प्रसूतिविज्ञान : (ऑब्स्टेट्रिक्स). वैद्यकाच्या ज्या शाखेत गर्भधारणा, गर्भारपणा, प्रसवपूर्व परिचर्या, प्रसूती आणि प्रसवोत्तर परिचर्या या विषयांचा अभ्यास केला जातो तिला ‘प्रसूतिविज्ञान’म्हणतात. प्रस्तुत नोंदीत फक्त प्रसूती या विषयावर भर देण्यात आलेला असून वर उल्लेखिलेल्या बाकीच्या सर्व विषयांवर स्वतंत्र नोंदी आहेत. प्रथम मानवी प्रसूतिविज्ञानासंबंधी व पुढे पशूंच्या प्रसूतिविज्ञानासंबंधी माहिती दिली आहे.

इतिहास : सोळाव्या शतकापर्यंत प्रसूतीच्या वेळी मदत करण्याचे तसेच कष्टप्रसूतीच्या वेळी उपाय योजण्याचे कार्य सर्वस्वी स्त्रियाच करीत. जबाबदारीने बाळंतपण करणाऱ्या स्त्रीला सुईण म्हणत. आजही प्रसूतिविज्ञानाचा उल्लेख कधीकधी ‘सूतिकाशास्त्र’असा केला जातो. प्रबोधन कालात हे शास्त्र अतिशय दुरावस्थेत होते. सोळाव्या शतकात प्राकृतिक (सर्वसाधारण) प्रसूती होऊनही ५०% बाळंतिणी ⇨प्रसूति-पूतिज्वराने किंवा गर्भिणी विषबाधेने [⟶ गर्भारपणा] मृत्युमुखी पडत. कष्टमय प्रसूतीमध्ये अतिशय हालहाल होऊन स्त्रियांना मृत्यू येत असे.

आयुर्वेदातील या विषयाच्या उल्लेखावरून प्राचीन वैद्यांना यासंबंधीचे काही ज्ञान निश्चितच असावे. कष्टप्रसूतीचे एक कारण श्रोणि-संकोच (धडाच्या खालच्या बाजूस असलेल्या दोन्ही बाजूंस अनामिक अस्थी व मागे त्रिकास्थी मिळून बनलेल्या हाडांच्या पोकळीचा अरुंदपणा) हे असू शकते, याची कल्पनाही शिवलेली नसावी. इतर कारणांसंबंधीही अज्ञानच होते. चरक, सुश्रुत व वाग्भट यांच्या ग्रंथांतून प्रसूतीसंबंधी उल्लेख आहेत. सुश्रुतांनी कष्टप्रसूतीचा उल्लेख ‘मूढगर्भ’म्हणून केला आहे. ज्या कल्पना पाश्चात्य वैद्यांना सुचावयास कित्येक शतके लोटावी लागली त्यांपैकी काहींचा उल्लेख सुश्रुतसंहितेत केल्याचे आढळते उदा., गर्भपरिवर्तन (उदरावरून हात विशिष्ट पद्धतीने फिरवून गर्भदर्शन बदलण्याची प्रसूतिविज्ञाने केलेली क्रिया) आडवे आलेले मूल या क्रियेमुळे फिरवता येऊन पाददर्शन किंवा शिरोदर्शन (पाय किंवा डोके प्रथम बाहेर येण्याची स्थिती) करता येते. गर्भवतीस इजा न होईल अशा बेताने मृत गर्भ कापून तो तुकड्या तुकड्यांनी बाहेर काढण्याची शस्त्रक्रिया आणि मृत मातेच्या पोटातील जिवंत गर्भ बाहेर काढण्यासाठी तिच्या उदरावर करावयाची शस्त्रक्रिया यांचे सुश्रुतांनी वर्णन केलेले आहे.

रोमन व अरेबियन वैद्यकात कष्टप्रसूतीच्या वेळी पुरुष वैद्याने मदत करण्याच्या जाणीवेबद्दल पूर्ण कल्पना आलेली होती. सतराव्या शतकात पुरुष प्रसूतिक्रियेच्या वेळी मदत करू लागले. या काळात या शास्त्राच्या संबंधात पॅरिस येथील फ्रांस्वा मॉरिक्यू (१६३७–१७०९) आणि हॉलंडमधील हेन्ड्रिक व्हान डिव्हेंटर व हेन्ड्रिक व्हान रुनहुयझे (१६२५ – ?) या प्रसूतिविज्ञांची नावे उल्लेखिण्यासारखी आहेत. रुनहुयझे व डिव्हेंटर यांनी सुईणींचे शिक्षण आणि दर्जा सुधारण्यात मोलाची कामगिरी केली. रुनहुयझे काही कष्टप्रसूती प्रकारात कराव्या लागणाऱ्या ‘सिझेरियन छेदन’ (मरणोन्मुख गर्भवतीच्या पोटातील गर्भ उदर-छेदन आणि गर्भाशय-छेदन करून काढण्याबद्दलच्या आणि Lex Caesarenनावाच्या रोमन कायद्यावरून नाव देण्यात आलेल्या) शस्त्रक्रियेत पटाईत होते व त्यांनी अशा अनेक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केल्या होत्या.

हळूहळू स्त्री-सुईणीशिवाय पुरुषांनाही बाळंतपण करू देण्यास स्त्रिया तयार होत गेल्या. पीटर चेंबरलिन यांनी १६२८ मध्ये राणी हेन्रिएटा मारिआ हिच्या गर्भस्रावाच्या वेळी मदत केली होती. १६९२ मध्ये ह्यू चेंबरलीन यांनी भावी राणी अना हिच्या बाळंतपणात मदत केली होती. दरबारी स्त्रियांमध्ये ही प्रथा सुरु झाल्यानंतर तिचा हळूहळू फैलाव होत गेला. १५६९ मध्ये धार्मिक छळास कंटाळून फ्रान्स सोडून इंग्लंडमध्ये स्थलांतर केलेल्या या चेंबरलिन कुटुंबातील एकाने प्रसूती संदंश (कष्टप्रसूतीत वापरता येणारा चिमटा) प्रथम शोधून काढला होता व पुढे अठराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत त्याबद्दल अत्यंत गुप्तता राखून आपल्या कुटुंबाकडेच त्याची मक्तेदारी ठेवली होती. 

प्रसूती संदंशाचा उल्लेख प्राचीन आयुर्वेदीय ग्रंथांतूनही आणि आढळतो. कष्टप्रसूतीच्या वेळी गर्भ काढण्याकरिता ‘गर्भशंकू’वापरावा असे वाग्भटांनी सांगितले आहे. कष्टप्रसूतीमध्ये गर्भ मेलेला असल्यास डोक्याची हाडे फोडून नंतर ती शंकूने धरून (शंकुना गृहित्वा) काढावी, असे सुश्रुतांनी म्हटले आहे.

ग्रेट ब्रिटनमधील विल्यम स्मेली (१६९७–१७६३) आणि ⇨विल्यम हंटर (१७१८–८३) यांनी प्रसूतिविज्ञानात मोलाची भर घातली. स्मेली यांनी या विषयाचे शिक्षण पॅरिसमध्ये घेतले व १७३९ मध्ये लंडन येथे व्यवसाय सुरु केला. आपल्या घरीच मानवी हाडापासून बनविलेल्या, चामड्यांचे आच्छादन घातलेल्या मानवी आकाराच्या नमुन्याचा उपयोग करून स्मेली विद्यार्थ्यांना बाळंतपणाचे शिक्षण देत. स्मेली यांनी कष्टप्रसूतीत उपयोगी पडणारे काही विशिष्ट प्रसूती संदंश शोधले होते. त्यांनी लिहिलेला ट्रिटाइज ऑन द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ मिडवाइफरी हा ग्रंथ तीन खंडांत १७६४ पर्यंत प्रसिद्ध झाला होता. प्रसूती संदंश धोका टाळून कसा वापरावा याबद्दल नियम घालून देणारा, तसेच स्त्रीची सामान्य श्रोणी व श्रोणि-संकोच यांमधील फरक प्रत्यक्ष मोजमापे घेऊन स्पष्ट करणारा हा पहिलाच ग्रंथ होता.

विल्यम हंटर हे १७४१ मध्ये स्मेली यांच्याकडे निवासी विद्यार्थी म्हणून शिकावयास गेले. तीस वर्षांच्या परिश्रमपूर्वक अभ्यासानंतर त्यांनी ॲटलास ऑफ द प्रेग्नंट युटेरस हा सचित्र ग्रंथ १७७४ मध्ये प्रसिद्ध केला. मँचेस्टर येथील शस्त्रक्रिया विशारद चार्ल्‌स व्हाइट यांनी १७७३ मध्ये लिहिलेल्या प्रसूतिविषयक ग्रंथात ‘अपूतित’ (संसर्गविरहित) प्रसूतीची कल्पना प्रथमच मांडण्यात आली होती. शस्त्रक्रियेच्या वेळी जेवढी काळजीपूर्वक स्वच्छता घ्यावी तेवढीच बाळंतपणातही घ्यावी असे त्यात सांगण्यात आले होते.

 एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास सूतिकाशास्त्राची प्रगती ते ‘प्रसूतिविज्ञान’या वैद्यकाच्या शाखेत अंतर्भूत होण्यापर्यत झाली. संसर्गजन्य व स्पर्शजन्य रोगप्रसाराच्या वाढत्या ज्ञानामुळे बहुतेक वेळा मारक ठरणाऱ्या प्रसूति-पूतिज्वरामुळे होणाऱ्या मृत्युप्रमाणात बरीच घट झाली. 

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस प्रसूतिपूर्व परिचर्येचे महत्त्व आणि प्रतिबंधात्मक वैद्यकाची प्रसूतीमधील ही पहिली व्यवहार्य उपयुक्तता अमेरिकेत प्रथम दाखवून देण्यात आली व त्यानंतर आधुनिक वैद्यकाची एक महत्त्वाची शाखा म्हणून हे शास्त्र गणले जाऊ लागले.

 प्रसूती वेदनारहित कशी करता येईल याकडे काही शास्त्रज्ञांचे लक्ष वेधले गेले होते परंतु सनातनी मतप्रणालीचे वैद्य व धर्मगुरू यांच्याकडून संवेदनाहारक औषधांच्या उपयोगाला जोरदार विरोध होता. हळूहळू या विचारात बदल होत गेला. १८४७ मध्ये जे. वाय्. सिंप्सन या एडिंबरो येथील प्रसूतिविज्ञानाच्या प्राध्यापकांनी प्रसूतिवेदनाहारक म्हणून क्लोरोफॉर्मचा प्रथम उपयोग केला. जॉन स्नो या लंडनच्या वैद्यांनी १८५३ आणि १८५७ या वर्षी राणीची दोन्ही बाळंतपणे करताना क्लोरोफॉर्मचा उपयोग केला होता. ते क्लोरोफॉर्मशिवाय ईथरचाही संवेदनाहारक म्हणून मोठ्या प्रमाणावर उपयोग करीत. यानंतर निरनिराळ्या स्मृतिलोपकारक व संवेदनाहारक औषधांचा शोध लागून त्यांचा वापर करण्यात येऊ लागला. प्रसूतीच्या वेळी पुच्छनालात (मेरुनालाच्या खालच्या भागात) वेदनाहारक औषधाचे अंतःक्षेपण (इंजेक्शन) करून शुद्ध न घालवता वेदनारहित प्रसूती करता येऊ लागली.


  

अगदी अलीकडे ब्रिटन व अमेरिकेत ‘नैसर्गिक’प्रसूतीची ग्रॅन्टली डिक-रीड यांनी शोधिलेली आणि ‘रीड-पद्धत’या नावानेच ओळखली जाणारी पद्धत प्रसूतीकरिता लोकप्रिय असून मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आहे. आतापर्यंत स्त्रीची प्रसूती म्हणजे काही दिवसांची रुग्णालयातील कैदच भासे. प्रसूतीला इंग्रजी भाषेतील प्रतिशब्दच ‘कन्‌फाइनमेंट’(बंदिवास) असा आहे. इतर रुग्णांवर जशी बंधने रुग्णालयात घातली जातात तशीच प्रसूतीकरिता आलेल्या स्त्रीवरही घातली जात. ब्रिटनमध्ये रीड आणि फ्रान्समध्ये फेर्नां लमाझ यांनी ‘पूर्वनियोजित प्रसूती’ची कल्पना उचलून धरली. गर्भारपणाच्या शेवटी शेवटी स्त्रीला प्रसूती विषयीची सर्व माहिती देण्यात येते. तिला प्रत्यक्ष प्रसूतीच्या वेळी वापरावयाच्या श्वसनविषयक व प्रसूतिक्रियेस मदत करणाऱ्या इतर व्यायामांचे शिक्षण दिले जाते. तिच्या पतीला या सर्व शिक्षणक्रमात सहभागी करून घेण्यात येते. प्रत्यक्ष प्रसूतीच्या वेळी वेदनाशामके वापरली, तरी शुद्धिहारके न वापरण्यावर विशेष भर दिला जातो. अमेरिकेतील काही रुग्णालयांतून पित्याला प्रत्यक्ष प्रसूतीत मदत करण्यास परवानगी देण्यात येते व तो तज्ञांच्या देखरेखीखाली नवजाताची नाळ कापण्यापर्यंत मदतही करतो. या पद्धतीमुळे माता-पिता व अपत्य यांच्यामध्ये आपलेपणाचा दुवा निर्माण होतो.

