प्रलय : पुनर्निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सजीवांचा अपवाद वगळता पृथ्वीवरील इतर सर्वांचा, प्रचंड महापुरासारख्या एखाद्या कारणाने झालेला नाश म्हणजे प्रलय होय. ज्या शाश्वत तत्त्वापासून या विश्वाची निर्मिती झालेली असते, त्या तत्त्वातच शेवटी विश्व विलीन होणे, या अपरिहार्य प्रक्रियेलाही प्रलय असे म्हटले जाते. ईजिप्त, जपान इ. काही अपवाद वगळता जगातील इतर बहुसंख्य देशांतून प्रलयाच्या कथा आढळतात. आफ्रिकेतील लोकांत त्यांचे प्रमाण कमी आहे, तर अमेरिकन इंडियन लोकांत मात्र अशा अनेक कथा आहेत.

प्रलयाचे स्वरूप : एखाद्या देवतेच्या (किंवा क्वचित कृष्णसर्पासारख्या दुष्टशक्तीच्या) कोपाने प्रलय होणे, एखाद्या सदाचरणी पुरुषाला पूर्वसूचना मिळाल्याने त्याने नौका, पेटी इ. साधनांचा उपयोग करून प्रलयातून वाचणे, भावी प्रलयाची सूचना देवता वा एखादा प्राणी याजकडून मिळणे, पुनर्निर्मितीसाठी सर्व प्राणिमात्रांची बीजे प्रलयातून वाचणे, प्रलयानंतर वाचलेल्या व्यक्तीने यज्ञ करणे, पुन्हा निर्मिती होणे इ. घटना या जगातील बहुसंख्या प्रलयकथांतून कमीजास्त फरकाने वर्णिलेल्या आढळतात. अतिवृष्टी, बर्फ वितळणे, अग्नी, सूर्य, वादळ, हिवाळा इ. कारणांनी प्रलय झाल्याच्या कथा आहेत. एका फिनिश कथेनुसार एकदा उष्ण पाण्याच्या योगाने प्रलय झाला होता. प्रलयातून एखादा सदाचारी पुरुष, त्याचे कुटुंबीय, एखादे जोडपे, भाऊ-बहीण, प्राण्यांच्या प्रत्येक जातीतील एक वा अनेक जोडपी इ. प्राणी जिवंत राहिल्याची वर्णने या कथांतून असतात. एखाद्या उंच पर्वतावर बसल्यामुळे ते वाचतात. याउलट, उंच पर्वत बुडूनदेखील सखल भागातील एक बेट न बुडाल्याची एक कथा ऑस्ट्रेलियात आढळते. प्रलयाच्या कालाविषयी सात, चाळीस, तीनशे पासष्ट इ. दिवसांचा निर्देश आढळतो. प्रलयानंतर जमीन शोधण्यासाठी आधी पक्ष्यांना पाठविल्याचे निर्देशही आढळतात.

