प्रमाणमीमांसा : प्रमाण हा पारिभाषिक शब्द भारतीय तत्त्वज्ञानातील आहे. केवळ प्रमाणमीमांसा म्हणून प्रथम गौतमाचे न्यायदर्शन अस्तित्वात आले. नंतर इतर दर्शनांनी आपआपल्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत अशी प्रमाणमीमांसा निर्माण केली. त्या त्या भारतीय दर्शनात प्रथम तत्त्वमीमांसाच होती प्रमाणमीमांसा नव्हती. उदा., पूर्वमीमांसा, ब्रह्ममीमांसा इत्यादी. भारतीयांच्या सर्व आस्तिक व नास्तिक दर्शनांमध्ये प्रमाणमीमांसा अंतर्भूत आहे. प्रमेयाची म्हणजे वस्तूची वा तत्त्वाची सिद्धी प्रमाणाने होते, असा सर्व दर्शनांचा सिद्धांत आहे. सिद्धी म्हणजे निर्णय वा निश्चय होय. वस्तुनिर्णयासच प्रमा म्हणतात.

ज्ञानाचे स्वरूप, ज्ञानाचे प्रकार, ज्ञानाची कारणे व साधने, ज्ञानाचे प्रामाण्य व अप्रामाण्य या विषयांची मीमांसा म्हणजे प्रमाणमीमांसा होय. प्रमेचे अथवा यथार्थ ज्ञानाचे असाधारण कारण म्हणजे प्रमाण होय परंतु कित्येक वेळा ‘प्रमाण’शब्द ‘प्रमा’या अर्थीही वापरला जातो. प्रमेय म्हणजे प्रमेचा विषय होय. हा विषय प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असा दोन प्रकारचा असतो. ज्ञानेंद्रियांनी जी जी वस्तू किंवा पदार्थ कळतो तो तो प्रत्यक्ष होय आणि जी वस्तू व जो पदार्थ ज्ञानेंद्रियांनी कळत नाही तो अप्रत्यक्ष होय. अप्रत्यक्ष वस्तूसच परोक्ष वस्तू असेही म्हणतात. ज्ञानेंद्रिय ज्या वस्तूशी संलग्न होत नाही म्हणजे ती असन्निकृष्ट असते वा ज्ञानेंद्रिय संलग्न होत असले, तरी जी वस्तू सूक्ष्म असते ती ज्ञानेंद्रियाचा विषय होत नाही किंवा काही वस्तू संमिश्र म्हणजे एकमेकींत मिसळल्यामुळे ज्ञानेंद्रियास ओळखता येत नाहीत, त्यांना अप्रत्यक्ष किंवा परोक्ष म्हणतात. प्रत्यक्ष विषय होऊ शकणाऱ्या परंतु अविद्यमान अशा म्हणजेच नष्ट किंवा भविष्यकालीन वस्तूही परोक्ष अथवा अप्रत्यक्ष म्हणून म्हणता येतात. असन्निकृष्ट, सूक्ष्म, संमिश्र आणि अविद्यमान अशा प्रमेयांना परोक्ष म्हणतात. त्यांचे ज्ञान ⇨ अनुमानाने वा शब्दाने होते. काही प्रमेये प्रत्यक्ष असली, तरी दूरस्थ, असन्निकृष्ट आणि अविद्यमान असली तर त्यांनाही परोक्ष म्हणतात परंतु काही प्रमेये प्रत्यक्ष असूच शकत नाहीत. त्यांना नित्यपरोक्ष म्हणतात. उदा., दृश्य विश्वाचे अदृश्य कारण, आस्तिक दर्शनांतील पाप-पुण्ये, वैशेषिक दर्शनातील परमाणू, सांख्यदर्शनातील सत्त्वरजस्तमात्मक मूलप्रकृती इ. विषय नित्यपरोक्ष होत. अनुमान वा आगम या प्रमाणानेच ज्या नित्यपरोक्ष वस्तू कळतात त्यांच्या प्रमाणाचा प्रारंभही प्रत्यक्षापासूनच होतो. कारण प्रत्यक्ष वस्तूच्या उपपत्तीकरिताच नित्यपरोक्ष वस्तूची संकल्पना सांगावी लागते. अशा नित्यपरोक्ष वस्तूंची प्रमा म्हणजे यथार्थ निश्चय, अनुमान वा वेदादी आगम या प्रमाणांनी होतो.

