प्राणिजन्य मानवी रोग : पाळीव प्राण्यांपासून मानवाला होणारे रोग अशी प्राणिजन्य मानवी रोगांची व्याख्या पूर्वी केली जाते असे. प्रचलित व्याख्येप्रमाणे मानवाशिवाय इतर पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांपासून मानवाला होणारे रोग तसेच मानवाचे इतर पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये होणारे रोग या दोहोंचाही समावेश प्राणिजन्य मानवी रोग या संज्ञेत केला जातो.
दहा ते बारा हजार वर्षांपूर्वी सर्वप्रथम कुत्रा हा प्राणी माणसाळविण्यात आला. त्यानंतर क्रमाने शेळ्या व मेंढ्या (ख्रि. पू. ९२००), डुकरे (ख्रि. पू. ५५००), गाईगुरे (ख्रि. पू. ३०००) व त्यानंतर गाढव, घोडे व उंट हे प्राणी माणसाळविण्यात आले. मांजर हा प्राणी इतिहासपूर्व काळापासून माणसाळविण्यात आला आहे. या प्राण्यांच्या सान्निध्यात मनुष्य राहू लागल्यानंतर साहजिकच त्यांना होणाऱ्या रोगांचा संपर्क त्याला अधिकाधिक पोहोचू लागला.
वर्गीकरण : या रोगांचे वर्गीकरण रोगकारकानुसार सूक्ष्मजंतुजन्य, व्हायरसजन्य व जीवोपजीवीजन्य [दुसऱ्या सजीवांपासून प्रत्यक्षपणे अन्नपाणी घेऊन उपजीविका करणाऱ्या सजीवांपासून होणारे ⟶ जीवोपजीवन] असे करीत असत. त्यानंतर ज्या प्राण्यापासून रोग होई त्यानुसार म्हणजे माणसाळलेल्या प्राण्यापासून, वन्य प्राण्यापासून व ज्यांना या दोन्ही संज्ञा लावता येत नाहीत परंतु माणसाच्या सान्निध्यात असणाऱ्या कृंतक (उंदरासारख्या कुरतडून खाणाऱ्या) प्राण्यापासून होणारे असे तीन वर्ग पाडण्यात आले. अलीकडे रोगसंपर्क होण्यासाठी ज्या प्रकारच्या प्राण्यांची आवश्यकता असते, त्यावरून वर्गीकरण करण्यात येऊ लागले असून पुढील चार वर्ग मानण्यात येतात.
(१) नैसर्गिक रीत्या एका जातीच्या पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये होणारे व त्या प्राण्यांपासून सरळ मानवाला होणारे रोग उदा., ⇨ अलर्करोग.
(२) माणसामध्ये रोगसंसर्ग होण्यापूर्वी दोन पृष्ठवंशी प्राण्यांमधून रोगकारकाचा प्रवास घडणारे रोग उदा., पट्टकृमी बाधा [⟶पट्टकृमि कृमि].
(३) पृष्ठवंशी प्राण्यांशिवाय मानवाला रोगसंपर्क होण्यासाठी एका अपृष्ठवंशी प्राण्याची जरूरी असणारे रोग उदा., ⇨ निद्रारोग.
(४) पृष्ठवंशी प्राण्यांशिवाय विशिष्ट परिस्थितीत निसर्गामध्ये रोगकारकांचा साठा असल्यामुळे तेवढ्या परिसरातच होणारे रोग उदा., ऊतकद्रव्यी कवकजन्य रोग [ ⇨जालिकाअंतःस्तरीयतंत्रातील कोशिकांत (पेशींत) ऊतकद्रव्यी कवक (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहातील द्रव्यात संक्रामण करणारी बुरशीसारखी हरितद्रव्यरहित वनस्पती हिस्टोप्लाझ्माकॅप्सुलॅटम) शिरल्यामुळे होणारा हा विशिष्ट रोग आहे. पक्ष्यांची विष्ठा मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या जमिनीत हे कवक भरपूर प्रमाणात असते आणि अशा जमिनीचा संपर्क येणाऱ्या माणसांच्या शरीरात ते प्रवेश करते].