 रीड पद्धतीमुळे प्रसूतीबद्दलची संपूर्ण माहिती मिळून भीती नाहीशी होते. मानसिक ताण कमी होऊन प्रत्यक्ष प्रसूतीच्या वेळी मन तयार असल्यामुळे मदत होते. विशिष्ट सरावामुळे प्रसूतीच्या वेळी योग्य शरीरस्थिती ठेवण्यास मदत होते. यामुळे वेदनानाशकांचा व शुद्धिहारकांचा उपयोग टाळता येऊन त्यामागील धोकेही टाळता येतात. याशिवाय इतर शरीरक्रियांप्रमाणे बाळंतपण ही एक नैसर्गिक क्रिया असल्याचे पटवून देता येते.

 प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांच्या शोधानंतर प्रसूतीतील मृत्युप्रमाण बरेच घटले. प्रसूतिवेदना चालू असताना ⇨पोष ग्रंथीचे गर्भाशय-संकोचन (ऑक्सिटोसीन) नावाचे हॉर्मोन (उत्तेजक स्राव) अंतर्नीला बिंदू पद्धतीने देण्यामुळे (२ ते ५ एकक ऑक्सिटोसीन ५००–६०० मिलि. ५% डेक्स्ट्रोज द्रावणात घालून नीलेतून दर मिनिटास ०·५ मिलि. या गतीने देण्यामुळे) दीर्घप्रसूती व तिचे दुष्पपरिणाम टाळता येतात. या उपचारामुळे गर्भाशय स्नायूंची जोरदार आकुंचने चालू राहून प्रसूतीस मदत होते. प्रतिजैव औषधांप्रमाणेच रक्ताधानाचा वाढता उपयोग, नवनव्या उपकरणांचा शोध, शस्त्रक्रियाविज्ञानातील प्रगती, क्ष-किरणांचा निदानात्मक उपयोग इत्यादींमुळे प्रसूतिविज्ञानात बरीच प्रगती झाली आहे.

 प्रसूती  : या विषयाची विभागणी पुढीलप्रमाणे केली आहे : (अ) प्राकृतिक अथवा सामान्य प्रसूती, (आ) अप्राकृतिक अथवा अपसामान्य प्रसूती आणि (इ) प्रसूतीसंबंधीच्या शस्त्रक्रिया.

 प्राकृतिक प्रसूती : स्त्रीची श्रोणी प्राकृतिक असून गर्भाचे शिरोदर्शन आहे व इतर कोणत्याही प्रकारची अपसामान्यता नसून प्रसूतिक्रिया सुरु झाल्यापासून चोवीस तासांच्या आत गर्भवती व गर्भ दोघांपैकी कुणालाही इजा न होता, पूर्ण होणाऱ्या प्रसूतीला प्राकृतिक अथवा सामान्य प्रसूती म्हणतात.

 प्रसव लक्षणे : खाली दिलेली काही विशिष्ट लक्षणे प्रसूती सुरू झाल्याचे दर्शवितात व त्यांना ‘प्रसव लक्षणे’म्हणतात.

 (१) प्रसवसूचक स्राव : योनिमार्गातून येणाऱ्या रक्तमिश्रित श्लेष्मल (बुळबुळीत) स्रावाला प्रसवसूचक स्राव म्हणतात. सर्वसाधारणपणे प्रसूती सुरु होण्यापूर्वी २४ ते ४८ तास अगोदर असा स्राव सुरू होतो. गर्भाशयाच्या ग्रीवेत (मानेसारख्या भागात) श्लेष्माचा घट्ट बुचासारखा थर बसलेला असतो, तो हळूहळू सुटत जाऊन थोडा थोडा स्राव बाहेर येऊ लागतो, गर्भकला (भ्रूणाची वाढ होत असताना त्याच्याभोवती उत्पन्न होणारी पातळ वेष्टणे) गर्भाशय भित्तीपासून अलग होताना केशवाहिन्या (सूक्ष्म रोहिण्या व सूक्ष्म नीला यांना जोडणाऱ्या केसांसारख्या बारीक वाहिन्या) तुटून हा रक्तमिश्रित स्राव बनतो.

आ. १.गर्भाशय ग्रीवा उर्ध्वसरण (प्रथमप्रसवा) : (अ) गर्भाशय ग्रीवेच्या विस्फारणाची सुरुवात (आ व इ) विस्फारणातील प्रगती (ई) पूर्ण विस्फारण : (१) उल्ब-द्रवाची पिशवी.

 (२) वेदनायुक्त गर्भाशय आकुंचने : गर्भाशयाची लयबद्ध वेदनायुक्त आकुंचने प्रसवसूचक असतात. कधी प्रसववेदना (कळा अथवा वेणा) खोट्याही असतात व त्यांना ‘मिथ्या प्रसववेदना’म्हणतात. मिथ्या वेदना अनियमित, अल्पकाळ टिकणाऱ्या, तीव्रता व टिकण्याचा अवधी क्रमशः न वाढणाऱ्या असतात. खऱ्या प्रसववेदना गर्भाशयाशी संबंधित असतात व हळूहळू त्या गर्भाशय ग्रीवेचे विस्फारण करतात. त्या गर्भाशय बुध्न (बराच रुंद गोल घुमटाकार भाग) व ग्रीवा यांच्यामधील वेगळेपणा हळूहळू नाहीसा करतात. हा परिणाम फक्त खऱ्या वेदनाच करू शकतात. याला ‘गर्भाशय ग्रीवा ऊर्ध्वसरण’ म्हणतात. दर १० मिनिटांस ३ ते ५ प्रसववेदना येतात व प्रत्येक वेदना सर्वसाधारणपणे १ मिनिट टिकते. प्रत्येक वेदनेच्या वेळी ग्रीवेतून अग्र उल्ब-द्रवाची पिशवी (भ्रूणाभोवताली पाण्यासारख्या द्रवाने भरलेली पातळ पटलमय पिशवी) फुगोटी येऊन पुढे येते.

 (३) पाठदुखी : प्रसूतीच्या सुरुवातीस कधीकधी पाठ दुखू लागते. पोट फारसे दुखत नाही. पाठदुखी एकसारखी किंवा अधूनमधून जाणवणारी असते. पोट हाताने तपासून पाहिल्यास गर्भाशय आकुंचने जाणवतात. पाठीतील तीव्र वेदना जेव्हा पोटात अजिबात वेदना न होता होतात तेव्हा त्या बहुतकरून गर्भाशय आकुंचनाची असंगती दर्शवितात.

(४) गर्भकला स्रवण : उल्ब-द्रव अत्यल्प प्रमाणात योनिमार्गातून बाहेर पडू लागतो. बहुधा पश्च उल्ब-द्रव (गर्भदर्शनाच्या वरील भागातील उल्ब-द्रव) हळूहळू बाहेर पडतो. मात्र अग्र उल्ब-द्रव पिशवी फुटल्यास पुष्कळसा द्रव एकदमच बाहेर पडतो. गर्भकला एकदम फाटून पुष्कळसा उल्ब-द्रव बाहेर पडणे हे बहुतकरून गर्भदर्शन करणारा गर्भाचा भाग व श्रोणी यांमध्ये असमानता असल्याचे निदर्शक असते. अशा वेळी गर्भाच्या अगोदर नाळदर्शन होण्याचा नेहमी संभव असतो.


आ. २. गर्भाशय विस्फारण : बोटांनी मापणे

(५) इतर लक्षणे : प्रत्येक आकुंचनाबरोबर गर्भाशय हाताला कठीण लागून पोट किंचितसे पुढे येते. गर्भवतीच्या नाडीची गती प्रत्येक आकुंचनाबरोबर वाढते. परंतु दोन आकुंचनांच्या मधल्या काळात ती नेहमीप्रमाणे संथ होते. रक्तदाब ५ ते १० मिमी. वाढतो व तापमानही किंचित वाढते. योनिमार्ग तपासणीत गर्भाशयाचे बाह्य मुख व अंतर्मुख हळूहळू विस्फारित होत असल्याचे समजते. गर्भाशय ग्रीवा विस्फारणाचा उल्लेख ‘एक बोट, दोन बोटे, तीन बोटे आणि पूर्ण विस्फारण’ असा करतात. काही ठिकाणी तो सेंटिमीटरमध्ये करतात (१ बोट = सु. १·६ सेंमी.).

प्रसूती सुरू होण्याची कारणे : सर्वसाधारणपणे गर्भारपणाची लक्षणे सुरू होण्यापूर्वीच ऋतुस्रावाच्या पहिल्या दिवसापासून २८० दिवसांनी प्रसूतीस सुरुवात होते. प्रसूतीचा अंदाजी दिवस काढण्याकरिता एफ्. के. नेअगेली (१७७७–१८५१) या जर्मन प्रसूतिविज्ञांनी प्रतिपादिलेल्या नियमाचा उपयोग करतात. ऋतुस्रावाच्या पहिल्या दिवसाच्या तारखेतून ३ महिने वजा करावयाचे व येईल त्या तारखेत सात दिवस अधिक मिळवावयाचे म्हणजे येईल ती तारीख प्रसूतीची अंदाजी तारीख येते. उदा., ऋतुस्रावाचा पहिला दिवस १२ मे आहे त्यातून ३ महिने वजा केल्यास १२ फेब्रुवारी तारीख येते व त्यात सात दिवस मिळविल्यास प्रसूतीची अंदाजी तारीख १९ फेब्रु वारी येते. सर्वसाधारणपणे १०% स्त्रियांत हा अंदाज बरोबर निघू शकतो. ५०% स्त्रिया अशा अंदाजी तारखेपासून एक आठवड्यात बाळंत होतात. या नियमाच्या आधारे बनविलेले सबंध वर्षाचे अंदाजी तारीख दर्शविणारे तयार तक्ते उपलब्ध आहेत.

 प्रसूतीची सुरुवात ठराविक काळानंतरच का होते याविषयी अनेक सिद्धांत मांडण्यात आले आहेत. प्रसूतिक्रिया एक जटिल (गुंतागुंतीची) शारीरिक क्रिया असून कोणतेही एकच कारण तिची सुरुवात करते असे निश्चित सांगता येत नाही. दिवस पूर्ण होण्यापूर्वी कित्येक आठवडे अगोदरपासून प्रसूतीची तयारी चालू असते व प्राकृतिक प्रसूती ही कधीही एकाएकीच सुरु होणारी क्रिया नसते. या जटिल क्रियेची सुरुवात होण्यास पुढील गोष्टी कारणीभूत असाव्यात : (१) गर्भवतीच्या शरीरातील हॉर्मोनांच्या संतुलनातील [⟶ हॉर्मोने ] बदल, (२) गर्भाशय भित्तीवरील ताण आणि (३) गर्भाच्या पोषणविषयक वाढत्या गरजा.

 (१) ⇨ स्त्रीमदजनप्रगर्भरक्षी ही हॉर्मोने गर्भाशयाच्या आकुंचनावर परिणाम करतात. यांपैकी पहिले आकुंचने उत्तेजित करते, तर दुसरे त्यांना रोखून धरते. ज्या वेळी प्रगर्भरक्षीचे प्रमाण अत्यल्प होते व स्त्रीमदजन वाढते त्या वेळी प्रसूतीची सुरुवात होते, अशी समजूत होती. या दोन हॉर्मोनांचे एकमेकांशी असलेले प्रमाण महत्त्वाचे असून ती गर्भाशयाच्या संवेदनशीलतेवर परिणाम करीत असावीत. स्त्रीमदजन गर्भाशय स्नायूवर प्रत्यक्ष परिणाम करते की पोष ग्रंथीच्या पश्च खंडाच्या गर्भाशय-संकोचक हॉर्मोनाच्या उत्पादनास चेतना देते, हे अनिश्चित आहे. एस्. आर्. एम्. रेनल्ड्झ यांच्या मताप्रमाणे स्त्रीमदजन गर्भाशयाच्या आकुंचनामध्ये सुसूत्रता आणते.

 (२) गर्भावस्थेतील गर्भाशयाच्या वाढत्या आकारमानाबरोबरच गर्भाशय स्नायू ताणले जाऊन भित्तीतील ताण वाढतो. त्याशिवाय भित्ती अधिक पातळ बनत जाते व स्नायू अधिक संवेदनाशील बनतात. बहुप्रसवा स्त्रियांत पुष्कळ वेळा आढळणारी अकाल प्रसूती याच कारणामुळे उद्‌भवत असावी.

