग्लर व के. प्रांट्ल यांच्या पद्धतीनुसार या गणात एकूण तीन कुलांचा (प्रिम्युलेसी, थीओफ्रॅस्टेसी, मिर्सिनेसी) समावेश आहे. जी. बेंथॅम व जे. डी. हुकर यांच्या पद्धतीत थीओफ्रॅस्टेसीऐवजी ⇨प्लंबॅजिनेसी कुल (चित्रक कुल) समाविष्ट केले आहे. प्रिम्युलेसी कुलात एकूण २७ वंश व ८५० जाती आहेत व त्या बहुतेक उत्तर समशीतोष्ण कटिबंधात अगर उंच पर्वतावर आढळतात. मिर्सिनेसी कुलात (विडंग कुलात) सु. ३२ वंश व १,००० जाती असून त्या सामान्यतः सर्वत्र आढळतात. थीओफ्रॅस्टेसी कुलात ४-५ वंश असून ते सर्व अमेरिकेतील उष्ण भाग, मेक्सिको व वेस्ट इंडीजमधील आहेत. या गणाचे पूर्वज कॅरिओफायलेलीझ अथवा पाटलपुष्प गणातील असावेत, याबद्दल बहुतेक एकमत आहे. प्रिम्युलेसीतील ⇨प्रिमरोझ शोभेची म्हणून व ⇨बिशकोप्रा औषधी म्हणून उपयोगात आहेत.
परांडेकर, शं. आ.