प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, वस्तू जशी आहे तशी कळणे ⇨ शंकराचार्यांनी (ब्रह्मसूत्रभाष्य १·१·२) म्हटले आहे, की वस्तुयाथात्म्यज्ञान म्हणजेच तत्त्वज्ञान होय. ते वस्तुतंत्र (वस्तुजन्य) असते पुरुषतंत्र म्हणजे माणसांच्या कल्पनाविलासांवर अवलंबून नसते. येथे तत्त्वज्ञान या शब्दाचा प्रमा किंवा यथार्थ ज्ञान असा अर्थ आहे. या पुढे शंकराचार्य असे म्हणतात, की मंदांधकारामध्ये दिसणारा स्थाणू (म्हणजे झाडाचा बुडखा) पाहिला असताना हा स्थाणू आहे, की माणूस आहे, की दुसरे काही आहे, असा संशय उत्पन्न होतो. संशयास तत्त्वज्ञान म्हणत नाहीत. ‘माणूस किंवा दुसरे काही’असे वाटणे हे मिथ्याज्ञान म्हणजे भ्रम होय आणि ‘हा स्थाणूच आहे,’ हे तत्त्वज्ञान होय. कारण ते वस्तुतंत्र आहे. प्रमेसच शंकराचार्यांनी जसा ‘तत्त्वज्ञान’हा शब्द पर्याय म्हणून वापरला आहे तसाच वात्स्यायनांनीही न्यायभाष्यात (१·१·१) वापरला आहे.

येथे असा प्रश्न उपस्थित होतो, की एखादी वनस्पती म्हणजे झाड पाहिले म्हणजे त्यावरून ते झाड बीजापासून उत्पन्न झाले आहे, असे अनुमान होते धुरावरून अग्नीचे अनुमान होते नदीच्या पुरावरून वृष्टीचे अनुमान होते. या अनुमानाच्या वेळी बीज, अग्नी किंवा वृष्टी ह्या वस्तू नसतात, मग या अनुमानास वस्तुतंत्र का म्हणावे? ह्याचे उत्तर असे, की बीज, अग्नी किंवा वृष्टी या वस्तूंचे केव्हातरी प्रत्यक्ष ज्ञान त्या वस्तूंमुळे झालेले असते. वनस्पती, धूर किंवा पूर या कार्यरूप वस्तूही अगोदर पाहिलेल्या असतात म्हणून असे अनुमान होऊ शकते. तात्पर्य असे, की साक्षात किंवा परंपरेने वस्तू ही यथार्थ ज्ञानास कारण होतेच. ज्या वस्तू नित्यपरोक्ष असतात, उदा., वैशेषिकांचे अणू, आस्तिकांची (अदृष्ट) पाप-पुण्ये, सांख्यांची मूलप्रकृती यांचे अनुमान ⇨ कार्यकारणभाव नियमाच्या आधारे होत आणि कार्यकारणभाव हा सामान्य रूपाने मनुष्यांच्या प्रत्यक्ष अनुभवास आलेलाच असतो. तात्पर्य असे, की प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान हे वस्तुतंत्र असते, हा शंकराचार्यांचा सिद्धांत मानावाच लागतो.