(३) गर्भ जसजसा वाढत जातो तसतशी त्याची पोषणविषयक गरजही वाढत जाते. परंतु गर्भावस्थेच्या प्रत्येक दिवसागणिक वार जुनी होत जाते व तिच्या काही भागाचा अपकर्ष होत जातो [⟶ वार–२]. यामुळे पोषणविषयक गरजा भागवण्यास ती असमर्थ बनते. अपकर्षामुळे गर्भाशय-स्नायु-संकोचन हॉमोनाच्या स्रवणात वाढ होते व प्रसूतीस सुरुवात होते, असे सुचविण्यात आले आहे.

वरील कारणांशिवाय इतर काही कारणांचाही प्रसूतिक्रिया सुरू होण्याच्या संदर्भांत उल्लेख केला जातो. दिवस पूर्ण होण्याच्या सुमारास गर्भाशयातील उल्ब-द्रवाचे प्रमाण एवढे कमी होते की, वाढलेला गर्भ गर्भाशय भित्तीला बिलगू लागतो. हा वाढता गर्भदाब गर्भाशयाच्या अधःखंडावर व ग्रीवा भागाच्या तंत्रिका (मज्जा) गुच्छिकेवर परिणाम करीत असावा. अलीकडील संशोधनानुसार माता व गर्भ यांच्या रक्तातील गर्भाशय-संकोचन हॉर्मोन व रक्तदाबवर्धक हॉर्मोन यांची प्रसूतीपूर्वी, प्रसूतीच्या सुरुवातीस आणि प्रसूतीच्या दुसऱ्या अवस्थेच्या शेवटास तपासणी केल्यास, त्यांच्या प्रमाणामध्ये पुष्कळ फरक झाल्याचे आढळले आहे. मातेच्या रक्तात ही हॉर्मोने गर्भाच्या रक्तापेक्षा बऱ्याच कमी प्रमाणात असल्याचे आढळले आहे. याशिवाय गर्भाच्या अमस्तिष्कता (मोठा मेंदू व लहान मेंदू यांच्यासहित कवटीच्या सपाट हाडांची वाढ न होणे) या विकृतीत नाळेतील रक्तात ही दोन्ही हॉर्मोने सापडलेली नाहीत. यावरून गर्भाच्या मेंदूतील अधोथॅलॅमस व पोष ग्रंथी यांचा प्रसूतीच्या सुरुवातीमध्ये तसेच प्रसूतिक्रिया चालू ठेवण्यामध्ये महत्त्वाचा वाटा असावा.

वरील विवेचनावरून हे लक्षात येईल की, प्रसूती का सुरू होते याविषयी अजून संपूर्ण ज्ञान प्राप्त झालेले नाही. रेनल्ड्झ यांच्या म्हणण्याप्रमाणे रचनात्मक, हॉर्मोनविषयक, तसेच तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था), पोषण आणि रक्ताभिसरण यांच्याशी संबंधित अशी निरनिराळी कारणे प्रसूती सुरु करून गर्भाशय रिते करण्याच्या कामात भाग घेत असावीत.

प्रसूतिक्रियेच्या तीन अवस्था  : सामान्य प्रसूतिक्रियेचे वर्णन करताना तिच्या तीन अवस्था वर्णितात : (१) प्रथमावस्था : सुरुवात झाल्यापासून गर्भाशय ग्रीवेचे पूर्ण विस्फारण होईपर्यंत, (२) द्वितीयावस्था : गर्भाशय ग्रीवेच्या पूर्ण विस्फारणापासून संपूर्ण गर्भ योनिमार्गाबाहेर पडेपर्यंत आणि (३) तृतीयावस्था : अर्भकाच्या जन्मानंतर संपूर्ण वार बहेर पडेपर्यंत. याशिवाय बहुते प्रसूतींतून ‘पूर्व-सूचना अवस्था’ ओळखता येते.

पूर्व-सूचना अवस्था : ही अवस्था पुष्कळ दिवस अगोदर किंवा एक-दोन आठवडे अगोदर सुरू होते. गर्भाशय बुध्नाची उंची कमी झाल्याबरोबर गर्भवतीला हलके झाल्यासारखे वाटू लागते. गर्भाशयाच्या मध्यपटलावर (उदर व छाती यांना विभागणाऱ्या स्नायुमय पटलावर) पडणारा दाब कमी होऊन श्वसनक्रिया क्लेशरहित बनते. मूत्राशयावरील दाब वाढून मूत्रोत्सर्गाची वारंवारता वाढते. श्रोणिसंधी शिथिल पडल्यामुळे चालण्यात बोजडपणा येतो. योनिमार्गाच्या भित्ती मऊ पडत जाऊन योनिमार्गाच्या निःस्रावात (बाहेर पडणाऱ्या स्रावात) वाढ होते.


  

(१) प्रथमावस्था : प्रथमप्रसवा स्त्रीत ही अवस्था सर्वसाधारणपणे चौदा तास (१० ते १८ तास) व बहुप्रसवा स्त्रीत सहा तास (३ ते १२ तास) टिकते. यात प्रसववेदना सुरू होतात. सुरुवातीस प्रसववेदना वेळावेळाने (तासातासानंतरही) येतात. हळूहळू दोन वेदनांमधील अंतर ३-४ मिनिटांपर्यंत कमी होते परंतु सुरुवातीस कमी असणारी तीव्रता वाढत जाते. वेदना अल्पकाळच टिकते. या वेळी निजून न राहता इकडे तिकडे फिरणे वा दैनंदिन कामे करीत राहणे हे सहज प्रसूतीच्या दृष्टीने हितावह असते. उभे राहिल्यामुळे श्रोणी पुढे अधिक वळलेली राहून तिच्या मुखाकडील भागाचा अग्र-पश्च व्यास वाढतो. त्यामुळे बालकाचे डोके खाली उतरण्यास अधिक जागा मिळते. या काळात गर्भवतीस भरपूर द्रव पदार्थ, विशेषेकरून फळांचा रस वगैरे, प्राशन करू द्यावेत.

आ.३. गर्भाशयाचा गर्भावर पडणारा प्रत्यक्ष दाब : प्रसूतिक्रियेच्या द्वितीय व तृतीय अवस्थांमध्ये या दाबामुळे गर्भ व वार गर्भाशयाच्या बाहेर टाकली जातात.

प्रसववेदनांवर भावना, मूत्राशयात मूत्र साचून नेहमीपेक्षा त्याचा अधिक विस्तार होणे, मलाशयात मलसंचयामुळे अडथळा उत्पन्न होणे या गोष्टी परिणाम करतात. वेदनांबद्दलची प्रतिक्रिया निरनिराळी असू शकते. काही स्त्रिया शांत राहून सहन करू शकतात, तर कमी मनोबलाची घाबरलेली स्त्री, विशेषेकरून पहिलटकरीण, नातलगांना घाबरवून सोडण्याइतका गोंधळ करील. अनेक वेळा सबंध प्रथमावस्थाच वेदनारहित राहिल्याचेही आढळते. वेदनांबरोबरच गर्भाशय व ग्रीवा यांच्यामध्ये शरीररचनात्मक बदल होतात व अग्र उल्ब-द्रव पिशवी तयार होते. हळूहळू गर्भाशय ग्रीवेचे विस्फारण होत जाते आणि पूर्ण विस्फारण झाले म्हणजे ही अवस्था संपते.

(२) द्वितीयावस्था: प्रथमाप्रसवा स्त्रीत ही अवस्था सर्वसाधारणपणे ३० ते ९० मिनिटे व बहुप्रसवा स्त्रीत १० ते ३० मिनिटे टिकते. सुरुवातीसच बहुतकरून गर्भकलेचे विदारण होते व अग्र उल्ब-द्रव बाहेर पडतो. त्यानंतर अल्पकाल वेदना थांबल्यासारखे होते परंतु लगेचच  त्या जोरदार व जलद सुरू होतात. गर्भवतीस श्रोणी भागाच्या तळावर दाब पडल्याची जाणीव होते व गर्भ बाहेर टाकण्याचे सर्व प्रयत्न ती करू लागते.गर्भाशयाची जोरदार आकुंचने व बाहेर टाकण्याचा जोरदार  प्रयत्न, गर्भकला विदारण आणि गुदद्वाराचे विस्फारण यांवरून ही अवस्था सुरू असल्याचे निश्चित समजते. उल्ब-द्रव बाहेर पडल्यामुळे गर्भाशय आकुंचने आता गर्भांगावर प्रत्यक्ष दाब देऊन त्यास खाली ढकलू  लागतात (आ. ३).

या अवस्थेतील प्रसूतिक्रियेची प्रगती वेळेवर अवलंबून नसून गर्भदर्शन करणारा भाग (उदा., गर्भाचे डोके) हळूहळू परंतु निश्चितपणे खाली सरकत आहे किंवा नाही यावर अवलंबून असते. म्हणून प्रथमप्रसवा स्त्रीत प्रगती निश्चित असल्यास तीन तासांचा कालावधी लागल्यासही चालते. या अवस्थेतच गर्भाच्या हृदयाचे ठोके दर पाच मिनिटांनी दोन आकुंचनांच्या मध्यंतरात गर्भ-श्रवणनलिका या उपकरणाने ऐकतात. हे ठोके दर मिनिटास १२० पेक्षा कमी किंवा १६० पेक्षा जास्त झाल्यास गर्भास धोका असल्याचे समजून पुढील उपाय योजावे लागतात.

 आ. ४. द्वितीयावस्थेत खांद्यांच्या प्रसूतीकरिता करावी लागणारी मदत : (अ) पश्च खांद्याच्या प्रसूतीकरिता डोके वर उचलणे (आ) अग्र खांद्याच्या प्रसूतीकरिता डोके किंचित खाली वाकविणे.

याच अवस्थेत गर्भवतीच्या विटपाच्या मूत्र-जनननलिका व गुदांत्र यांमधील ऊतकावर (ऊतक म्हणजे समान रचना व कार्य असलेल्या पेशींचा समूह) ताण पडून गर्भ बाहेर पडताना ते वाकडेतिकडे फाटण्याचा धोका असतो. प्रथमप्रसवा स्त्रियांत हा धोका अधिक असल्यामुळे ‘भगच्छेदन’शस्त्रक्रिया (ताणलेल्या विटप ऊतकामध्ये स्थानिक बधिरपणा उत्पन्न करणाऱ्या द्रव्याचे अंतःक्षेपण करून, विशिष्ट ठिकाणी हत्याराने ऊतक सरळ कापून प्रसूतीनंतर पुन्हा जखम शिवणे) करतात. 

डोके योनिमार्गातून बाहेर आल्यानंतर सुईणीने मदतीकरिता काही क्रिया करावयाच्या असतात. प्रथम तिने गर्भाच्या गळ्याभोवती नाळेचे वेढे नसल्याची खात्री करून घ्यावी [⟶नाळ]. वेढ्यातून सहज सुटका करता आल्यास उत्तम, न आल्यास दोन बंधांमध्ये पकडून अगोदरच नाळ कापावी. डोक्यानंतर खांदे बाहेर पडण्याकरिता तिला मदत करावी लागते (आ. ४). अशा वेळी डोके जोराने ओढता कामा नये. गर्भशरीराचा उरलेला भागही सौम्य कर्षणानेच (ओढण्याच्या क्रियेने) बाहेर पडू द्यावयाचा असतो. 

 आ. ५ . नाळ कापणे : दोन पकडींत किंवा दोन रोहिणी संदेशांत पकडून नाळ मधे कापतात.

(३) तृतीयावस्था: अर्भकाच्या जन्मानंतर नाळेतील स्पंदन बोटांना लागेनास झाल्यानंतर (म्हणजे रक्तप्रवाह थांबल्यानंतर) नाळ ठराविक पद्धतीने कापावी लागते (आ ५). अर्भक जन्मल्यानंतर गर्भाशय बरेचसे आकुंचित होऊन बुध्न बेंबीच्या खाली येते. या वेळी सुईणीने आपला डावा हात गर्भाशय बुध्नावर धरून त्याचे नियंत्रण करावे. गर्भाशय आकुंचने चालूच असतात परंतु आता ती वेदनारहित असतात. पाच ते वीस मिनिटांच्या अवधीत गर्भाशय बुध्न अधिक गोलाकार बनते व वार गर्भाशयाच्या भित्तीपासून सुटून ऊर्ध्वखंडातून अधःखंडात उतरते. तेथून प्रथम नाळ (उरलेला भाग) व नंतर वार योनिमार्गातून बाहेर पडतात. वार बाहेर पडतानाच गर्भकलेचा सर्व भाग बरोबर घेऊन येते. कधीकधी सुईणीस या अवस्थेतही मदत करावी लागते. शक्यतो वार सुटण्याची क्रिया आपोआप म्हणजे गर्भाशयालाच करू द्यावी. ही अवस्था सर्वसाधारणपणे ५ ते १५ मिनिटे टिकते. प्रसूतिक्रियेच्या वरील तीन अवस्थांपैकी तृतीयावस्था अधिक धोकादायक असते कारण गंभीर रक्तस्राव होण्याची शक्यता याच वेळी असते.