प्राणिजन्य मानवी रोगांची संख्या आज दीडशेच्या आसपास असून प्रतिवर्षी त्यांत सतत भर पडत आहे. यांपैकी काही रोग प्राणघातक आहेत, तर काही नुसतेच त्रासदायक आहेत. यांशिवाय मानवाला होणाऱ्या काही रोगांचा संबंध पृष्ठवंशी प्राण्यांशी लागत असला, तरी ते सांसर्गिक रोगांच्या व्याख्येत बसत नसल्यामुळे त्यांना प्राणिजन्य मानवी रोग अशी संज्ञा लावीत नाहीत. उदा., सर्पदंशजन्य विषबाधा किंवा विशिष्ट जातीचे मासे खाल्ल्यामुळे होणारी विषबाधा [⟶ विषविज्ञान]. यांशिवाय मूलतः मानवामध्येच होणारे परंतु संसर्गाने इतर प्राण्यांत तात्पुरते उद्भवणारे व त्या प्राण्यांपासून पुन्हा माणसात उद्भवणाऱ्या रोगांचा समावेश प्राणिजन्य मानवी रोगांत करीत नाहीत. थोडक्यात कनिष्ठ वर्गीय प्राण्यांमध्ये जैव दृष्ट्या अनुकूल परिस्थिती असल्यामुळे नेहमी आढळणारे व काही परिस्थितींतच मानवातही उत्पन्न होणारे रोग म्हणजे प्राणिजन्य मानवी रोग होत.
संप्राप्ती : इतर ⇨संसर्गजन्य रोगांप्रमाणे प्राणिजन्य मानवी रोग सूक्ष्मजंतू, व्हायरस, रिकेट्सिया (सूक्ष्मजंतूंपेक्षा लहान परंतु व्हायरसांपेक्षा मोठ्या आकारमानाचे सूक्ष्मजीव), कवके [⟶ कवकसंसर्ग रोग] व जीवोपजीवी या रोगकारकांमुळे होतात.
प्राण्यांमधील काही जीवोपजीवींच्या जीवनचक्रातील विशिष्ट अवस्थांच्या वाढीसाठी मानव हा नैसर्गिक मध्यस्थ पोषक (आश्रय देणारा सजीव) आहे. या अवस्थांमुळे मानवात जरी काही आजार उद्भवत असले, तरी त्यांचा समावेश प्राणिजन्य मानवी रोगांत करणे योग्य होणार नाही परंतु मध्यस्थ पोषक नसताना नकळत किंवा हलगर्जीपणामुळे उद्भवणाऱ्या अशा जीवोपजीवीजन्य रोगांचा समावेश मात्र प्राणिजन्य मानवी रोगांत करतात. कुत्र्याच्या एका पट्टकृमीची अंडी माणसाच्या आंत्रमार्गात (आतड्यांत) गेल्यामुळे होणारा द्राक्षार्बुद रोग (फुप्फुसे, यकृत, अस्थी या अवयवांत लहान लहान द्रवार्बुदे-द्रवयुक्त पिशव्या-तयार होणारा रोग), जलतरणजन्य कंड (पाणबदकाच्या रक्तामधील पर्णकृमींच्या डिंभावस्था-अळीसारख्या अवस्था-पोहणाऱ्या माणसाच्या त्वचेमध्ये शिरल्यामुळे होणारा व कंड अथवा खाज हे प्रमुख लक्षण असणारा त्वचारोग), काही कीटक व वन्य पशूंतील ट्रिपॅनोसोमाक्रूझाय नावाच्या सूक्ष्म जीवोपजीवीमुळे मानवात होणारा शागास रोग (कार्लस शागास नावाच्या ब्राझिलियन शास्त्रज्ञांनी कारण शोधल्यामुळे त्यांचे नाव दिलेला रोग) ही जीवोपजीवींमुळे होणाऱ्या प्राणिजन्य मानवी रोगांची काही उदाहरणे आहेत.
