प्राण्यांचेवर्तन: प्राणी स्वतंत्रपणे किंवा समूहात असताना ज्या निरनिराळ्या हालचाली किंवा कामे करतात त्यांना प्राण्यांचे वर्तन असे म्हणतात. प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी निरनिराळ्या तऱ्हेची तंत्रे वापरण्यात आली असून प्राण्यांची वाढ, रचना, वेगवेगळ्या शरीरक्रिया, भोवतालची परिस्थिती आणि आनुवंशिकता यांच्या संदर्भात प्राणी कशा तऱ्हेने वर्तन करतात याचाही अभ्यास करण्यात आला आहे. प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास ही एक स्वतंत्र शास्त्रशाखा झाली असून या शाखेचा मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि भौतिकी यांच्याशी संबंध येतो.

 

प्राणिवर्तनासंबंधीचेसंशोधन : इतिहास: प्राणी वेगवेगळ्या परिस्थितींत कसा वागतो? त्याच्या मूळच्या वर्तणुकीत किंवा वर्तनात काही कारणांमुळे फरक पडला आहे का? हा फरक थोड्या अवधीपुरताच आहे का दीर्घावधीकरिता आहे? या वर्तनातील फरकामुळे प्राण्याच्या शरीररचनेत किंवा शरीरक्रियेत काही बदल झाला आहे का? इ. निरनिराळ्या दृष्टिकोनांतून फार पूर्वीपासून प्राणिवर्तनाचा अभ्यास झाल्याचे आढळून येते. पूर्वी होऊन गेलेल्या सॉलोमन राजाच्या काळातही लोक प्राण्यांपासून अनेक गोष्टी शिकत असत. मुंगी किंवा कोल्हा यासारखे प्राणी कसे वागतात? परिस्थिती बदलल्यावर त्यांच्या वर्तनात कसा फरक पडतो? इ. गोष्टींचे ते निरीक्षण करीत असत. मनुष्य प्राण्यातही सहसा न आढळणारे बदललेले वर्तन या निरनिराळ्या प्राण्यांमध्ये आढळून येते. अशा तऱ्हेने सर्वसाधारण जनतेला कीटकांच्या वर्तनाविषयी कुतूहल असले, तरी एकोणिसाव्या शतकापर्यंत या विषयाच्या ज्ञानात प्रगती झाली असल्याचे दिसत नाही. विसाव्या शतकात सुप्रसिद्ध इंग्लिश शास्त्रज्ञ चार्ल्‌स डार्विन यांनी ⇨ नैसर्गिकनिवड हा सृष्टीच्या क्रमविकासाचा (उत्क्रांतीचा) महत्त्वाचा सिद्धांत जगापुढे मांडला. आपली मते मांडताना डार्विन यांनी प्राणिसृष्टीचा क्रमविकास होत असताना प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या रूपांतरणाला (बदलाला) फार महत्त्व दिले आहे. बदलत्या परिस्थितीनुसार जसजसे प्राण्यांचे वर्तन बदलत जाते तसतसे त्यांच्या निरनिराळ्या अवयवांत रूपांतरण होत जाते.

 

डार्विननंतर अनेक अमेरिकन आणि यूरोपियन शास्त्रज्ञांनी या विषयावर संशोधन केल्याचे आढळते. अमेरिकन शास्त्रज्ञांत ⇨ टॉमसहंटमॉर्गन, ⇨ झाकलब, रेमंड पर्ल, ई. बी. विल्सन, जी. एच्. पार्कर, एस्. ओ. मास्ट आणि एस्. जे. होम्स यांचा समावेश होतो, तर यूरोपियन शास्त्रज्ञांत ई. क्लापारेद, एच्. ड्रीश, ⇨ कॉजवेलॉईडमॉर्गन, डब्ल्यू. ए. नागेल, ⇨ इव्हानप्यिट्रॉव्ह्यिचपाव्हलॉव्ह, जी. जे. रोमानिस, एम्. फेरव्होर्न आणि जे. फोन यूक्सक्यूल यांचा समावेश होतो. आर्. एम्, यर्किस आणि ⇨ एडवर्डलीथॉर्नंडाइक यांसारख्या विद्वान मानसशास्त्रज्ञांनीही प्राण्यांच्या वर्तनाविषयी संशोधन केले आहे.

 

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला आनुवंशिकी, शरीररचनाशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान इ. विज्ञानशाखांमध्ये शास्त्रज्ञांनी विशेष लक्ष घातल्यामुळे प्राण्यांच्या वर्तनासंबंधी फार कमी संशोधन झाले. त्यातसुद्धा अनेक जातींच्या प्राण्यांपैकी फक्त कीटकांच्याच ⇨ सहजीवनाचा अभ्यास करण्यात आला. प्राण्यांमध्ये जे निरनिराळे शारीरिक बदल होत असतात ते केवळ तो प्राणी जगण्याच्या दृष्टीने होत असतात, असा सर्वसाधारण समज होता. १९२० साली महत्त्वाची अशी दोन संशोधने झाली. (१) अनेक कीटक आणि पक्षी जननकालात विशिष्ट आवाज (ज्याला ‘गाणे’ म्हणतात) काढून भिन्नलिंगी प्राण्याला आकर्षित करतात. या गाण्याचे महत्त्व एच्. ई. हौअर्ड यांनी विशद केले. (२) कोंबड्यांच्या समूहात आढळणाऱ्या सामाजिक वर्चस्वासंबंधीचे संशोधन. यानंतर पुढील महत्त्वाचे संशोधन करण्यात आले : (१) डब्ल्यू. सी. ॲली यांनी प्राण्यांच्या समूहाचे व प्राण्यांच्या सहजीवनाचे महत्त्व विशद करणारे लेख प्रसिद्ध केले. (२) सी. आर्. कार्पेटर यांनी नरवानरांमधील (प्रायमेट्समधील) सहजीवन आणि समूहरचना यांचा अभ्यास केला. ⇨ कॉनरॅडझाकारियासलोरेन्ट्स यांनी पक्ष्यांच्या सामूहिक संबंधांचा विचार केला. (४) डब्ल्यू. एम्. व्हीलर यांनी कीटकांच्या वर्तनावर संशोधन केले. (५) ए. ई. एमर्सन यांनी वाळवी-मुंग्यात आढळणाऱ्या सामाजिक भेदांचे विवेचन केले. (६) टी. सी. श्नायली यांनी सैनिकी मुंग्याच्या जीवनाचा अभ्यास केला आणि (७) ⇨ कार्ल फोनफ्रिश यांनी प्रयोगाच्या आनुषंगाने मधमाश्यांची भाषा समजून घेतली.

 

दुसऱ्या महायुद्धामुळे वरील विषयातील संशोधनात यूरोपमध्ये खंड पडला परंतु महायुद्ध संपल्यानंतर या विषयात पुन्हा संशोधन करण्यास सुरुवात झाली. (१) ⇨ नीकोलासटिनवर्जेन आणि इतर यूरोपियन शास्त्रज्ञांनी प्राण्य़ांच्या ⇨ सहजप्रेरणेच्या प्राणिवर्तनाशी असलेल्या संबंधांचा अभ्यास केला व बिहेव्हियर या नावाचे शास्त्रीय मासिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. (२) ई. ए. आर्मस्ट्राँग, डी. लॅक, डब्ल्यू. एच्. थॉर्प व इतर ब्रिटिश संशोधकांनी पक्ष्यांच्या सामूहिक जीवनाचा अभ्यास केला. जे. एच्. कॅलहून, एन्. ई. कोलिअस, जे. टी. एमलेन, एम्. एम्. नाईस, एम्. सी. केंडिग, एच्. बी. डेव्हिस, जे. ए. किंग इ. अमेरिकन शास्त्रज्ञांनी प्राण्यांचे सहजीवन आणि प्राणिसंख्येची गतिकी (प्राणिसंख्येचे आकारमान व संघटन निर्धारित करणाऱ्या प्रक्रियांचा समुच्चय) यांविषयी संशोधन केले. (४) जे. एफ्. हॉल, एच्. एस्, लिड्ल, एच्. डब्ल्यू. निसेन, एच्. एफ्. हार्लो, डी. ओ. हेबे, डब्ल्यू. आर्. टॉम्पसन यांसारख्या मानसशास्त्रज्ञांनी प्राण्यांच्या वर्तनाचा तंत्रिका तंत्राच्या (मज्जासंस्थेच्या) दृष्टीने अभ्यास केला.

 

अभ्यासाचेप्रकार: प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास पुढील दोन प्रकारांनी केला जातो : (१) नैसगिक परिस्थितीत प्राणिवर्तनाची पाहणी करणे आणि (२) प्रयोगशाळेत प्राण्यांना बंदिस्त करून त्यांना निरनिराळ्या परिस्थितींत रहावयास लावून त्यांचे वर्तन पाहणे. या पद्धतींनी प्राण्यांचे रोजचे वर्तन, निरनिराळ्या ऋतूंतील वर्तन व प्राण्यांची वाढ होताना त्यांच्या वर्तनात होणारे बदल यांची माहिती घेता येते. कारण पिलांचे व त्यांच्या आईबापाचे वर्तन यांत फरक असतो. तसेच पिलू आपल्या आईबापाचे वर्तन पाहून आपले वर्तन सुधारते.

 

परंतु वरील दोन पद्धतींनीच म्हणजे नैसर्गिक परिस्थितीत किंवा प्रयोगशाळेत बंदिस्त अवस्थेतील प्राण्यांचे वर्तन पाहून आपणास त्यांच्या वर्तनाविषयी संपूर्ण माहिती मिळते असे नाही. संशोधकाने गोळा केलेल्या माहितीवरून आपणास काही ठोकताळे मांडता येतात. हे ठोकताळे प्रयोगशाळेतील बंदिस्त अवस्थेतील प्राण्यांच्या वर्तनाशी ताडून पहातात. यावरून काही नियम, निष्कर्ष किंवा सिद्धांत बनविण्यात येतात. अनेक वेळा त्यांचा पडताळा पाहून ते निश्चित केले जातात. प्रयोगशाळेत बंदिस्त अवस्थेतील प्राण्यावर प्रयोग करताना खालील गोष्टी ध्यानात धराव्या लागतात.