ज्ञानाचे दोन प्रकार प्रमा व भ्रम होत. मंदांधकारात दुरून दिसणारा म्हणजे स्थाणू (बुडखा) ‘हा स्थाणू आहे’असे निश्चित ज्ञान प्रमा होय आणि ‘हा माणूस आहे’हे ज्ञान भ्रम होय. ‘हा’हे विशेष्य आणि ‘स्थाणु’हे विशेषण. विशेषण ज्या विशेष्यांशी संबद्ध आहे तेथेच त्या विशेषणाचे ज्ञान होणे म्हणजे प्रमा होय. ‘हा स्थाणू आहे’हे ज्ञान प्रमा होय. कारण ‘हा’या विशेष्याला ‘स्थाणु’हे विशेषण लागू आहे. ‘हा माणूस आहे’या उदाहरणात ‘हा’ (मंदांधकारातील स्थाणू हा पदार्थ) या विशेष्याला ‘माणूस’हे विशेषण लागू नाही तरी ते तेथे संबध्द म्हणून भासते म्हणून तो भ्रम होय. ज्या विशेष्याशी तेथे विशेषण वस्तुतः संबद्ध नसते परंतु तेथे भासते, तो भ्रम होय.

प्रमा व भ्रम असे हे ज्ञानांचे वर्गीकरण बौद्धांच्या विज्ञानवादी तत्त्वज्ञानाला मान्य नाही. त्यांच्या मते ज्ञानाच्या बाहेर बाह्यविषय असा नसतोच. सर्वच ज्ञाने स्वप्नासारखी असतात म्हणजे भ्रमात्मकच असतात. या विज्ञानवादावर असा आक्षेप उपस्थित होतो, की माणसाच्या जीवनव्यवहारामध्ये भ्रम-प्रमा म्हणजेच खरे-खोटे असा जो विभाग पडतो तो विभाग का पडावा? असा विभाग नसता, तर व्यवहारच कुंठित झाला असता. त्यावर त्यांचे उत्तर असे, की तत्त्वतः असा विभाग करता येत नसला तरी व्यवहारतः असा विभाग करता येतो. ज्या ज्ञानाने घडणारा व्यवहार निष्फल ठरतो, फसवणूक होते, ते ज्ञान भ्रम होय. ज्या ज्ञानाने घडणारा व्यवहार सफल होतो, ते ज्ञान प्रमा होय. निष्फळ होणे म्हणजेच विसंवाद आणि सफल होणे म्हणजेच अविसंवाद होय. व्यवहाराचे साफल्य म्हणजे झालेल्या विशिष्ट ज्ञानापासून निश्चितपणे अपेक्षित सुख, दुःख, सुखनाश वा दुःखनाश यांचा अनुभव होय. स्वप्नात पाहिलेला हत्ती जागृतीतही सापडला असता, तर सुखानुभव आला असता. तो आला नाही व हत्ती न सापडल्यामुळे दुःखानुभव आहे. दुरून पाहिलेला जलाशय जवळ गेल्यावर सापडला म्हणजे अपेक्षित सुखानुभव आला म्हणून जलज्ञानाने घडलेला व्यवहार सफल झाला, म्हणजेच जलज्ञान प्रमा ठरले. स्वप्नात आपल्या अंगणात पाहिलेला हत्ती जागृतीत कोठेच दिसत नाही म्हणून हत्तीचे स्वप्न हा भ्रम होय असे आपण म्हणतो. याचे कारण स्वप्न व जागृती या दोन ज्ञानांमध्ये विसंवाद दिसतो. ज्या ज्ञानाशी विसंवादी ज्ञान निर्माण होत नाही ते ज्ञान प्रमा होय. उदा., डोळ्याने आपण काही अंतरावर जलाशय पाहिला आणि नंतर आपण ते अंतर तोडून जेथे जलाशय पाहिला, तेथे गेलो व जलाशयच अनुभवास आला तेथे जलाशय नाही असा अनुभव आला नाही म्हणून दुरून झालेले जलाशयाचे ज्ञान विसंवादी ठरले नाही म्हणून त्यास प्रमा म्हणतात. परंतु उन्हाळ्यामध्ये दुरून जेथे जलाशय दिसला, तेथे जाऊन पोहोचल्यावर जलाशय नाही असे आढळले म्हणून दुरून झालेले जलाशयाचे ज्ञान विसंवादी ठरले म्हणून त्यास भ्रम म्हणतात. म्हणून बौद्ध विज्ञानवादाप्रमाणे अविसंवादी ज्ञान म्हणजे प्रमा होय व विसंवादी ज्ञान म्हणजे भ्रम होय. येथे विसंवाद म्हणजे एकंदर व्यवहारात उत्पन्न होणारा दोन वा अधिक ज्ञानांमधला विरोध होय. व्यवहार म्हणजे सफल प्रवृत्ती व निवृत्ती. प्रवृत्ति-निवृत्तिसाफल्य हे मध्ये ज्ञानात्मकच असते.


