प्रसुप्तावस्था : (डॉर्मन्सी). वनस्पतींची बीजे रुजण्यास बाह्य परिस्थिती अनुकूल असूनही अपेक्षित वेळी, काही आंतरिक कारणांमुळे रुजत नाही या अवस्थेला ‘प्रसुप्तावस्था’किंवा ‘विश्रांति-काल’म्हणतात. काही वनस्पतींची सूक्ष्म बीजुके (प्रजोत्पादक भाग), कळ्या, कंद अथवा इतर भूमिस्थित खोड (ग्रंथिक्षोड) इत्यादींसारखी शाकीय इंद्रियेही असाच प्रकार दर्शवितात. बाह्य परिस्थितिजन्य कारणांमुळे ⇨अंकुरण (रुजून वाढीस लागणे) होत नसल्यास त्या अवस्थेला ‘निश्चलता’म्हणतात. नैसर्गिक अवस्थेत या दोन्हींतला फरक प्रत्यक्ष प्रयोगांशिवाय कळणे कठीण असते.
कारणे : (१) अपार्य बीजावरण : यामुळे पाणी व बहुधा ऑक्सिजन यांच्या प्रवेशाला प्रतिबंध होतो. साठवणीमुळे ही अपार्यता हळूहळू कमी होत असते. ओलावा, तापमान, सूक्ष्मजंतू व कवक (अळिंबे) इ. जमिनीतील घटकांच्या संस्कारामुळे अपार्यता कमी होते. (२) मजबूत बीजावरण : यामुळे काही तणांच्या बीजांच्या (उदा., कॅप्सेला, ॲमॅरँथसइ.) विचोषणानंतर (पाणी शोषून घेतल्यानंतर) गर्भास फुगण्यास विरोध होतो व बीज रुजत नाही. ह्या बीजातील गर्भांना प्रसुप्तावस्था नसल्याने बीजावरण काढून टाकल्यास त्यांची वाढ लागलीच सुरू होते. अशा इतर मजबूत बीजांचे आवरण नरम करण्याचे काही उपाय केल्यास अंकुरण त्वरित होते. (३) बीजावरणाचा ऑक्सिजनाला विरोध (अपार्यता) : ⇨दुतुंडीसारख्या वनस्पतीच्या बीजावर केलेल्या प्रयोगांती असे आढळले की, त्यांची प्रसुप्तावस्था बीजावरणाच्या ऑक्सिजनाच्या अपार्यतेमुळे असते ही बीजावरणे फोडल्यास किंवा अभग्न बीजावरणावरचा ऑक्सिजनाचा दाब वाढविल्यास अंकुरण त्वरित होते. अनेक गवते व ⇨कंपॉझिटी कुलातील (सूर्यफूल कुलातील) कित्येक वनस्पतींच्या बीजांची प्रसुप्तावस्था बीजावरणाच्या अपार्यतेमुळे या सदरात येते. (४) अपूर्ण गर्भविकास : गर्भाचा विकास बीजे स्वतंत्र होते वेळी अपूर्ण असणे त्यामुळे गर्भाची पूर्ण वाढ होईपर्यंत प्रसुप्तावस्था टिकून राहते. उदा., गिंको [⟶गिंकोएलीझ], ॲश व अनेक आमरे [⟶ऑर्किडेसी]. (५) प्रसुप्त गर्भ : गर्भाचा पूर्ण विकास झाला असूनही शरीर व्यापारदृष्ट्या अपूर्णता राहते (उदा., पाइन, ॲश, सफरचंद, पीच इ.). अशा बाबतीत ‘अनुपाक’म्हणजे नंतरची अधिक पिकण्याची प्रक्रिया आवश्यक असते. (६) अंकुरणाला विरोध करणारे (निरोधक) घटक : उदा., टोमॅटोच्या रसामुळे त्यांच्या व इतर काहींच्या बियांना रुजण्यास विरोध होतो. अनेक बीजांतही निरोधक पदार्थ आढळतात. [⟶अंकुरण], शिवाय अतृप्त लॅक्टोनासारखी काही संयुगे बऱ्याच वनस्पतींत असतात त्यामुळे वाढ व अंकुरणाला विरोध होतो.