 

(१) काळ आणि वेळ: ज्या दिवशी किंवा वर्षातील ज्या काळात एखादा प्रयोग करावयाचा असेल त्याची वेळ प्रथम निश्चित करावी लागते. नैसर्गिक परिस्थितीत राहणारा प्राणी व बंदिस्तावस्थेतील प्राणी यांच्या वर्तनाची संपूर्ण माहिती गोळा केल्यावर त्यांची तुलना करून निश्चित निष्कर्ष काढता येतात.

 


(२) प्राण्याची जात : निवडलेल्या जातीचा प्राणी प्रयोग करण्याच्या वेळी उपलब्ध असला पाहिजे.

 

(३) वैयक्तिक फरक : प्राण्यामध्ये वैयक्तिक लाक्षणिक फरक असतात. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक वर्तनातही बदल घडण्याचा संभव असतो. आनुवंशिक फरक असतील, तर आंतरजनन केलेले प्राणी व एकाच लिंगाचे प्राणी प्रयोगासाठी वापरता येतात.

 

(४) सामाजिक परिस्थिती : प्रयोगासाठी वापरण्यात येणारे प्राणी वेगळे वाढवून त्यांच्यावर प्रयोग केल्यास त्यांच्यावर भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचा परिणाम होत नाही. उलट प्रयोग करणारा हाच प्राण्याच्या दृष्टीने परिस्थितीचा एक घटक बनतो.

 

(५) भौतिक परिस्थिती : नैसर्गिक परिस्थितीत प्राण्याच्या जीवनावर परिणाम करणारे तापमान, प्रकाश, ध्वनी इ. घटकांचे प्रयोगशाळेत योग्य नियंत्रण करता येते. हवा, वातावरणाचा दाब, वास इ. घटक गौण असतात.

 

(६) प्रयोगातील अचूकपणा : प्रयोग करणाऱ्याची प्रयोगाची पद्धत, प्रयोगात केलेले निरिक्षण आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष यांच्या अचूकपणावर प्रयोगाचे यश अवलंबून असते.

 

वर्तनाचेप्रकार: प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, निसर्गात उत्पन्न होणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या संवेदना ज्ञानेंद्रियांकडून ग्रहण केल्या जातात. या संवेदना नंतर तंत्रिका तंत्राद्वारे मेंदूपर्यत नेल्या जातात. नंतर मेंदूकडून ज्याप्रमाणे आज्ञा होईल त्याप्रमाणे एखाद्या अवयवाकडून संवेदनांना प्रतिसाद दिला जातो. उदा., एखाद्या गाईला रानात फिरत असताना कोवळा चारा दिसला, तर ती चाऱ्याजवळ जाऊन चारा खाऊ लागते. स्वस्थ बसलेल्या मांजराला उंदीर दिसल्याबरोबर ते चटकन धावत जाऊन त्याला पकडते. अशा तऱ्हेने प्राण्यांचे वर्तन अनेक वेळा बाह्य परिस्थितीमध्ये घडणाऱ्या घडामोडींवर अवलंबून असते. उंदीर, कुत्रा, मांजर, पक्षी इ. प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यात आलेला असून वर्तनाचे अनेक प्रकार असतात, असे आढळले आहे. पक्ष्यांमध्ये त्यांचा विशेष अभ्यास झाला आहे. प्राण्यांच्या वर्तनाचे काही प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

 

(१) अन्न भक्षणाचे वर्तन : सुगीच्या दिवसात शेतांवर पक्ष्यांचे थवे जमतात आणि आपल्या चोचीच्या साह्याने ते धान्यकण गोळा करतात.

 

(२) संरक्षणासाठी केलेले वर्तन : रात्रीच्या वेळी पक्षी दाट पानांमध्ये विश्रांती घेतात. या पानांमुळे त्यांना संरक्षण मिळते.

 

(३) क्षेत्रीय सार्वभौमत्वाचे वर्तन : प्रत्येक पक्ष्याच्या हालचालीचे क्षेत्र ठरलेले असते. या क्षेत्रात जर इतर पक्षी आला, तर त्या क्षेत्रातील मूळचा पक्षी त्याला हुसकावून लावतो.

 

(४) लैंगिक वर्तन : प्रजोत्पादन काळात नर पक्षी आपला पिसारा उभारून किंवा निरनिराळे आवाज (गाणी) काढून मादी पक्ष्याचे लक्ष आपणाकडे आकर्षित करून घेतो.

 

(५) अपत्य संगोपनाचे वर्तन : पक्षी आपल्या पिलांचे संरक्षण करतात. त्यांना अन्न भरवतात आणि पिले मोठी होऊन स्वावलंबी बनेपर्यंत त्यांच्या पाठीशी राहतात.

 

(६) पिलांचे वर्तन : पिले आपल्या चोची उघड्या ठेवून किंवा चिवचिव आवाज करून आपल्या मातापित्यांचे लक्ष वेधून घेतात व त्यांच्याकडून अन्न ग्रहण करतात.

 

(७) परस्पर संरक्षणाचे वर्तन : अनेक पक्षी जेव्हा अन्न शोधण्यासाठी घरट्याबाहेर पडतात तेव्हा ते समूहाने किंवा थव्याने हवेत उडत असतात. यामुळे त्यांच्यावर घार, ससाणा यांसारख्या शिकारी पक्ष्यांचा हल्ला होण्याची भिती नसते. कारण हे शिकारी पक्षी एकेकट्या पक्ष्यावर हल्ला करतात.

 

(८) घरटे स्वच्छ राखण्याचे वर्तन : अनेक पक्ष्यांची पिले आपल्या विष्ठेमुळे घरटे खराब होऊ नये म्हणून विष्ठा एका पातळ आवरणात ठेवून तिचे विसर्जन करतात. पिलांचे आईबाप ही विष्ठा नंतर घरट्याबाहेर फेकून देतात. ससाण्यासारखे पक्षी विष्ठेचे विसर्जन करताना आपली शेपटी फडफडवितात. यामुळे विष्ठा घरट्याबाहेर फेकली जाते आणि घरटे स्वच्छ राहते. मांजरे आपली विष्ठा मातीमध्ये गाडून टाकतात, हे आपण नेहमी पाहतो.

 

(९) समन्वेषी (शोधक) किंवा कुतूहलजनक वर्तन : अनेक पशुपक्षी कुतूहलजनक वर्तन करतात. उदा., (अ) उंदीर एखाद्या पेटीत ठेवला, तर तो आपले नाक आणि मिशा यांच्या साह्याने भोवतालच्या जागेचा अंदाज घेत सावकाश पेटीभर फिरतो. याला समन्वेषी वर्तन म्हणतात. (आ) रॅकून, माकडे यांसारखे पशू एखादी नवी वस्तू वाटेत दिसली, तर ती उचलून हातात घेतात, ती वरखाली फिरवून तिचा वास घेतात व चव घेतात. (इ) पक्ष्याची दृष्टी चांगली असल्याने ते भोवतालच्या परिस्थितीचे नीट निरीक्षण करून हालचाल करतात.

 

अशा तऱ्हेने प्राणी नैसर्गिक परिस्थितीत फिरत असताना वेगवेगळ्या प्रकारचे वर्तन करतात.

 


 

संवेदनाक्षमता: प्राणी भोवतालच्या परिस्थितीत असलेल्या घटकांच्या अनुषंगाने योग्य ते वर्तन करतात. प्राण्यांचे तंत्रिका तंत्र आणि ज्ञानेंद्रिये यांमुळे हे शक्य होते. निरनिराळ्या घटकांमुळे उत्पन्न होणाऱ्या वेगवेगळ्या संवेदनांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते.

 

(अ) स्पर्शज्ञान: अमीबा, पॅरामिशियम यांसारख्या कनिष्ठ दर्जाच्या एककोशिक (ज्यांचे शरीर एकाच पेशीचे बनलेले आहे अशा) प्राण्यांना स्पर्शेंद्रिय नसली, तरी हे प्राणी त्यांना स्पर्श केल्यावर आपले एककोशिक शरीर आकसून प्रतिक्रिया व्यक्त करतात. सीलेंटेरेटा या संघातील प्राण्यांच्या स्पर्शकांवर (स्पर्शज्ञान, शोध घेणे, पकडणे किंवा चिकटणे इ. कार्यासाठी उपयोगी पडणाऱ्या लांब, सडपातळ व लवचिक इंद्रियांवर) स्पर्शेंद्रिय असतात. बहुतेक सर्वच प्राणी शरीराला इजा करणारा स्पर्श झाला, तर तत्काळ प्रतिक्रिया दाखवितात. उच्च दर्जाच्या प्राण्यांत उष्ण, थंड व दुःख देणाऱ्या स्पर्शाचे ज्ञान देणारी ज्ञानेंद्रिये असतात.

 

(आ) रासायनिक ज्ञान : (१) प्रोटोझोआ संघातील प्राणी पाण्यामधील नैसर्गिक व अनैसर्गिक रसायनांना प्रतिक्रिया व्यक्त करतात परंतु पदार्थांची चव घेणारी ज्ञानेंद्रिये त्यांना नसतात. (२) प्लॅनेरियन या प्राण्यांच्या डोक्यावर रासायनिक ज्ञान देणारी ज्ञानेंद्रिये असतात. (३) कीटकांच्या शृंगिका (सांधेयुक्त लांब स्पर्शेंद्रिये) स्पर्श आणि गंध यांचे ज्ञान देतात. (४) पृष्ठवंशी (पाठीचा कणा असणाऱ्या) प्राण्यांत नाकामुळे गंधज्ञान होते. ज्या प्राण्यांना गंधज्ञान देणारी इंद्रिये असतात असे प्राणी भोवतालच्या परिस्थितीचे जास्तीत जास्त आकलन करू शकतात.