  आ.६. तृतीयावस्था पूर्ण करण्याची पद्धत : नियंत्रित नाळ कर्षण पद्धत

सुटलेली वार गर्भाशयातून लवकर (३० मिनिटे थांबूनही) बाहेर न पडल्यास प्रसूतितज्ञ व्यक्तीला किंवा प्रशिक्षित सुईणीला मदत करावी लागते. याकरिता एक-दोन निरनिराळ्या पद्धतींचे उपाय उपलब्धआहेत. यांपैकी नियंत्रित नाळ कर्षण पद्धती अधिक वापरात आहे (आ. ६). यामध्ये डावा हात कठीण बनलेल्या गर्भाशयावर ठेवून ते बेंबीकडे सरकवणे व त्याच वेळी योनिमार्गातून बाहेर पडलेली नाळ चिमट्याने धरून विशिष्ट दिशेने ओढणे या क्रिया कराव्या लागतात. 

वार बाहेर पडल्यानंतर अल्पसा रक्तस्राव होतो. या अवस्थेतील एकूण रक्तस्रावाचे प्रमाण सर्वसाधारणपणे ३०० ते ५०० मिलि. असते. ५०० मिलि.पेक्षा जादा रक्तस्राव ‘प्रसूतिपश्च रक्तस्राव’समजला जातो व त्याची गणना प्रसूतिपश्च उपद्रव म्हणून केली जाते. रक्तस्राव थांबताच बाळंतिणीच्या जननमार्गाच्या भोवतालचा भाग स्वच्छ करून निर्जंतुक पट्टी बांधतात. गर्भाशय बुध्नावर पट्टीची गोलाकार वळकटीसारखी घडी ठेवून पोटावर रुंद पट्टा किंचित ताणून बांधतात. यामुळे गर्भाशयात रक्तस्रावजन्य रक्ताच्या गुठळ्या तयार होत नाहीत. प्रसूतिक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाळंतिणीला दोन तास उताणे पडू द्यावे. तिची नाडी व रक्तदाब यांवर लक्ष ठेवावे. 

अप्राकृतिक अथवा अपसामान्य प्रसूती : प्रत्येक प्रसूतीत तीन महत्त्वाच्या गोष्टी भाग घेतात : (१) प्रवासी : जन्मणारे अर्भक किंवा गर्भ, वार आणि गर्भकला (२) प्रेरक शक्ती : गर्भाशय आकुंचने, उदर स्नायू व मध्यपटल यांची द्वितीयावस्थेत घेतली जाणारी दुय्यम मदत (३) प्रवासमार्ग : श्रोणी व तीवरील मऊ ऊतकांचे आच्छादन, गर्भाशय, योनिमार्ग आणि श्रोणीचा तळ. 

वरीलपैकी कोणतीही एक गोष्ट अप्राकृतिक असल्यास प्रसूतिक्रियेवर दुष्परिणाम होऊन अप्राकृतिक प्रसूती संभवते. प्रसूतिक्रिया जेव्हा २४ तासांपेक्षा जास्त काळ लांबते तेव्हा गर्भवती व गर्भ या दोघांनाही इजा पोहोचण्याचा धोका वाढतो. ४८ तासांपेक्षा जास्त लांबलेली प्रसूती अनेक वेळा धोकादायकच ठरते. 

अप्राकृतिक प्रसूतीची निश्चित व्याख्या करणे कठीण आहे. द्वितीयावस्थेत चिमटा वापरून ती पूर्ण होण्यास मदत करून प्रसूती सुसह्य केल्यास त्या प्रसूतीस अप्राकृतिक प्रसूती म्हणणे योग्य ठरणार नाही. सर्व प्रकारची अप्राकृतिक प्रसूती कष्टमय असल्यामुळे तिचा उल्लेख कष्टप्रसूती असाही करतात. 

कष्टप्रसूतीस वर सांगितलेल्या प्रवासी, प्रेरक शक्ती व प्रवासमार्ग यांमधील दोषांशिवाय पुढील गोष्टी कारणीभूत असू शकतात.  

(अ) वय : सोळा ते वीस वर्षे वयाच्या प्रथमाप्रसवा स्त्रियांत प्राकृतिक आपोआप होणाऱ्या प्रसूतींचे प्रमाण अधिक असते. मुंबईतील नौरोसजी वाडिया प्रसूती रुग्णालयातील २,००० प्रसूतींचा अभ्यास केल्यानंतर असे आढळले की, १,२६० प्राकृतिक बाळंतपणे या वयोगटातील स्त्रियांमधील होती. वाढत्या वयाबरोबर चिमट्याचा अधिकाधिक उपयोग करावा लागतो. पंचविशीनंतर प्रथमप्रसवेत भगच्छेदन शस्त्रक्रिया आवश्यक असते. वयस्कर प्रथमप्रसवा स्त्रियांत सिझेरियन छेदन शस्त्रक्रियांचे प्रमाण अधिक असते.  

(आ) प्रसवसंख्या : दुसरे ते पाचवे बाळंतपण बहुधा सुलभ असते. पाचव्या प्रसूतीनंतरच्या प्रसूतीत कष्टप्रसूतींचे प्रमाण वाढते. 

(इ) शरीररचना : भारतीय स्त्रियांमध्ये पोषणज दुष्परिणामांमुळे शारीरिक वाढ समाधानकारक नसते. श्रोणिमापन केल्यास पाश्चिमात्य स्त्रियांपेक्षा भारतीय स्त्रियांची श्रोणी आकारमानाने लहान असल्याचे आढळते पण त्याचबरोबर भारतीय अर्भकांचे जन्मवजनही कमीच असते. या कारणामुळे भारतातील कष्टप्रसूतींची संख्या इतर देशांच्या मानाने फारशी वाढलेली आढळत नाही. देशाच्या काही भागांत मात्र श्रोणीच्या विकृतींचे प्रमाण बरेच असल्यामुळे तिथे कष्टप्रसूतीचे प्रमाण जादा आढळते. बुटक्या स्त्रियांत (१५५ सेंमी.पेक्षा कमी उंचीच्या) कष्टप्रसूतीचे प्रमाण उंच स्त्रियांमध्ये (१६२ सेंमी.पेक्षा अधिक उंचीच्या) चौदा पटींनी अधिक आढळते. 

(ई) गर्भारपणाचा काळ : ४० आठवड्यांपेक्षा जास्त दिवस लांबलेले गर्भारपण बहुधा कष्टप्रसूतीस कारणीभूत होते. यास गर्भाचे वाढलेले वजन तसेच गर्भाशय स्नायूंच्या विकृतक्रिया कारणीभूत असतात.  


 

काही प्रमुख प्रकार : अप्राकृतिक प्रसूतीचे काही प्रमुख प्रकार येथे वर्णिले आहेत.  

(अ) अकाल गर्भकला विदारण : गर्भकलेचे विदारण प्राकृतिक प्रसूतीमध्ये नेहमी प्रथमावस्थेच्या शेवटास किंवा द्वितीयावस्थेच्या सुरुवातीसच होते. गर्भारपणाच्या शेवटी शेवटी किंवा प्रसूतिक्रियेच्या सुरुवातीसच गर्भकलेचे विदारण होणे अकाली गणले जाते. बहुगर्भता व अप्राकृतिक गर्भस्थिती हे गर्भाशयाच्या अती फुगोटीस कारणीभूत होतात. अकाली गर्भकला विदारणामध्ये नाळेचे स्खलन होण्याचा (डोक्याऐवजी नाळेचा भाग योनिमार्गातून अगोदर बाहेर पडण्याचा) किंवा गर्भाचा हात डोक्याअगोदर बाहेर पडण्याचा धोका असतो. अशा वेळी वैद्यकीय मदत तातडीने न मिळाल्यास गर्भ मृत्यूचा नेहमी धोका असतो. 

आ. ७. एकमेकांत अडकलेल्या जुळ्यांचा एक प्रकार

(आ) बहुगर्भता : जुळे, तिळे, चतुष्क, पंचक इ. एकापेक्षा अधिक गर्भ असलेल्या गभावस्थेला बहुगर्भता म्हणतात. [⟶गर्भधारणा व गर्भबाहुल्य ]. जुळे असलेली प्रसूती पुष्कळ वेळा प्राकृतिक असते परंतु कधीकधी जुळा राक्षसगर्भ असल्यास किंवा दोन गर्भ एकमेकांत अडकल्यास कष्टप्रसूतीचा संभव असतो. जुळ्याचे प्रमाण ८० ते ९० प्रसूतींत एक एवढे असते. एकमेकांत अडकलेल्या गर्भांच्या प्रसूती करताना पहिल्या गर्भाची (योनिमार्गातून शरीरभाग प्रथम बाहेर पडलेल्या गर्भाची) मान कापून डोके बाजूला सरकवून दुसऱ्याची सुटका करावी लागते (आ ७). 

(इ) अप्राकृतिक गर्भदर्शन : जेव्हा गर्भ श्रोणीच्या तळावरून उतरून प्रथम डोक्याच्या बाजूने बाहेर येतो तेव्हा ‘शिरोदर्शन झाले’असे म्हणतात. शिरोदर्शनाचे चार उपप्रकार असून ते सर्व प्राकृतिक प्रसूतीत आढळतात. शिरोदर्शन असूनही कधीकधी अप्राकृतिक प्रसूती संभवते. गर्भाच्या डोक्याची प्रमाणापेक्षा जादा वाढ झाल्यास किंवा दीर्घस्थायी पश्चकपालास्थी पश्च राहणे (प्रसूती होताना गर्भाच्या डोक्याचा मागचा भाग विशिष्ट प्रकारे न फिरल्यामुळे प्रगती खुंटणे) या गोष्टी कष्टप्रसूतीस कारणीभूत होतात. 

डोक्याशिवाय गर्भशरीराचा इतर भागही योनिमार्गातून प्रथम बाहेर पडण्याची शक्यता असते उदा., नाळदर्शन. अशा सर्व गर्भदर्शनांना अप्राकृतिक गर्भदर्शन म्हणतात. यामधील काही प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.  

(१) मुखदर्शन : गर्भाचे डोके पूर्णपणे मागे म्हणजे गर्भाच्या पाठीकडे वळलेले असून पश्चकपालास्थी पाठीस टेकलेली असते व या अवस्थेत चेहरा योनिमार्गातून प्रथम बाहेर पडतो. शिरोदर्शनाच्या चार उपप्रकारांप्रमाणेच मुखदर्शनाचेही चार उपप्रकार आहेत. त्यांपैकी दोन प्रकारांत हनुवटी मातेच्या अग्रभागाकडे, तर दोन प्रकारांत ती तिच्या पश्चभागाकडे असते. कोणत्याही प्रकारचे मुखदर्शन असले, तरी ९०% बाळंतपणे प्राकृतिक असतात. १०% बाळंतपणांत मात्र कष्टप्रसूती संभवते.  

आ. ८. भालदर्शन आ. ९. नितंबदर्शन

शिरोदर्शनाच्या एका उपप्रकारात डोके पूर्णपणे पुढे किंवा मागे वळलेले नसते व भालप्रदेशाचे (भुवईच्या उंचवट्यापासून अग्र-टाळूपर्यंतच्या डोक्याच्या भागाचे) दर्शन होते. याला ‘भालदर्शन’म्हणतात (आ ८). कष्टप्रसूतीच्या शिरोदर्शन उपप्रकारांतील हा उपप्रकार सर्वांत अधिक धोकादायक असतो. दुर्लक्ष झालेल्या किंवा लवकर निदान न झालेल्या भालदर्शन प्रसूतीत गर्भवती व गर्भ या दोघांनाही गंभीर धोका उत्पन्न होतो. 