विशेष्याशी संबद्ध असलेल्या विशेषणाची विशेष्यामध्ये निश्चित येणारी प्रतीती म्हणजे प्रमा होय, असे प्रमेचे लक्षण वर सांगितले. हे लक्षण न्यायदर्शनात सांगितले आहे. पूर्वमीमांसा, वेदान्त व सांख्य या दर्शनांच्या मते हे लक्षण अपूर्ण आहे. मातापितरांचा अनुभव येत असतो. मातापितरांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मरण होते. ते जसेचे तसेच होते. त्या स्मरणास म्हणजे स्मृतीस प्रमा म्हणून म्हणता येणार नाही कारण मृत झाल्यानंतरही त्यांची जशीच्या तशी स्मृती होते परंतु त्यावेळी मातापितर नसतात. म्हणून त्या स्मृतीस प्रमा म्हणता येणार नाही. याकरिता वरील दर्शने वरील ‘यथार्थ ज्ञान’या व्याख्येमध्ये ‘स्मृतिभिन्न’या विशेषणाची अधिक भर घालतात. जो विषय अगोदर कळलेला नसतो, म्हणजे अनधिगत असतो, त्याचे यथार्थ ज्ञान म्हणजे प्रमा होय. यथार्थ म्हणजे भ्रमात्मक नसलेले अथवा अबाधित असलेले. भ्रम हा बाधित होतो. म्हणजे खोटा ठरतो.

प्रमेचे करण म्हणजे प्रमाण होय. प्रमाता म्हणजे ज्ञाता हे प्रमेचे साधारण कारण होय. कारण सर्वच प्रमांचा आश्रयरूप कारण प्रमाता होय. प्रमा ज्याला होते तो प्रमाता होय आणि करण म्हणजे असाधारण कारण होय. ज्या साधनाने प्रमात्याला म्हणजे ज्ञात्याला यथार्थ ज्ञानाची प्राप्ती होते ते साधन प्रमात्याचे कारण होय आणि तेच प्रमाण होय. ही प्रमाणे विविध असतात. उदा., इंद्रियांनी प्रमात्याला वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान, व्याप्तिज्ञानाने अनुमितिज्ञान, सादृश्यज्ञानाने उपमितीज्ञान व शब्द (वाक्य) ज्ञानाने शाब्दबोध होत असतो. हे ज्ञान खरेही असते आणि खोटेही असते. म्हणजे प्रमाही असते किंवा भ्रमही होतो. म्हणून निर्दोष असे ज्ञानसाधन हे प्रमाण होय, असे म्हणावे लागते. सदोष ज्ञानसाधनांनी भ्रम होतो. कावीळ झालेल्या माणसाला ‘पीतः शंखः’ (‘शंख पिवळा आहे’) असा भ्रम होतो. याचे कारण त्याचे चक्षू हे इंद्रिय पित्तदोषाने दूषित असते. सदोष ज्ञानसाधने ही भ्रमास कारण होतात.