काही बीजे पक्व झाल्यावर लागलीच रुजू शकतात परंतु ती प्रतिकूल परिस्थितीत थोडा वेळ ठेवली असता त्यांची ही क्षमता जाते. अशा रीतीने पुन्हा आलेल्या या प्रसुप्तावस्थेस ‘दुय्यम प्रसुप्तावस्था’म्हणतात. अंकुरणास आवश्यक घटकांपैकी निदान एक तरी याला जबाबदार असतो. उदा., प्रकाशसंवेदी बिया अंधारात ठेवल्यास किंवा या उलट काळोखात रुजणाऱ्या बिया प्रकाशात आणल्यास दुय्यम प्रसुप्तावस्था प्राप्त होते. तापमानातील फरक अवरक्त (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) किरण किंवा प्रत्यक्ष गर्भातील काही शरीरक्रियावैज्ञानिक घटना इत्यादींमुळेही दुय्यम प्रसुप्तावस्था येते. प्राथमिक प्रसुप्तावस्थेप्रमाणे दुय्यम प्रसुप्तावस्था कृत्रिम रीत्या कमी करता येते.
कधीकधी अंकुरणानंतर बीजापासून जन्मलेल्या रोपाची वाढ चालू राहत नाही पण याचे कारण बीजाची प्रसुप्तावस्था हे नसते. वसंतातील काही रानटी वनस्पतींची बीजे रुजताना मूल तंत्राची [⟶मूळ–२] वाढ होते पण अप्याक्ष (बीजाच्या दलिका व पहिली पाने यांच्या दरम्यानचा अक्षाचा भाग) वाढत नाही, तर काही जातींत अप्याक्ष बीजातून अंशतः बाहेर येऊन तेथेच वाढ थांबते. बहुधा ही अप्याक्षाची प्रसुप्तावस्था नीच तापमानाच्या (१°-१०° से.) प्रभावाने मोडली जाते.
बीजांची प्रसुप्तावस्था मोडणे : याला बरेच व्यावहारिक महत्त्व आहे ते कृत्रिम रीत्या साध्य झाल्यास बागायतीत व कृषीत फायद्याचे ठरते. याकरिता केले जाणारे उपाय प्रसुप्तावस्थेच्या मूलभत कारणांवर अवलंबून असतात. बीजावरण घासणे व खरवडणे किंवा त्याला तीव्र खनिज अम्ले लावणे, यामुळे साधारणपणे बीजावरणात फरक पडून अंकुरणाला गती मिळते, तसेच तापमानात व आर्द्रतेत फरक करून अनुपाकात सोईस्कर बदल घडविता येतात. गर्भाची प्रसुप्तावस्था नीच व उच्च तापमानांच्या एकांतरणाने कमी होते. प्रकाश देणे किंवा काळोखात ठेवणे आणि जलदाब (वातावरणीय दाबाच्या २,००० पट) यांमुळेही इष्ट हेतू साध्य होतो. कार्बन डाय-ऑक्साइडाच्या उच्च संहतीचा (प्रमाणाचा) प्रभाव किंवा एथिलीन संयुगांच्या संपर्कामुळेही अंकुरण लवकर घडवून आणता येते.
बीजांची अंकुरणक्षमता : काही आठवड्यांपासून ते ५०, ७५ किंवा १०० वर्षांवर काळापर्यंत कित्येक बीजे जिवंत राहिल्याची उदाहरणे आहेत. त्यांची क्षमता त्यांच्य जातीवर व बाह्य परिस्थितीवर अवलंबून असते. मँचुरियामध्ये पीटच्या थरात सापडलेल्या भारतीय कमळाच्या (निलंबो न्युसीफेरा) अंकुरणक्षम बीजांचे वय कमीत कमी १२० व जास्तीत जास्त २००–४०० वर्षे व कदाचित २,००० वर्षे असावे. बहुतेक सर्व पिकांची बीजे सापेक्षतः अल्पजीवी असून सामान्य प्रकारे साठविली गेली असल्यास बहुधा १–३ वर्षे अंकुरणक्षम राहतात परंतु विशेष प्रकारे साठविल्यास ही क्षमतेची मर्यादा पुष्कळच वाढविता येते. सर्वसाधारणपणे काही जंगली वनस्पतींची कठीण आवरणाची बीजे ५० वर्षे किंवा अधिक काळ जिवंत राहतात तसेच कित्येक तणांची बीजेही दीर्घजीवी असल्याचे प्रयोगांती आढळले आहे.