(२) नितंबदर्शन : गर्भदर्शन जेव्हा गर्भाच्या नितंब भागाकडून होते (वर डोके व खाली श्रोणी असे) तेव्हा त्यास नितंबदर्शन म्हणतात (आ. ९). यामध्येही काही उपप्रकार आहेत. दोन्ही मांड्या पोटाजवळ, दोन्ही पायांची पावले डोक्याजवळ, गुडघे सरळ व ताठ असलेल्या प्रकाराला ‘सरळ पायांचे नितंबदर्शन’म्हणतात. पाय गुडघ्यात वाकलेला असून नितंबापूर्वी पाऊल पुढे असल्यास ‘पाददर्शन’म्हणतात. पायाकडून जन्मलेल्या अर्भकांना ‘पायाळू’ अशी संज्ञा लावतात. कधीकधी गुडघाच पुढे असतो व त्यास ‘जानुदर्शन’म्हणतात. नितंबदर्शनाचे प्रमाण ४० बाळंतपणांत एक एवढे सर्वसाधारणतः आढळते. नितंबदर्शनात गर्भशरीराची नितंब, खांदे व नंतर शेवटी डोके या क्रमाने प्रसूती व्हावयाची असल्यामुळे नेहमीच कष्टप्रसूतीचा संभव असतो. पुष्कळ वेटा शेवळी येणारे डोके श्रोणीच्या तळावर अडकते व सुईणीने किंवा तज्ञाने प्रत्यक्ष मदत केल्याशिवाय प्रसूती पूर्ण होत नाही.  

 आ. १० स्कंधदर्शन आ. ११. हस्तस्खलन

(३) स्कंधदर्शन व गर्भाची आडवी स्थिती : (मूल आडवे येणे). शिर किंवा नितंब यांऐवजी गर्भाच्या इतर भागाचे, विशेषेकरून खांद्याचे (आ. १०), दर्शन गर्भाचा लांब अक्ष गर्भाशयाच्या लांब अक्षाशी आडवा किंवा तिरपा झाला म्हणजेच उद्‌भवते. यालाचगर्भाची आडवी स्थिती म्हणतात. प्राकृतिक प्रसूतीत हे दोन्ही अक्ष एकमेकांशी जुळणारे असतात. कधीकधी खांद्याऐवजी, एक हात योनिमार्गातून बाहेर पडतो व याला ‘हस्तस्खलन’म्हणतात (आ ११). स्कंधदर्शन व हस्तस्खलन या दोन्हींमध्ये बहुधा कष्टप्रसूती संभवते. या  प्रकारचे सर्वसाधारण १५०–२०० बाळंतपणात एक एवढे असते.  


आ. १२. जुळा राक्षसगर्भ

 

गर्भजन्य कारणे : यांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. 

(अ) जुळा राक्षसगर्भ : यामध्ये एकयुग्मजीय जुळी [⟶गर्भधारणा व गर्भबाहुल्य ] एकमेकांत शरीराने मिसळलेली असतात (संयुक्त जुळे, आ. १२). 

(आ) सर्वांग जलसंचयित गर्भ : गर्भाच्या शरीरभर ऊतकातून अपसामान्य जलसंचय होणे. मातेचे रक्त आरएच अव्यक्त [⟶ऱ्हीसस घटक ] व गर्भाचे आरएच व्यक्त असल्यास मातेच्या रक्तातील प्रतिपिंडे [⟶प्रतिपिंड] गर्भाच्या रक्ततील तांबड्या कोशिकांचे (पेशींचे) विलयन करतात. परिणामी जलोदर, जलवक्ष, यकृतवृद्धी, प्लीहावृद्धी (पानथरीची वाढ) व सर्वांगावर सूज या विकृती गर्भ शरीरात संभवतात. 

 आ. १३. जन्मजात अर्बुद : कष्टप्रसूतीचे एक कारण

(इ) गर्भाची अर्बुदे : (नव्या कोशिकांची अत्यधिक वाढ होऊन निर्माण होणाऱ्या व शरीरक्रियेला निरुपयोगी असणाऱ्या गाठीला  अर्बुद म्हणतात). गर्भामध्ये डोके, मान, छाती आणि उदरगुहा या ठिकाणी अर्बुद तयार झाल्यास व ते प्रमाणापेक्षा अधिक वाढल्यास कष्टप्रसूती संभवते. 

(ई) जलशीर्ष : या विकृतीत मस्तिष्क-मेरुद्रवाची (मेंदू व मेरुरज्जू यांना यांत्रिक आधार म्हणून उपयोगी पडणाऱ्या द्रवाची) प्रमाणापेक्षा अधिक वाढ झाल्यामुळे डोक्याचे आकारमान बरेच मोठे होते व त्यामुळे कष्टप्रसूती संभवते [⟶तंत्रिका तंत्र ]. 

इतर काही कारणे : (अ) गर्भाशय स्नायूंची क्रियाविकृती : यामध्ये अपरिणामकारक गर्भाशय स्नायुक्रिया, असंगत व अनियमित गर्भाशय स्नायुक्रिया, गर्भाशय ग्रीवेचे अविस्फारण आणि सबंध गर्भाशयाचे तानिक आकुंचन (नेहमीप्रमाणे लयबद्ध आकुंचने न होता, आकुंचन एकसारखे व बराच काळपर्यंत टिकून राहणे) इत्यादींचा समावेश असून त्यामुळे प्रसूतिक्रियेचा काळ लांबतो. प्रसूतीचा प्रकार बहुतांशी गर्भाशय स्नायूंच्या क्रियाशीलतेवर अवलंबून असतो. जोरदार गर्भाशय आकुंचने ही प्रवासी व प्रवास मार्ग (गर्भ व जननमार्ग) यांमधील विजोडपणावर मात करून प्रसूतिक्रिया पूर्ण करू शकतात. गर्भाशय जडत्वाची पूर्वसूचना मिळत नाही, म्हणून इलाजही समाधानकारक योजता येत नाहीत. या विकृतीचे सर्वसाधारण प्रमाण ०·८ ते १·५% आढळते. 

(आ) मातेच्या श्रोणीचा संकोच : प्रसूतिक्रियेत मातेच्या श्रोणीचेआकारमान महत्त्वाचे असते. हे आकारमान प्राकृतिक असल्यासच गर्भ सुखरूप प्रवास करू शकतो. श्रोणिमुखाच्या आकारमानावरून श्रोणींचे वर्गीकरण करण्यात येते. त्याकरिता श्रोणिमापनाचा उपयोग करतात. क्ष-किरण श्रोणिमापनाच्या तंत्रापासून अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली आहे. श्रोणिमुखाचा अग्र-पश्च व्यास आणि सर्वांत रुंद आडवा व्यास यांवरून श्रोणिमुखाच्या आकारमानाचा अंदाज करता येतो. मातेच्या श्रोणीचे आकारमान जेव्हा प्राकृतिक आकारमानाच्या पूर्ण गर्भास योनिमार्गातून प्रसूत होण्यास अडथळा करू शकते, तेव्हाच अशा श्रोणीला ‘श्रोणि-संकोच’ही संज्ञा लावतात. श्रोणि-संकोचाची निरनिराळी कारणे आहेत : उदा., ⇨ अस्थिमार्दव, ⇨ मुडदूस, ⇨ प्रसवपूर्व परिचर्येत श्रोणि-संकोचाचे निदान होणे महत्त्वाचे असते. कोणत्याही कारणामुळे दीर्घप्रसूती झाल्यास, विशेषेकरून प्रथमप्रसवेत गर्भकला विदारणानंतरही १८ तासांपेक्षा अधिक विलंब झाल्यास, श्रोणि-संकोचाची शक्यता लक्षात घेऊन गर्भवतीस सूतिका रुग्णालयात हालवणे आवश्यक असते. श्रोणि-संकोचामुळे अप्राकृतिक गर्भदर्शन (मुख, नितंब किंवा स्कंधदर्शन) होण्याचा संभव सामान्य श्रोणी असलेल्या स्त्रियांपेक्षा ३-४ पटीने अधिक असते.  

प्रसूतीसंबंधीच्या काही शस्त्रक्रिया : कष्टप्रसूतीच्या वेळी कधीकधी तातडीचा उपाय म्हणून शस्त्रक्रियेचा उपयोग करावा लागतो. या शस्त्रक्रिया नेहमी गर्भवती व गर्भ या दोघांनाही संभाव्य हानीपासून बचावण्याकरिता करतात. परंतु नेहमी हे शक्य होत नाही व पुष्कळ वेळा मातेचा जीव वाचविणारीच शस्त्रक्रिया करावी लागते. अशा वेळी गर्भाकडे पूर्ण दुर्लक्ष करणे भाग पडते. काही प्रसूती शस्त्रक्रिया अगोदर ठरवून विचारपूर्वक केल्या जातात. अशा शस्त्रक्रियांना ‘निवडक शस्त्रक्रिया’म्हणतात. उदा., श्रोणि-संकोचामुळे प्राकृतिक प्रसूती अशक्य ठरल्यानंतर करण्यात येणारी ‘सिझेरियन छेदन’शस्त्रक्रिया.  

प्रसूतीसंबंधीच्या काही शस्त्रक्रियांची थोडक्यात पुढे दिली आहे. 

भगच्छेदन : प्रसूतीक्रियेच्या दुसऱ्या अवस्थेत विटपाचा ताणलेला भाग मुद्दाम कापून योनीमार्गाचा सुरुवातीचा भाग मोठा करण्याकरिता करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेला ‘भगच्छेदन’म्हणतात. या शस्त्रक्रियेचा उपयोग पुढील कारणांकरिता करतात : (१) प्रथमप्रसवेतील विटप भागाचा ताठरपणा. यामुळे वेणा जोरदार असूनही दर्शनीय भागाची प्रगती रोखलेली असते. या शस्त्रक्रियेमुळे विटप वाकडेतिकडे फाटत नाही. (२) प्रथमप्रसवेतील नितंबदर्शन प्रसूती. (३) संदंश (चिमटा) वापरून करावयाच्या सर्व प्रसूतींत प्रथम भगच्छेदन करतात. (४) प्रसूतीच्या वेळी मातेचे गुदद्वार व गुदाशय यांना गंभीर इजा होण्याचा धोका असल्यास. (५) गर्भवतीच्या मूत्रमार्ग परिसंकोचीस (मूत्रमार्गाचे आकुंचन करणाऱ्या वलयाकार स्नायूस) इजा होण्याचा धोका असल्यास. (६) पूर्वीच्या प्रसूतीमुळे झालेल्या जखमा भरून येताना वण तयार झाल्यामुळे विटप ऊतक ताठर झाले असल्यास. (७) गर्भवती किंवा गर्भ यांचा गंभीर धोका टाळण्याकरिता विशेषेकरून प्रथमप्रसवेला हृद्रोग वगैरे असल्यास प्रसूतिक्रियेच्या द्वितियावस्थेचा कालावधी कमी करून तिचे श्रम वाचविण्याकरिता. 

शस्त्रक्रिया करण्यापूर्वी ज्या जागी कापावयाचे ती जागा १ % झायलोकेन द्रावणाच्या अंतःक्षेपणाने बधिर करतात. बरोबर मध्यरेषेत पश्चभागी कापण्यास सुरुवात करून सु. ३·७५ सेंमी. लांब तिरपे कात्रीने कापतात. छेदाची लांबी कमीजास्त ठेवता येते. वार बाहेर पडल्यानंतर म्हणजे प्रसूती पूर्ण होताच ही जखम आंत्रताताने (जनावरांच्या आतड्यापासून बनविलेल्या चिवट व बळकट धाग्याने) शिवून टाकतात. (आ. १४). 


आ. १४. भगच्छेदन : (अ) कात्रीने तिरपे कापताना (आ) छेद शिवल्यानंतर.

 

प्रसूतिक्रिया लवकर पूर्ण करण्याकरिता केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया : प्रसूती संदंश वापरून केलेल्या प्रसूतींचा यात समावेश होतो. प्रसूती संदंशाचा उल्लेख ऐतिहासिक माहितीत मागे आलेलाच आहे. संदंश प्रसूती ही एक सर्वसाधारणपणे नेहमी उपयोगात असलेली शस्त्रक्रिया आहे. पुष्कळ वेळा ती एक प्रमुख शस्त्रक्रियाही गणली जाते. निवासी शस्त्रक्रिया (रुग्णाच्या घरी करता येणारी) म्हणून उपयोगात असणारी ही एकमेव महत्त्वाची प्रसूती शस्त्रक्रिया आहे.  

संदंश वापरण्यापूर्वी प्रसूतिक्रियेसंबंधी पुढील गोष्टींची आवश्यकता असते : (१) गर्भ जिवंत असावा. (२) गर्भाशय ग्रीवेचे पूर्ण विस्फारण झालेले असलेच पाहिजे. (३) गर्भकला विदारण झालेले असले पाहिजे. (४) गर्भाशय आकुंचने व्यवस्थित चालू असावी. (५) योग्य गर्भदर्शन असावे उदा., शिरोदर्शन. (६) डोके श्रोणिगुहेत पूर्णपणे उतरलेले असावे. (७) श्रोणि-संकोच नसावा. (८) मूत्राशय व गुदाशय रिकामी असावीत. मल-मूत्र संचय असल्यास संदंश वापरताना या अवयवांना इजा होण्याचा धोका असतो. (९) रुग्णास योग्य अशी भूल दिलेली असावी. (१०) शक्यतो प्रथम भगच्छेदन करून नंतर संदंश वापरावा. 