  प्रलय-संकल्पनेमागची कारणे : जन्मणाऱ्या प्रत्येक पदार्थाला नाश असतो हे निरीक्षण, सूर्योदयानंतर सूर्यास्त व सूर्यास्तानंतर सूर्योदय या कालचक्राचा प्रभाव, महापुरांनी केलेल्या प्रचंड नाशाचा प्रत्यक्ष अनुभव, ईश्वर पाप्यांचा नाश करतो व सज्जनांचे रक्षण करतो ही श्रद्धा, जुन्या जगाचा नाश होऊन नव्या जगाची निर्मिती व्हावी ही आकांक्षा इ. कारणांनी प्रलयाची संकल्पना व तद्‌विषयक कथा निर्माण झाल्या असाव्यात. जे. जी. फ्रेझरच्या मते प्रलयकथा ऐतिहासिक घटनांवर आधारलेल्या नसून पर्वत, समुद्र, दऱ्या इ. निसर्गघटनांच्या निर्मितीचे स्पष्टीकरण करण्यासाठी तयार झाल्या आहेत. उदा., ड्यूकेलिअनची ग्रीक प्रलयकथा ही थेसलीच्या पर्वतांत निर्माण झालेल्या फटीचे स्पष्टीकरण देण्यासाठी तयार झाली आहे. सूर्य म्हणजे प्रलयातून वाचलेला नोआ, उगवता सूर्य म्हणजे प्रलयातून वाचून जमिनीवर उतरणारा वीर इ. प्रकारे निसर्गघटनांचे रूपकात्मक वर्णन करण्यासाठी या प्रलयकथा तयार झाल्या असण्याची शक्यताही आहे.एकंदरीत, वास्तवाचे निरीक्षण व कल्पनाशक्ती यांच्या मिश्रणातून या कथा तयार झाल्या आहेत. जगाच्या वेगवेगळ्या भागांतील प्रलयकथांमध्ये समानता आढळते. त्या समानतेमागे एकच विश्वव्यापी प्रलय झालेला असणे, एकीकडच्या कथा दुसरीकडे जाणे, विशिष्ट निसर्गघटनेविषयी दूरदूरच्या मानवांची मानसशास्त्रीय दृष्ट्या समान प्रतिक्रिया असणे इ. कारणे सांगितली जातात.

एकच विश्वव्यापी प्रलय नाही : एकदा विश्वव्यापी असा एक प्रलय होऊन गेला आहे (इ. स. पू. ४००४ मध्ये), हे काहींचे मत आता शास्त्रीय आणि ऐतिहासिक दृष्ट्या योग्य नसल्याचे मानले जाते. ⇨बायबलमधील प्रलय ही एक ऐतिहासिक घटना आहे, असे मानणारे लोक पृथ्वीवरून नष्ट झालेल्या प्राण्यांच्या जाती व त्यांचे अवशेष यांचा निर्देश करतात व हे प्रलयामुळे झाले, असे मानतात. परंतु ईश्वरी संकेताप्रमाणे प्रलयातून सर्व जाती वाचावयास हव्या होत्या मग त्यांपैकी काही नष्ट कशा झाल्या, असा संशय निर्माण होतो. शिवाय, नष्ट झालेल्या अनेक जाती पृथ्वीवर मानवाचा उदय होण्यापूर्वीच नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचा नाश प्रलयाने झाला, असे म्हणता येत नाही. छोट्याशा नौकेत इतके प्राणी कसे बसले, असे म्हणता येत नाही. छोट्याशा नौकेत इतके प्राणी कसे बसले, हेही गूढच आहे. एखादा विश्वव्यापी प्रलय खरोखरच होऊन गेला असेल, तर पुनर्निर्मितीनंतर सर्व मानवांचा एकच वंश न बनता अनेक वंश कसे बनले, याचाही उलगडा होत नाही. अशा प्रकारे, विश्वव्यापी प्रलयाच्या ऐतिहासिकतेवर अनेक आक्षेप घेतले जातात.