ज्ञानाकरणक ज्ञान प्रत्यक्ष प्रमा व ज्ञानकरणक ज्ञान परोक्ष प्रमा, असे प्रमेचे दोन विभाग दिसतात. प्रत्यक्ष प्रमा ज्ञानेंद्रियाने होते. सकाळी उठल्याबरोबर चक्षूंनी जग दिसावयास लागते. अगोदर निद्रा असते म्हणजे ज्ञानाभाव असतो येथे प्रत्यक्ष ज्ञानास ज्ञान हे कारण नसते प्रत्यक्ष प्रमा ही ज्ञानाकरणक होय. परंतु अनुमिती, उपमिती, शाब्द या परोक्ष प्रमा ज्ञानकरणक ज्ञान असतात. व्याप्तिज्ञान, सादृश्यज्ञान व शब्दज्ञान ही ज्ञाने अनुमिती, उपमिती, शाब्दबोध यांची असाधारण कारणे होत.

प्रमेची असाधारण कारणे भिन्नभिन्न प्रकारची असतात म्हणून त्या असाधारण कारणांच्या वर्गीकरणावरून प्रमाणे किती, याबद्दल निरनिराळ्या भारतीय दर्शनांमध्ये यासंबंधी अनेक प्रकारचे मतभेद आहेत. प्रत्यक्ष हे एकच प्रमाण नास्तिक चार्वाक किंवा लोकायत दर्शन मानते. चक्षू, रसना, घ्राण, त्वक् आणि श्रोत्र ही बाह्य ज्ञानेंद्रिये आणि मन अथवा अंतःकरण ही प्रत्यक्ष प्रमाणे होत. अंतःकरणाचे देहाहून स्वतंत्र अस्तित्व चार्वाक मानीत नाही. बाह्य पाचच ज्ञानेंद्रिये तो मानतो. चैतन्य म्हणजे अंतःकरण हा गुण देहाचाच आहे, असे त्याचे मत आहे. इतर दर्शने अनुमान हे प्रमाण मानतात. अनुमान प्रमाण म्हणजे व्याप्तिज्ञान होय. प्रत्यक्ष व अनुमान ही दोनच प्रमाणे बौद्ध व वैशेषिक ही दोन दर्शने मानतात. वैशेषिक दर्शनाने उपमान, शब्द व अर्थापत्ती यांचा अनुमानात व अनुपलब्धीचा प्रत्यक्षात अंतर्भाव केला आहे. बौद्ध दर्शनाने अनुपलब्धीचा अनुमानात केला आहे. प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द ही तीन प्रमाणे सांख्यदर्शन मानते. शंकराचार्यही ही तीनच प्रमाणे मानतात आणि वस्तुतः हीच तीन प्रमाणे मुख्य होत. प्रत्यक्ष, अनुमान उपमान आणि शब्द ही चार प्रमाणे न्यायदर्शनाने मानलेली आहेत. प्राभाकरमीमांसेने अर्थापत्ती आणि कुमारिल भट्टांच्या मीमांसेने सहावे अनुपलब्धी हे प्रमाण मानले आहे. एकंदर भारतीय दर्शनांमध्ये या सहा प्रमाणांच्या संदर्भातच त्यांच्या संख्येबद्दलच्या मतभेदाची चर्चा चालते. दार्शनिक ऐतिह्य हे शब्दप्रमाणात, संभव व चेष्टा (अभिनय) अनुमानात आणि शकुन शब्दप्रमाणात वा अनुमानात अंतर्भूत करतात.

पहा : केवलाद्वैतवाद ख्यातिवाद जैन दर्शन (प्रमाणमीमांसा) द्वैतवाद (प्रमाणमीमांसा) न्यायदर्शन पूर्वमीमांसा बौद्ध दर्शन लोकायत दर्शन वैशेषिक दर्शन सांख्यदर्शन.

संदर्भ : 1. Dasgupta, S.N. A history of Indian Philosophy, 5 Vols., Delhi, 1975.            2. ईश्वरकृष्ण, सांख्यकारिका, निर्णयसागर प्रत, मुंबई, १९४०.              3. माधवाचार्य, सर्वदर्शनसंग्रह:, आनंदाश्रम प्रत, पुणे, १९२८.

जोशी, लक्ष्मणशास्त्री