संदंश वापरून प्रसूती पूर्ण करण्याची कल्पना सुचल्यानंतर, वापरावयाच्या हत्यारामध्ये वेळोवेळी बदल होत गेले. निरनिराळ्या प्रसूतितज्ञांनी आकार, लांबी, वापरण्याची वेळ व पद्धत यांबद्दल नवीन भर घातली. काही संदंशांना शोधक शास्त्रज्ञांची (उदा., चेंबरलिन, स्मेली, इ. एस्. तार्न्ये इ.) नावे देण्यात आली आहेत (आ. १५). 

प्रसूती संदंश पुढील पाच प्रकारच्या क्रिया करू शकतो : (१) कर्षण, (२) संकोचन, (३) तरफक्रिया, (४) गर्भाशय आकुंचन उत्तेजन आणि (५) अक्षीय परिभ्रमण. यांपैकी सर्वांत महत्त्वाची क्रिया कर्षण ही असते. संदंश हो उपकरणच अर्भकास ओढून बाहेर काढण्याकरिता बनविलेले आहे. संदंश प्रसूतीत गर्भवती व गर्भ या दोघांनाही इजा होण्याचा धोका असतो. विसाव्या शतकात संदंश शस्त्रक्रियेचा वापर कमी झाला आहे. श्रोणिमुखाच्या वर असलेल्या डोक्यास किंवा श्रोणिगुहेत वर असलेल्या डोक्यास पूर्वीप्रमाणे संदंश लावीत नाहीत. कारण सिझेरियन छेदन शस्त्रक्रिया गर्भवती व गर्भ या दोघांनाही निर्धोक असल्याचे सिद्ध झाले आहे.  

आ. १५. प्रसूती संदंशाचे प्रकार : (अ) चेंबरलिन संदंश (चिमट्याचा सुरुवातीचा प्रकार) (आ) स्मेली संदंश (इ) मिल्न मरी संदंश.

भारतातील प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांतून संदंश प्रसूतींचे प्रमाण २ ते ८% आढळते. पाश्चात्य देशांतून ते थोडे अधिक आढळते.  

संदंश प्रसूती यशस्वी होण्याकरिता गर्भाचे डोके चिमट्याच्या दोन पात्यांमध्ये व्यवस्थित पकडले जाणे जरूरीचे असते (आ १६). 

आ. १६. आदर्श संदंश पकड

नितंबदर्शन प्रसूतीत पुष्कळ वेळा मागाहून येणाऱ्या डोक्यास संदंश लावून प्रसूती पूर्ण करावी लागते (आ. १७). 

आ. १७. मागाहून येणाऱ्‍या डोक्याची संदंश प्रसूती सिझेरियन छेदन शस्त्रक्रिया : ज्या शस्त्रक्रियेत प्रथम उदरगुहेवर शस्त्रक्रिया करून ती उघडावयाची  व नंतर ताबडतोब गर्भाशय छेदन करून गर्भ बाहेर काढावयाचा असतो त्या शस्त्रक्रियेला सिझेरियन छेदन शस्त्रक्रिया म्हणतात. याला ‘उदर प्रसूती’असेही म्हणता येईल. 

पुढील कारणांमुळे योनिमार्गातून प्रसूती होण्यामध्ये गर्भवती व गर्भ यांना धोका असण्याचा संभव असतो :

(१) प्रवासी (गर्भातील) दोष : नितंबदर्शन (विशेषेकरून प्रथमप्रसवेत मूल आकारमानाने नेहमीपेक्षा मोठे असल्यास), मुखदर्शन, भालदर्शन यांबरोबरच इतर काही दोष असल्यास. 


(२) प्रवास मार्ग (जननमार्गाचे) दोष : गंभीर श्रोणि-संकोच, ग्रीवा तंत्वार्बुद (तंतुमय अर्बुद), ग्रीवा कर्करोग. 

(३) प्रेरक शक्ती दोष : गर्भाशय जडत्व व ग्रीवा अविस्फारण, विशेषेकरून गर्भवती व गर्भ या दोघांनाही क्लेश होत असल्यास. 

पूर्वीच्या दोन प्रसूती उदरप्रसूती असल्यास पूर्वप्रसूतीमुळे गर्भाशयावर झालेला वण तुटण्याचा धोका असल्यास किंवा गंभीर श्रोणि-संकोचासारखा कायमचा दोष असल्यास पुनरावर्ती सिझेरियन छेदन करावे लागते. 

(४) गर्भावस्थेतील काही उपद्रव व गर्भवतीचे काही रोग : मुखस्थ अपरा (वार गर्भाशयाच्या बुध्नाच्या वरच्या भागी नसून गर्भाशयाच्या मुखाजवळ असणे) या विकृतीत रक्तस्रावाचा गंभीर धोका असतो. गर्भवतीस हृद्रोग किंवा मधुमेह असल्यास उदर प्रसूती करावी लागते. मधुमेहात बहुतकरून गर्भाचे आकारमान प्रमाणापेक्षा वाढलेले असते.  

(५) इतर गर्भजन्य कारणे : ४१ आठवड्यांपेक्षा जास्त लांबलेल्या गर्भावस्थेत गर्भाची पक्वता वाढते, तसेच अशा गर्भातील मृत्युप्रमाणही अधिक असते. ४३ आठवड्यांपेक्षा जास्त लांबलेल्या गर्भावस्थेत सिझेरियन छेदन शस्त्रक्रिया, विशेषेकरून वयस्कर प्रथमप्रसवेत हा उत्तम उपाय असतो. 

शस्त्रक्रिया प्रकार व निवड : सिझेरियन छेदन शस्त्रक्रिया तीन पद्धतींनी करता येते. 

आ. १८. सिझेरियन छेदन : गर्भाशय छेदातून उजव्या हाताने केलेली डोक्याची प्रसूती : (१) उदर भित्तीचा छेद, (२) गर्भाशय भित्तीचा छेद.  

(अ) गर्भाशय अधःखंडित शस्त्रक्रिया : प्रसूतिक्रियेच्या सुरुवातीपासून गर्भाशयाचे दोन खंड ओळखता येतात. (२) ऊर्ध्व किंवा वरचा खंड व (२) अधःस्थ किंवा खालचा खंड. अधःखंडीय शस्त्रक्रियेत गर्भाशय छेदन या खालच्या भागात करतात. हा छेद बहुतकरून आडवा घेतात. ९८% सिझेरियन शस्त्रक्रिया या प्रकारात मोडातात. 

(आ) गर्भाशय ऊर्ध्वखंडीय शस्त्रक्रिया अथवा रूढ सिझेरियन छेदन शस्त्रक्रिया : या प्रकारात छेद गर्भाशयाच्या वरच्या भागात घेतात. गंभीर श्रोणि-संकोच असल्यास किंवा गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग असल्यासच या पद्धतीचा उपयोग करतात. त्यामुळे या शस्त्रक्रियेचे एकूण प्रमाण फक्त १·५% इतके कमी असते. 

(इ) सिझेरियन गर्भाशयोच्छेदन शस्त्रक्रिया : यामध्ये गर्भाची उदरप्रसूती केल्यानंतर शस्त्रक्रियेने गर्भाशय काढून टाकतात. काही विशिष्ट कारणाकरिताच (उदा., निविष्ट अपरा म्हणजे गर्भाशय भित्तीत घट्ट शिरलेली वार) ही शस्त्रक्रिया करावी लागते. या शस्त्रक्रियेचे एकूण प्रमाण ०·५ % असते.  

अधःखंडीय शस्त्रक्रिया पूर्वनियोजित असल्यास शस्त्रक्रियापूर्व तयारी करतात. सार्वदेहिक भूल देऊन शस्त्रक्रिया करतात. उदर छेदनानंतर गर्भाशयाच्या अधःखंडावर आडवा १० सेंमी. लांबीचा छेद घेतात. गर्भकलेचे विदारण करून डोके धरून गर्भ प्रसूती हळूहळू पूर्ण केली जाते. नेहमीप्रमाणे नाळ कापून नवजात अर्भक मदतनीसाकडे पुढील देखरेखीकरिता सोपवता. याच छेदातून वार व गर्भकलांची प्रसूती झाल्यानंतर व गर्भाशयाच्या अंतर्भागाची तपासणी केल्यानंतर जखम शिवतात. उदराचा छेद शिवून शस्त्रक्रिया पूर्ण केली जाते. रुग्णास शक्यतो लवकर चोवीस तासांनंतर थोडीफार हालचाल करावयास लावणे हितावह असते. स्तनपान करू देण्यास चोवीस तासांनंतर परवानगी देतात. उदरावरील टाके सातव्या दिवशी काढतात.  

क्षेत्रमाडे, सुमति भालेराव, य. त्र्यं.


पशुसंबंधित प्रसूतिविज्ञान : निरनिराळ्या जातींच्या पाळीव पशूंच्या माद्या ठराविक गर्भावधीनंतर प्रसूत होऊन वासरू, रेडकू, कोकरू, करडू व सामान्यपणे पिलू अशी नावे धारण करणारे गर्भ बाहेरच्या जगात प्रवेश करतात. त्यांच्या प्रसूतिक्रियेतील बऱ्याच घटना मानवातील क्रियेशी मिळत्याजुळत्या आहेत.  

गर्भाची वाढ पूर्ण झाल्यावर पशूंच्या माद्या ज्यावेळी प्रसूत होतात (वितात) त्या त्याच वेळी का होतात हे शास्त्रीय दृष्ट्या अजून पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. कारण नवजात पिलू जिवंत राहणे अगर त्याचा मृत्यू होणे हे त्या क्षणाच्या प्रसूतीवर अवलंबून नाही. याबाबतीत निरनिराळे सिद्धांत मांडण्यात आले असले, तरी हॉर्मोनांच्या परस्परावलंबी उत्पादनामुळे हे घडत असावे असे मानण्यास सबळ पुरावा आहे. गर्भधारणेनंतर अंडाशयामध्ये तयार होणारी प्रतिपिंड ग्रंथी (अंडाशयातून अंडामोचन होते त्या जागी तयार होणारी ग्रंथी) हाताने खुडून टाकल्यास मादीच्या गाभण अवस्थेची अखेर होते. यावरून या सिद्धांताला पुष्टी मिळते. गर्भाशय विस्तार पावणे, त्याच्या ग्रीवेवर गर्भाचा दबाव येणे व मदजन (इस्ट्रोजेन), प्रगर्भरक्षी, रिलॅक्झीन (त्रिकास्थी व श्रोणिफलक यांच्या संधिबंधातील म्हणजे श्रोणिबंधांतील ताण कमी करणारे हॉर्मोन) व गर्भाशय संकोचक या हॉर्मोनाच्या समतोलातील बदलामुळे गाभण अवस्थेचा शेवट होऊन प्रसूती होत असावी. याविषयी अधिक विवरण नोंदीच्या सुरुवातीस मानवासंबंधीच्या माहितीमध्ये केले आहे व ते पशूंच्या बाबतीतही लागू पडते. निरनिराळ्या जातींच्या पशूंच्या माद्यांचा सरासरी गर्भावधी लक्षात घेऊन माद्यांच्या विण्याच्या दिनांकाचा अंदाज करता येतो. याबाबत काही कोष्टके तयार करण्यात आली आहेत. त्यातील एका कोष्टकाचा नमुना खाली दिला आहे. 

गर्भावधी व मादी विण्याचा अंदाजी दिनांक दर्शविणारे कोष्टक 

विण्याची अंदाजी दिनांक 

पशू :                          घोडी                        गाय                      म्हैस                     मेंढी            डुकरीण

गर्भावधी :                 ३३६ दिवस          २८१ दिवस             ३१० दिवस         १४७ दिवस     ११४  दिवस 

संयोगीचा दिनांक : 

१ जानेवारी              ३ डिसेंबर               ९ ऑक्टोबर          ७ नोव्हेंबर             २८ मे              २५ एप्रिल 

६ जानेवारी             ८ डिसेंबर               १४ ऑक्टोबर      १२ नोव्हेंबर              २ जून            ३० एप्रिल 

११ जानेवारी        १३ डिसेंबर                १९ ऑक्टोबर     १७ नोव्हेंबर              ७ जून               ५ मे 

 याप्रमाणे वर्षाचे दिनांक ५ दिवसांच्या अंतराने मांडून कोष्टक तयार केले जाते.