  विविध देशांतील प्रमुख प्रलयकथा : ऋग्वेदात प्रलयाची मनुमत्स्यकथा आलेली नाही. ती प्रथम तपथ ब्राह्मणात (१·८·१) आढळते. पुराणांच्या पंचलक्षणांपैकी म्हणजेच वर्ण्यविषयांपैकी ‘प्रतिसर्ग’ (प्रलय) हे महत्त्वाचे लक्षण होय. मनुमत्स्यकथेनुसार विष्णू हा मत्स्याचे रूप घेऊन मनूच्या ओंजळीत प्रकट झाला आणि त्याने त्याला भावी प्रलयाची सूचना देऊन नौकेतून वाचवले. काहींच्या मते या कथेत गंगेच्या महापुराचे, तर काहींच्या मते हिमालयावरून झालेल्या प्राचीन स्थलांतराचे वर्णन आहे. भारतीय प्रलयसंकल्पनेचे वैशिष्ट्य असे, की प्रलय हा एखाद्या देवतेच्या कोपाने घडत नाही, तर ऋतुचक्राप्रमाणे विशिष्ट कालखंडानंतर नियमितपणे पुनःपुन्हा घडून येणारी ती एक अपरिहार्य घटना आहे. हिंदू पुराणांनी प्रलयाचे चार प्रकार मानले आहेत. प्रत्येक पदार्थात क्षणोक्षणी होणारा सूक्ष्म बदल हा नित्य प्रलय, विविध दुःखांचा कायमचा नाश हा आत्यंतिक प्रलय, ⇨कल्पम्हणजेच ब्रह्मदेवाचा दिवस संपल्यावर ब्रह्मदेव झोपी जातो, तेव्हा होणारा तो नैमित्तिक प्रलय आणि ब्रह्मदेवाची शंभर वर्षे झाल्यावर त्याचे आयुष्य संपताना होणारा महाप्रलय म्हणजे प्राकृत प्रलय होय. यावेळी तन्मात्रा, अहंकार आणि महत्तत्त्व [⟶ सांख्यदर्शन] यांचा मूळ प्रकृतीमध्ये लय होतो. भागवतपुराणाच्या मते यावेळी १००वर्षे सूर्य तळपतो व पाऊस पडत नाही नंतर १०० वर्षे पाऊस पडत राहतो. तत्त्वांच्या निर्मितीचा जो क्रम असतो, त्याच्या उलट क्रमाने त्यांचा प्रलय होतो.


  अकेडियन कथेनुसार देवांनी प्रलय करावयाचे ठरविले, तेव्हा ईआ या देवाने सित्नपिस्ती याला सूचना देऊन जहाज तयार करावयास सांगितले व प्रलयातून वाचविले. बायबलमधील प्रलयकथा अकेडियन कथेशी बऱ्याच प्रमाणात समान आहे. मेसोपोटेमियातील मूळच्या कथेला हिब्रू लोकांनी एक नवे रूप दिले, असे दिसते. दुष्ट मानवजात नष्ट करून फक्त सदाचरणी नोआला वाचवावयाचे असे ⇨येहोषाच्या मनात होते. त्यानुसार त्याने नोआला पेटी तयार करावयास सांगून त्याला प्रलयातून वाचवले. बायबलच्या ‘नव्या करारा’त येशूने प्रलयाची तुलना अंतिम निवाड्याशी केली आहे. [⟶ निवाड्याचा दिवस]. इ. स. तिसऱ्या शतकातील काही नाणी आशिया मायनरमध्ये सापडलेली असून त्यांवर नोआचे नाव व त्याच्या पेटीचे चित्र आहे. प्रलयाशी संबद्ध अशी पुढच्या काळातील चित्रे आणि शिल्पेही आढळतात. ग्रीक कथेनुसार रागावलेल्या ⇨ झ्यूसने मानवजात नष्ट करण्यासाठी प्रलय घडवला, तेव्हा प्रॉमीथिअसच्या सूचनेनुसार प्रॉमीथिअसचा मुलगा ड्यूकेलिअन हा पिर्रा या आपल्या पत्नीबरोबर नावेत बसून वाचला. नंतर त्याने झ्यूससाठी यज्ञ केला आणि झ्यूसच्या सूचनेनुसार त्याने जे दगड फेकले, त्यांपासून पुरुष आणि त्याची पत्नी पिर्रा हिने जे दगड फेकले, त्यांपासून स्त्रिया, अशी पुनरुत्पत्ती झाली. हाइअरॅपलिस येथील जमिनीत असलेल्या एका भेगेत प्रलयाचे पाणी गुप्त झाले, असे मानले जाते. ड्यूकेलिअनने तेथे हेराचे मंदिर बांधले असून, तेथे वर्षातून दोनदा समुद्राचे पाणी आणून त्या भेगेत ओतले जाते. अथेन्समधील झ्यूसच्या देवळाजवळील भेगेत प्रलयाचे पाणी गुप्त झाले, या समजुतीने तेथे बळी वाहण्याची प्रथा आहे. पारशी कथेनुसार ⇨ अहुर मज्दाने प्रलय व त्यानंतर अत्यंत कडक हिवाळा पाठवावयाचे ठरविले, तेव्हा यीमा याला किल्ला बांधण्याची व त्यात सर्व प्राण्यांचे नमुने घेऊन राहण्याची सूचना देण्यात आली होती. चिनी कथेनुसार यू नावाच्या पुरुषाने लोकांना महापुरातून वाचवले. काही विद्वानांच्या मते या कथेत चीनचे अश्रू मानल्या जाणाऱ्‍या हूवांग हो या नदीच्या पुराची वर्णने आहेत.