 

(इ) ध्वनी व प्रकाश यांचे ज्ञान : सर्व जलचर प्राण्यांना आपल्या ज्ञानेंद्रियामुळे पाण्यात उत्पन्न होणाऱ्या थोड्याशाही हालचालींची जाणीव होत असते. जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांचे कान हे ध्वनिग्रहण करण्यास कार्यक्षम असतात. नाकतोडा, टोळ यांसारख्या कीटकांच्या उदरखंडावर (पोटाच्या भागवर) असलेले पातळ पडद्यासारखे ज्ञानेंद्रिय ध्वनिग्रहण करण्यास उपयोगी पडते. पृष्ठवंशी प्राण्यांचे कान हे ध्वनिंद्रिय आहे एवढेच नव्हे, तर ते शरीराचा तोल संभाळण्याचेही कार्य करते [⟶ कान].

 

यूग्लीना या एककोशिक प्राण्यात प्रकाशाची जाणीव करून देणारे विशेष इंद्रिय असते. ते अतिशय सूक्ष्म असते. चापट कृमी, सीलेंटेरेट प्राणी यांतही असेच इंद्रिय असते. मॉलस्क (मृदुकाय) प्राणी, आर्थ्रोपॉड (संधिपाद) प्राणी आणि पृष्ठवंशी प्राणी यांना डोळा हे ज्ञानेंद्रिय प्रकाशाचे ज्ञान देते व कोणत्याही वस्तूचे प्रतिबिंब तयार करते [⟶ डोळा].

  

चलनक्षमता : संचलन करू शकणाऱ्या प्राण्याच्या शरीरात भोवतालच्या परिस्थितीप्रमाणे वर्तन करण्याची क्षमता असते. स्पंजासारखे स्थिर राहणारे प्राणी किंवा चापट कृमीसारख्या दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरात राहणारे परजीवी प्राणी यांना संचलनाची गरज नसल्याने त्यांच्या शरीरावर संचलनाचे अवयव नसतात. संचलनासाठी आणि कोणतीही वस्तू पकडून ठेवण्यासाठी प्राण्यांमध्ये अनेक अवयव अगर पद्धती असतात. उदा., (अ) ⇨ पादामांच्या किंवा ⇨ पक्ष्माभिकांच्या साहाय्याने पाण्यात होणारे संचलन. (२) जेट विमानाप्रमाणे पाण्यामधून शरीर एकदम पुढे ढकलणे. (३) ॲनेलिड (वलयी) प्राण्यांत शरीर खंडांची हालचाल करून संचलन होते. (४) आर्थ्रोपॉड प्राणी आपल्या अनेक अवयवांची, एकायनोडर्म (कंटकचर्मी) प्राणी नालपादांची (जल-परिवहन तंत्राशी जोडलेल्या नळीसारख्या बारीक पायांची) आणि मॉलस्क प्राणी परांची हालचाल करून संचलन करतात. (५) मासे आपल्या परांच्या हालचालीमुळे पाण्यात पोहतात आणि (६) माकडे झाडावरून उड्या मारीत संचलन करतात व केव्हा केव्हा आपल्या शेपटीने झाडांच्या फंद्या पकडून लोंबकळत राहतात.

 

मेंदूवतंत्रिकातंत्रयांचेमहत्त्व: प्राण्यांच्या वर्तनात मेंदू व तंत्रिका तंत्र यांना फार महत्त्व आहे. भोवतालच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या विविध संवेदना निरनिराळी ज्ञानेंद्रिये कशी ग्रहण करतात हे पूर्वीच सांगितले आहे. तंत्रिकांद्वारे संवेदना मेंदूकडे नेली म्हणजे मेंदू ज्याप्रमाणे आज्ञा देईल त्याप्रमाणे विशिष्ट अवयव प्रतिक्रिया व्यक्त करतात. संवेदनेची तीव्रता कमी असेल, तर ती एकदम मेंदूकडे नेली जात नाही ती तंत्रिका तंत्रातच साठविली जाते व तिची शक्ती वाढल्यानंतर ती मेंदूकडे नेऊन नंतर अवयवाकडून प्रतिक्रिया व्यक्त होते. या क्रियेला साठवण व संकलन असे म्हणतात.

 

साठवण: उंदीर विजेच्या प्रवाहाला प्रतिसाद देतो. उंदराच्या शरीरातून कमी दाबाचा विजेचा प्रवाह जाऊ दिला, तर उंदीर काहीच प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही परंतु विजेचा दाब हळूहळू वाढविला, तर या संवेदनेचे काही काळाने संकलन होऊन उंदीर प्रतिक्रिया व्यक्त करतो. तसेच उंदराला जर अकस्मात जास्त दाब असलेल्या विजेचा झटका दिला, तर तंत्रिकेमध्ये ही संवेदना साठविण्याची क्षमता नसल्याने मेंदूकडून चटकन प्रतिक्रिया व्यक्त केली जाते.

 

संकलन: विजेचा कमी दाबाचा प्रवाह उंदराच्या शरीरातून जाऊ दिला, तर कोणतीच प्रतिक्रिया दिसत नाही परंतु थोड्याच अंतराने जर वारंवार हा प्रवाह त्याच्या शरीरातून जाऊ दिला, तर त्याचे संकलन होऊन त्याचा परिणाम एकाच जास्त दाबाच्या प्रवाहासारखा दिसतो.

 


 

वर्तनाचीशरीरांतर्गतकारणे : (१) भक्षण करण्याचे वर्तन : सीलेंटेरेटासारख्या कनिष्ठ दर्जाच्या प्राण्यांत जठरात मावेल इतके अन्न घेतले जाते. अनेक प्राण्यांच्या भक्षणाची क्रिया पाहिल्यावर डब्ल्यू. कॅनन या शास्त्रज्ञांनी असे अनुमान काढले की, मानवासकट सर्व प्राण्यांत जठर मोकळे झाल्यावर ते आकुंचन पावू लागते. त्यामुळे प्राण्याला वेदना होऊ लागतात व त्या टाळण्यासाठी अन्न भक्षण केले जाते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण आणि हॉर्मोनांचे (अंतःस्रावी ग्रंथींद्वारे सरळ रक्तात सोडल्या जाणाऱ्या उत्तेजक स्रावांचे) प्रमाण यांत बदल होऊ लागला, तर अन्न भक्षण करण्याची इच्छा होते.

 

(२) लढा करण्याचे वर्तन : या बाबतीत उंदरावर संशोधन केले गेले आहे. वयाने लहान असलेल्या उंदराला जर काही बाह्य कारणाने वेदना होऊ लागल्या, तर तो पळून जायचा प्रयत्न करतो परंतु मोठा उंदीर स्वतःचे रक्षण करण्यासाठी ठामपणे उभा राहून लढा देतो. या वेळी शरीरात हॉर्मोने निर्माण केली जातात व त्यामुळे लढा देण्याचे वर्तन उंदीर करतो.

 

(३) लैंगिक वर्तन : लैंगिक हॉर्मोनांच्या स्रवणामुळे प्राणी बेचैन होतो. त्याची हालचाल वाढते, मेंदू व तंत्रिका तंत्र उत्तेजित होतात आणि भिन्न लिंगी प्राण्याशी संपर्क साधण्याचा तो प्रयत्न करतो.

 

(४)पिलाच्या पालनपोषणाचे वर्तन : हार्मोनामुळे मातापित्याकडून हे वर्तन केले जाते. उदा., सस्तन प्राण्यात पिलांची वाढ होताना स्तनामध्ये दूध निर्माण होते. [⟶ दुग्धस्रवण व स्तनपान हार्मोने].

 

शिकणे : अनुभवाचापरिणाम : अनेक वेळा ठराविक संवेदनांचा अनुभव घेतल्यावर प्राणी या अनुभवाने शिकून आपले वर्तन बदलतात. सुप्रसिद्ध रशियन शास्त्रज्ञ पाव्हलॉव्ह यांनी कुत्र्यावर केलेल्या प्रयोगांवरून असे सिद्ध केले की, अनुभवामुळे प्राणी शिकतात. पाव्हलॉव्ह यांनी कुत्र्याला पिंजऱ्यात ठेवून त्याला अन्न देण्यापूर्वी पिंजऱ्यात दिवा लागेल व घंटा वाजेल अशी सोय केली. प्रत्येक वेळी कुत्र्याला अन्न देताना वरीलप्रमाणे दिवा आणि घंटा यांची सवय कुत्र्याला लागली. अनेक दिवसांच्या अनुभवानंतर कुत्र्याच्या मनात या गोष्टी पूर्णपणे ठसल्याचे आढळले. कारण काही दिवसांनी फक्त दिवा लावून घंटा वाजल्यावर कुत्र्याला अन्न दिले नाही, तरी त्याच्या तोंडातून लाळ गळू लागली. म्हणजेच वरील घटनांपाठोपाठ आपणास अन्न मिळणारच अशी कुत्र्याची समजूत होती. याला अवलंबी प्रतिक्षेप [⟶ प्रतिक्षेपी क्रिया] अशी संज्ञा आहे. ही स्मृती कुत्र्यात बरेच दिवस राहते, असे आढळले आहे.