कळ्यांची प्रसुप्तावस्था : समशीतोष्ण कटिबंधातील झुडपांना व वृक्षांना वसंत ऋतूत व उन्हाळ्याच्या आरंभी येणाऱ्या कळ्या त्या वेळी सामान्यतः प्रसुप्तावस्थेत नसतात अशा वेळी काही कारणाने पाने गळून गेल्यास या कळ्यांपासून नवीन वाढ होते परंतु पाने गळण्याच्या नित्याच्या कालापर्यंत किंवा क्वचित अगोदर या कळ्या प्रसुप्तावस्थेत जातात. निसर्गतः काष्ठयुक्त झाडांच्या कळ्यांची प्रसुप्तावस्था सापेक्षतः नीच हिवाळी तापमानात मोडते. प्रसुप्तावस्थेची कालमर्यादा जातीवर अवलंबून असते. कळ्यांची प्रसुप्तावस्था ही कधीकधी अन्योन्य संबंधावर अवलंबून असते. याबाबत नित्याचे उदाहरण म्हणजे शेंड्याची कळी दुखावली किंवा काढली तरच बाजूच्या खालच्या कळ्या वाढीस लागतात. याचप्रमाणे कंद ग्रंथिक्षोड, घनकंद [⟶खोड] इत्यादींच्या कळ्यांही कमी–अधिक काळ, बाह्य परिस्थिती अनुकूल असताही प्रसुप्त राहतात.
वर उल्लेखिलेल्या समशीतोष्ण कटिबंधातील काष्ठयुक्त झाडांच्या कळ्या शरद ऋतूत व हिवाळ्यात आरंभी प्रसुप्त असतात, याचे कारण कमी तापमान हे नव्हे कारण ही झाडे अधिक उच्च तापमान सतत असलेल्या पादपगृहात ठेवली असताही वाढ बंद राहते. मात्र जर ती झाडे पाणी गोठण्याच्या तापमानात आणली, तर प्रसुप्तावस्था मोडते. एखादी फांदीच फक्त थंड केली व इतर झाड उच्च तापमानात राखले, तर त्याच फांदीवरच्या कळ्या फक्त अंकुरतात.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी डब्ल्यू. एल्. योहान्सेन यांनी असे दाखविले की, कित्येक वनस्पतींच्या कळ्यांवर ईथर व क्लोरोफॉर्म यांचे फवारे एक-दोन दिवस मारल्यास त्यांची प्रसुप्तावस्था संपते. मात्र या संस्काराचा काळ व प्रत्यक्ष परिणाम यांमधला अवघी तो संस्कार वर्षातील कोणत्या काळी केला त्यावर अवलंबून असतो. त्यानंतरच्या अनेकांच्या प्रयोगांनी कळ्या व बटाटे (ग्रंथिक्षोड) आणि इतर तशी शाकीय इंद्रिये यांवर अनेक रसायनांचा परिणाम घडवून प्रसुप्तावस्था कमी करता येते किंवा लांबविता येते, हे सिद्ध झाले. ईथर व क्लोरोफॉर्म यांशिवाय एथिल ब्रोमाइड किंवा आयोडाइड, ॲसिटोन, ॲसिटिलीन, कार्बन टेट्राक्लोराइड, कार्बन डायसल्फाइड, एथिलीन क्लोरोहायड्रिन व इतर काही रसायने प्रसुप्तावस्था मोडण्यास परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. ऑक्सिजन काढून घेणे किंवा कार्बन डाय-ऑक्साइडाची संहती वाढविणे यांमुळेही कळ्या व ग्रंथिक्षोडांची प्रसुप्तावस्था मोडता येते. बटाटे व ग्लॅडिओलस यांचे घनकंद साधारण उच्च तापमानात साठविल्यास यांची प्रसुप्तावस्था लवकर मोडते, असे आढळले आहे. कळ्यांना टोचणे किंवा चिमटणे वा त्यांचे काही खवले काढून टाकणे अशा उपायांनीही प्रसुप्तावस्था मोडणे शक्य आहे, असे काहीना आढळले आहे. कधीकधी व्यापाराच्या दृष्टीने प्रसुप्तावस्था लांबविणे इष्ट ठरते. अशा वेळी वाढ नियमित करणारी रसायने उपयुक्त ठरतात. साठविलेल्या बटाट्यांना अंकुर फुटू नयेत म्हणून नॅप्थॅलीन ॲसिटिक अम्लाच्या मिथिल एस्टरामध्ये मुरविलेल्या कागदांचे कपटे बटाट्यांच्या साठवणात टाकले असता प्रसुप्तावस्था चालू राहते. ज्या हवामानात तापमानाचा पल्ला फार लहान असतो, तेथे तेथे कंदादि प्रसुप्त इंद्रियांना पुष्प-विकासाकडे खेचण्यास प्रथम नीच व नंतर उच्च तापमान देणे परिणामकारक ठरते, असे आढळले आहे.
पहा : अंकुरण वृद्धि, वनस्पतींची.
संदर्भ : Meyer, B. S. Anderson, D. B. Bohning, R. H. Introduction to Plant Physiology, London, 1960.
परांडेकर, शं. आ.
“