साळुंखे, आ. ह. 

पुरातत्त्वीय विचार :मध्ययुगीन जगतात ह्या प्रलयकथा म्हणजे पूर्वी प्रत्यक्षात घडलेल्या गोष्टी अशीच दृढ श्रद्धा होती. त्यानुसार या घटनांची कालनिश्चितीही युरोपात करण्यात आलेली होती. आपल्याकडेही मनूचा काळ दाखविणारी गणिते काही ग्रंथांत मांडण्यात आलेली आहेत पण ती कित्येक सहस्त्र वर्षांच्या भाषेत असल्याने सामान्यपणे पडताळून पाहता येण्याच्या बाहेरची असतात. सतराव्या शतकातील काही ख्रिस्ती पंडित व संशोधक यांनी मात्र हे सगळे पटेल अशा प्रकारे मांडले व इ. स. पू. ४००४ मध्ये हा प्रसिद्ध प्रलय झाला असे ठासून सांगितले. ही समजूत बरेच दिवस रूढ होती आणि भूस्तरज्ञ व इतर संशोधक यांच्या संशोधनाच्या चौकटीत ठाकूनठोकून ती बसविण्याचा यत्न करण्यात येत असे. उदा., भूस्तरज्ञांना मिळलेले नष्टावशेष आणि विशेषतः पूर्वी नष्ट झालेल्या प्राण्यांचे जीवश्म (खडकात उमटलेले ठसे) ही प्रलयाची द्योतके समजण्यात येऊ लागली. लवकरच भूस्तरशास्त्राचा कालदृष्ट्या आवाका फार मोठा असल्याचे दिसू लागले व ४००४ या कालनिश्चितीवर कोणाचाच विश्वास राहिला नाही. पण मग निदान प्रलय ही घटना तरी ऐतिहासिक होती (काळ कोणताही असेल) की नाही, या दृष्टीने संशोधन सुरू झाले. ⇨लेनर्ड वुली यांनी अर येथील उत्खननात मिळून आलेला गाळाचा सु. ३ मी. जाडीचा थर हा महापुराचा निदर्शक असावा व हा पूर म्हणजेच प्रलयकथांचे मूळ असावे, अशी कल्पना मांडली. मात्र हा पूर टायग्रिस–युफ्रेटीसच्या खोऱ्‍यांपुरताच मर्यादित होता, हे त्यांनी स्पष्ट केले. नंतरच्या संशोधकांनी तर या पुराचे क्षेत्र फक्त अरपुरतेच मर्यादित असल्याचे दाखवून दिले आहे. म्हणजे पुरातात्त्विक संशोधनही प्रलयाची ऐतिहासिकता सिद्ध करण्यास असमर्थ ठरले आहे, हे स्पष्ट दिसते. 

देव, शां. भा.

पहा : पुराणकथा.

संदर्भ :1. Parrot, Andre Trans. Hudson, Edwin, The Flood and Noah’s Ark, New York, 1955.

       2. Stollberger, Edmond, The Babylonian Legend of the Flood, London, 1962.

       3. Wooley, Leonard, Ur of the chaldees, 1929.