 प्रसूतिक्रियेतील अवस्था : पशूंच्या माद्यांमध्ये प्राकृतिक विण्याच्या क्रियेच्या चार अवस्था दिसून येतात. प्राथमिक अवस्थेमध्ये जसजसा विण्याचा दिवस जवळ येऊ लागतो तसतशा माद्या शांत व मरगळलेल्या दिसतात. इतर जनावरांपासून एका बाजूला जाऊन एकलकोंड्या राहतात (कुत्री, मांजरी व काही प्रमाणात डुकरिणींमध्ये हे विशेषत्वाने दिसते), डुकरणीच्या अंगाखाली घातलेले गवत एकत्र करण्याचा ती प्रयत्न करते. गाय व घोडी यांचे श्रोणिबंध व स्नायू ढिले होऊन तो भाग थलथलीत दिसू लागतो व चालण्यात सुस्तपणा येतो, कास भरगच्च व ताठरलेली दिसू लागते. काही ठिकाणी दुग्ध ग्रंथीचा ताठरपणा कमी करण्यासाठी विण्याआधीच गायीचे दूध (चीक) काढण्याची पद्धत आहे पण ती योग्य नव्हे. कारण वासरांना चिकाची आवश्यकता असते. बाह्य जननेंद्रियांना व त्यांच्या श्लेष्मकलेला (पातळ बुळबुळीत आवरणाला) सूज येऊन पिवळट रंगाचा स्राव वाहतो. घोडीमध्ये स्राव फारसा दिसत नाही. ती जोराने शेपटी झाडते व खूर आपटते. गाय उठबस करते, घोडी खिंकाळते, गाय हंबरते, मेंढी, कुत्री व मांजरी कण्हल्यासारखा आवाज करतात.

  

 दुसऱ्या अवस्थेमध्ये गर्भाशयाच्या ग्रीवेचे स्नायू ढिले होऊन तोंड उघडले जाते. मादी आणखीनच अस्वस्थ होते. घोडी पोट दुखत असल्यासारखे एकसारखी त्याच्याकडे वळून पाहते व पोटाकडे लाथा झाडते. मादीची नजर भेदरलेली दिसते व तिची उठबस वाढते. गर्भाशयाच्या ग्रीवेचे तोंड विस्फारित होत जाऊन श्रोणिबंध आणखीनच ढिले होतात. गर्भाशयाच्या भित्तीतील अनुदैर्घ्य स्नायूंचे (लांब तंतू असलेल्या स्नायूंचे) लयबद्ध आकुंचन तसेच काही प्रमाणात पोटांच्या स्नायूंचे आकुंचन होऊ लागते. यालाच प्रसूतिवेदना किंवा वेणा वा कळा म्हणतात. सुरुवातीला कळा १५ मिनिटांच्या अंतराने येतात व त्या १-२ मिनिटे टिकतात. कळा सुरू झाल्यावर अर्धा ते तीन तासांनी गर्भाशय व ग्रीवा यांच्यामध्ये रचनात्मक बदल होऊन ⇨जरायूचा उल्ब-द्रवानी भरलेला फुग्यासारखा भाग तयार होऊन तो भगोष्ठामध्ये (बाह्य जननेंद्रियाच्या त्वचेच्या घडीने बनलेल्या ओठासारख्या भागामध्ये) दिसू लागतो. निरनिराळ्या पशूंच्या माद्यांमध्ये ह्या कळांत फरक पडतो. काही वेळा उल्ब-द्रवाची ही पिशवी जननेंद्रियाच्या बाहेर लोंबकळू लागते. गर्भाशय ग्रीवा आणखी विस्फारित होतच असते. ती पूर्णपणे विस्फारित झाली म्हणजे कळा लवकर लवकर व जोराने येऊ लागतात. येथून पुढे तिसरी अवस्था सुरू होते. 

 तिसऱ्या अवस्थेत उल्ब-द्रवाची पिशवी आणखी बाहेर येते व तिच्यावरील ताण वाढून ती फाटते व त्यातून गर्भाचे पुढील पाय दिसू लागतात. पिशवीतून पुष्कळ द्रव बाहेर येतो. या वेळी कळा थोड्या काळ थांबतात व काही मिनिटांनी पुन्हा पहिल्यापेक्षा जास्त जोराने येऊ लागतात. पोटाच्या स्नायूंचे आकुंचन करून मादी गर्भ बाहेर फेकण्याचे निकराचे प्रयत्न करते. प्रत्येक प्रयत्नाबरोबर गर्भ हळूहळू श्रोणिगुहेतून पुढे सरकतो. मांसाहारी प्राण्यांमध्ये डोके मोठे असल्यामुळे पायांच्या पुढे डोके येते व पाय पोटाखाली अगर बाजूला दुमडलेले असतात. भगामधून डोके पुढे सरकल्यावर कळा पुन्हा थोडा वेळ थांबतात. यानंतर मात्र सर्वांत अधिक जोरदार कळा येऊन गर्भाचे छाती, खांदे व धड हे भाग श्रोणिगुहेबाहेर सटकतात. आता अर्धाअधिक गर्भ बाहेर आल्यामुळे त्याच्या वजनाने उत्पन्न होणाऱ्या कर्षणामुळे व उरलेला भाग त्यामानाने लहान असल्यामुळे लवकर बाहेर येतो. उभ्याने विणाऱ्या मादीमध्ये हे चटकन घडते. घोडी पुष्कळदा उभ्याने विते. गाय सुरुवातीस उभी असली, तरी गर्भ बाहेर येऊ लागताच पुष्कळदा आडवी होते. घोडीमध्ये शिंगरू बाहेर आल्यावर तेजमिनीवर पडतेवेळी नाळ आपोआप तुटते. तशी ती तुटली नाही, तर घोडी ती चावून तोडते. बहुधा ती घोडीच्या व शिंगराच्या हालचालींमुळे आपोआप तुटते. गायीतही नाळेची लांबी कमी असल्यामुळे गर्भाचे मागील पाय बाहेर येतेवेळी ती तुटते. डुकरीण, कुत्री आणि मांजरी चावून नाळ तोडतात. गाय व घोडी (विशेषतः घोडीमध्ये) यांमध्ये नाळ लवकर कापली, तर शिंगरामध्ये नाळेवाटे येणाऱ्या रक्तातील १,००० ते १,५०० मिलि. रक्त वाया जाते. नैसर्गिक रीत्या नाळ तुटू दिली, तर फारतर २०० मिली. रक्त वाया जाते. घोडीमध्ये नाळेवर एक जागा अशी असते की, त्या ठिकाणी ती तुटली म्हणजे रक्तस्राव कमी होतो, असे दिसून आले आहे. नैसर्गिक रीत्या ती त्याच ठिकाणी तुटते. उल्ब-द्रवाची पिशवी फुटल्यापासून संपूर्ण गर्भ बाहेर पडण्यास सर्वसाधारणपणे घोडीमध्ये १० ते ३० मिनिटे, गायीमध्ये अर्धा ते ४ तास, मेंढीमध्ये १५ ते ३० मिनिटे आणि डुकरिणीमध्ये प्रत्येक पिलाला ५ ते १० मिनिटे लागतात.

  


उल्ब, अपरापोषिका कला व जरायू या गर्भकलांना [⟶गर्भकला ] एकत्रित रीत्या वार म्हणून संबोधतात. विण्याच्या क्रियेच्या चौथ्या अवस्थेमध्ये वार बाहेर टाकली जाते. सर्वसामान्यपणे वार बाहेर टाकण्यास म्हैस, गाय, घोडी यांसारख्या माद्यांना ८ ते २४ तास लागतात. गर्भ बाहेर पडल्यावर गर्भाशयाच्या निवर्तन (पूर्ववत होण्याच्या) क्रियेला सुरुवात होते. गर्भाशयाच्या भित्तीतील स्नायूंचे आकुंचन होऊन त्यांचे आकारमान लहान होण्यास सुरुवात होते. या क्रियेमध्ये गर्भकला गर्भाशयाच्या भित्तीपासून सुटून बाहेर टाकण्यास मदत होते. घोडीमध्ये वार व गर्भाशयाची श्लेष्मकला यांची जोडणी विस्तृत प्रमाणावर होत असल्यामुळे शिंगराच जन्माबरोबर बहुधा ती बाहेर पडते. गायीमध्ये ही जोडणी वारेवरील रसांकुरांच्या (गर्भाला पोषक द्रव्ये पोहोचविणाऱ्या प्रवर्धांच्या विस्तारित वाढीच्या) पृष्ठभागांनीच होत असल्यामुळे मर्यादित असते. यामुळे वासराच्या जन्माबरोबर वार क्वचितच बाहेर पडते. सामान्यपणे वासराच्या जन्मानंतर काही तासांनी ती बाहेर येते पण काही वेळा बराच काळ आत राहिल्यामुळे कधीकधी ती सडण्याच्या क्रियेलाही सुरुवात होते. अशा वेळी हस्तक्षेप करून ती काढून टाकावी लागते. शेळी व मेंढी या माद्यांमध्ये एकापेक्षा अधिक गर्भ बाहेर येत असल्यामुळे पहिल्या बाहेर येणाऱ्या गर्भाची वार दुसऱ्या गर्भाच्या जन्माबरोबर व दुसऱ्याची तिसऱ्याच्या वेळी आणि तिसऱ्याची मात्र जन्मानंतर काही तासांनी बाहेर टाकली जाते. डुकरीण, कुत्री व मांजरी यांच्या बाबतीतही असेच घडते, मात्र शेवटच्या पिलाची वार ते गर्भाशयाच्या शृंगासारख्या भागमध्ये लांबवर आत असल्यामुळे तेथेच अडकून राहते व काही काळानंतर टाकली जाते. पडलेली वार ताबडतोब बाजूला केली नाही, तर गाय, डुकरीण, कुत्री, मांजरी व कधीकधी घोडीसुद्धा ती खाऊन टाकतात. गायीमध्ये वार घशात अडकण्याचा, तसेच एकदम प्रथिनयुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात पोटात गेल्यामुळे अपचन, पोटदुखी वगैरे विकारा होण्याचा धोका असतो. कुत्री व मांजरी यांची पिले पुष्कळदा जरायूमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये जन्मतात. तोंड व नाकपुड्यांवरील आवरणामुळे पिलांच्या श्वासोच्छ्‌वासात अडथळा येण्याची शक्यता असते. वार खाण्याच्या सवयीमुळे हा अडथळा आपोआपच दूर व्हावा, अशी निसर्गाची योजना दिसते. यांशिवाय वारेमध्ये काही प्रमाणात हॉर्मोन असतात व ती खाण्यात आल्याने गर्भाशय पूर्ववत होण्याला तसेच दुग्धस्रवणाला मदत होते. घोडीमध्ये बहुधा शिंगराच्या जन्माबरोबरच वार बाहेर पडते हे वर आलेच आहे परंतु कधीकधी ती पडण्याला तीन तास लागतात. हा कालावधी तीन तासांपेक्षा जास्त झाल्यास तिचे अपघटन होऊन (घटक द्रव्ये अलग होऊन) गर्भाशयदाह झाल्यामुळे क्वचित घोडी दगावण्याचा संभवही असतो. गायीमध्ये वार बाहेर पडण्यास २ ते ८ तास लागतात. कधीकधी २४ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो परंतु त्यामुळे फारसा अपाय होत नाही, असे दिसते. मात्र अशा वेळी हस्तक्षेप करून ती काढून टाकणे आवश्यक असते. मेंढीमध्ये वार बाहेर टाकण्यास २ ते ४ तास लागतात. डुकरिणीला सर्व पिलांना (८ ते १२) जन्म देण्याला ४ तास, कुत्रीला (४ ते ६ पिलांना) ६ तास व मांजरीला (३ ते ५ पिलांना) ६ तास लागतात. सामान्य प्रसूतीच्या या चार अवस्था वर्णिल्या असल्या, तरी खरे पाहता त्या खंड न पडता एकामागून एक सुरू असतात.

गर्भदर्शनाचे प्रकार व कष्टप्रसूती : सर्व पशूंमध्ये विण्याच्या वेळी गर्भाचे पुढील पाय गर्भाशय ग्रीवेच्या दिशेला असून डोके दोन पायांमध्ये असते. याला अग्रगर्भदर्शन म्हणतात आणि घोडी व गाय यांमध्ये विण्याची ही स्वाभाविक अवस्था आहे. याशिवाय पश्चगर्भदर्शन, पृष्ठगर्भदर्शन, तसेच या तिन्हींमधील अनेक प्रकार स्त्रियांमध्ये दिसून येतात त्याप्रमाणे पशूंच्या माद्यांमध्येही आढळतात. कुत्री व मांजरी यांमध्ये ३०% प्रसूतींच्या वेळी पश्चगर्भदर्शन असते व त्यांच्या बाबतीत ही स्वाभाविक प्रसूतीच समजली जाते. गाय, म्हैस व घोडी यांसारख्या मोठ्या जनावरांमध्ये अग्रगर्भदर्शनाशिवाय इतर प्रकारांमध्ये माता व नवजात यांची सुटका करण्यासाठी कमीजास्त प्रमाणात मदत द्यावी लागते. अशा प्रसूतींना कष्टप्रसूती म्हणतात.  