 

बी. एफ्. स्कीनर या शास्त्रज्ञांनी प्राण्याच्या अनुभवजन्य वर्तनासंबंधी अभ्यास करण्याकरिता तयार केलेल्या पिंजऱ्यात एक कळ ठेवली होती. ही कळ दाबल्यावर अन्नाचा कप्पा उघडून अन्नाची एक गोळी पिंजऱ्यात ठेवलेल्या ताटलीत पडण्याची व्यवस्था होती. या पिंजऱ्यात एक उंदीर ठेवण्यात आला. पिंजऱ्यात इतर कोणत्याही ठिकाणी अन्न ठेवले नव्हते. उंदराला भूक लागल्यावर चौकसपणे तो सर्व पिंजऱ्यात फिरू लागला. पिंजऱ्यातील कळ त्याने सहजपणे दाबल्यावर त्याला अन्नाची गोळी ताटलीत पडलेली दिसली. अनेक वेळा सहजपणे ही कळ दाबल्यावर प्रत्येक वेळी अन्नाची गोळी मिळते, हे उंदीर अनुभवाने शिकला व यानंतर जेव्हा जेव्हा त्याला भूक लागे त्या त्या वेळी तो कळ दाबून अन्न मिळवू शकला. हे वर्तन अनुभवाने घडू लागले.

 

दुसऱ्या एका प्रयोगात प्रत्येक वेळी कळ दाबण्यापूर्वी पिंजऱ्यात दिवा लावला असताना अन्नाची गोळी ताटलीत पडण्याची व्यवस्था केली. पिंजऱ्यात दिवा लागला नसेल तर कळ दाबूनही अन्नाची गोळी पडत नाही, हे उंदीर अनेक दिवसांच्या अनुभवाने शिकल्यावर जेव्हा जेव्हा पिंजऱ्यात अंधार असेल तेव्हा तो भूक लागली असली, तरीही कळ दाबीत नाही, असे शास्त्रज्ञांना आढळले.

 

शास्त्रज्ञांनी निरनिराळ्या प्रकारची कोडी तयार केली आहेत व उंदीर, पक्षी यांसारखे प्राणी अनुभवानंतर ही कोडी सहजपणे सोडवितात, असे दिसून आले आहे.

 

कार्ल फोन फ्रिश या सुप्रसिद्ध जर्मन शास्त्रज्ञांनी मधमाश्यांच्या बौद्धिक पात्रता व शिकण्याची पात्रता यासंबंधी काही प्रयोग केले आहेत. त्यांनी मधमाश्यांना आपल्या प्रयोगशाळेतील टेबलावर खालीलप्रमाणे वेगवेगळ्या वेळी निरनिराळी संहती (प्रमाण) असलेला साखरेचा पाक खाण्यासाठी ठेवला.

 

सकाळी १० वाजता – ५०% संहतीचा साखरेचा पाक

दुपारी १२ वाजता – ७०% संहतीचा साखरेचा पाक आणि

दुपारी २ वाजता – ९०% संहती असलेला साखरेचा पाक.

 


 मधमाश्या या निरनिराळ्या वेळी न चुकता प्रयोगशाळेत येऊन साखरेचा पाक खात असत. हा प्रयोग पुष्कळ दिवस केल्यावर फ्रिश यांना असे आढळले की, मधमाश्या फक्त दुपारी २ वाजता ज्या वेळी साखरेच्या पाकाची संहती जास्त असते त्या वेळी तो खाण्यासाठी येतात. या निरीक्षणाने असे सिद्ध झाले की, मधमाश्यांना स्मरणशक्ती आणि हुशारी असून वेळेचेही ज्ञान असते. म्हणूनच त्या इतर वेळी प्रयोगशाळेत न येता फक्त दुपारी २ वाजताच येत होत्या. फ्रिश यांना असेही आढळले की, प्रयोगशाळेतील टेबलावर पाक ठेवण्याचे बंद केल्यावरही अनेक दिवस दुपारी २ वाजता मधमाश्या टेबलावर येत होत्या परंतु आपणास पाक मिळत नाही हे कळल्यावर त्या येईनाशा झाल्या. यावरून मधमाश्यांना स्मृती असते असे अनुमान फ्रिश यांनी काढले.

 

आपणास असे आढळते की, लहान मुले धिटाईने पाळलेला कुत्रा अगर मांजर यांना हात लावतात वा त्यांची शेपटी ओढतात. हे प्राणी पुष्कळ वेळा हा त्रास सहन करतात परंतु हा त्रास अनेक वेळा झाल्यावर प्राणी चिडतात व त्या मुलांना चावतात अगर बोचकारतात. एकदा मुलांना असा अनुभव आला की, ती या प्राण्यांच्या वाटेला जात नाहीत. अशा तऱ्हेने या मुलांचे वर्तन बदलते.

 

झुरळासारख्या कीटकावरही शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग केले आहेत. त्यांनी एक पिंजरा करून त्याचे दोन भाग पाडले. एका भागात झुरळे व दुसऱ्या भागात अन्न ठेवले. पिंजऱ्याच्या दोन्ही बाजूंच्या मधोमधच्या भागातून विजेचा सौम्य प्रवाह सोडला. झुरळे अन्न खाण्यासाठी दुसऱ्या भागाकडे जात असताना पिंजऱ्याच्या मधल्या भागाजवळ आल्याबरोबर त्यांना विजेचा झटका बसू लागला. त्यामुळे झुरळे माघारी फिरू लागली. अनेक वेळा झुरळांनी अन्नाकडे जाण्याचा प्रयत्न करूनही प्रत्येक वेळी त्यांना विजेचा झटका बसू लागल्याने त्यांनी अन्नाकडे जाण्याचा नाद सोडून दिला आणि ती उपाशी राहिली. या प्रयोगावरून झुरळेही अनुभवाने शिकतात व त्यांना स्मरणशक्ती असते हे सिद्ध झाले. [⟶ ज्ञानसंपादन].

 

आनुवंशिकताववर्तन : भोवतालच्या एकाच परिस्थितीत निरनिराळ्या जातींचे प्राणी वेगवेगळे वर्तन करतात. शास्त्रज्ञांच्या मते हे आनुवंशिकतेमुळे होते. यासाठी अनेक महत्त्वाचे पुरावे शास्त्रज्ञांनी गोळा केले आहेत.

 

(अ) परिस्थितीमध्ये बदल घडविणे : लोरेन्ट्स यांनी पक्ष्यांवर केलेल्या संशोधनावरून असे अनुमान काढले की, भोवतालच्या परिस्थितीनुसार पक्षी निराळे वर्तन करतात.

 

(आ) निवडीचा परिणाम : भोवतालची परिस्थिती कायम ठेवून प्राण्यांच्या जातीची आनुवंशिकतेच्या दृष्टीने निवड केल्यावर प्राण्यांच्या वर्तनात काय फरक पडतो याचा अभ्यास केला गेला आहे. काळे उंदीर माणसाळले जात नाहीत. परंतु अनेक पिढ्या आनुवंशिकतेच्या दृष्टीने निवड केल्यावर पांढरे उंदीर माणसाळले गेले आहेत.

 

(इ) दुसऱ्या प्राण्याच्या संततीची जोपासना करणे : कोकिळा कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते. यामुळे कोकिळेच्या पिलांचे कावळ्याची मादी आपल्या पिलांबरोबरच संगोपन करते. एकत्र वाढ होत असली, तरी कोकिळेच्या पिलाचे वर्तन कावळ्याच्या पिलासारखे असत नाही.

 

(ई) संकराचा परिणाम : दोन वेगळ्या जातींच्या प्राण्यांचा संकर झाला, तरी उत्पन्न होणाऱ्या संततीत ग्रेगोर मेंडेल यांच्या सिद्धांताप्रमाणे लक्षणांची वाटणी होत असते. [⟶ आनुवंशिकी ].

 

वर्तनातीलटप्पे : प्राणी कोणत्याही संवेदनांना अनुलक्षून जे वर्तन करतात त्याचे पुढील तीन टप्पे पडतात : (१) मनाशी एखादे ध्येय बाळगून ते शोधण्याचे वर्तन. (२) ध्येय शोधल्यावर ते आत्मसात करण्याचे वर्तन. (३) उद्दिष्ट आत्मसात केल्यावर प्राणी विश्रांती घेतात हे वर्तन.

 

प्राणिवर्तनात वरीलप्रमाणे तीन टप्पे असतात हे पुढील उदाहरणावरून स्पष्ट होते. एखाद्या कुत्र्याला भूक लागली म्हणजे तो अन्न शोधण्यासाठी फिरू लागतो. हा पहिला टप्पा होय. काही काळाने अन्न सापडल्यावर ते कुत्रा खातो. हा वर्तनाचा दुसरा टप्पा आहे. अन्न खाऊन पोट भरल्यावर कुत्रा विश्रांती घेतो. हा वर्तनाचा तिसरा टप्पा होय. पोट भरलेला कुत्रा पुन्हा भूक लागेपर्यंत अन्न शोधण्याच्या खटपटीत पडत नाही किंवा अन्न जरी त्याच्या समोर ठेवले, तरी तो ते खात नाही. वर उल्लेखिलेल्या तीन टप्प्यांत कमीअधिक अंतर असू शकते. उदा., चिमणीसारखे काही पक्षी वारंवार अन्न खात असतात. त्यांच्या वर्तनातील विश्रांतीचा काळ थोडा असतो. याउलट वाघासारखे हिंस्त्र पशू किंवा गाई-म्हशीसारखे गवत खाणारे पशू अन्न भक्षण केल्यावर पुष्कळ तास विश्रांती घेतात.

 

प्राण्यांच्या प्रत्येक वर्तनात अशा तऱ्हेने तीन टप्पे पडतात. मग ते वर्तन अन्न भक्षिण्यासंबंधी असो, घरटे बांधण्यासाठी असो अगर प्रजोत्पादन कालातील लैंगिक वर्तन असो. शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की, प्रजोत्पादन कालात प्राण्यांचे लैंगिक वर्तन इतके प्रभावी असते की, ते कित्येक तास अगर दिवस पुरेसे अन्न आणि विश्रांती घेतल्याशिवाय करीत असतात.