रोगसंसर्ग : इतर संसर्गजन्य रोगांप्रमाणेच या रोगांचा संसर्ग मानवाला होण्याचे अनेक मार्ग आहेत. यांपैकी चार प्रमुख मार्ग असे आहेत : (१) प्रत्यक्ष शारीरिक संपर्क, (२) हवा, (३) अन्न आणि (४) कीटक. या मार्गांनी होणाऱ्या रोगांची काही उदाहरणे खाली दिली आहेत.
(१) प्रत्यक्ष संपर्कामुळे रोगी जनावरापासून होणारे पाददद्रू [⟶ कवकसंसर्ग रोग] व ⇨गजकर्णयांसारखे त्वचारोग. खाटीकखान्यात काम करणाऱ्यांच्या त्वचेतून किंवा श्लेष्मकलेतून (आतडी, श्वासनाल यांसारख्या नलिकाकार पोकळ्यांच्या बुळबुळीत अस्तरातून) प्रत्यक्ष संपर्कामुळे ⇨ आंदोलज्वराचे सूक्ष्मजंतू मानवी शरीरात प्रवेश करू शकतात.
(२) शुकरोग हा ‘बेडसोनीया’ गटातील सूक्ष्मजंतूमुळे होणारा आणि न्यूमोनिया हे प्रमुख लक्षण असलेला पोपट व तत्सम पक्ष्यांमुळे उद्भवणारा रोग आहे. हे सूक्ष्मजंतू रोगट पक्ष्याच्या विष्ठेतून बाहेर पडतात आणि अशी जंतुयुक्त कोरडी विष्ठा कणरूपाने श्वसनक्रियेबरोबर मानवाच्या फुप्फुसांत शिरल्यामुळे हा रोग उत्पन्न होतो. [⟶ शुकरोग].
(३) क्षयी गुरांचे अर्धेकच्चे मांस खाण्यात येऊन उद्भवणारा क्षयरोग आणि बहुतेक सर्व पाळीव प्राण्यांत व वन्य प्राण्यांत आढळणाऱ्या व अनेक प्रकार असलेल्या साल्मोनेला वंशाचे सूक्ष्मजंतू मानवाच्या जठरांत्र मार्गात (जठर, लहान आतडे व मोठे आतडे मिळून बनणाऱ्या अन्नमार्गात) तोंडाने गिळले जाऊन उद्भवणारे काही विशिष्ट रोग उदा., [जठरांत्रशोथ ⟶ जठरांत्र मार्ग] ही अन्नावाटे होणाऱ्या रोगसंसर्गाची उदाहरणे आहेत.
(४) काही सूक्ष्मजंतू व व्हायरस मानवात कीटकांद्वारे प्रवेश करतात. ⇨ प्रलापकसन्निपातज्वर, ⇨ पीतज्वर आणि ⇨ प्लेग ही अशा रोगांची उदाहरणे आहेत. कीटक व इतर संधिपाद (ज्यांच्या पायांना सांधे असतात असे) प्राणी रोगवाहक असतात परंतु मूळ रोग एखाद्या पृष्ठवंशी प्राण्यात असतो उदा., प्लेग हा रोग मूळ उंदरात असून रोगवाहकाचे काम पिसवा करतात.
काहीरोग : प्राणिजन्य मानवी रोगांपैकी काही रोगांविषयी थोडक्यात माहिती खाली दिली आहे.
अलर्करोग : जलसंत्रास, म्हणजे अन्न किंवा पाणी गिळण्याचा प्रयत्न करताच रोगाचा क्षोभ वाढणे, या दुसऱ्या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या रोगाचे रोगकारक व्हायरस पिसाळलेल्या श्वानवर्गी जनावरांच्या चावण्यामुळे त्यांच्या लाळेतून मानवी शरीरात प्रवेश करतात. [⟶ अलर्क रोग].
आंदोलज्वर : ताप हे प्रमुख लक्षण असलेला व तापात आंदोलने (चढउतार) असलेला हा रोग पशूंमार्फत मानवात उद्भवतो. याकरिता पशुसंपर्क प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष यावा लागतो. पंजाब व काश्मीर या भारतातील राज्यांमध्ये शेळीच्या निरशा दुधाच्या वापरामुळे काही लोकांना हा रोग झाल्याचे आढळले आहे. प्राण्यांतील रोगाचा प्रतिबंध आणि दूधदुभत्याचे पाश्चरीकरण (६२°·८ से. ते ६५°·५ से. या तापमानात ३० मिनिटे दूध ठेवून त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश करण्याची प्रक्रिया) यांमुळे अमेरिकेत या रोगाचे प्रमाण ९०%नी कमी करण्यात यश मिळाले आहे. [⟶ आंदोलज्वर].