 कष्टप्रसूतीची अनेक कारणे असू शकतात आणि त्या सर्वांचे मानवातील कष्टप्रसूतीच्या संबंधात वर्णिलेल्या कारणांशी साम्य आहे. मादीच्या श्रोणिगुहेमध्ये गर्भाशय असते. श्रोणि-अस्थींच्या ज्या विकृतीमुळे गर्भाशयातील गर्भाला बाहेर येण्यास अडथळा होईल अशा सर्व विकृती कष्टप्रसूतीला कारणीभूत होतात. श्रोणि-अस्थींची विकृत रचना व श्रोणि-अस्थिभंगामुळे होणारी अस्थिवृद्धी ही प्रमुख भातृक कारणे आहेत. याशिवाय गर्भाचे आकारमान वाजवीहून मोठे असणे, गर्भाभोवती नाळेचा पाश पडणे, गर्भाच्या पोटात व छातीत पाणी साठून गर्भाचे आकारमान वाढणे, गर्भमृत्यू इ. गर्भाच्या विकारांतही कष्टप्रसूती होते. गर्भाच्या भ्रूणावस्थेत जनुकव्यक्त [⟶जीन] लक्षणांमुळे युग्मकांच्या (शुक्राणू-पुंजनन कोशिका-व अंडाणू-स्त्रीजनन कोशिका-यांच्या संयोगाने तयार झालेल्या कोशिकांच्या) विभाजन क्रियेमध्ये विसंवाद निर्माण होऊन काही अवयवांची वृद्धी अनिर्बंध होते. यामुळे दोन तोंडे असणे, दोन धडे, आठ पाय असणे असे राक्षसगर्भ तयार होतात व त्या वेळीही कष्टप्रसूती होते. तसेच एका वेताच्या वेळी एकापेक्षा अधिक संतती होणाऱ्या प्राण्यांमध्ये प्रसूतीच्या वेळी गर्भ एका पाठोपाठ योनिमार्गात दाखल होण्याऐवजी ते एकाच वेळी दाखल झाल्यासही कष्टप्रसूती होते. पशूंमध्येही काही कष्टप्रसूतींच्या वेळी सिझेरियन छेदन शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. घोडी, गाय, म्हैस यांसारख्या मोठ्या जनावरांच्या कष्टप्रसूतींच्या वेळी वापरण्यासाठी अगंज (स्टेनलेस) पोलादाचे चिमटे, विशिष्ट प्रकारचे आकडे, प्लॅस्टिकचे दोरे इ. साहित्य वापरले जाते. अस्वाभाविक गर्भदर्शनामुळे श्रोणिगुहेत अडकलेला गर्भ हात घालून सरळ करणे व बाहेर काढणे, गर्भाशयाच्या व पोटाच्या स्नायूंच्या आकुंचनामुळे शक्य होत नाही. अशा वेळी प्रोकेन, नोव्होकेन यांसारख्या शुद्धिहारक औषधांची शेपटीच्या पहिल्या व दुसऱ्या मणक्यांमध्ये कशेरुक नालामध्ये (कण्याच्या पोकळीमध्ये) अंतःक्षेपणे देऊन संवेदनाहरण करतात. त्यामुळे हात लांबवर सुगम रीतीने घालता येतो. कधीकधी छोटीसी शस्त्रक्रिया जरूरीप्रमाणे करावी लागते. सिझेरियन छेदन शस्त्रक्रिया विशेषेकरून कुत्री व मांजरी या प्राण्यांमध्ये बऱ्याच वेळा करतात व त्या वेळी भूल देणे आवश्यक असते.  


नवजाताची घ्यावयाची काळजी : नवजात जन्मल्याबरोबर त्याला श्वासोच्छ्‌वास करण्याला गर्भकलेचा अडथळा येत नाही ना, हे पाहणेअगत्याचे असते. सुरुवातीला ते कष्टाने एक-दोन वेळा श्वास घेते व थोड्या प्रयत्नाने काही मिनिटांतच व्यवस्थित श्वासोच्छ्‌वास सुरू होतो. काही वेळा नवजाताला उलटे धरून श्वसन मार्गातील श्लेष्म व लाळ बाहेर काढून श्वसनमार्ग मोकळा करावा लागतो. बहुतेक पशूंच्या माद्या नवजात बाहेर आल्यावर त्याला चाटून कोरडे करण्याला सुरुवात करतात. काही वेळा नवजाताच्या अंगाला मीठ चोळून घोडीने त्याला चाटावे म्हणून प्रवृत्त करावे लागते. बहुतेक पशूंमध्ये नवजात काही मिनिटांतच उभी राहतात व मातेच्या स्तनाकडे जाण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या दुधामुळे म्हणजे चिकामुळे आतड्यातील ग्रंथींतून स्राव येण्याला व त्यांचा क्रमसंकोच होण्याला मदत होते. यामुळे आतड्यात साचलेला काळपट व चिकट मळ बाहेर पडतो. काही कारणामुळे नवजाताला चीक मिळाला नाही, तर एखादे सारक औषध देणे जरूर असते.  

  स्वाभााविक रीत्या प्रसूती झाली असल्यास बहुतेक पशूंच्या माद्या काही मिनिटांतच उभ्या राहतात. गाय, म्हैस व घोडी यांना कोमट कांजी देण्याची प्रथा आहे व ती चांगली आहे. पहिले दोन दिवस माद्यांना खुराकाचा संपूर्ण हिस्सा देत नाहीत. त्यानंतर खुराक वाढवत जाऊन ८–१० दिवसांत नेहमीप्रमाणे खुराक देणे सुरू करतात. प्रसूतिक्रियेमध्ये गर्भाची ओढाताण झाल्यामुळे मादीचा योनिमार्ग, भग व भगोष्ठ यांना इजा झाल्यामुळे सूज येते. अशा वेळी या भागाला गरम पाण्यात फडके बुडवून पिळवून शेक दिल्यास सूज कमी होते.

प्रसवोत्तर विकृती : प्रसूतीच्या वेळी घडलेल्या अस्वाभाविक घटनांमुळे किंवा विशिष्ट शरीरक्रियात्मक घटनांमुळे प्रसूतीनंतरच्या नजीकच्या काळात काही विकृती उद्‌भवण्याची शक्यता असते. प्रसवोत्तर रक्तस्राव, वार अडकणे, गर्भाशयभ्रंश (गर्भाशय योनिमार्गात घुसणे किंवा बाहेर येणे), कीटोनांचे आधिक्य व दुग्धज्वर यांसारख्या विकृती जनावरांमध्ये दिसून येतात.

  

 गर्भाच्या पायांमुळे किंवा कष्टप्रसूतीच्या वेळी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमुळे गर्भाशयातील रक्तवाहिन्यांना इजा झाल्यामुळे रक्तस्राव संभवतो. घोडी व गाढवीमध्ये वार विस्तृत प्रमाणावर गर्भाशयाच्या श्लेष्मकलेला जोडली गेली असल्यामुळे रक्तस्राव होण्याचा धोका अधिक असतो. रक्तस्राव बंद करण्याच्या इतर उपायांबरोबर ॲड्रेनॅलीन किंवा पिट्यूट्रीन या औषधांची अंतःक्षेपणे देतात. 

गर्भाशयाचे स्नायू वार बाहेर फेकण्यासाठी सतत आकुंचन पावत असतात व त्याचा परिणाम म्हणून गर्भाशयाचा भ्रंश होतो. तसेच कष्टप्रसूतीमध्ये करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमुळे गर्भाशय व योनिमार्गामध्ये जंतूंचा प्रवेश होतो. यामुळे क्षोभ होऊन ही इंद्रिये उद्दीपित होतात व त्यांचा भ्रंश होतो. गाभण अवस्थेमध्ये गर्भपोषणाच्या वेळी खाद्यामधील कार्बोहायड्रेटांचे प्रमाण कमी झाल्यामुळे वसा (स्निग्ध पदार्थ) व कार्बोहायड्रेटे यांच्या चयापचयातील (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडींतील) दोषामुळे अपचयन (ऊतकातील जटिल पदार्थांचे अपघटन होऊन त्यांचे टाकाऊ पदार्थांत रूपांतर होण्याची क्रिया) अपूर्ण होते. त्यांपासून उत्पन्न होणाऱ्या कीटोन व ॲसिटोन यांचे रक्तातील प्रमाण वाढते आणि ॲसिटोनेमिया व कीटोनांचे आधिक्य हे विकार उद्‌भवतात. [⟶कीटोनांचे आधिक्य]. 

विलेल्या गायीच्या किंवा म्हशीच्या रक्तातील कॅल्शियमाचे प्रमाण अचानक कमी झाल्यामुळे दुग्धज्वर होतो. गाय विशेषतः दुधाळ गाय, दूध देणाऱ्या शेळ्या आणि कधीकधी मेंढ्या व डुकरिणी यांना व्याल्यानंतर तीन दिवसांत होणारा हा रोग आहे. [⟶दुग्धज्वर]. 

 वार अडकून राहण्याची विकृती गाय व म्हैस यांच्यामध्ये अनेक वेळा दिसून येते. अडकलेली वार २४ तासांच्या आत हस्तक्षेप करून काढणे जरूरीचे असते. अन्यथा गर्भाशयशोथ (गर्भाशयाची दाहयुक्त सूज) झाल्यामुळे पुढील गर्भधारणेमध्ये अडथळा येण्याचा संभव असतो. [⟶गाय].  

मानवी मदतीची आवश्यकता : सर्व जातींतील पशूंच्या माद्या सामान्यपणे माणसाच्या मदतीशिवाय वितात. मात्र काही वेळा सारासार विचार करून गर्भाचे पाय ओढणे, डोके सरळ करणे अशासारखी अल्पशी मदत दिल्यास नवजात व माता दोघांनाही उपकारक होते. विण्याच्या वेळी मादीला बांधलेले नसावे व आवतीभोवती अडगळ नसलेली हवेशीर खोली असली म्हणजे पुरे. मादी विण्याची लक्षणे दिसू लागल्यावर विण्यासाठी मदत लागल्यास ती त्वरित देण्यासाठी मदतनिसाने जवळपास राहणे योग्य असते. मेंढ्या बहुधा उघड्यावर वितात. डुकरिणीला मात्र स्वतंत्र खोली देणे आवश्यक असते, कारण इतर डुकरे आसपास असली, तर ती पिलांना खाऊन टाकण्याचा संभव असतो. उल्ब-द्रवाची पिशवी फुटल्यानंतर घोडीमध्ये १० ते २० मिनिटांत व गायीमध्ये २० ते ४० मिनिटांत गर्भाचे पाय दिसू लागले नाहीत, तर योनिमार्गात हात घालून गर्भदर्शन कसे आहे हे आजमावून कशा प्रकारची मदत देणे जरूर आहे याची दिशा ठरविता येते. गर्भाचे अप्राकृतिक दर्शन असेल, तर प्रसूतीची क्रिया आणखी पुढे जाऊन गर्भाशयाच्या ग्रीवेमध्ये गर्भ गच्च अडकून पडण्यापूर्वी योग्य ते उपाय योजून मादी व नवजात दोघांचीही सुटका करता येते. योनिमार्गात लांबवर हात घालून गर्भाच्या जिभेची, जबड्यांची व डोळ्यांच्या पापण्यांची प्रतिक्षेपी क्रिया (बाह्य उद्दीपनामुळे आपोआप होणारी अनैच्छिक क्रिया) व नाळेतील रक्तवाहिन्यांचे नाडीचे ठोके यांवरून गर्भ जिवंत असल्याचे कळते. वरील गोष्टींचा अभाव गर्भाच्या मृत्यूचे निदर्शक समजतात. प्रसूतितज्ञाने कष्टप्रसूतीच्या वेळी जरूर तेवढाच हस्तक्षेप विचारपूर्वक करावा, असा अलिखित दंडक आहे.

दीक्षित, श्री.  गं. 

पहा : गर्भधारणा व गर्भबाहुल्य गर्भारपणा नवजात अर्भक प्रसवपूर्व परिचर्या प्रसवोत्तर परिचर्या. 

संदर्भ : 1. Baird, D., Ed., Combined Textbook of Obstetrics and Gynaecology, London, 1962.

            2. Benesch, F. Wright, J. G. Veterinary Obstetrics, London, 1950.

            3. Dawn, C. S. Textbook of Obstetrics, Calcutta, 1974.

            4. Masani, K. M. Parikh, M. N. Textbook of Obstetrics, Bombay, 1976.

            5. McDowell, R. E. Improvement of Livestock Production in Warm Climates, San Francisco, 1972.

            6. Miller, W. C. West, G. P., Ed. Black’s Veterinary Dictionary, London, 1962.

            7. Rice, V. A. Breeding and Improvement of Farm Animals, New York, 1957.

         8. भट, वि. म. प्रसूतितंत्र, येवले, १