प्रामबानान : इंडोनेशियाच्या जावा बेटावरील नवव्या-दहाव्या शतकांतील हिंदू मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेले स्थळ. हे जोगजाकार्ताच्या ईशान्येस सु. २० किमी. जोगजाकार्ता-सुराकार्ता लोहमार्गावर वसले आहे. येथील मंदिरसमूहात ८ मोठी व १४८ लहान मंदिरे आहेत. त्यांपैकी लारा जोंग्रांग हे शिवमंदिर इंडोनेशियातील सर्वांत मोठे व प्रसिद्ध असून, त्याला प्रामबानानचे मंदिर असेही संबोधिले जाते. हे मातारामचा राजा दक्ष याने दहाव्या शतकाच्या सुरुवातीला बांधले, असे समजतात. या मंदिरातच असलेल्या दुर्गादेवीच्या मूर्तीला उद्देशून ‘लारा जोंग्रांग’ (नाजूक मूर्ती) असे नाव स्थानिक लोकांनी दिलेले आहे. या मंदिराची रचना चतुरस्र जोत्यावर केलेली असून त्याच्या सभोवतीच्या प्राकार भिंतींत चार प्रवेशद्वारे आहेत. मंदिरातील उंच चौथऱ्यांवर ब्रह्मा-विष्णू-महेश यांची मोठी देवालये असून त्यांच्या अनुक्रमे हंस, गरुड व नंदी या वाहनांची छोटी देवालये आहेत. मोठ्या मंदिरावर रामायणातील प्रसंगांची निदर्शक अशी उत्थित शिल्पे कोरलेली आहेत. मंदिरांतील छोट्या चौथऱ्यांवर लहान देवालये आहेत. लारा जोंग्रांगचा जीर्णोद्वार १९५१ मध्ये पूर्ण करण्यात आला.

 

चौधरी, वसंत