प्रवालपाद : (स्टिल्ट). हा पक्षी कॅरॅड्रीइडी या पक्षिकुलातील आहे. याचे शास्त्रीय नाव हिमँटोपस हिमँटोपस असे आहे. हा पक्षी जगाच्या बहुतेक भागांत आढळतो. भारतात हा सगळीकडे आढळतो. हिवाळ्यात या जातीचे पक्षी उत्तरेकडून हिवाळी पाहुणे म्हणून भारतात येतात व उन्हाळ्यात परत जातात. येथील रहिवासी पक्षी बाहेर जात नाहीत.

हा पक्षी साधरणपणे तित्तिराएवढा [⟶ तितर] असतो त्याचे पाय काटकुळे व बरेच लांब (सु. २५–१८ सेंमी) असतात. हिवाळ्यात नराचे डोके व पाठीचा पुढचा भाग तपकिरी पंख व पंखांमधला पाठीचा भाग काळा असतो. शेपटी करड्या रंगाची असते. शरीराचा बाकीचा भाग पांढरा असतो. उन्हाळ्यात नराच्या डोक्याचा माथा काळा खालची बाजू पांढरी व त्यात गुलाबी छटा असते. मादीची पाठ व पंख काळे, बाकीचे भाग पांढरे असतात. डोळे तांबडे, चोच लांब, सरळ, बारीक आणि काळी मान लांब, पाय तांबूस रंगाचे, बोटे पातळ कातडीचे अंशतः जोडलेली असतात.

प्रवालपाद"

यांची लहान टोळकी असून ती तलाव, तळी, दलदलीची जागा, मिठागरे, समृद्रकाठचा चिखल इ. ठिकाणी भक्ष्य शोधीत हिंडत असतात. पाय लांब असल्यामुळे काठावरील थोड्याफार खोल पाण्यात हिंडून तळाच्या गाळात चोच खुपसून तो आपले भक्ष्य उपसून काढतो. कृमी, गोगलगाई व पाणकिडे हे याचे भक्ष्य होय. हा उत्तम पोहणारा आहे. उडताना मान पुढे व पाय मागे पसरलेले असतात.

यांचा प्रजोत्पादनाचा काळ मुख्यतः एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत असतो. पाण्याच्या काठाशी किंवा उथळ पाण्यात लहान खळगा करून त्यात बारीक काटक्या किंवा पाणवनस्पती घालून घरटे तयार केलेले असते. बहुधा अशा घरट्यांची एक मोठी वसाहत असते. मादी भुऱ्या रंगाची तीन अगर चार अंडी घालते. त्यांच्यावर दाट काळे ठिपके असतात.

कर्वे, ज. नी.