क्यूज्वर : कॉक्सिलाबर्नेटी नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे उद्भवणारा व मानवात ताप, प्लीहा (पाणथरी) व यकृत यांची वृद्धी आणि रक्तक्षय ही प्रमुख लक्षणे असलेला हा रोग १९३५ च्या सुमारास ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड या राज्यात प्रथम आढळल्यावरून त्यास क्यू ज्वर (किंवा क्वीन्सलँड ज्वर) असे नाव दिले आहे. काश्मीर, आसाम, बंगाल आणि उत्तर प्रदेशातील काही भागात गाई व शेळ्यामेंढ्यांमध्ये हे सूक्ष्मजंतू आढळले आहेत. ते शुष्कीकरण प्रतिरोधक असल्यामुळे शुष्कावस्थेत धुलिकणातून श्वसनमार्गात शिरतात. पशूंचा जननमार्गाचा कोरडा झालेला स्राव, दूध व मूत्र संसर्ग फैलावण्यास कारणीभूत असतात. संसर्गित गवत आणि माल बांधण्याची वेष्टने यांमधूनही रोग संसर्ग फैलावतो.
शागासरोग : ट्रिपॅनोसोमा क्रूझाय नावाच्या प्रोटोझोआ संघातील सूक्ष्मजीवापासून हा रोग मानवात उद्भवतो. पश्चिम गोलार्धातील टेक्सस ते अर्जेंटिना या भूप्रदेशात आढळणारा हा रोग रेडुव्हिडी नावाच्या पंख असलेल्या कीटकापासून तसेच ढेकूण आणि गोचीड यांसारख्या रोगवाहकांपासून मानवात उद्भवतो. सूक्ष्मजीवांचा साठा कुत्री व मांजरे तसेच वन्य पशूंत असतो. रोगवाहकाच्या चाव्यातून ते मानवी शरीरात प्रवेश करीत नाहीत परंतु त्यांच्या विष्ठेतून बाहेर पडणारे सूक्ष्मजीव श्लेष्मकला किंवा खंडित त्वचेतून शरीरात प्रवेश करतात. या रोगात ज्वर, सार्वदेहिक लसीका ग्रंथीची [⟶ लसीका तंत्र] वाढ, यकृत व प्लीहा यांची वृद्धी, चेहरा व धड या शरीर भागांचा शोफ (द्रवयुक्त सूज) ही लक्षणे उद्भवतात. मानवात रोगलक्षणे तीव्र किंवा चिरकारी (दीर्घकालीन) स्वरूपात आढळतात. कधीकधी १० ते ३० वर्षांपर्यंत किंवा आजन्म काळपर्यंत कोणतेही रोगलक्षण न उद्भवता मानवी शरीरात हे सूक्ष्मजीव राहिल्याचे आढळले आहे. या रोगावर कोणताही समाधानकारक उपचार अजून सापडलेला नाही. घरांची सुधारणा व लिंडेन (बीएचसी) या कीटकनाशकाचा फवारा मारणे हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत. समाधानाची गोष्ट एवढीच की, या रोगाचे ९० ते ९५% रोगी बरे होतात.
ट्युलॅरिमिया : कॅलिफोर्नियातील टूलेरी (ट्युलेरी) नावाच्या भागात प्रथम वर्णिल्यामुळे हे नाव दिलेला हा रोग कृंतक वर्गातील ससा व उंदीर यांसारख्या प्राण्यांत फ्रान्सिसेलाट्युलॅरेन्सिस नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे उद्भवतो. वन्य कृंतक प्राण्यांत गोचीड, माशी, पिसू व ऊ या रोगवाहकांमार्फत रोगप्रसार होतो. संसर्गित संधिपाद प्राणी, दूषित पाणी आणि मांस यांच्याद्वारे मानवात रोगप्रसार होतो. सशांची कातडी सोलण्याचे काम करणाऱ्या कामगारांत खंडित त्वचेतून रोगकारक सूक्ष्मजंतू प्रवेश करण्याचा संभव असतो. जलद वाढणारा ताप, डोकेदुखी व अंगदुखी ही मानवातील प्रमुख लक्षणे असलेला हा रोग अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, जपान, रशिया, स्कँडिनेव्हिया व बहुतेक यूरोपियन देशांतून आढळतो. या रोगावर स्ट्रेप्टोमायसीन व क्लोरटेट्रासायक्लीन ही औषधे गुणकारी आहेत.