 

सामाजिकवर्तन : अपृष्ठवंशी प्राण्यांपैकी वाळवी, मुंग्या, मधमाश्या आणि गांधील माश्या हे कीटक आणि पृष्ठवंशी प्राण्यांत माकडे, हरणे, हत्ती यांसारखे प्राणी समूहाने राहतात आणि सामाजिक वर्तन दाखवितात. या प्राण्यांत सामाजिक वर्तन उच्च प्रतीचे असते. काही प्राण्यांत हे वर्तन कनिष्ठ प्रतीचे असते. प्राण्यांच्या सामाजिक वर्तनाची काही उदाहरणे खाली दिली आहेत.

 

(१) अनेक प्राणी निरनिराळ्या कारणांसाठी एकत्र येतात परंतु त्यांच्या वर्तनात सुसूत्रता किंवा शिस्त नसते. उदा., आपणास असे आढळते की, रस्त्यावरील पाऱ्याच्या दिव्याखाली पतंग, पाण्यातील किडे, भुंगेरे वगैरे निरनिराळ्या जातींचे कीटक जमा होतात. केवळ प्रकाशाच्या आकर्षणामुळेच हे कीटक एकत्र आलेले असतात. या कीटकांपैकी कोणताही कीटक इतरत्र निघून जातो किंवा बाहेरचा कोणताही कीटक त्या समूहात येतो. जर दिवा बंद केला, तर या समूहातील कीटक इतरत्र निघून जातात. अशा तऱ्हेने हा समूह तात्पुरताच असतो.

 


 

(२) वाळवी, मुंग्या, मधमाश्या आणि गांधील माश्या यांसारखे कीटक समाजप्रिय आहेत. ते समूहाने राहतात आणि घरटी बांधून राहतात. त्यात आपली अंडी घालतात आणि तेथेच आपली संतती वाढवितात. या कीटकांत निरनिराळ्या जातींचे कीटक तयार होतात व आपल्या समूहासाठी करावयाच्या कामाची परस्परांत वाटणी करतात. उदा., या कीटकांत नर, मादी, कामकरी आणि सैनिक कीटक अशा जाती असतात. यांपैकी कामकरी आणि सैनिक कीटक प्रजोत्पादन करू शकत नाहीत. कामकरी कीटक घरटी बांधणे, त्यांचा विस्तार करणे, संततीची काळजी घेणे, अन्न गोळा करणे इ. कामे करतात, तर सैनिक कीटक घरट्याचे आणि घरट्यातील इतर जातीच्या कीटकांचे शत्रूपासून रक्षण करतात. नर कीटक अनेक असतात व मादी कीटक एकच असते. तिला राणी म्हणतात. नर आणि मादी कीटकांचे काम प्रजोत्पादनाचे असते.

 (३) काही पक्षी समूहाने राहतात परंतु त्यांच्यातही एक पक्षी प्रमुख असतो. त्याच्या हुकमतीखाली इतर पक्षी राहतात. या पक्ष्यांतही क्रमाक्रमाने वरचढपणा असतो. उदा., कोंबड्यांच्या थव्यात एक प्रमुख कोंबडी असते. जमिनीवरील दाणे टिपताना ती प्रथम दाणे टिपते. जर एखाद्या कोंबडीला एखादा दाणा आढळला, तर ही प्रमुख कोंबडी जोरजोराने आवाज काढीत तिच्याजवळ येऊन दाणा पटकावते. ही कोंबडी सर्वांत बळकट असून तिच्या हाताखाली कमी बळकट कोंबडी असे क्रमाक्रमाने वर्चस्व असते.

 

(४) माकडे गट करून राहतात. माकडांत परस्परांशी कसे वागावयाचे याचे वर्तन ठरून गेलेले असते. गटात एक बळकट नर प्रमुखाचे काम करतो. त्याच्या आज्ञेत गटातील इतर नर राहतात. गटात अनेक माद्या आणि पिले असतात. संकटाच्या वेळी गटाचा प्रमुख नर शत्रूशी सामना करतो व इतरांचे रक्षण करतो. गटातील माकडे एकमेकांशी निरनिराळ्या प्रकारचे वर्तन करतात. उदा., मादी आणि पिलू यांचे वात्सल्याचे वर्तन, एका मादीचे दुसऱ्या मादीशी सलोख्याचे वर्तन, एका पिलाचे दुसऱ्या पिलाशी मैत्रीचे वर्तन, नराचे मादीशी लैंगिक वर्तन, एका नराचे दुसऱ्या नराशी मैत्रीचे वर्तन आणि नराचे पिलाशी संरक्षणाचे वर्तन आढळून येते.

 

समूहाने अगर थव्याने राहणारे प्राणी आपला नेता अगर प्रमुख निवडताना जो सर्वांत बळकट असेल त्याची निवड करतात. मेंढीच्या कळपातील वयाने मोठ्या असलेल्या मेंढीला प्रमुख मानून इतर मेंढ्या तिच्या पाठोपाठ जातात. हे वर्तन अनेक वेळा आंधळेपणाचे असते. कारण दुर्दैवाने जर ही प्रमुख मेंढी विहिरीत पडली अगर कड्यावरून घसरली, तर तिच्या पाठोपाठ इतर मेंढ्याही विहिरीत पडतात अगर कड्यावरून कोसळतात.

 

सामूहिक जीवन जगणारे वाळवी, मुंगी, मधमाशी यांसारखे कीटक एकमेकांबरोबर संधान ठेवण्यासाठी वेगवेगळे वर्तन करतात. यालाच कीटकांची ‘भाषा’ म्हणतात. उदा., कामकरी जातीच्या वाळवी किंवा मुंग्या रांगेने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या त्याच जातीच्या कीटकांच्या शृंगिकांना आपल्या शृंगिकांनी स्पर्श करून मगच पुढे चालू लागतात. तर कामकरी मधमाशी मध मिळण्याजोगे ठिकाण सापडल्यावर आपल्या मोहोळावर येऊन विशिष्ट तऱ्हेने गोलाकार किंवा इंग्रजी 8 (आठ) आकड्यासारखे भरभर चालतात. त्याच वेळी आपल्या उदरखंडाची दोन्ही बाजूंना हालचाल करतात. यामुळे इतर कामकरी मधमाश्यांना मध मिळण्याचे ठिकाण, त्याची दिशा, अंतर आणि तेथे मिळणाऱ्या मधाचा अंदाज यांची माहिती देतात. कार्ल फोन फ्रिश यांनी मधमाश्यांच्या या वर्तनावर अत्यंत महत्त्वाचे संशोधन करून जणू काय त्यांची भाषाच जाणून घेतली म्हणून त्यांचा १९७३ सालचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

 

मुंग्या ज्या वेळी जमिनीवरून जात असतात त्या वेळी त्यांच्या शरीरातून एक द्रव पदार्थ पाझरत असतो. याला ⇨ फेरोमोन असे म्हणतात. या पदार्थाला एक विशिष्ट वास असतो व प्रत्येक जातीच्या मुंगीच्या शरीरातून ठराविक वासाचा द्रव पाझरत असतो. या ठराविक वासामुळे मुंग्या कोठेही फिरत असल्या, तरी न चुकता आपल्या वारुळात परत येतात. मुंग्या सहसा दुसऱ्या जातीच्या मुंग्यांच्या समूहात जात नाहीत. कारण या नव्याने आलेल्या मुंग्यांचा समूहातील मुंग्या स्वीकार करीत नाहीत. उलट त्यांना हुसकावून लावतात अगर ठार करतात परंतु आपण जर एखाद्या मुंगीला अल्कोहॉलमध्ये बुचकळून काढले, तर तिच्या शरीराला येणारा वास निघून जातो. अशी मुंगी दुसऱ्या जातीच्या मुंग्यांच्या समूहात सोडली, तर ती समूहात सामावून घेतली जाते. तिला ठार केले जात नाही. [⟶ प्राण्यांचे सामाजिक, जीवन, प्राण्यांमधील संदेशवहन].

 

परिस्थितीनुसारहोणारेवर्तन : भोवतालच्या परिस्थितीनुसार प्राणी आपले वर्तन बदलतात व आपले हालचालीचे क्षेत्र ठरवून घेतात. या ठरविलेल्या क्षेत्रात त्याच जातीच्या इतर प्राण्याला येऊ दिले जात नाही. उदा., अनेक पक्षी घरटी बांधण्यापूर्वी एखादे झाड अगर योग्य जागा निवडून तेथे आपले घरटे बांधतात. या झाडाभोवती असलेल्या भागात इतर पक्ष्यांना घरटे बांधू देण्यास विरोध करतात व आपल्या घरट्याचे आणि पिलांचे शत्रूपासून रक्षण करतात. निसर्गात निर्माण होणाऱ्या निरनिराळ्या संवेदना प्राणी ग्रहण करतात व त्या संवेदनांप्रमाणे आपल्या शरीराची हालचाल करतात. या वर्तनाला दिशादेशन म्हणतात. या संवेदनेकडे आपले शरीर वळवून (उदा., भक्ष्य दिसल्याबरोबर त्याकडे लक्ष देऊन हळूहळू भक्ष्याच्या दिशेने जाणे) अगर संवेदनेच्या विरुद्ध बाजूला निघून जाऊन (उदा., विस्तवापासून अनेक प्राणी दूर जातात) प्राणी वर्तन करतात. भोवतालच्या परिस्थितीत अन्नाचा तुटवडा पडला अगर हवामान प्रतिकूल झाले, तर कीटक, पक्षी व अनेक सस्तन प्राणी स्थलांतर करतात. हेही एक प्रकारचे वर्तन आहे.

