प्रिन्स, मॉर्टन : (२१ डिसेंबर १८५४ – ३१ ऑगस्ट १९२९). विख्यात अमेरिकन तंत्रिका वैज्ञानिक व मानसोपचारज्ञ. त्यांचा जन्म बॉस्टन येथे झाला. हार्व्हर्ड विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. बॉस्टन येथील रुग्णालयात त्यांनी १८८५ ते १९१३ पर्यंत तंत्रिकाविक्रिया वैद्य म्हणून आणि १९०२ ते १९१२ पर्यंत मेडफर्ड (मॅसॅ.) येथील टफ्टस महाविद्यालयात तंत्रिकाव्याधींचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. त्यानंतर त्यांनी हार्व्हर्ड येथे अध्यापन केले व ‘हार्व्हर्ड सायकॉलॉजिकल क्लिनिक’ची स्थापना केली. जर्नल ऑफ अब्नॉर्मल सायकॉलॉजी (१९०६) हेही त्यांनीच सुरू केले. प्रिन्स हे अपसामान्य मानसशास्त्राचे अमेरिकेतील एक अग्रणी समजले जात होते.
प्रत्येक अनुभवाचा व मानसिक क्रियेचा संस्कार मेंदूवर होत असतो व त्यामुळे गत गोष्टींची स्मृती अबोधपणे मेंदूत साठवलेली असतेच, असे त्यांनी प्रतिपादन केले. वर्तमान परिसरातून पूर्णपणे लक्ष काढून घेऊन ते एखाद्या भूतकालीन क्षणावर केंद्रित केले व त्या क्षणाशी संबंधित असलेल्या स्मृती जर अनिर्बंधपणे येऊ दिल्या तर, एरव्ही न आठवणाऱ्या कितीतरी गोष्टी अचूक, तपशीलवार आठवू लागतात, हे त्यांनी सप्रयोग सिद्ध केले आणि वरील विधानास बळकटी प्राप्त करून दिली. पूर्ण जाणिवेच्या कक्षेत स्थान न लाभलेले अनुभव संमोहित अवस्थेत आठवू लागतात, पूर्वीचे भावनात्मक प्रसंग पुन्हा जसेच्या तसेच घडत असल्यागत व्यक्ती संमोहित अवस्थेत वागू लागते व तिच्या शारीरिक प्रक्रिया तसेच विक्रिया (उदा., वेदना, अंगवध, संवेदनलोप, आचके इ.) पूर्वीच्या त्या प्रसंगी झाल्या तशाच होतात, हेही प्रिन्स यांनी दाखवून दिले. पूर्वी पाहिलेली दृश्ये व ऐकलेले शब्द कधीकधी निर्वस्तुभ्रमाचे रूप धारण करतात आणि पूर्वी मनात येऊन गेलेल्या कल्पना वा इच्छा स्वप्नांमध्ये प्रतीकात्मक रूप घेऊन येतात, या गोष्टीही अबोध मानसिक स्तराचा पुरावा म्हणून प्रिन्स यांनी निदर्शनास आणल्या.
भयविकृतीचे झटके येणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत, त्यांना वर्तमानातून लक्ष काढून घेऊन भूतकालीन क्षणावर ते केंद्रित करण्याची पद्धत (मेथड ऑफ अब्स्ट्रॅक्शन) प्रिन्स यांनी वापरली. झटके येण्याआधीच्या अवस्थेतील तसेच झटका आलेल्या अवस्थेतील व्यक्तीची संवेदने, तिचे विचार व तिने केलेल्या गोष्टी तिला आठवावयास लावायचे आणि तिची भीती अमुक संवेदनाशी वा विचाराशी वा कृतीशी निगडित असल्याचे तिच्या लक्षात आणून द्यावयाचे, अशा प्रकारचे अनेक यशस्वी प्रयोग प्रिन्स यांनी केले.
प्रिन्स यांची विशेष ख्याती झाली ती ‘वियोजन प्रक्रिये’ मुळे. व्यक्तीच्या ठिकाणी दुसऱ्या एका अथवा अनेक व्यक्तिमत्त्वांची निर्मिती होऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी वियोजनाची ⇨प्येअर झाने (१८५९-१९४७) यांची संकल्पना विस्तारपूर्वक स्पष्ट केली व तिच्या आधारे बहुव्यक्तिमत्त्व, स्वयंचलित लेखन (ऑटोमॅटिक राय्टिंग), संवेदनलोप ही कार्यिक विकृती (फंक्शनल ॲनीस्थीसिआ) आणि निद्राभ्रमण या प्रकारांचे स्पष्टीकरण केले. बीचम यांच्या बहुव्यक्तिमत्त्व विकृतीचे प्रिन्स यांनी केलेले वर्णन व उकल खूपच प्रसिद्ध आहे.
प्रिन्स यांचे पुढील ग्रंथ उल्लेखनीय आहेत : डिसोसिएशन ऑफ अ पर्सनॅलिटी (१९०६), द अन्कॉन्शस (१९२१) आणि क्लिनिकल अँड इक्स्पेरिमेंटल स्टडीज इन पर्सनॅलिटी (१९२९).
अकोलकर, व. वि.