द्राक्षार्बुदरोग : इकिनोकॉकसग्रॅन्युलोसस (किंवा टीनियाइकिनोकॉकस) नावाच्या एक प्रकारच्या पट्टकृमीपासून हा रोग उद्भवतो. या रोगात यकृत, हृदय किंवा फुप्फुसे, अस्थी यांमध्ये द्रवार्बुद तयार होते. कुत्रा, कोल्हा आणि लांडगा या प्राण्यांच्या आतड्यात हे पट्टकृमी वाढतात. गाईगुरे व मेंढ्या यांच्याप्रमाणेच कधीकधी मानव या पट्टकृमींचा मध्यस्थ पोषक बनतो. रोगग्रस्त कुत्र्याच्या विष्ठेतील अंडी त्यांच्या अंगावरील केसांना चिटकतात व अशा कुत्र्याच्या अंगावरून हात फिरवताना माणसाच्या हाताला चिकटून ती त्याच्या आंत्रमार्गात जातात. तेथून रक्तप्रवाहाद्वारे प्रथम यकृतात व नंतर इतर शरीर भागांत जातात आणि तेथे द्रवार्बुद तयार होते. याशिवाय रोगग्रस्त प्राण्यांची विष्ठा दूषित भाजीपाल्यातूनही मानवी आतड्यात प्रविष्ट होऊन रोग होण्याचा संभव असतो. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अर्जेंटिना, यूरग्वाय, पॅराग्वाय, ग्रीस, यूगोस्लाव्हिया व मध्यपूर्वेतील देश या भागांत नेहमी आढळणारा हा रोग असून भारताच्या काही भागांत व पाकिस्तानातही तो प्रदेशनिष्ठ स्वरूपात आढळतो. द्रवार्बुद ज्या अवयवात असेल त्यावर शस्त्रक्रियोपचार अवलंबून असतात. निदान निश्चित झाल्यानंतर शस्त्रक्रिया करून अर्बुद काढून टाकणे हा एकमेव उपाय उपयुक्त असतो.
क्षयरोग : मायकोबॅक्टिरियमट्युबरक्युलोसीस नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे मानवी शरीरातील बहुसंख्य अवयवांवर, विशेषेकरून फुप्फुसांवर, दुष्परिणाम करणाऱ्या संचारी (एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होणाऱ्या) रोगाला क्षयरोग म्हणतात. क्षयरोग जंतूंचे स्पष्टपणे ओळखता येणारे पुढील एकूण पाच प्रकार आहेत : (१) मानवी, (२) गोकुलीय, (३) पक्ष्यांतील, (४) मूषकवर्गीय आणि (५) मत्स्यवर्गीय. यांपैकी फक्त पहिले दोनच मानवात रोगोत्पादक आहेत. गोकुलीय क्षयरोगजंतू बहुधा गायीच्या संसर्गित दुधातून मानवी शरीरात प्रवेश करतात. लहान मुलांत प्रामुख्याने आढळणारी विकृती ‘उदर क्षयरोग’ म्हणून ओळखली जाते. यूरोप व अमेरिकेत गायींतील रोगावर प्रतिबंधात्मक इलाज योजून मानवातील या रोगाचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. याशिवाय दूध उकळून पिण्याच्या सवयीमुळे भारतातही रोगप्रमाण कमी झाले असावे. [⟶ क्षयरोग].