 

अनेक कीटक, मासे, बेडूक, सरीसृप (सरपटणारे) प्राणी, सस्तन प्राणी, पक्षी वगैरे भोवतालच्या परिस्थितीप्रमाणे आपल्या शरीरावर रंग निर्माण करून शत्रूपासून आपले रक्षण करतात. काही कीटकांचे शरीर पानासारखे किंवा गवताच्या काडीसारखे असते व त्यामुळे त्यांना ओळखणे कठीण जाते. अनेक प्रकारचे पक्षी व सर्प यांना ते गवतात किंवा झाडावर असताना ओळखणे कठीण जाते. [⟶ अनुकृति मायावरण].

 

सहजप्रेरणा : अनेक प्राण्यांच्या बाबतीत पूर्वीचा अनुभव नसतानाही ठराविक संवेदनांना ठराविक प्रकारची प्रतिक्रिया किंवा वर्तन केले जाते, असे आढळून येते. हे ज्ञान प्राण्यांना उपजत असते. या ज्ञानाला किंवा वृत्तीला सहजप्रेरणा (किंवा सहजप्रवृत्ती) म्हणतात. या उपजत वृत्तीची अनेक उदाहरणे देता येतील. उदा., बदकाची पिले अंड्यांमधून बाहेर पडल्याबरोबर पूर्वानुभव नसतानाही आपल्या आईच्या पाठोपाठ फिरू लागतात, पाण्यात शिरतात आणि पोहू लागतात. कोंबडीची पिले जन्मल्याबरोबर सहजपणे जमिनीवरील दाणे टिपू लागतात. मधमाशी कोशातून बाहेर पडल्यावर मोहोळावर फिरून त्यातील कप्पे स्वच्छ करणे, अळ्यांना खाऊ घालणे, नवीन कप्पे तयार करणे, फुलामधील मध गोळा करणे व तो कप्प्यात साठविणे इ. कामे पूर्वानुभव नसतानाही करते. कुंभारीण या नावाची गांधील माशी अंडी घालण्यासाठी चिखलाचे सुंदर घर तयार करते. अमोफिला या नावाची गांधील माशी जमिनीत भोक पाडून एक प्रशस्त पोकळीचे घर बनविते. प्रत्येक वेळी घराबाहेर पडण्याच्या वेळी ती घराचे तोंड बारीक खड्यांनी बद करते. यामुळे इतर कीटक या घरात शिरत नाहीत. नंतर ती पानावर असणाऱ्या फुलपाखरांच्या अळ्यांना नांगी मारून निष्प्रभ करते आणि त्यांना तोंडात धरून आपल्या घराजवळ आणते. घराच्या जवळ आल्यावर ही तोंडातील अळी जमिनीवर ठेवून घराच्या तोंडावर ठेवलेले खडे दूर करते व अळीला घरात नेऊन तेथील पोकळीत ठेवते. पुन्हा घराबाहेर पडल्यावर ती घराचे तोंड खड्यांनी बंद करते व अळी शोधण्यासाठी झाडाकडे जाते. अशा तऱ्हेने अनेक अळ्या गोळा करून ती प्रत्येक अळीवर आपली अंडी घालते. या अळ्या केवळ गांधील माशीच्या नांगीतील विषामुळे निष्प्रभ पडलेल्या असतात. त्या मेलेल्या नसतात. सर्व अळ्यांवर अंडी घातल्यावर ही गांधील माशी घराबाहेर पडते व घराचे दार बंद करून पुन्हा त्याकडे फिरकत नाही. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या गांधील माशीच्या अळ्या फुलपाखरांच्या अळ्या खाऊन मोठ्या होतात. त्यांचे कोश बनतात व कोशातून पूर्णावस्थेतील गांधील माशा तयार झाल्यावर त्या घराबाहेर पडून स्वतंत्र जीवन जगतात. अशा तऱ्हेने पूर्वानुभव नसतानाही अमोफिला गांधील माशी घर बांधणे, अळ्या गोळा करणे, त्यांवर आपली अंडी घालणे इ. कामे करतात.

 


 कामकरी मुंग्याही पूर्वानुभव नसताना अन्न गोळा करणे, वारुळाची निगा राखणे इ. कामे करतात. हे सर्व वर्तन सहजप्रेरणेमुळे होते. सिंह, वाघ, हत्ती, मानव इत्यादींमध्ये याउलट स्थिती आढळते. या प्राण्यांच्या पिलांना उपजत वृत्ती नसते. त्यांचे वर्तन आपल्या मातापित्यांचे वर्तन पाहून सुधारले जाते. उदा., जन्मतःच सिंहाची पिले दुबळी असतात. त्यांचे डोळे मिटलेले असतात. त्यांना नीट चालता येत नाही व ती आईचे दूध पितात. पिले थोडी मोठी झाल्यावर त्यांना मांस कसे खावयाचे हे आईबाप शिकवितात. तसेच आपली आई भक्ष्याचा पाठलाग कशी करते? त्यावर झडप घालून त्यास कशी ठार मारते? व भक्ष्य तोंडात धरून ते कसे नेते? इ. कृतींचे निरीक्षण पिले करतात. नंतर ही कामे ती स्वतः करू लागली असताना थोड्या चुका करतात. परंतु अनुभवाने त्यांच्या चुका सुधारून योग्य वर्तन केले जाते. मनुष्यप्राण्यातही हेच आढळते. लहान मूल त्याला चालण्यासाठी, बोलण्यासाठी आईवडिलांकडून धडे घेतल्यावरच चालू किंवा बोलू शकते. [⟶ सहजप्रेरणा].

 

प्राण्यांच्या सहजप्रेरणेबद्दल बरेच संशोधन झाले आहे. प्राण्यांच्या पिलांना एकएकटे वाढवून त्यांच्या सहजप्रेरणेमध्ये बदल घडतो किंवा नाही याचाही विचार झाला आहे. अनेक जातींचे मासे, पक्षी इ. प्राणी एकएकटे वाढविल्यावरही अन्न ग्रहण करण्याचे, लैंगिक क्रियेचे किंवा संरक्षणाचे वर्तन आपल्या मातापित्याप्रमाणेच करतात. यामुळे आनुवंशिकतेमुळे प्राण्यामध्ये सहजप्रेरणा निर्माण होते, असे शास्त्रज्ञांचे मत झाले आहे. यासंबंधी शास्त्रज्ञांनी केलेले काही प्रयोग उल्लेखिता येतील. १९२७ साली एल्. कारमायकेल यांनी बेडकांच्या पिलांवर काही प्रयोग केले. बेडकाचे पिलू जेव्हा अंड्यामध्ये असते त्या वेळी त्याच्या शेपटीच्या मागेपुढे हालचाली होत असतात. या हालचाली पिलू जेव्हा जन्मल्याबरोबर पाण्यात प्रवेश करते तेव्हा पोहण्यासाठी उपयोगी पडतात. कारमायकेल यांनी बेडकांची अंडी सतत प्रकाशात ठेवली, त्यामुळे ही पिले एक तऱ्हेच्या सुप्तावस्थेत गेली व त्यांच्या शेपटीची हालचाल बंद पडली. पिले अंड्यांमधून बाहेर पडण्यापूर्वी काही तास प्रकाश बंद करून अंडी अंधारात ठेवली. या अंड्यांमधून पिले बाहेर पडल्यावर आपल्या शेपटीची मागेपुढे व्यवस्थित हालचाल करून पाण्यात पोहू लागली. यांवरून कारमायकेल यांनी असा निष्कर्ष काढला की, शेपटीची पोहण्यासाठी हालचाल करण्याची पिलामध्ये उपजत वृत्ती असते. यासाठी वेगळे शिक्षण घ्यावे लागत नाही.

 

डी. स्पॉल्डिंग या शास्त्रज्ञांनी १८७३ साली पक्ष्यांच्या उडण्याच्या पात्रतेसंबंधी काही निरीक्षणे केली. काही जातींच्या चिमण्यांची पिले फार लहान पिंजऱ्यात वाढविली. हे पिंजरे इतके लहान होते की, या पिलांना आपले पंखही पूर्णपणे पसरता येत नव्हते मग उडणे तर दूरच राहिले. पिलांची वाढ पूर्णपणे झाल्यावर त्यांना मोकळे सोडले. तेव्हा स्पॉल्डिंग यांना असे आढळले की, ही पिले निसर्गात वाढणाऱ्या इतर पिलांसारखीच सहजपणे आपल्या पंखांचा उपयोग करून हवेत उडू शकतात परंतु फ्लेजलिंगसारख्या पक्ष्यांचा याला अपवाद आहे. या पिलांना उडण्याचे शिक्षण मातापित्याकडून घ्यावेच लागते आणि उडण्यातील बारकावे व खुब्या शिकाव्या लागतात. अनेक जातींच्या पक्ष्यांचे वर्तन आनुवंशिक असून अनुभवाने सुधारते.

 

डब्ल्यू. सी. डिल्‌जर या शास्त्रज्ञांनी १९६७ साली लव्ह बर्ड्‌स या पक्ष्यांच्या दोन निरनिराळ्या जातींच्या घरटे बांधण्याच्या पद्धतीचे निरीक्षण केले. एका जातीचे पक्षी घरटे बांधण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या गवताच्या काड्या आपल्या चोचीने गोळा करतात, तर दुसऱ्या जातीचे पक्षी आपल्या अंगावरील पिसांत या काड्या खोचून गोळा करतात. प्रयोगशाळेत या दोन जातींच्या पक्ष्यांचा संकर केल्यावर, संकरित पक्षी आपले घरटे बांधताना गवताच्या काड्या कोणत्या प्रकाराने गोळा करतात यांचे डिल्‌जर यांनी निरीक्षण केले. त्या वेळी त्यांना असे आढळले की, बरेच दिवस या पक्ष्यांना गवताच्या काड्या कशा गोळा कराव्यात हे समजत नव्हते. त्यांना धड चोचीतून काड्या नेता येईनात किंवा अंगावरील पिसांत त्या खोचता येईनात. सरतेशेवटी अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर या पक्ष्यांना चोचीतून काड्या नेणे सोईचे वाटू लागले.