वर वर्णन केलेल्या रोगांखेरीज ‘काळपुळी, संसर्गजन्य’ व ‘शेंबा’ (सेंबा) या रोगांवरील स्वतंत्र नोंदी तसेच गाय, कुत्रा यांसारख्या पाळीव पशूंद्वारे होणाऱ्या मानवी रोगांसंबंधीच्या माहितीकरिता त्या पशूंवरील नोंदी पहाव्यात.
सर्व प्राणिजन्य मानवी रोगांची माहितीच नव्हे, तर नुसता नामनिर्देशही येथे करणे अशक्य आहे. वरील काही रोगांच्या माहितीवरून याविषयीची कल्पना येऊ शकेल.
प्रतिबंधात्मकउपाय : प्राणिजन्य मानवी रोगांचा प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने पशूंतील रोगप्रतिबंध, रोगी माणसावरील उपचार व रोगवाहकांचा नायनाट करणे अशा तीन बाजूंनी प्रयत्न होणे जरूर असते.
ट्युबरक्युलीन परीक्षा (प्राणिशरीरात रोजजंतुजन्य प्रथिनांचे अंतःक्षेपण – इंजेक्शन -करून त्याच्या परिणामाचे निरीक्षण करण्याची परीक्षा) करून क्षयी गाई ओळखता येतात. संसर्गित गाई मारून टाकून मानवातील गोकुलीय क्षयरोगजंतुजन्य रोगाचे प्रमाण पाश्चात्त्य देशांतून नगण्य बनले आहे. प्रसमूहन परीक्षेने (दूषित प्राण्याच्या रक्तरसात-रक्ताच्या कोशिकाविरहित निवळ द्रव भागात-रोगजंतू मिसळल्यास गुठळ्या दिसणाऱ्या प्रतिक्रियेने) आंदोलज्वर संसर्गित गाई किंवा शेळ्या ओळखता येतात. रक्तरसाऐवजी अशा प्राण्यांचे दूध तपासल्यासही अशीच प्रतिक्रिया दिसते. रोगी गाई वेगळ्या काढून आंदोलज्वराला आळा घालता येतो. क्षयरोग व आंदोलज्वर या रोगांना दुधाच्या पाश्चरीकरणामुळेही बराच आळा बसला आहे.
प्राणिजन्य मानवी रोगांच्या संदर्भात प्राणिजन्य खाद्यपदार्थांच्या तसेच त्यांची कातडी, हाडे, केस इ. पदार्थांच्या तपासणीची व्यवस्था बऱ्याच देशांत अस्तित्वात आहे. खाटीकखान्यातील प्राण्याची कत्तल करण्यापूर्वी व कत्तल केल्यानंतर केलेली तपासणी या दृष्टीने उपयुक्त असते.
रोगवाहकांच्या नाशाकरिता योग्य त्या कीटकनाशकांचा उपयोग प्रतिबंधाकरिता महत्त्वाचा असतो.
अलीकडील अतिजलद वाहतुकीच्या साधनांनी माणसे व प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय वाहतूक होते. यापुढे दुसऱ्या देशात लागण होऊन प्रत्यक्ष आजार न दिसणाऱ्या अवस्थेत रोगी माणसे व जनावरे देशात येण्याचा धोकाही वाढला आहे. याशिवाय विमानातून रोगवाहक कीटक येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याकरिता परदेशातून येणाऱ्या माणसांची व प्राण्यांची रोगासंबंधीची वैद्यकीय प्रमाणपत्रे तपासण्याची, तसेच जरूर पडल्यास ⇨ विलग्नवासाची योग्य ती व्यवस्था ठेवणे रोगप्रतिबंधाकरिता आवश्यक आहे.
संदर्भ : 1. Brandly, C. A. Jungherr, E. L., Ed., Advances in Veterinary Science, Vol.I, London, 1953.
2. Hull, T. G. Diseases Transmitted from Animals to Man, Springfield, 1963.
3. Thorn, G. W. and other, Principles of Internal Medicine, Tokyo, 1977.
4. Van der Hoeden, J., Zoonoses, New York, 1965
5. देव, म. रा. प्राणिजन्य मानवी रोग, मुंबई, १९७५.
देव, म. रा. दीक्षित, श्री. गं. भालेराव, य. त्र्यं.
“