 

आय्. फोन आयबल-इब्सफेल्ट यांनी १९६१ साली पोलकॅट या प्राण्याच्या भक्ष्य पकडण्याच्या पद्धतीवर संशोधन केले. या प्राण्याच्या पिलांना एकएकटे ठेवून वाढविले. अशा पिलांच्या जवळ जिवंत उंदीर सोडल्यावर त्या उंदरांच्या हालचालीकडे या पिलाचे सतत लक्ष होते. त्यांनी उंदराला ठार मारले नाही परंतु ज्या वेळी उंदीर त्यांच्यापासून दूर जाऊ लागला त्या वेळी या पिलांनी त्याच्यावर एकदम उडी मारून त्याचा गळा पकडला. असे अनेक वेळा उंदराच्या बाबतीत केल्यावर या पिलांनी उंदीर आपणापासून दूर जात आहे असे दिसताच त्याच्यावर उडी मारून त्याच्या गळ्याला चावा घेवून त्याला ठार मारले व आपला हिंस्रपणा प्रकट केला.

 

पक्ष्यांच्या गाण्यासंबंधीची अनेक शास्त्रज्ञांनी निरीक्षणे केली आहेत. त्यांच्या मते पक्ष्यांची पिले प्रथम जेव्हा गाणी गाऊ लागतात तेव्हा आपल्या आईवडिलांचे गाणे ऐकून आपले गाणे सुधारतात. गाणी म्हणण्याचे ज्ञान त्यांना उपजत असते परंतु गाणी सुधारण्याचा काळ पहिल्या चार-पाच महिन्यांचा असतो. या काळात जर पिलाचे गाणे सुधारले नाही, तर ते पिलू बेसूर गाणे गाते. पक्ष्याच्या पिलाच्या गाण्यामध्ये कसकशी सुधारणा होत जाते यासंबंधी पी. मार्लर आणि एम्. टाम्यूरा यांनी १९६४ साली काही निरीक्षणे केली. व्हाईट क्राउन्ड फिंच या जातीच्या पक्ष्यांच्या पिलांना पिंजऱ्यात एकएकटे ठेवण्यात आले. त्यांना बाहेरचा कोणताही आवाज ऐकू येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली. पिले तीन महिन्यांची होईपर्यंत गाणी गातात व त्यात सुधारणा होते. वरील प्रयोगात पिले गाणी गाऊ लागली परंतु ती बेसूर होती असे आढळले. कारण त्यांना त्यांच्या आईबापाची गाणी ऐकावयास मिळाली नाहीत.

 

दुसऱ्या प्रयोगात काही पिलांना दुसऱ्या जातीच्या पक्ष्याचे गाणे ऐकविण्यात आले. यामुळे या पिलांचे गाणे आपल्या मूळच्या पद्धतीप्रमाणे न होता नव्या पद्धतीचे झाले. तिसऱ्या प्रयोगात पहिले तीन-चार महिने काही पिले गाणी गाऊ लागल्यानंतर त्यांना इतर कोणत्याही पक्ष्याचे गाणे ऐकविले, तरी त्यांच्या गाण्यात बदल होत नाही असे आढळून आले.

 

एम्. कोनिशी या शास्त्रज्ञांनी १९६५ साली पक्ष्यांच्या गाण्यांबद्दल काही प्रयोग केले. त्यांनी पिलांच्या अंतर्कर्णांना इजा करून त्यांना बहिरे बनविले. यामुळे या पिलांना स्वतःचे गाणे व इतर पक्ष्यांचे गाणे ऐकू येईना. अशी पिले बेसूर गाणी गाऊ लागली.

 


 

काही प्राण्यांत विशिष्ट वर्तन करण्याची उपजत पात्रता असते. पोपट, मैना, साळुंकी यांसारखे पक्षी इतर पक्ष्यांच्या किंवा प्राण्यांच्या आवाजाची नक्कल करतात. थॉर्प यांनी १९६१ साली यांसंबंधी काही निरीक्षणे करून असा निष्कर्ष काढला की, पक्ष्यांच्या गळ्यात असणाऱ्या स्वरयंत्राच्या साह्याने आवाजाची नक्कल करणे शक्य होते. अर्थात स्वरयंत्रालाही काही मर्यादा असतात व त्यामुळे हे पक्षी सर्व प्रकारचे आवाज काढू शकत नाहीत.

 

टिनबर्जेन यांनी १९५० साली असे दाखवून दिले की, हेरिंग कुरव (गल) या पक्ष्याची मादी अंड्यांमधून बाहेर पडलेली आपली पिले कोणती व दुसऱ्या मादीची पिले कोणती हे जाणू शकते. आर्. ए. हिंड आणि टिनबर्जेन यांनी १९५८ साली असे निरीक्षण केले की, ‘टिटमाइस’ जातीचे पक्षी मोठ्या आकारमानाचे भक्ष्य आपल्या पायात धरून त्याचे चोचीने तुकडे करतात. ‘चॅफिंच’ जातीचे पक्षी जरी टिटमाइस पक्ष्याच्या सहवासात वाढविले, तरी ते भक्ष्य पायात धरत नाहीत व त्यांचे चोचीने तुकडे करीत नाहीत. वर उल्लेखिलेल्या अनेक उदाहरणांवरून आपणास असे दिसून येते की, काही प्राण्यांचे वर्तन आनुवंशिक असते, तर काहीमध्ये ते निरीक्षण करून सुधारले जाते.

 प्रतिसाद : प्राणी जे वर्तन करतात त्यास निसर्गात निर्माण होणाऱ्या संवेदना कारणीभूत असतात. या संवेदनांमुळे (१) ठराविक किंवा निश्चित आणि (२) अनिश्चित प्रतिसाद प्राणी देतात. हे कार्य मेंदूकडून केले जाते. अनिश्चित प्रतिसाद हा मेंदू व तंत्रिका तंत्र यांच्या अकार्यक्षमतेवर अवलंबून असतो. उदा., एखादा बहिरा प्राणी ध्वनी ऐकू शकत नसल्याने आपली मूळ जागा सोडून हलत नाही किंवा भूक नसली, तर एखादा प्राणी अन्नाकडे आकर्षिला जात नाही.

 

जेव्हा प्राण्यांचे ज्ञानेंद्रिय एखादी संवेदना ग्रहण करते तेव्हा तंत्रिकेमधून ती मेंदूपर्यंत जात असताना प्रभावी बनत असते. वाघाची डरकाळी ऐकल्यावर हरिणे त्या जागेपासून दूर पळून जातात. उंदीर आसपास फिरत असल्याचे लक्षात आल्यावर मांजर त्यावर झडप घालण्यासाठी दबा धरून बसते. आपला मालक आपणासाठी भाकरी आणत आहे हे कळल्यावर कुत्र्याच्या तोंडातून लाळ गळू लागते. अशा तऱ्हेने ध्वनी, दृष्टी किंवा वास या संवेदनांना प्राणी विशिष्ट वर्तनाने निश्चित प्रतिसाद देतात. अनेक प्राणी थोड्याशा संवेदनेमुळेही उत्तेजित होतात. उदा., रॉबिन पक्ष्यामध्ये प्रजोत्पादन काळात नराच्या छातीवरील पिसे लाल रंगाची होतात. पिंजऱ्यात नर पक्षी ठेवून त्याच्या शेजारी लाल रंगाच्या पिसांची नरपक्ष्याची ओबडधोबड प्रतिकृती ठेवली, तर नरपक्षी या प्रतिकृतीवर रागाने हल्ला करतो. टिनबर्जेन यांना १९५१ साली स्टिकलबॅक या माशाच्या बाबतीत असाच अनुभव आला. प्रजोत्पादनाच्या काळात मादीच्या पोटाचे आकारमान मोठे होते आणि नराच्या गळ्याजवळील भाग लाल होतो. एका काचपात्रात टिनबर्जेन यांनी एक नर मासा ठेवला व त्याच काचपात्रात नर माशाची हुबेहूब प्रतिकृती ठेवली. या प्रतिकृतीच्या गळ्याजवळील भागाला लाल रंग दिला नव्हता. या प्रतिकृतीकडे नर माशाने संपूर्णपणे दुर्लक्ष केले. दुसऱ्या एका प्रयोगात नर मासा ठेवलेल्या काचपात्रात लांबट गोल, चौकोनी पट्टीसारख्या आकाराच्या परंतु खालील भाग लाल रंगाने रंगविलेल्या प्रतिकृती ठेवल्यावर टिनबर्जेन यांना असे आढळले की, हा नर मासा आपले डोके खाली वळवून रागारागाने या प्रतिकृतीवर तुटून पडला. जणू काय लाल रंगाचे गळे असलेले अनेक नर मासे या काचपात्रात शिरले होते. तिसऱ्या प्रयोगात नर मासा असलेल्या काचपात्रात मादी माशाची पोटाचा भाग फुगीर असलेली प्रतिकृती ठेवली (प्रजोत्पादन काळात जेव्हा मादीच्या शरीरात अंड्यांची पूर्ण वाढ होऊन ती फलनासाठी तयार होतात त्या वेळी तिच्या पोटाचा भाग फुगीर होतो). या वेळी नर माशाने या मादीच्या प्रतिकृतीवर हल्ला न करता तिच्याशी प्रणयाराधन सुरू केले. अशाच एका प्रयोगात टिनबर्जेन यांनी नर मासा असलेले काचपात्र प्रयोगशाळेतील खिडकीजवळ ठेवले होते. त्यांना काही वेळाने असे आढळले की, हा नर मासा आपले डोके खाली करून काचपात्राच्या रस्त्याकडील बाजूला वारंवार धडका मारीत आहे. टिनबर्जेन यांनी रस्त्यावर पाहिले असता खिडकीसमोर पोस्टाची लाल रंगाची मोटार उभी असलेली त्यांना दिसली. जोपर्यंत ही मोटार खिडकीसमोर उभी होती तोपर्यंत नर मासा वारंवार काचपात्रावर धडका मारीत होता. जेव्हा ही मोटार तेथून निघून गेली तेव्हा नर मासा शांत झाला. अशा तऱ्हेने रॉबिन पक्षी आणि स्टिकलबॅक मासा लाल रंगामुळे उत्तेजित होऊन विशिष्ट वर्तन करतात.

 

अंड्यांतून बाहेर पडलेल्या पिलांची चिवचिव ऐकल्यावर कोंबडीच्या मनात वात्सल्यभाव निर्माण होतो व यामुळे ती पिलांचे नेहमी रक्षण करते. एका प्रयोगात असे आढळले की, चिवचिव करणारी कोणतीही वस्तू कोंबडी आपले पिलू समजून आपल्याजवळ राहू देते. कोंबडीच्या कानाला इजा करून तिला बहिरी केली, तर अंड्यातून बाहेर पडलेल्या पिलाची चिवचिव ती ऐकू शकत नाही व ती पिलांना ठार मारते.

 

घुबड, ससाणा इ. अनेक परभक्षी पक्ष्यांचे डोळे मोठे असतात व त्यामुळे इतर पक्षी या परभक्षींना ओळखतात. काही जातींचे पतंग व फुलपाखरे यांच्या पंखांवर डोळ्याच्या आकाराची आकृती असते. जेव्हा या कीटकांना कीटकभक्षी पक्ष्यापासून धोका असतो त्या वेळी हे कीटक आपले पंख पसरून डोळ्यासारख्या आकृत्या उघड करतात. या आकृत्या म्हणजे जणू काय परभक्षी पक्ष्यांचेच डोळे आहेत, असे समजून हे पक्षी घाबरून निघून जातात.

 

काही पक्षी आपली अंडी घरट्यात उबवीत असताना त्या घरट्याशेजारी या पक्ष्यांच्या अंड्याच्याच रंगाचे परंतु आकारमानाने मोठे असे दुसऱ्या पक्ष्याचे अंडे ठेवल्यावर हे पक्षी आपली अंडी उबवायची सोडून मोठ्या आकारमानाचे अंडे आपल्या घरट्यात ओढून उबवितात, असे आढळले आहे. कुरव, हंस यांसारख्या पक्ष्यांत हे निरीक्षण केलेले असून केवळ अंड्याचे मोठे आकारमान हेच या पक्ष्यांचे आकर्षण ठरते.

 

हेरिंग कुरव पक्ष्याच्या खालच्या चोचीवर लाल रंगाचा ठिपका असतो व बाकी सर्व चोच पिवळी असते. हे पक्षी आपल्या चोचीत अन्न गोळा करून पिलांना भरविण्यासाठी घरट्यात येतात त्या वेळी हा लाल रंगाचा ठिपका पाहून पिले आपली चोच त्या ठिपक्यावर आपटू लागतात. त्या वेळी हे पक्षी आपल्या चोचीत धरलेले अन्न पिलांना देतात. टिनबर्जेन यांनी अनेक आकारांच्या व रंगांच्या प्रतिकृती करून या प्रतिकृती त्या पिलांजवळ नेल्यावर पिले कसा प्रतिसाद देतात ते पाहिले. त्यांना असे आढळले की, लाल रंगाचा ठिपका व पिवळा रंग असलेल्या कोणत्याही आकाराच्या प्रतिकृतीला पिले ठराविक प्रतिसाद देतात.

 


 

लोरेन्ट्स यांच्या प्रयोगातील प्रतिकृती(तिमिर चित्र).अनेक पक्ष्यांना व त्यांच्या पिलांना ससाणा, घार, गरुड इ. परभक्षी पक्ष्यांपासून भिती असते. कोंबडी जेव्हा आपल्या पिलांसह दाणे टिपीत असते तेव्हा तिला जर आकाशात एखादा परभक्षी पक्षी घिरट्या मारताना दिसला, तर ती विशिष्ट आवाज काढून पिलांना जवळ बोलविते आणि आपल्या पंखांखाली घेते. लोरेन्ट्स यांनी १९३७ साली यासंबंधी एक प्रयोग केला. त्यांनी कोंबडीची पिले एका कुंपणाने बंदिस्त अशा उघड्या जागेत ठेवली. एक तार या जागेवर आडवी बांधली व त्या तारेवर अशी एक पंख पसरलेल्या पक्ष्याची प्रतिकृती (तिमिर चित्र) करून ठेवली की, ती लांबट आकाराच्या भागाकडून पाहिली असता बगळ्याच्या चोचीचा व गळ्याचा आणि पाठीमागचा भाग त्याची शेपटी असा भास व्हावा. प्रतिकृती आखूड भागाकडून पाहिली, तर घारीच्या डोक्याचा व गळ्याचा भास होऊन पाठीमागील लांब भाग जणू तिची शेपटी आहे असे वाटावे. ही प्रतिकृती जेव्हा डावीकडे हालविली तेव्हा ती बगळ्यासारखी दिसल्याने कोंबडीच्या पिलांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले परंतु जेव्हा प्रतिकृती उजवीकडे हालविली तेव्हा परभक्षी घारीचा भास होऊन कोंबडीची पिले कुंपणात सैरावैरा घावू लागली. कोंबडीच्या पिलांच्या या वर्तनाला ‘धोक्याच्या इशाऱ्याचा प्रतिसाद’ असे म्हणतात.

  

अशा तऱ्हेने निसर्गातील निरनिराळ्या संवेदना प्राणी आपल्या ज्ञानेंद्रियांवाटे ग्रहण करीत असले, तरी त्यांची शरीरात छाननी होऊन मगच विशिष्ट प्रतिसाद देत असतात. ही छाननी ज्ञानेंद्रियात किंवा मेंदूमध्ये होते.

 

अनेक वेळा प्राणी त्याच संवेदनेला वेगवेगळ्या तऱ्हेचा प्रतिसाद देत असतात. याला कारण प्राण्यांची शारीरिक अंतर्गत स्थिती हे होय. उदा., एखाद्या भुकेलेल्या कुत्र्याजवळ दूधभाकरीची थाळी नेताना ती मिळेपर्यंत तो अतिशय बेचैन असतो. अन्न खाऊन पोट भरल्यावर त्याच्याजवळ दूधभाकरी नेली, तरी तो ढुंकूनही पहात नाही. अन्न तेच परंतु प्राण्याच्या वेगवेगळ्या अंतर्गत स्थितीमुळे तो त्याच संवेदनेला वेगवेगळे प्रतिसाद दर्शवितो. माकडासारखे प्राणी फार चौकस असतात. माकड आपल्याभोवती असलेल्या निरनिराळ्या वस्तूंचे कसे निरीक्षण करते हे आपण पूर्वीच पाहिले आहे. एका प्रयोगात माकडाला पिंजऱ्यात ठेवून त्यात खोकी, काठी इ. अनेक वस्तू ठेवल्या व पिंजऱ्याच्या छताला एक केळ बांधून ठेवले. ते केळ मिळविण्यासाठी माकडाने उड्या मारल्या परंतु त्याचा हात केळ्याला पोहोचेना. शेवटी त्याने खोक्यावर उभे राहून व काठीचा वापर करून हुशारीने केळ मिळविले. दुसऱ्या एका प्रयोगात माकड प्रयोगशाळेत ठेवून पिंजऱ्याला दोन लहान खिडक्या ठेवल्या. एक खिडकी कायमची बंद होती व दुसरी उघडत होती. माकड वारंवार खिडकी उघडून प्रयोगशाळेतील माणसे काय काम करतात, हे चौकसपणे पहात असे.

 

प्राण्यांच्या शरीरात असलेल्या ⇨ पोष ग्रंथीच्या अधोथॅलॅमस या भागात प्रेरणाकेंद्र असते. मिठाचा पाण्यासारखा विद्राव अधोथॅलॅमसामध्ये टोचला असता उंदीर, मेंढी यांसारखे प्राणी सतत पाणी पितात. एवढेच काय कडू पाणीदेखील हे खळखळ न करता पितात, असे आढळले आहे. कारण मिठाच्या पाण्याने अधोथॅलॅमस उत्तेजित होऊन सतत पाणी पिण्याचे कार्य चालू राहते. अन्न भक्षण करण्याच्या बाबतीतही असेच म्हणता येईल.

 

वरील अनेक उदाहरणांवरून आपणास असा निष्कर्ष काढता येईल की, निसर्गात उद्‌भवणाऱ्या अनेक संवेदना ग्रहण करण्यासाठी प्राण्यांना ज्ञानेंद्रिये असतात व या संवेदनांना प्राणी प्रतिसाद देतात. ते जे वर्तन करतात ते शिकण्यामुळे सुधारते किंवा ते उपजत वृत्तीमुळे असते. प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास आता अनेक उपकरणांच्या साहाय्याने करता येऊ लागला आहे व प्राण्यांचे मानसशास्त्र ही एक नवीन शास्त्रशाखा उदयास आली आहे.

 

पहा : तुलनात्मक मानसशास्त्र प्रणयाराधन प्रेरणा-१.

 

संदर्भ :  1. Krushinskii. L. V., Trans. Haigh, B. Animal Behaviour : Its Normal and Abnormal Development . New York 1960.

            2. Maier, N. R. F. Schneirla, T. C. Principles of Animal Psychology, New York, 1964.

            3 Manning. A. An Introduction to Animal Behaviour, London, 1969.

            4. marler, P. R. Hamilton, W. J. Mechanism of Animal Behaviour. New York, 1966.

            5. Thorpe, W. H. Zangwill, O. L., Ed. Current Problems in Animal Behaviour, Cambridge, 1966.

 

रानडे, द. र.